निर्गुण ब्रह्मावेगळे आघवे। भ्रमरूप
ज्ञानी लोकांच्या दृष्टीने ही सृष्टी म्हणजे केवळ भास आहे. तिला स्वतंत्र अस्तित्व नाही. परमात्मा अर्थात् चैतन्याचे अधिष्ठान ‘आहे' म्हणून तिचे अस्तित्व ‘आहे.' अन्यथा ती ‘नाहीच.' जिथे जिथे जे जे आहे ते एका परब्रह्माचे अविष्करण आहे.
मना पावना भावना राघवाची।
धरी अंतरी सोडि चिंता भवाची।
भवाची जिवा मानवा भूलि ठेली।
नसे वस्तूची धारणा वेर्थ गेली । श्रीराम ७९।
ज्या माणसाचा भगवंतावर विश्वास नाही त्याला संसारातील चिंतेची बाधा होते. सर्व चिंताहरण करून शाश्वत आनंदाचा अनुभव देण्यास भगवंत समर्थ आहे. तो नित्य आपल्या अगदी जवळ आहे. पण आपल्याला तो दिसत नाही. त्याला पाहण्याचा आपण प्रयत्न करत नाही. जो नित्य, सत्य, पूर्ण, आनंदस्वरूप आहे त्याच्याकडे न पाहता आपण अनित्य, मिथ्या, अपूर्ण, दुःख मूळ संसाराकडे पाहतो हेच आपल्या चिंतेचे आणि दुःखाचे कारण आहे. समर्थ पुनःपुन्हा सांगत आहेत की हे मना! राघवाची पावन भावना तुझ्यात स्थिर कर. स्वतःला त्या पवित्र, निर्मल नामात गुंतवून ठेव. म्हणजे तुझा सर्व क्षोभ शांत होईल. राग-द्वेष आदि विकार निघून जातील. विश्रांतीचा, समाधानाचा अनुभव येईल. समर्थांचा राघव म्हणजे परब्रह्म. ते निर्विकार, निर्दोष आहे. अत्यंत पवित्र आहे. म्हणून त्याच्याशी जोडून घेतले तर आपले मनही निर्मल होते. सारी अशुद्धता संपते. भगवंताच्या पावन नामाचे स्मरण केल्याने महापातकांचाही नाश होतो.
अशा पावन भगवंताला, पावन भगवद्नामाला अंतःकरणात दृढ धरावे. म्हणजे तिथे संसारातील कोणत्याही चिंतेला, दुःखाला, अशुद्धतेला थारा राहणार नाही. संसाराची चिंता वाटते, कारण त्याची सातत्याने विनाशाकडे वाटचाल सुरू आहे. त्याचे भय माणसाच्या मनात कायम आहे. संसार अपूर्ण आहे त्याचेही त्याला दुःख आहे. कारण त्याला पूर्णतेची आस आहे. पूर्णतेची आस आहे कारण ‘पूर्ण' हे त्याचे मूळ स्वरूप आहे. फक्त अज्ञानाच्या आवरणामुळे त्याला त्याचा विसर पडला आहे. मी देह आहे हे त्याचे अज्ञान आहे. अज्ञानामुळे त्याच्या जीवनात अविवेक आढळतो. अविवेक म्हणजे नित्य व अनित्य यातील फरक ओळखता येत नाही. शाश्वत आणि नाशवंत यातील भेद कळत नाही. दिसणारे जग नाशवंत असूनही सत्य वाटते. त्यामुळे त्या जगातील सर्व अनुकूल पदार्थ हवेसे वाटतात. प्रतिकूल पदार्थ नकोसे वाटतात. यालाच भूल पडणे किंवा भ्रमित होणे म्हणतात. जे नाशवंत, अपूर्ण आहे त्याच्याकडून मनुष्य पूर्णत्वाची अपेक्षा करतो. अखंड समाधानाची अपेक्षा करतो. आणि ह्या अशक्यप्राय अपेक्षांमुळे दुःखी होतो. तत्वज्ञान व्यक्त करणारा हा श्लोक आहे. परमात्मा हेच एकमेव सत्य आहे. हे जग, ही सृष्टी, त्यातील विविध चर-अचर जीव-प्राणी, ही निर्गुण निराकार परमात्म्याची व्यक्त रूपे आहेत. ज्ञान दृष्टीने विचार केला तर वेगवेगळ्या आकाराचे दिसणारे देह म्हणजे पंचमहाभूते आणि त्रिगुणांचे गाठोडे आहे. ही अष्टधा प्रकृती परब्रह्माच्या मायाशक्तीतून निर्माण झाली आहे. काही काळासाठी हे आकार अस्तित्वात आले आहेत आणि काही काळानंतर ते पुन्हा आपल्या मूळ ब्रह्मस्वरूपात विलीन होणारआहेत. जशी चित्रपट किंवा नाटकाची एक भासमान सृष्टी असते जी त्या मय्राादित काळापुरती सत्य वाटते आणि तेवढा काळ संपताच संपून जाते. सर्व कलाकार आपल्या मूळ रूपात परत येतात. त्याच प्रकारे ज्ञानी महात्म्यांच्या दृष्टीने ही सृष्टी म्हणजे केवळ भास आहे. तिला स्वतंत्र अस्तित्व नाही. परमात्मा अर्थात् चैतन्याचे अधिष्ठान आहे म्हणून तिचे अस्तित्व ‘आहे.' अन्यथा ती ‘नाहीच.'
जिथे जिथे जे जे आहे ते एका परब्रह्माचे अविष्करण आहे. परंतु सूक्ष्म असल्यामुळे ते तत्व दिसत नाही. साकार झालेले स्थूल जग दिसते. डोळ्यांना दिसते म्हणून खरे वाटते. जो खरोखर नाहीच त्या संसाराला खरा समजून माणूस घट्ट धरूनठेवतो. त्यात आसक्त होऊन राहतो. त्याच्या प्रभावाने सुखी दुःखी होत राहतो. जीवनाचा मोठा काळ मनुष्य मुळात नसलेल्याच संसाराला पूर्ण करण्याच्या खटाटोपात वाया घालवतो. जे खरोखर प्राप्त करून मनुष्यजन्माचे सार्थक करायला हवे ते परमतत्व जवळ असूनही दूर राहते.
सद्गुरूकृपेने माणसाचा विवेक जागृत झाला तर शाश्वत सत्य परमात्मा आणि नाशवंत मिथ्या संसार यातील फरक त्याच्या लक्षात येतो. सर्व संसारात व्यापून असलेले परमतत्व पाहता आले की भेद मावळतो. भेद गेला की भय संपते. राग-द्वेष संपतो. चिंता संपते. पर्यायाने दुःख संपते. हा संसार जसा दिसतो तसा अनेक रंगरूपात्मक नाहीच. एक भगवंतच अनेक रंगरूपात नटला आहे असा विचार मनात स्थिर होतो तेव्हाच दुःखाची निवृत्ती होते. "सर्व काही भगवंतच” हा विचार निरंतर अभ्यासाने स्थिर होतो. म्हणूनच समर्थांचा आग्रह आहे की संसाराची चिंता सोडून राघवाचे पावन नाम नित्य नेमाने सतत स्मरत रहावे. अंतःकरणात अगदी भरून घ्यावे. भगवंताने अंतःकरण व्यापले की अखंड आनंद स्वतःसिध्द आहेच.
जय जय रघुवीर समर्थ
-सौ. आसावरी भोईर