गुढीपाडवा शोभायात्रेचा पाया रचला डोंबिवली शहराने !

डोंबिवली शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री गणेश मंदिर संस्थानाच्या पुढाकाराने आयोजित गुढीपाडवा शोभायात्रेची प्रेरणा सर्वांनीच घेतल्याने महाराष्ट्र आणि परदेशातसुद्धा विविध अशा शोभायात्रेचे आयोजन आता होऊ लागले आहे. या शोभायात्रेमुळे जनजागृती आणि सामाजिक प्रबोधनसुद्धा होऊ लागले आहे. तरुणांचा यामध्ये मोठया प्रमाणावर सहभाग यामुळे नावीन्य, कल्पकता, नियोजन, आकर्षक सजावट, विविध पारंपारिक पेहराव, ऐतिहासिक चित्ररथ, ढोल ताशा, लेझिम पथकांची जुगलबंदी, मराठमोळा साजशृंगार यामुळे या शोभायात्रेची रंगत वाढते.

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. मराठी संस्कृती, शुभकार्य, परंपरा जपणारा असा हा हिंदु धर्म, संस्कृतीचा नविन वर्ष प्रारंभाचा दिवस. त्यामुळे केवळ शुभकार्य नव्हे तर नविन वर्षाची सुरवात नवे संकल्प, नविन गृहप्रवेश, नवी खरेदी,   अनेक विधिवत धार्मिक कार्यक्रम आणि त्याचेच  औचित्य साधून उदघाटने, सांस्कृतिक कार्यक्रम या सर्वांची रेलचेल, सर्वत्र आनंद, जल्लोषाच्या वातावारणात हा सण, उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्याची परंपरा; पण मागील साधारण तीन दशकापासून या आनंदात खऱ्या अर्थाने भर पडली. ती विविध शहरे, उपनगरे, अगदी गांव पातळीवरून निघणाऱ्या कलात्मक, विषयावर  आधारीत, सामाजिक प्रबोधन, विविध देखावे, चित्ररथ, आकर्षक पारंपरीक वेशभूषा, या माध्यमातून निघणाऱ्या शोभायात्रा. या शोभायात्रेचा   पाया रचला तो डोंबिवली या शहराने.

या शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री गणेश मंदिर संस्थान यांच्या पुढाकाराने साकारलेल्या या शोभायात्रेची प्रेरणा केवळ मुंबईतच नव्हे; संपूर्ण महाराष्ट्र आणि परदेशात सुद्धा विविध अशा शोभायात्रेचे आयोजन आता होऊ लागले आहे. विविध विषयांवरील या  शोभायात्रेमुळे जनजागृती आणि सामाजिक असे प्रबोधन सुद्धा होऊ लागले आहे. तरुणांचा यामध्ये मोठया प्रमाणावर सहभाग असल्यामुळे नावीन्य, कल्पकता, नियोजन, आकर्षक सजावट, विविध पारंपरीक पेहराव, ऐतिहासिक चित्ररथ, ढोल ताशा,  लेझिम या पथकांची जुगलबंदी, मराठमोळा साज- शृंगार, विविध प्रकारची लोककला नृत्य, अशा या सर्व गोष्टीनी शोभायात्रेला भव्य दिव्य असे स्वरूप प्राप्त झालेले असते.

 डोंबिवलीपाठोपाठ गिरगांवनेसुद्धा दाखवून दिले ‘हम भी कुछ कम नही' असे म्हणत स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली बावीस वर्षे भव्य दिव्य अशा प्रकारे शोभायात्रेचे आयोजन केले जात आहे. तसेच ठाणे, नवी मुंबई यासारख्या विविध उपनगरातून सुद्धा भव्य, दिव्य अशा मोठया प्रमाणावर शोभायात्रेचे आयोजन केले जात आहे.

 गुढीपाडवा आणि शोभायात्रा हे जणू एक समीकरणच होऊन गेले आहे. उत्साहात, आनंदात, जल्लोषात साजरा होणाऱ्या गुढीपाडवा या सणअधिक व्यापक झाला. शोभायात्रेच्या माध्यमातून आर्थिक उलाढाल सुद्धा मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. शोभायात्रेमुळे आलेला भव्य दिव्यपणा, वाढती प्रसिद्धी यामुळे राजकीय व्यक्ती, पक्ष यांनीसुद्धा आपलें हातपाय पसरण्यास सुरवात केली. देणगीदार, स्पॉनर्स यामुळे एक प्रकारे सकारात्मक स्पर्धा सुरु होऊ लागली. त्यामुळे गुढीपाडवा आणि शोभायात्रा हे जणू काय सर्वासाठी मुक्त व्यासपीठच झाले आहे. असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

 अशा या गुढीपाडवा सण व शोभायात्रा यामुळे रुढी, परंपरा, संस्कृती यांचे जतन तर होतेच, पण त्याच बरोबरीने कला, साहित्य, शैक्षणिक, आरोग्य, सुरक्षा, आदी सर्व क्षेत्राचे सामाजिक प्रबोधनसुद्धा होत आहे. आणि ते अनुभयाचे भाग्य आम्हाला या शोभा यात्रेच्या माध्यमातून मिळते. यासारखे भाग्य कोणते? गुढीपाडवा नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....!!  - पुरुषोत्तम कृ आठलेकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

निर्गुण ब्रह्मावेगळे आघवे। भ्रमरूप