पुस्तक वाचन आणि पुस्तक संग्रह

काही चांगल्या पुस्तकांच्या आवृत्त्या परत निघतीलच याची शाश्वती नसते. मोबाईलवर पुस्तक वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष पुस्तक वाचणे जास्त नेत्रसुखद असते.

पुस्तक वाचन आणि पुस्तक संग्रह या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. तरीही त्या परस्पर पूरक आहेत. मी साहित्यिक आणि पत्रकारही असल्याने हे दोन्ही छंद माझ्या पथ्यावरच पडले! १९७६-८० या काळात मी मुंबईला महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यावर मुंबईला प्रथम बृहन्मुंबई महानगरपालिकेत आणि नंतर बँक ऑफ इंडियात कामाला लागलो.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना रेन आणि मार्टीनच्या इंग्रजी व्याकरणाचा बोलबाला होता. तेव्हा ते पुस्तक मी विकत घेतले. पुस्तकाचे प्रत्येक प्रकरण विद्यार्थ्यांना सुंदर त-हेने समजावून सांगितले आहे. दर प्रकरणाच्या अंती काही प्रश्न विचारलेले असत. ते ते प्रकरण विद्यार्थ्यांना किती अवगत झाले आहे, हे समजण्यासाठी हा खटाटोप होता. काही प्रश्न मला नीट सुटत नसत. तेव्हा मात्र माझी पंचाईत होत असे.

चर्चगेट रेल्वे स्टेशनजवळच सीटीओची (केंद्रीय तार खात्याची) ब्रिटीश काळातील दगडी इमारत होती. अजूनही आहे. पण आता तार खाते बंद झाले आहे एवढेच. त्या इमारतीच्या दक्षिणेस आणि पूर्वेस दगडी कुंपणाच्या आसऱ्याने जुन्या आणि दुर्मिळ पुस्तकांची उघडी दुकाने होती. याच इमारतीच्या दक्षिणेला रस्त्यापलीकडच्या जुन्या दगडी इमारतीच्या उत्तर बाजूच्या कुंपणाच्याही आसऱ्याने अशी दुकाने होती. तिथे इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजराती भाषेतील पुस्तके वाजवी भावात विकत मिळत. हिंदू पॉलिटी (इंग्रजी) (के.पी.जायस्वाल), माटी की मूरतें (हिंदी) (रामवृक्ष बेनीपुरी), भागवत प्रवचनो (गुजराती) (डोंगरे महाराज), एकनाथ महाराज मंडळ, सातारा यांनी प्रकाशित केलेले एकनाथी भागवत, इतिहास मंजिरी (संपादक द.वि.आपटे), महाराष्ट्राचे दुसरे वेड (पु.रा.लेले)... अशा कितीतरी जुन्या आणि दुर्मिळ पुस्तकांचा मी संग्रह करून ठेवलेला आहे.

एक दिवस मी सीटीओजवळ पुस्तके चाळीत असताना मला रेन आणि मार्टीनच्या इंग्रजी व्याकरणाचे गाईड हाती लागले! मी लगेच ते विकत घेतले. एक दिवस घरात रेन आणि मार्टीनच्या इंग्रजी व्याकरणाचा विषय निघाला. तेव्हा त्याचे गाईड मला अचानक कसे मिळाले, ते मुलीला सांगत होतो. तेव्हा मुलगी म्हणाली, अण्णा, आजकाल आपण हवे ते पुस्तक आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून वाचू शकतो. त्यासाठी या पुस्तकांचा कचरा कशाला जमा करून ठेवला?

मी मुलीला म्हणालो, काही चांगल्या पुस्तकांच्या आवृत्त्या परत निघतीलच याची शाश्वती नसते. मोबाईलवर पुस्तक वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष पुस्तक वाचणे जास्त नेत्रसुखद असते. शिवाय पूर्वी मोबाईलचा शोध लागला नव्हता. एक पुस्तक वाचणे म्हणजे एक माणूस वाचणे होय, असे म्हणतात. मी अनेक माणसे वाचतो. मला कोण वाचणार? की माझाही कचरा होणार? - नाना ढवळे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 श्रद्धा, भक्ती आणि पर्यटनाचा अनोखा मिलाप श्री क्षेत्र जेजुरी