श्रद्धा, भक्ती आणि पर्यटनाचा अनोखा मिलाप श्री क्षेत्र जेजुरी

श्री खंडोबाची कार्य, कीर्ती व चरित्र अनुभवायचे असेल तर एकदा तरी जेजुरीला यावेच लागेल. उत्सुकतेपोटी तसेच श्रद्धा व पर्यटन म्हणून आज जेजुरी नगरीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्यादेखील लक्षणीय आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेले व साक्षात श्री खंडोबाचे गडाचे स्थान असलेल्या जेजुरीला भक्तगणांबरोबरच निसर्गप्रेमी व गडप्रेमी देखील आवर्जून भेट देतात.

 जेजुरीच्या खंडेरायाची महती आज सर्वदूर पसरलेली आहे. जेजुरी हे वीरांचे दैवत व महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. आमच्या कुटुंबाचेदेखील कुलदैवत खंडोबा असल्याने दरवर्षी श्री क्षेत्र जेजुरी येथे दर्शनासाठी जातो. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ठाण्यावरून मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस पकडून सहकुटुंब जेजुरीला दुपारी दोनच्या सुमारास पोहोचलो. जेजुरी स्थानक आता पूर्वीपेक्षा अत्यंत सुंदर व जेजुरगडाची छबी असलेले बनवण्यात आले आहे. पूर्वी येथून येण्याजाण्यासाठी एकच फलाट होता. त्यामुळे एकावेळी दोन ट्रेन आल्यास दुसऱ्या बाजूच्या गाडीतील प्रवाशांना सरळ रेल्वे पटरीवरच उतरावे लागायचे. मी व इतर अनेक प्रवाशांनी दर वेळेस अनेकदा या ठिकाणी आल्यानंतर जेजुरीच्या रेल्वे स्टेशन मास्तरकडे याबाबत तक्रार केलेली होती. मात्र आता दोन्ही बाजूला फलाट, त्यावर शेड, बसायला बाकडे व फलाटाची लांबीदेखील वाढवण्यात आली आहे. जेजुरगडाला असलेल्या प्रवेशद्वारासारखे हुबेहूब मुख्य द्वार स्थानकाला बनवण्यात आल्याने रेल्वे स्थानकापासूनच खंडेरायाच्या नगरीत आल्याचा फील येतो.

रेल्वे स्टेशनवरून जेजूरी गावाचे अंतर एक ते दीड किलोमीटर असून नाममात्र भाड्यात शेअर प्रवाशी रिक्षांची सोय त्यासाठी उपलब्ध आहे. मात्र एका रिक्षात प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशी भरणे, स्वतंत्रपणे रिक्षा करून जायचे असल्यास अवाच्या सव्वा भाडे आकारणे हे प्रकार इथेही दिसतात. जेजुरी गडाच्या पायथ्याशी मुक्काम करायचा असल्यास अनेक छोटी हॉटेल्स उपलब्ध असून माफक दरात येथे निवासाची सोय उपलब्ध आहे. संस्थांनचे भक्तनिवासदेखील उपलब्ध आहे. आम्हीदेखील पायथ्याशी एका हॉटेलमध्ये रूम घेतली. दुपारचे जेवण वगैरे उरकल्यावर थोडी विश्रांती घेतली व साडेचारच्या सुमारास गड चढायला लागलो. जेजुरीचा गड चढण्यासाठी मोठमोठ्या दगडाच्या पायऱ्या थोडया धोकादायक असल्या तरी त्यांना पौराणिक पार्श्वभूमी असल्याने व अनेक भक्तगण सोबत प्रवास करत असल्याने काही अडचण जाणवत नाही. गड चढताना काही ठिकाणी बसायलादेखील जागा असल्याने दमल्यावर थोडे बसता येते. माझी पाच वर्षाची मुलगीदेखील उत्साहात एका दमात पायऱ्यांवरून आमच्यासोबत गड चढली. वयोवृद्ध, दिव्यांग, शारीरिकदृष्ट्या असमर्थ असलेल्यांसाठी या ठिकाणी सशुल्क डोलीची व्यवस्थादेखील आहे. मध्ये काही फोटोग्राफी करणारे व्यावसायिक गडासोबत विविध पौराणिक वेषभूषा करून आपले फोटो काढून लगेच देत असतात. त्याचा आस्वाद घेत साधारणतः २०-२५ मिनिटांत आम्ही गडावर पोहोचलो. गडावर नेहमीप्रमाणे उत्साहाचे वातावरण होते.

