उतारवयातील कुत्तरओढ टाळायची असल्यास...!

मुलगी असो किंवा मुलगा शिक्षणासमवेत त्यांना संस्कार देणे, समानतेचे, कर्तव्याचे धडे देणे फार गरजेचे आहे. भोळेभाबडे, जे आपल्या मुलांनाच आपली संपत्ती समजत आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावून त्यांच्या उज्वल भविष्याचे स्वप्न पाहतात अशा आई-वडिलांचे नशिबी मात्र असे दयनीय म्हातारपण येते. आई-वडील जे मुलांमध्ये उद्याचे शिल्पकार पाहत असतात, त्यांनी संपूर्णपणे मुलांवर आधारित न राहता शंभर रुपये मिळकतीतील किमान दोन रुपये तरी स्वतःसाठी, मुलांना माहीत न होता बचत करावी.

घरोघरी गोड-धोड बनलेच असेल; तसेच आनंदाने व उत्साहाने हा सण सर्वांनी साजरा केला असेल. हा अनुभव कालचाच आहे. कामानिमित्त  कवी संमेलनानिमित्त किंवा संस्थेच्या काही कामांमध्ये महिला सशक्तीकरण सबलीकरण महिला विकास अशा काही कारणास्तव जेव्हा बाहेर जाण्याचा योग्य येतो तेव्हा कान-डोळे आजूबाजूला ऐकत असतात पहात असतात.  पूर्वीसुद्धा बहुतेक वेळा असा अनुभव आला आहे. रस्त्याच्या किनारी बस स्टॉपवर किंवा बाजारात सोडून दिलेल्या भटकत असलेल्या अनेक आई-बाबांना पाहिले आहे. डोळे भरून येतात आणि स्वतःच असहाय्य असल्यासारखे वाटते. कवितेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करते; परंतु आज हा लेख मुद्दामून मुला-मुलींसाठी नसून आई-वडिलांसाठी लिहीत आहे. आपण मुलांना जन्म देतो. त्यांचे पालन पोषण करतो,  शिक्षण, आरोग्य, भविष्य यासाठी कष्ट करतो; रात्रंदिवस त्यांची चिंता आपल्याला होत असते. या स्पर्धेच्या (महागाईच्या) युगात मुलांना सो कॉल्ड स्टेटसप्रमाणे आयुष्य जगता यावे म्हणून आई-वडील दोघांनाही नोकरी करावी लागते, अशा वेळेस मुलांना बाहेरच्या स्पर्धात्मक जगात वावरण्याची कला, जगण्याची कला अवगत करून देताना घरचे संस्कार द्यायचे राहून जातात आणि आपण जे काही करतो ते मुलांच्या दृष्टीने आपले कर्तव्यच होते असा शिक्का मारून मुले मोकळी होतात.

खूप उच्चशिक्षित, वस्तुस्थिती जाणणारे म्हणजेच प्रॅक्टिकल विचारांचे आई-वडील सहसा उघड्यावर पडलेले दिसणार नाहीत असे आई-वडील आपले भविष्य म्हणजेच म्हातारपण सुरक्षित करतात. परंतु भोळे भाबडे जे आपल्या मुलांनाच आपली संपत्ती समजून आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावून त्यांच्या उज्वल भविष्याचे स्वप्न पाहतात. अशा आई-वडिलांचे नशिबी मात्र असे दयनीय म्हातारपण येते. माझे विनंती आहे की सर्व आई-वडील जे मुलांमध्ये उद्याचे शिल्पकार पाहत असतात, त्यांनी संपूर्णपणे मुलांवर आधारित न राहता शंभर रुपये मिळकतीतील किमान दोन रुपये तरी स्वतःसाठी, मुलांना माहीत न होता बचत करावी. आपला स्वाभिमान आणि आपल्या जोडीदाराची जबाबदारी आपणच घेतली पाहिजे. नवरा बायको यांनी पारदर्शकपणे यावर बोलले पाहिजे. दुर्दैवाने जर एक जोडीदार अगोदर निघून गेला तर दुसऱ्याचे भयाण हाल होतात. त्यातूनही जर मुलांनी हेळसांड केली तर नरकयातना सोसाव्या लागतात. समाजाने आता अनुभवातून शिकले पाहिजे जर मुलांना जन्म देणे, पालन पोषण करणे त्यांचे शिक्षण, आरोग्य ही आपली जबाबदारी आहे आणि मुलांच्या मते कर्तव्यच आहे; तर त्यांना त्यांचे कर्तव्य नक्कीच समजणार नाहीत. स्वतःच्या चुकांसाठी वकील होणे सोपे असते. आई-वडील उतार वयात गुन्हेगार ठरत असतात. ते कुठे कमी पडले याचा पाढा मुले वाचून दाखवतात आणि, ”तुम्ही केलेच काय आमच्यासाठी? असा आरोप लावून स्वतःच्या कर्तव्यातून स्वतःची सुटका करून घेतात. सामाजिकतेचे भान राखून किंवा हळव्या मनाचे काही लोक मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. चांगली माणसे अजून संपलेली नाहीत. माणुसकी पूर्णतः मेलेली नाही तरीसुद्धा स्वतः समजदार बनणे कधीही चांगलेच.

मुलगी असो किंवा मुलगा शिक्षणासमवेत त्यांना संस्कार देणे, समानतेचे, कर्तव्याचे धडे देणे फार गरजेचे आहे, ती काळाची गरज आहे. - सौ. सुचिता बागडे-खाडे 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

वीर नारायण मंदिराची आणखी काही वैशिष्ट्ये