वाढती वाहनसंख्या : भविष्यातील संकटाची नांदी !

वाहनसंख्येची समस्या लवकरच रौद्र रूप धारण करू शकते. यासाठी राज्य प्रशासनाने चिंतन करून वाहनसंख्येवर नियंत्रण आणण्याचे आणि या भीषण समस्येविषयी लोकजागृती करण्याचे उपाय लवकरात लवकर शोधले पाहिजेत.

आपल्याही दारात आपली स्वतःची गाडी असावी असे प्रत्येक व्यावहारिक माणसाचे स्वप्न असते. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अनेकांना मुहूर्त सापडतो तो गुढीपाडवा, दसरा किंवा दिवाळीचा. या तीन  सणांना गाड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी आणि विक्री होती. यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात ८६ हजार ८१४ वाहन खरेदीची नोंद करण्यात आली. वाहन खरेदीचे हे प्रमाण मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ३० टक्यांनी वाढले आहे. या वाहन खरेदीमध्ये अर्थातच शहरवासीय आघाडीवर आहेत. पुणे, मुंबई, नाशिक आणि ठाणे शहर पहिल्या पाचांत आहेत. शहरांत पूर्वी सर्वच गाड्या पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या असत, त्यानंतर सीएनजीचा पर्याय आला. इंधन खर्च वाचावा म्हणून लोकांनी आपल्या जुन्या गाड्या विकून सीएनजीवर चालणाऱ्या गाड्या खरेदी केल्या. आता विजेवर म्हणजेच बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या बाजारात येऊ लागल्या आहेत. त्यामुळे लोकांकडून या गाड्यांना अधिक पसंती मिळू लागली आहे. टॅक्सी रिक्षा यांच्याप्रमाणे खासगी वाहनांच्या खरेदी विक्रीवर कोणतेच बंधन नसल्याने शहरातील वाढती वाहनसंख्या डोकेदुखी ठरू लागली आहे.

 मुंबईतील वाढत जाणारी वाहनांची संख्या विचारात घेता भविष्यात मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागण्याची दाट शक्यता आहे. लोकसंख्येच्या भस्मासुराने मुंबईला आधीच गिळंकृत केले आहे. याचा भार लोकलगाड्या, बसगाड्या, टॅक्सी आणि रिक्शा यांवर पडत आहे. यांवर पर्याय म्हणून सुरु केलेली मोनो आणि मेट्रो रेल्वेही कमी पडू लागल्या आहेत. आजमितीला मुंबईकरांचे राहणीमान उंचावल्याने आणि लोकल अन्‌ बस गाड्यांतील जीवघेणी गर्दी नकोशी वाटू लागल्याने सर्वसामान्य मुंबईकरही स्वतःच्या मालकीचे वाहन घेऊ लागला आहे. व्यवसायासाठी घेतल्या जाणाऱ्या रिक्शा-टॅक्सींसह, ‘ओला, ‘उबेर यांसारख्या वाहतूक आस्थापनांच्या माध्यमांतून व्यवसाय करण्यासाठी विकत घेण्यात येणाऱ्या वाहनांचीही दरवर्षी यांमध्ये भर पडत आहे. वाढत जाणाऱ्या वाहनांच्या तुलनेत मुंबईतील रस्त्यांची संख्या आणि आकारमान मय्राादित आहे. मुंबईतील इंच इंच जागेला सोन्याचा दर असल्याने गाड्या उभ्या करण्यासाठी मोकळ्या जागाही कमी पडत आहेत. रस्त्यांवर उभ्या केल्या जाणाऱ्या गाड्या वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. त्यामुळे वाढत्या वाहनसंख्येवर नियंत्रण आणण्याची आज नितांत गरज निर्माण झाली आहे. दर वर्षी मुंबईतील वाहनांच्या संख्येत दोन ते तीन लाख वाहनांची भर पडते. पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वाढले असले तरी मुंबईकरांच्या हौसेपुढे ते नगण्य आहेत असेच म्हणावे लागेल. सद्यस्थितीत राज्यभरातील एकूण वाहनांपैकी १० टक्क्यांहून अधिक वाहने इवल्याशा मुंबईच्या रस्त्यांवरून फिरतात. मुंबईतील रस्त्यांची एकूण लांबी सुमारे १९०० किलोमीटर आहे. एकूण वाहनांची संख्या पहाता प्रति किलोमीटरमागे मुंबईत २३६८ वाहने आहेत. ‘मुंबईतील सर्व वाहने एकाच दिवशी रस्त्यावर आली, तर रस्त्यावरून चालण्याकरिता जागाच शिल्लक रहाणार नाही. असे मत वाहतूक तज्ञांनीही व्यक्त केले आहे. या आकडेवारीतूनच भविष्यात मुंबईचे काय होणार याचा अंदाज येतो.

 मुंबईतील वाढत जाणारी वाहनसंख्या वायू आणि ध्वनी प्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर घालत आहे. परिणामी नागरिकांना विशेषतः लहान मुलांना आणि वयस्कांना श्वसनाचे आणि फुप्फुसांचे विकार जडत आहेत. मुंबईत चालू असलेले मेट्रो-मोनो रेल्वे प्रकल्प, तसेच विविध कामांसाठी रस्त्यांत नियमितपणे होणारे खोदकाम या सर्वांचा परिणाम वाहतुकीच्या गतीवर होत असतो. त्यामुळे शहरातील सिग्नल यंत्रणेवर वर्दळीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात ताण येतो. यांवर पर्याय म्हणून सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत अवजड वाहनांना मुंबईत प्रवेशबंदी करण्यात आली होती; मात्र त्याचाही विशेष लाभ झाला नाही. जीएसटी आल्यानंतर ऑक्ट्रॉय नाकेही बंद झाल्याने मुंबईत येणाऱ्या वाहनांची संख्या आणखी वाढली आहे. वाहनसंख्येच्या क्रमवारीत मुंबईच्या पुढे असलेल्या दिल्ली शहरात एक दिवस सम क्रमांक असलेली आणि एक दिवस विषम क्रमांक असलेली वाहने चालवण्याचा पर्याय शोधण्यात आला होता; मात्र याचा भार सार्वजनिक वाहतूक यंत्रणेवर पडत असल्याने मुंबई शहरात हा पर्यायसुद्धा उपयोगाचा नाही. मुंबईप्रमाणे नवी मुंबई, ठाणे, पुणे या प्रगतशील शहरांतही काहीशी अशीच परिस्थिती आहे. - जगन घाणेकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 कोण म्हणतं आजची पिढी बेजबाबदार आहे ?