अघळपघळ
एक काळ होता की एखाद्याच्याच हाताला घड्याळ असे आणि बाकीचे लोक त्याला वेळ विचारुन घेत. त्याकाळी त्या घड्याळवाल्याकडे आणि वेळ विचारणाऱ्याकडे वेळच वेळ असे. लोक इतरांना वेळ देत असत. आता असे झाले आहे की घड्याळाची जागा वेळ दाखवणाऱ्या मोबाईलने घेतली आहे आणि तो जवळपास सगळ्यांकडेच आहे; पण वेळ मात्र कुणाकडेच नाही. थेट बोलायलाही...आणि ऐकायलाही!
विख्यात साहित्यिक व.पु.काळे यांच्या ‘भांडण' या कथेत एक वावय आहे.... ‘बायका बोलतात भरपूर आणि भांडतातही खूप..पण नेमका मुद्दा सोडतात.' मला वाटतं...बायकाच काय, अनेक पुरुषही नेमकेपणानं बोलायचं सोडून बाकीच्या फाफटपसाऱ्यासह बरेच काही बोलत असतातच की! अनेक बायका अबोल, शांत, अव्यक्त असतात त्याचं काय? अनेकजणी माहेरी बापाचा, भावाचा प्रभाव सोसत गप्प राहतात, सासर चांगलं मिळालं तर ठीक; नाहीतर सासू-सासरे-नवरोबा-दीर-जावा-नणंदा यांचीच तेथे चलती असेल तर तिथेही मुकाट बसण्याची वेळ त्यांच्यावर येते. तात्पर्य काय, की बोलायची संधी, वातावरण, बोलता येणं, मुद्दे मांडता येणं आणि समोरच्यांनी ते सारं ऐकण्याची मानसिकता ठेवणं हे सगळंच जुळुन यायला हवं.
संधी मिळो अथवा संधी हिसकावून घेत बोलण्याची वेळ येवो अथवा साधेपणाचं बोलणं असो..ते मात्र नेमकं, नेटकं, आटोपशीर हवं यावर कुणाचंही दुमत नसावं. आम्हाला पत्रकारितेच्या प्रशिक्षणात एक गोष्ट शिकवण्यात आली होती. ती म्हणजे बातमी बनवताना ती उलट्या त्रिकोणाच्या आकाराची हवी, म्हणजे महत्वाचे मुद्दे, वावये ही वरच्या बाजूला व दुय्यम, कमी महत्वाचा तपशील हा खाली लिहिला जावा. यामुळे बातमी जेंव्हा डेस्कवरील व्यक्तीच्या समोर जाते आणि जागेअभावी काही त्यातून कमी करायची, कापायची वेळ त्याच्यावर आलीच तर ती व्यक्ती बातमी खालून कापेल. हेच तत्व बोलतानाही लागू पडत असावे. रंगमंचावर किंवा प्रहसनात काम करणाऱ्या कलावंतांचे स्वतःचे काही आडाखे असतात. प्रवेश घेतल्यावर पहिल्या दोन तीन मिनिटांत प्रेक्षकांकडून जर अपेक्षित लापटर आला नाही तर पंच पडला, प्रवेश फसला, स्किट बोंबलले असे समजले जाते. म्हणजेच येथेही नेटकेपणाला, प्रभावीपणाला महत्व आहेच की! माझा एक ज्येष्ठ मित्र मी फोन त्याला केला तर पहिली चार पाच मिनिटे स्वतःबद्दल, स्वतःच्या पोरा-बाळांबद्दल, त्यांच्या कामगिरीबद्दल भरभरुन बोलायचा आणि मग सावकाश मध्येच आठवल्यासारखे करत ...‘हा तू बोल..तू फोन केला आहेस ना?' असं बोलून मोकळं व्हायचा. त्याने स्वतःहुन मला कधी फोन केला असला तर मग काही बोलूच नका. माझ्यावर हवकाचा (पण गाफील !) श्रोता व्हायची वेळ येत असे. ‘हां, हुँ, अरेरे, च्याक च्याक, असं का? काय सांगतोस? नाहीतर काय...' असे एकाक्षरी ते षष्ठाक्षरी शब्दच काय ते मला त्याच्या बोलण्यात जागा मिळेल तेथे शोधून बोलता येत असत.
