पुस्तक परिचय
सध्या मी, माझी बायको व माझी मुलं इतके छोटे कुटुंब राहिले आहे. अनेकांना आई, वडिलांच्या जबाबदाऱ्या नको असतात त्यामुळे संम्पतीच्या बाबत वाद विवाद होतात. काही वेळा एखाद्या कुटुंबात तीन मुलं असतात. त्यापैकी एखाद्या मुलाच्या शिक्षणासाठी अथवा आजारपणासाठी जास्त खर्च केला जातो व त्यामुळे त्याची आर्थिक प्रगती खूप होते. अशावेळेस आई वडिलांना असे वाटत असते की आपल्या निधनानंतर ज्या मुलाच्या शिक्षणावर जास्त खर्च न झाल्याने त्या मुलाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे त्याला आपल्या निधनानंतर मिळकतीतील जास्त हिस्सा मिळावा.
अशा वेळेस मृत्यूपत्र लिहिले असेल व त्यात तसा उल्लेख केला असेल तरच त्यांच्या मनासारखे वाटप होते. अन्यथा कायद्याने अपत्यांना सारखे वाटप होते. गृह कलह टळावेत आणि कोर्टकचेऱ्या होऊ नयेत व आपल्या इच्छेप्रमाणेच आपली मालमत्ता आपल्या मृत्यूनंतर वाटली जाऊ शकते. यामुळे आपल्या पत्नीला कोणाच्याही मेहेरबानीवर अवलंबून राहावे लागणार नाही. ती सन्मानाने जगु शकेल अन्यथा तिला वृध्दाश्रमात सुध्दा रहावे लागेल.
मृत्युपत्र कायदेशीर करण्यासाठी अनेक बाबींची पूर्तता केलेली असणे आवश्यक आहे. ते स्टॅम्पपेपरवर करण्याची सक्ती नसली तरी सुरक्षित राहील आणि वारसांना वेळेवर मिळेल याची काळजी घेतली पहिजे. मृत्युपत्राची भाषा सुस्पष्ट असावी. ह्या संदर्भात श्री अरूण गोडबोले यांचे १७२ पानी पुस्तक जरूर वाचावे. १६० रुपये किंमत असलेल्या पुस्तकात मृत्यूपत्र कसे लिहावे याबाबत योग्य मार्गदर्शन केले आहे. ज्यांना मृत्युपत्र करायचे असेल त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावं.
अरूण गोडबोले हे उत्तम लेखक आहेत तसेच ते उत्तम वक्ते आहेत. सर्व ज्येष्ठ नागरिक संघ व इतर सामाजिक संस्था यांनी ह्या पुस्तकाचे लेखक श्री. अरूण गोडबोले यांना व्याख्यानासाठी निमंत्रण देऊन त्यांचे पुस्तक खरेदी करून संग्रही ठेवावे ही अपेक्षा. गुढीपाडव्यानंतर नवीन वर्ष आणि एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले आहे.त्यानिमित्ताने शक्य असेल त्यांनी लवकरात लवकर मृत्यूपत्र तयार करण्याचा संकल्प करावा ही अपेक्षा. - दिलीप प्रभाकर गडकरी