मार्च महिन्यातील सेवाकार्य
सेवाकार्यात व्यस्त होताना गेल्या दहा वर्षात तुमचंच तर बोट धरून रांगायला शिकलो...चालायला शिकलो... आता या टप्प्यावर तुम्ही माझी साथ कशी सोडाल? तुमच्या सोबतीची फक्त खात्रीच नाही तर विश्वास आहे मला...या संपूर्ण प्रवासात मी जर कधी तुटलो फुटलो, भंगलो...तरी मूर्ती बनवणारे तुमचे सुंदर हात जोवर आहेत तोवर मला चिंता नाही...! तुमच्या मदतीनेच तर येथवर पोहचून समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम करता आले. कायम साथ देत राहणाऱ्या या सुंदर हातांपुढे मी आणि मनीषा नतमस्तक आहोत...नतमस्तक आहोत!!
भिक्षेकऱ्यांना वाहिलेले प्रशिक्षण व रोजगार केंद्र
घरात तिन्ही त्रिकाळ गरिबी, कोणतीही कागदपत्रे नाहीत म्हणून शिक्षणाच्या वाटा बंद, सरकारी कोणतीही योजना लागू नाही, व्यवसाय करावा तर अंगात कोणतेही कौशल्य नाही, ज्याला विशेष कौशल्य लागत नाही असा व्यवसाय करायचा तर भांडवल नाही, बँक कर्ज देत नाही आणि इथून सुरू होतो याचना करत भीक मागत जगण्या-जगवण्याचा संघर्ष !
माझ्यासारखा एखादा यांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न करतो, पण यांना कागदपत्र देऊ शकेन अशी माझ्याकडे कोणतीही सत्ता नाही, मी काही कुठला उद्योगपती नाही त्यामुळे एक गठ्ठा लोकांना नोकरी देऊ शकेन अशी माझी काही ताकद नाही. याशिवाय रस्त्यावर काम करताना वेगवेगळ्या अटी, कायदे कानून यांचे पालन करत, तुम्ही आणि तुमच्या भिकाऱ्यांमुळे ट्रॅफिक जाम होते म्हणून लोकांच्या शिव्या खात, यांचे पुनर्वसन करायचे.... एक ना अनेक....रस्त्यावरचे माझे संघर्ष वेगळेच आहेत ! यातूनही आपल्या सर्वांच्या मदतीने त्यांना स्वतःचे रोजगार टाकून दिले, पोरांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले, पण त्याला मर्यादा आहेत.
आपल्याला जिथून कोणी उठ म्हणणार नाही, असे आपल्या या लोकांसाठी एक स्वतंत्र प्रशिक्षण व रोजगार केंद्र आपणच सुरू करावे, या विचाराने दहा वर्षांपूर्वी मला पछाडले. दहा वर्षांपासून केलेला स्वप्नाचा पाठलाग या महिन्यात सत्यात उतरला आहे. याविषयी खूप सविस्तर माहिती मध्यरात्रीचे सूर्य नावाच्या माझ्या लेखामधून मागे कळवली आहे. या प्रकल्पात धार्मिक स्थळांमधील निर्माल्य आमच्या भिक मागणाऱ्या लोकांना गोळा करायला लावून, या फुलांपासून ऑरगॅनिक पावडर तयार करण्याचे प्रशिक्षण देणार आहोत. याव्यतिरिक्त लिक्विड वॉश तयार करणे, (मेहता सोप कंपनी यांनी आपल्याला हे तंत्रज्ञान मोफत देऊ केले आहे) त्याचप्रमाणे कृत्रिम मोत्यांपासून तयार केलेला आकर्षक बुके तयार करणे, कापडी पिशव्या शिवणे, प्लास्टिक पिशवी वापरू नये यासाठी प्रबोधन करणे असे या प्रकल्पाचे ढोबळमानाने स्वरूप आहे. मिळालेल्या देणगी मधून या लोकांना सन्मानाने पगार दिला जाईल. तर तीस तारखेला, या सर्वांना नेण्यासाठी आम्ही एक बस केली होती. सकाळी आठपासूनच आमच्याकडे लगबग सुरू झाली. विविध ठिकाणी आपापल्या परीने नटून थटून आमचे आई-वडील आजी-आजोबा रस्त्यात वाट पाहत थांबले होते.
यातील बहुतांश व्यक्ती दिव्यांग ! यांना गाडीत बसवणे हिच मोठी कसरत. आमची वरात मग सेंटरवर आली. सर्वप्रथम आमचे आराध्य दैवत आदरणीय श्री गाडगेबाबा यांच्या पूजेने सुरुवात केली. गुढीपाडव्याला भिक्षेकरी-वृद्ध आई बाबा, आजी आजोबा यांच्या हस्ते वास्तुपूजन केले, आदरणीय श्री दानिशभाई शहा, आदरणीय श्री विपुल भाई शहा यांचे सत्कार आमच्या वृद्ध आजी आजोबांकडून केले. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक श्रीमती अनुश्रीताई भिडे, श्रीमती चारुलताताई पाटील, श्रीमती मंदाताई नाईक, श्रीमती अरुणा कपाळे, श्रीमती साधनाताई परब, श्रीमती सुमनताई कांकरिया, श्री महावीर शहा, श्री मनीष जैन यांचे सत्कार सुद्धा आमच्या वृद्ध याचक आई-वडिलांकडून केल्या. यानंतर या सर्वांच्या डोळ्यात आसवे तरळलेली माझ्या नजरेतून सुटलं नाही. आमच्या लोकांना काम समजावून सांगितले आणि सर्वप्रथम जास्त गरज असणाऱ्या, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगणाऱ्या लोकांना प्राधान्य देऊन त्यांना रोजगार देण्यासाठी सिलेक्ट केले.यानंतर त्यांचे प्रशिक्षण होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रॉडक्शन काही दिवसात सुरू होईल. गुढीपाडव्याचे औचित्य साधून, त्यांना खाऊ घातले, गोडधोड म्हणून मोतीचूर लाडू आणि काजु कतली सुरकुतलेल्या हातांवर ठेवली. त्यांचे आशीर्वादाचे हात डोक्यावर घेऊन माझा आणि मनीषाचा गुढीपाडवा खऱ्या अर्थाने साजरा झाला !
माझ्यासाठी हा कोणताही प्रकल्प नाही, माणसाला माणसात आणण्याचा प्रयत्न आहे, कायम दुर्लाक्षित असलेल्या या समाजाला, सन्मानाने माणूस बनवण्याचा एक प्रयत्न आहे...माझ्या या प्रयत्नात आपली सर्वतोपरी साथ आणि सोबत हवी आहे. आपल्या या प्रयत्नामुळे धार्मिक स्थळातील निर्माल्य आपोआप उचलले जाईल, हे निर्माल्य नद्यांमध्ये जाणे वाचेल, नद्या प्रदूषित होणे कमी होईल, निर्माल्यामधून लक्ष्मी पुन्हा अवतार घेईल, माझ्या लोकांच्या डोक्यावर सुख समृद्धीचा हात ठेवून त्यांना गावकरी होण्याचा..माणूस होण्याचा आशीर्वाद देईल. अशाप्रकारे पर्यावरणाचे संवर्धन करत अनेक कुटुंबांची पोट भरणारा हा प्रकल्प आहे. कुंडीत लावलेलं झाड, दिसायला दिसतं सुंदर; पण कुणीतरी पाणी टाकण्याची वाट पाहत दीनवाणे परावलंबी आयुष्य जगतं! जमिनीत रुजलेलं झाड दिसायला दिसत असेल ओबडधोबड, पण जमिनीतला ओलावा शोषून, ऊन वारा पावसाला तोंड देत स्वावलंबी आयुष्य जगतं !!
माझ्या या समाजाला परावलंबी कुंडीतलं शोभेचे झाड बनवायचंच नाही, ओबडधोबड का असेना, परंतु ताठ मानेनं स्वतःच्या जीवावर जगणारा; मोठा झाल्यावर दुसऱ्यांनाही सावली देणारा वृक्ष बनवायचा आहे...! बघू; २० तारखेला गुढी तर उभारली आहे, आता वाट बघतोय तुमच्या तथास्तु म्हणून दिलेल्या आशीर्वादाची..हे रोजगार केंद्र उभारण्यासाठी छोट्या छोट्या आणि किरकोळ गोष्टींपासून ते अत्यंत मोठ्या मोठ्या गोष्टींची जमवाजमव करण्यामध्ये खूप वेळ गेला. तरीही रोजची रस्त्यावरची वैद्यकीय सेवा सुरूच होती. मेडिसिन देणे किंवा कुबड्या, काठ्या, वॉकर, चेअर कमरेचे, मानेचे पट्टे अशी वैद्यकीय साधने नेहमीप्रमाणे रस्त्यावरील वृद्धांना आणि दिव्यांग व्यक्तींना दिल्या आहेत. कोणत्याही क्षणी जाऊ शकतील अशा रस्त्याकडेला पडून असणाऱ्या अनेक गंभीर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून हॉस्पिटलची सर्व बिले भागवली आहेत. या सर्वांना नव्याने जीवदान मिळाले आहे. यातील कित्येक लोक बेपत्ता म्हणून पोलिसांकडे नोंद होते. अशा लोकांना त्यांच्या घरी जाण्याची व्यवस्था करून दिली आहे. प्रौढ अवस्थेत अचानक बेपत्ता झालेली मुले जेव्हा त्यांच्या घरी; त्यांच्या वृद्ध आई-वडिलांना पुन्हा अचानकपणे भेटत असतील, त्यावेळी आई-वडिलांच्या डोळ्यातल्या ज्योती कशा चमकल्या असतील, खोल गेलेल्या डोळ्यांच्या विहिरी पुन्हा पाण्याने कशा भरल्या असतील, मातीच्या ढेकळागत ओबडधोबड झालेले सुरकुतलेले हात, सापडलेल्या पोरांच्या गालावर फिरून पुन्हा कशी उगवली असतील नाती...याचा कल्पनाविलास करून मीच सुखावून जातो... !