माझ्या परिचयात अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्यांना अघळपघळ, पाल्हाळीक, पसरट बोलायची खूप सवय आहे. बरं तसंही त्यांनी बोलायला माझी काहीच हरकत नाही, पण समोरच्याला ते ऐकायला वेळ आहे का, तो त्या मानसिकतेचा आहे का, तो कसल्या कामात तर नाही ना याचा कसलाही विचार न करता हे लोक एकदम सुटतात ते मात्र आक्षेपार्हच वाटते. शहरी धकाधकीच्या जीवनात येथील नागरिकांचे जीवन घड्याळाच्या काट्याला बांधल्यासारखे असते. अशा वेळी कुणाच्या तरी घरात न बोलवताच घुसुन त्यांचा वेळ खाणे व त्यांना आपल्या शब्दामृताचे डोस पाजणे हे कोण सहन करील? काही ज्येष्ठ नागरिकांना कधी कधी असे वाटत असते की आपण आता ज्येष्ठ झालो ना, (खरे तर तसे होण्यासाठी कसलेच कष्ट घ्यावे लागत नसतात, कुणीही आपोआपच ज्येष्ठ होतच असते, तर ) मग आपल्याला आता इतरांना उपदेशाचे डोस पाजण्याची सनद मिळाली आहे म्हणून! बरं ते डोस पाजताना तरी व्यवस्थित मुद्देसूद तरी असावेत? तर तेही नाही. दुसऱ्याचा आरामाचा, त्याच्या घरातील विद्याथ्यार्ंचा परिक्षेचा/अभ्यासाचा, इतरांच्या आजारपणातील विश्रांतीचा वेळ वगैरे कसलाही मुलाहिजा न बाळगता काही व्यक्ती इतरांच्या घरात आगंतुकपणे अतिक्रमण करुन आपल्या वाणीचे ध्वनिप्रदूषण तिथे बिनदिवकतपणे पसरवतात. बरे, परिचित किंवा नात्यातलेच असल्याने त्यांना सरळसरळ हाकलून देण्याचीही सोय यजमानाकडे नसते. मुळात तो यजमानच नसतो, हेच मेहमान बनून त्याच्या घरी घुसखोरी करीत असतात. तिथे शिरुन स्वतःचीच गाऱ्हाणी त्या घरच्यांना न विचारता सांगणे सुरु करतात. सुनांच्या वागण्याबद्दलच्या तक्रारी, मुलगा ऐकत नाही, महागाई वाढलेय, राजकारणी मुजोर बनलेत, वातावरण बदलत चाललेय, आमच्या वेळी असे नव्हते असले काहीही ऐेकणाऱ्याला अजिबातच रुचि नसलेले बोलायला या लोकांना फार आवडते. हे ऐकताना मी एक निरीक्षण करुन ठेवलंय ही मंडळी बोलता बोलता एका विषयातून दुसऱ्या विषयात लिलया प्रवेश करतात. म्हणजे बघा एखादा तुमच्या घरी येऊन त्याच्या अपेंडिवसच्या ऑपरेशनची ष्टोरी तुम्ही न विचारताच सांगत बसला असेल तर ती ष्टोरी संपण्याआधीच तो अपेंडिवसमधून मुतखडा आणि मुतखड्यातून मुळव्याधीकडे कसा प्रवेश करील याचा काहीच नेम नसतो. बरं..हे त्याने स्वतःपुरतं तरी ठेवावं? पण नाही, तो त्याच्या दुखड्यासोबतच त्याच्या मुलीच्या, मुलाच्या, बायकोच्या दुखण्यांच्या ष्टोऱ्याही चऱ्हाट लावून सांगत बसतो.
