लहानपण देगा देवा..

मी  एस. वाय. बी. एस्सी. च्या चौथ्या सेमिस्टरच्या प्रँक्टीकल परीक्षाचा परीक्षक असल्यामुळे बरोबर नऊ वाजता महाविद्यालयात आलो. आज दिवसभर ही परीक्षा होती, शिवाय टी. वाय. च्या सेमिस्टर सहाच्या प्रत्याक्षिक परीक्षाही लगेच असल्याने त्या विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेशन सोबत होते. करोना महामारीमुळे विद्यार्थी शिक्षणासाठी फार उत्सुक दिसत नाहीत. यामुळे त्यांना वेळेचे महत्व नाही. हे विद्यार्थी फार रिलँक्स दिसतात. त्यांना कसली, म्हणजे कसलीही शिक्षण घेण्याची ओढ नाही. याच कारणाने अनेक विद्यार्थी प्रत्याक्षिक परिक्षाला परीक्षक आले तरी प्रयोगशाळेत येत नाहीत. म्हणजे परीक्षक अगोदर येतात व विद्यार्थी नंतर अशी काहीशी आमची अवस्था असते.

याहीवेळी त्याचा अनुभव आला. बरेच विद्यार्थी उशिराने आले. काहींनी प्रत्याक्षिक पुस्तिका आणल्या नाहीत तर काहींनी पुस्तिका पूर्ण केलेल्या नसल्याचे आढळले. हळूहळू सर्व विद्यार्थी प्रयोगशाळेत आले व ही प्रात्यक्षिक परीक्षा एकदाची नीट मार्गी लागली. माझ्यासोबत आणखी दोन सहकारी शिक्षक परीक्षकहोते. आमचे सुपरवायझर प्रयोगशाळेत परिक्षा व्यवस्थितपणे चालू झाली की नाही हे पहायला आले.त्यांच्या सोबत संवाद साधता-साधताच मी त्यांच्या सोबत प्रयोगशाळेच्या बाहेर आलो. सुपरवायझरपुढे निघून गेले. तेवढ्यात मैदानाकडून मुलांच्या आलेल्या आवाजाने माझे लक्ष वेधले. प्रयोगशाळेच्या समोरील मैदानावर आमच्या संकुलातील प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरी-चौथीची मुले दोन ग्रुप मध्ये स्वतःला विभागून एक प्लास्टिक शितपियाच्या बाटलीला चेंडू म्हणून एकमेकांकडे फेकतांना दिसले. समोरच्या ग्रुपने ती चेंडूवजा बाटलीचा झेल घेतला तरी किंवा न घेतला तरी ते उड्या मारून आपला आनंद व्यक्त करीत होते.

मी आणि सहकारी हे निरागस खेळाचे चित्र डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करीतच माझ्या बालपणीच्या बालविश्वात डोकावत होतो. मला तर हा क्षण खूपच सुखकर वाटला, म्हणून मला समोर जावून त्यांचे एक दोन फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. दहा अकराचे कोवळे उन्हं (तापमान) उन्हाळा असल्याने जास्तच वाटत होते. पण ते त्या खळात ऐवढे दंग झाले होते की त्यांना याचे भानही नव्हते. मी त्या निरागस बालकांचे काढलेले फोटो प्रखर उन्हात फार क्लिअर आले नाहीत, पण हे या क्षणी महत्वाचे नव्हतेच. या वयात त्यांचा निरागस खेळ मला फार महत्वाचा वाटत होता. आपणही हे असंच खेळलो, इकडे तिकडे बागडलो. आत्ताच्या सारखे तेव्हा आपण काय शिकतो, कशासाठी शिकतो हा आपल्यासह आपल्या आईवडीलांनाही तेव्हा कधी प्रश्न पडला नाही.लिहीता-वाचता येणे हेच तेव्हा जास्त अपेक्षित होते. या अशा निरागस बालपणातच उद्याचे भविष्य दडलेले असते हेच खरे आहे. करोना महामारीमध्ये शिक्षण क्षेत्रात आलेली मरगळ काही अंशी कमी होण्यास मदत होईल. ही अशा या विद्यार्थ्याकडून व्यक्त करायला हरकत नाही, ही अशा माझ्या मनात झाडांना फुटलेल्या चैत्र पालवी सारखी वाटली.

 एकीकडे इंग्रजी शाळा मुलांचे बालपण हिरावून घेतअसतांना मराठी शाळेतील हे विद्यार्थी किती बिनधास्त आपले बालपण अनुभवतात याचे ही मला कौतुक वाटले. असा काहीसा विचार चालू असतांना सर या हाकेने मी भानावर आलो. एवढा वेळ मनात चाललेला गोंधळ व विचारांचे काहुर क्षणात गळून पडले असे वाटले मी पुन्हा प्रयोगशाळेत घुसलो वपूर्ववत कामाला लागलो. या क्षणी मला एकच लहानपणी शिक्षकांनी मनावर बिंबवलेली म्हण आठवली,  लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा..
-डॉ. श्रीकृष्ण दिगंबर तुपारे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 पेंदुर्ल्यांचे झाड