 भंडारा उधळणे, जयघोष करणे यांसह पूजा अर्चेमध्ये भाविक व्यस्त होते. अनेक नववर-वधू लग्नानंतर दर्शनासाठी तिथे आल्याचे दिसले. फारशी गर्दी नसल्याने अर्ध्या तासातच आमचे दर्शन झाले. त्यानंतर अर्धा तास गडावरच आम्ही भ्रमंती केली.

जेजुरगड ८व्या शतकात बांधल्याचे पुरावे सापडले आहेत. सन १५५३ ते १७७८ या कालावधीत गोविंद कुलकर्णी, अहिल्यादेवी होळकर यांसह अनेक मराठा सरदारांनी या गडाच्या तटबंदी, मुख्य गाभारा, दीपमाळा, वेशीचे काम पूर्ण केले. गडावरील भंडाऱ्यामुळे सर्वत्र पसरलेले पिवळे आच्छादन, खंडोबा, म्हाळसा तसेच विविध देवतांची मंदिरे, धुनी, मोठमोठे दगडी खांब यांमुळे वातावरण अगदी भक्तिमय वाटते. त्यातच भर म्हणून ‘येळकोट येळकोट जय मल्हार' ‘सदानंदाचा येळकोट' चा जयघोष सातत्याने सुरूच असतो. जेजुरगडाचे सर्व व्यवस्थापन आता श्री मार्तंड संस्थांनच्या माध्यमातून शासकीय झाल्याने पूर्वी पूजा, अर्चा, विधींसाठी प्रकर्षाने जाणवणारा पंडीतांचा त्रास जाणवत नाही. यामुळे भाविकांची होणारी लूट थांबलेली असून यासाठी श्री मार्तंड संस्थानला धन्यवादच दयायला हवेत. त्याचबरोबर संस्थांनच्या माध्यमातून भक्तांसाठी अनेक सुविधा व लोकोपयोगी कामेदेखील करण्यात करण्यात आली आहेत. गडाची डागडुजी करण्यात आलेली असून त्यामुळे गडाचे सौंदर्य अधिकच खुलुन दिसते.

 खंडोबा, म्हाळसा व बानुबाई यांच्या चरित्राभोवती फिरणारा या गडाचा इतिहास असून गडावरील विविध पौराणिक वस्तू व देवळे त्याची साक्ष देतात. गडावरूनच साधारणतः ३ ते ४ किलोमीटर दूर कडेपठार हादेखील ऐतिहासिक परिसर असून बानुबाईचा बानुगड किंवा जुनागड किंवा मल्हारगड म्हणूनदेखील प्रचलित आहे. जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला आलेले बहुतेक भक्त कडे पठारला भेट देतातच. शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तेथून जवळच अष्टविनायक स्थानांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र मोरगाव येथील श्री मयुरेश्वर मंदिरास भेट देऊन आम्ही दर्शन घेतले. त्यावेळी मंदिर समितीच्या वतीने कार्यालयात शाल श्रीफळ देत सन्मानीतही करण्यात आले. त्यानंतर पुन्हा जेजुरीत परतलो आणि हॉटेल अभिषेक येथे रात्रीचे भोजन करत त्या दिवशी आम्ही जेजुरीतच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी सातच्या सुमारास मी कडेपठारकडे कूच केली. सुरुवातीचा वन विभागाने विकसित केलेला थोडा भाग सोडला तर कडेपठारचा पुढील रास्ता काहीसा अवघड व धोकादायक आहे. दगड, धोंडे, पायवाट, उंच चढाव, मध्येच दगडी पायऱ्या अशा पद्धतीचा हा रस्ता डोंगराच्या दोनही बाजूस कोणतेही संरक्षण नसल्याने काहीसा धोकादायक वाटतो. असे असले तरी अनेक आबालवृद्ध, नवदाम्पत्ये या प्रवासात मोठ्या श्रद्धेने चालत असल्याचे दिसून येते. कडेपठारला पोहोचायच्या आधी बाणाई मंदिर रस्त्यात आपले लक्ष वेधून घेते व नंतर शिवमल्हार मंदिर. कडेपठार देवस्थानमध्ये खंडेरायाच्या सुंदर प्रतिमा स्थापित असून ३ ते ४ किलोमीटर चालण्याचा थकवा या दर्शनाने निघून जातो. श्री खंडोबा, म्हाळसा व बाणाईच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या जेजुरी नगरीस भेट देवून आपण सर्वांनीच एक अदभूत तीर्थक्षेत्र भेटीचा अनुभव घ्यावा यासाठीच हा लेखप्रपंच. - वैभव मोहन पाटील 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

लहानपण देगा देवा..