अत्तर कितीही सुगंधी असलं
तरी त्यावर फुलपाखरं बसत नाहीत,
त्यासाठी फुलच व्हावं लागतं... !
आई बापाची माया कळायला
आधी मुलच व्हावं लागतं...!!!
या महिन्यात विविध सणासुदीला, आमच्या लोकांना आम्ही चितळे यांचे साजूक तूप वापरून पुरणपोळी खाऊ घातली. कितीतरी आईंनी त्यांना दिलेली तुपाची पुरणपोळी उलट मलाच खाऊ घातली. एका मावशीने गोड बोलत बोलत जवळपास दीड पुरणपोळी माझ्या तोंडात कोंबून खाऊ घातली. मी म्हणालो, ‘मावशे बास की आता पोट भरलं माझं...'
यावर ती म्हणाली, ‘काय ल्येकरा, कुठली दीड पुरणपोळी ? आत्ताशी तर आर्दीच संपली...'
खरंच, जगातल्या कुठल्याच आईला हिशोब कसा येत नाही? माझ्या आभाळात ही माणसं इंद्रधनुष्य म्हणून येतात आणि मलाच रंगीत करून जातात.तर, आपण मांडलेल्या तीन अंकी नाटकाचा एक अंक आता संपला आहे. निर्माते आपण सर्वजण आहात...आम्ही दिग्दर्शक. नेपथ्य - श्री गणेश भाई शहा, श्री विपुल भाई शहा, श्री निलेश लिमये..संगीत योजना - आमच्या वृद्ध आई-वडील, आजी-आजोबांचे खळखळाट करत केलेले हसू. प्रकाश योजना - मध्यरात्रीतल्या आयुष्याच्या या टप्प्यावर डोळ्यात उगवलेला सूर्य. आणि भिक्षेकऱ्याचा मुखवटा फेकून देत गावकऱ्याच्या जबरदस्त भूमिकेत रस्त्यावरील आमचे आई-वडील, आजी आजोबा...! आता थोड्याच वेळात नाटकाचा दुसरा अंक सुरू होईल...माझ्यासाठी हा अंक जास्त महत्त्वाचा..या अंकात वृद्ध आणि दिव्यांगांना सेंटरवर आणून बसवणे आणि प्रॉडक्शनचे ट्रेनिंग देऊन त्यांच्याकडून प्रॉडक्शन तयार करून घेणे हा एक भाग. समाजातून ज्या कोणाला आमचे हे प्रॉडक्ट हवे असतील त्यांना ते देऊन, देणगी स्वरूपात मिळालेला निधी रोजगार केंद्रावर काम करणाऱ्या याचक मंडळींना देणे हा दुसरा भाग. या दोन्ही घटकांवर आम्हाला मदत करावीअशी मी आज तुम्हा सर्वांना प्रार्थना करतो..याचना करतो...! नेमकी काय आणि कशी मदत करायची याबद्दल पुन्हा सविस्तर कळवेनच असो, आपल्या या नाटकातल्या तिसऱ्या अंकाचा शेवट सुखद करायचा असेल तर याच दुसऱ्या अंकात जास्त परिश्रम घ्यावे लागणार आहेत.
आपल्या या नाटकाला कोणताही पुरस्कार नको, नामांकन नको, बक्षीस नको...काल रात्री विझलेल्या पणत्यांमधून, एखादी पणती पुन्हा उजळवता आली तर माझ्या आयुष्याचे सार्थक झाले असे मी समजेन. चला.. चला... थोड्या वेळात दुसरा अंक सुरू होतोय... तिसरी घंटा वाजते आहे... बापरे पडदासुद्धा उघडायला सुरुवात झाली...मला पुढे जायला हवे...मी निघतो...तुम्ही आहात ना सोबत? छे... मी पण काय प्रश्न विचारतोय? गेल्या दहा वर्षात तुमचंच तर बोट धरून रांगायला शिकलो...चालायला शिकलो... आता या टप्प्यावर तुम्ही माझी साथ कशी सोडाल? तुमच्या सोबतीची फक्त खात्रीच नाही तर विश्वास आहे मला...या संपूर्ण प्रवासात मी जर कधी तुटलो फुटलो, भंगलो...तरी मूर्ती बनवणारे तुमचे सुंदर हात जोवर आहेत तोवर मला चिंता नाही...! कायम देत राहणाऱ्या या सुंदर हातांपुढे मी आणि मनीषा नतमस्तक आहोत...नतमस्तक आहोत!!
लेखनकाल - दिनांक ३१ मार्च २०२५
-डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे डॉक्टर फॉर बेगर्स सोहम ट्रस्ट पुणे