एका विषयातून दुसऱ्या विषयात सहज प्रवेश करणारे हे लोक.. त्यांना राजकारण, हवामान, परदेश, रुपयाचे घसरणे, रशिया युक्रेन युध्द, म्यानमारचा भूकंप, बांगला देशातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती असा कोणताच विषय वर्ज्य नसतो. औरंगजेबाची कबर ते कुणाल कामरा अशा विविध विषयांकडे ते लिलया वळतात. कधी कधी मला वाटते की हे असलं अघळपघळ, पसरट, कुणीही न विचारलेलं, पाल्हाळीक बोलणाऱ्यांच्या घरचे वातावरण कसे असेल? त्यांना त्यांची पोरंबाळं, बायको, अन्य कुटुंबसदस्य कसे सहन करत असतील ? नंतर माझ्या लक्षात आले की या लोकांना घरी कुणीच विचारत नाहीत, ते बोलायला लागले की घरचे दटावतात, चूप करतात. म्हणून मग हे लोक बिनबुलाये म्हणून कुणाच्याही घरी घुसतात आणि आपली प्रच्छन्न इच्छा दुसऱ्याचे कान किटवून पूरी करतात. सर्वसाधारणपणे प्राध्यापक, शिक्षक मंडळी जास्त वेळ बोलतात असे समजण्याचा प्रघात आहे. त्यांना ठरवून दिलेल्या अर्ध्या किंवा पाऊण तास वेळेच्या तासिकेत बोलावे लागते आणि शाळा-कॉलेजची बेल झाल्यावर थांबून त्या वर्गावरुन निघावे लागते. पण माझ्या परिचयात, नात्यात असे अनेक शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य आहेत की जे त्यांचे कर्तव्य बजावत असताना योग्य तेवढेच बोलत विद्यार्थ्यांना शिकवतात. एरवीच्या जीवनात ते बऱ्यापैकी शांत असतात. विचारल्याशिवाय किंवा बोलावल्याशिवाय कुठे जात नाहीत आणि स्वतःहुन सुरुही होत नाहीत. एक काळ होता की एखाद्याच्या हातालाच घड्याळ असे आणि बाकीचे त्याला वेळ विचारुन घेत. त्याकाळी त्या घड्याळवाल्याकडे आणि वेळ विचारणाऱ्याकडे वेळच वेळ असे. लोक इतरांना वेळ देत असत. आता असे झाले आहे की घड्याळाची जागा वेळ दाखवणाऱ्या मोबाईलने घेतली आहे आणि तो मात्र जवळपास सगळ्यांकडेच आहे; पण वेळ मात्र कुणाकडेच नाही. थेट बोलायलाही...आणि ऐकायलाही! आज आपले आई-वडील, बहीण-भाऊ, मुलगा-मुलगी, जावई-सूना, आजी-आजोबा हे जवळ असले तरी त्यांच्याशी कमी बोलून लोक त्या जागेपासून अनेक किलोमीटर लांब असलेल्या दुसऱ्याच कुणाशीतरी मोबाईलवर बोलत असतात... तेही अघळपघळ..! पण समोर बसलेल्या आपल्या निकटवर्तीयाला जणू त्यांनी ऑप्शनला टाकलेले असते.
जेवढ्यास तेवढे बोला, विचारलेय तेवढेच सांगा, मुद्दा सोडु नका, बोलणे आटोपशीर ठेवा, समोरचा कंटाळून जांभया देईल, तुमच्या तोंडाकडे बघण्याऐवजी तोही त्याचा मोबाईल काढून त्यावर दुसऱ्यांशीच चॅटींग करायला सुरुवात करील अशी वेळ आणू नका असे सांगायची वेळ आणणारे तसे आहेत कमी. पण जे आहेत ते तापदायक आहेत..हे बरीक खरे! पण कधी कधी वाटते असे बोलघेवडे, अघळपघळ, पाल्हाळीक, पसरट, मुद्दे सोडुन बोलणारे, प्रेमाने आपली चौकशी करणारे, आपली ख्यालीखुशाली विचारणारे, न बोलावता आपल्या आनंदात सामील होऊन तो आनंद इतरांपर्यत आपल्या बोलीने पोहचवणारे लोकही आपल्या आयुष्यात असायला हवे असतात. शहरी, धकाधकीच्या, संघर्षाच्या, गळेकापू स्पर्धेच्या, दुसऱ्याला गाफील ठेवून स्वतःचे घोडे दामटणाऱ्या या मतलबी जगात असे स्वतःहुन पुढे बोलायला येणारे, आपल्यात रस दाखवणारे, थोडी आगाऊ वाटणारी आपली चौकशी करणारे लोकही आपल्या सभोवताली पाहिजे असतात. जे कळत-नकळत आपल्याला उर्जा पुरवतात, आपल्या तणावमुवतीसाठी विनाशुल्क प्रयत्न करतात. माणसांत आणि प्राण्यांत तेवढाच तर फरक आहे. त्यांना बोलता येत नाही. आपण बोलतो..ते किती? हा मात्र ज्याच्या त्याच्या तारतम्याचा भाग झाला. (मुशाफिरी) राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई