पेंदुर्ल्यांचे झाड
भात कापणीच्या हंगामातील प्रसंग. एक शेतकरी दीर्घ श्वास घेऊन आपल्या खारजमिनीतल्या लहानशा तळ्यात बुडी मारतो. तो दिसेनासा झाल्यानंतर थोड्या वेळाने एक निष्पर्ण काटेरी झाड हळूहळू तळ्याच्या वर येते. ते झाड त्याच बुडी मारलेल्या शेतकऱ्याच्या हातात आहे. या झाडाच्या फांद्यांवर पानांऐवजी काहीतरी जिवंत वस्तू असल्यासारखे दिसते. क्षणभर आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. कारण त्याच्या हातातील संपूर्ण झाड खेकड्यांनी भरलेले असते.
खेकड्यांचे झाड? असे कुठे असते का?
पुराणकथांतील चमत्कारांनाही मागे टाकणारे हे दृश्य; इथल्या शेतकऱ्याच्या परिचयाचे. पालघर, रायगड जिल्ह्यातील खाडीलगतच्या भातशेतीच्या जमिनींमध्ये पूरक उत्पन्न म्हणून शेततळी राखली जातात. पावसाळ्याच्या दिवसांत या लहान लहान तळ्यांमध्ये विविध प्रकारचे मासे अंडी घालतात. कापणीचा हंगाम येईपर्यंत शेतातले पाणी बऱ्यापैकी कमी होत जाते. अशा वेळी शेतातील मासळी हळू हळू या तळ्यांकडे सरकत जाते. त्यामुळे येथील शेतकरी कापणीच्या हंगामात तळ्यात साठलेली, वाढलेली मत्स्यसंपत्ती काढून घेतो. या तळ्यातील माशांची वाढ होईपर्यंत त्यांना कोणी पकडू नये म्हणून बोर, रांजण, हाटुरण यांसारख्या काटेरी झाडांच्या फांद्या तळाला गाडून ठेवल्या जातात. या मोठ्या झुडूपाला ‘झाप' म्हणतात. एखाद्याने या तळ्यात जाळे टाकलेच तर मासे मिळणे दूरच, पण त्या काट्यांमध्ये फसून त्याचे बहुमोल असे जाळेच फाटण्याची शक्यता असते.पाण्यात लपवलेले हे झाप कित्येक जलचरांसाठी आश्रयस्थान ठरतात. ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत चांगली वाढ होणारे ‘पेंदुर्ली' नावाचे खेकडेसुद्धा याच झापाचा आधार घेतात. मोठ्या संख्येने हे खेकडे काटेरी झुडूपावर चिकटून बसल्याने तिथे ‘खेकड्यांचे झाडच' उगवल्यासारखे वाटते.
हे खेकडे गोळा करून पोत्या-पोत्याने भरून स्थानिक बाजारात विक्रीसाठी आणले जातात. तुलनेने या खेकड्यांना कमी भाव मिळतो. पण या खेकड्यांच्या प्रेमात असलेले खवय्ये योग्य ती किंमत देऊ शकतात.
स्थानिक भाषेत पेंदुर्ली, बोदय, बोद्या या नावाने ओळखला जाणारा हा खेकडा पॅडलर क्रॅब (Paddler Crab) म्हणूनही ओळखला जातो. आथर्राेपोडा संघातील या प्राण्याला त्याच्या दहा हातांमुळे ‘डीकॅपोडा (Decapoda) या गणात स्थान मिळते. खाऱ्या पाण्यातले ‘चिंबोरी' नावाने प्रसिद्ध असणारे खेकडे आणि पेंदुर्ली यांतील मुलभूत फरक म्हणजे त्यांचे पाय. पेंदुर्लीचे पाय चपटे आणि त्यांवर लहान केसांप्रमाणे रचना असल्याने तिला सामान्य खेकड्यापेक्षा अधिक सफाईदारपणे पोहता येते. आपल्या पायांचा वल्ह्यांसारखा (Paddles) वापर करता आल्यानेच या खेकड्याला पॅडलर क्रॅब असे नाव मिळालेय. सामान्य खेकड्याप्रमाणे निवाऱ्यासाठी बिळ करण्याऐवजी पेंदुर्ली खेकडे भाडेकरूंप्रमाणे तात्पुरता निवारा शोधतात. मग हा निवारा कधी पाण्यातल्या झापांचा असतो किंवा कधी भाताच्या रोपांचा असतो. खारजमिनीतली भाताची रोपे ओलसरपणामुळे बऱ्याचदा झुकलेली असतात. या झुकलेल्या रोपांच्या बुंध्याला हे खेकडे खूप वेळा आढळतात. भात कापणीच्या पारंपारिक पद्धतीत बुंध्याला हात घालून विळ्याने कापणी केली जाते. अशा वेळेस तिथे दडून बसलेले हे खेकडे हाताला चावतात. (अर्थात खेकड्याचे हे चावणे सगळीकडून गांजलेल्या सामान्य शेतकऱ्यासाठी विशेष त्रासदायक ठरत नाहीत.) या खेकड्याच्या कवचाची रचना समद्वीभुज समलंब चौकोनाप्रमाणे असते. हे कवच तयार झाल्यानंतर त्याची वाढ होत नाही. आपण जसे आपली वाढ होत असताना लहान कपडे टाकून नविन कपडे घेतो, तसेच हे खेकडेही वरचे कवच टाकून आतील बाजूने नविन कवच तयार करतात. वाढीच्या पहील्या वर्षाला हे कवच बदलण्याची प्रक्रिया सहा ते सात वेळा घडते. त्यानंतर मात्र वर्षातून एक ते दोन वेळाच हे कवच-दान घडते. कवचाला लागूनच समोरील बाजूस गाडीच्या वायपरप्रमाणे वर येणारे दोन डोळे असतात. पाण्यातून वर आल्यावर हे डोळे तिथल्या खोबणीतून बाहेर निघतात. या लहानशा डोळ्यामध्ये शेकडो लहान लहान भिंगांची रचना असते. त्यांचा वापर पाण्याखाली, दाटी-फटींमध्ये लपताना मार्ग शोधण्यासाठी होतो. डोळ्यांच्या खालच्या बाजूस तोंडाचा भाग असतो. दातांचा त्रिफळा उडालेल्या व्यक्ती जशा अडकीत्त्याने सुपारी कातरून खातात तसेच हा खेकडादेखील आपल्या पंजाने अन्नाचे तुकडे करून नंतर तोंडात ढकलतो. नाही म्हणायला त्याच्या तोंडात तीन दात असतात. परंतु हे दात गोलाकार असल्याने अन्न चावण्याऐवजी केवळ घुसळण्याची क्रिया होते. पेंदुर्ली हा प्राणी मिश्राहारी. अन्न म्हणून त्याला वनस्पती, मृत जीव, मासे, कोलंबी यांसारखे जीव यातले काहीही चालते.
कोळ्याप्रमाणे सांध्यांवर वाकणाऱ्या पायांमुळे खेकड्यांना गंमतीने "Spiders of the Sea” असे म्हटले जाते. या पायांवर असलेल्या केसांमध्ये उवाही (Public Lice) होतात.(हो, तुमच्या आमच्या डोक्यात असलेल्या उवा!) उवांच्या बाबतीत इथे स्त्री-पुरूष भेद नाही. परंतु इतर शरीररचनेमध्ये बऱ्यापैकी फरक जाणवतो. नराच्या पोटाकडील भागाला त्रिकोणी आकाराचा एक कप्पा असतो, तर मादीच्या शरीराचा हाच भाग आकाराने मोठा व गोलाकार असून संपूर्ण पोटाकडील भागाला व्यापणारा असतो. मादीच्या पोटाकडील भागातच अंड्यांची उबवण होऊन त्यातून मोठ्या संख्येने लहान पिल्ले बाहेर पडतात. नर पेंदुर्लीचा पंजा मादी पेंदुर्लीपेक्षा आकाराने मोठा असतो. त्यामुळे "ये हाथ नही हथौडा है” म्हणत तो नेहमीच वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतो. याच पंजाच्या साह्याने आवाज करून संपर्कही साधता येतो. एखाद्या गब्बर शत्रूने या खेकड्यावर हल्ला केलाच तर ‘ये हात हमका दे दे ठाकूर” अशी मागणी व्हायच्या आतच तो आपले हात देऊन पळून जातो. पुढे योग्य पोषण झाले तर हा अवयव नव्याने उगवतो.
कोकणातील सुप्रसिद्ध खाद्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेकड्यांच्या तुलनेत पेंदुर्ली हे गरीबांचे अन्न म्हणून ओळखले जाते. परंतु पेंदुर्ली ही ‘बी १२' या जीवनसत्त्वाचा उत्तम स्त्रोत मानली जाते. त्यामुळे भविष्यात या खेकड्यांच्याही संवर्धनाचे प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खाडी किनाऱ्यावरची परिसंस्था धोक्यात आली असताना या सध्याच्या काळातही नेहमीप्रमाणे भातशेतीचा हंगाम येतो. तो शेतकरी आशेचा श्वास घेऊन आपल्या उरल्यासुरल्या खारजमिनीतील लहानशा तळ्यात बुडी मारतो. तो दिसेनासा झाल्यानंतर एक निष्पर्ण काटेरी झाड हळूहळू तळ्याच्या वर येते. बुडी मारलेल्या व्यक्तीच्या हातात ते झाड तसेच आहे. पण यावेळेस झाडाच्या फांद्यांवर पानांऐवजी फक्त काटेच दिसतात. पूर्वीसारखे खेकड्यांनी भरलेले झाड दिसत नाही. या झापांवरचा खेकड्यांचा आढळ कमी झालाय. कायम एकमेकांचे पाय ओढणाऱ्या मानवामुळे ‘खेकड्यांच्या झाडाची' पानगळ झालीय. खाऱ्या पाण्यातील हे खरे चमत्कार पुन्हा पहायला मिळणे कठीण होत चाललेय. पण आशा अजूनही जिवंत आहे, पुन्हा एकदा नवी मुंबई, रायगडच्या खाडीकिनाऱ्यावर पूर्वीसारखीच जीवसृष्टी नांदेल. योग्य सहाय्य लाभल्यास पेंदुर्ल्यांनी भरलेले हे ‘खेकड्यांचे झाड' पुन्हा एकदा बहरेल. शेतीपूरक व्यवसायाला पुन्हा संजीवनी मिळू शकेल. - तुषार म्हात्रे