नववर्ष स्वागतयात्रा आणि हिंदू संघटनाची आवश्यकता !
गुढीपाडव्याच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या स्वागतयात्रांमध्ये लोक आपली जात, पक्ष, संघटना विसरून एक हिंदू म्हणून सहभागी होतात. हिंदूंच्या संघटनशक्तीचे अभूतपूर्व दर्शन या स्वागतयात्रांतून घडते. खरेतर हे संघटन केवळ स्वागतयात्रांच्या निमित्ताने नव्हे तर ते कायमस्वरूपी दिसण्याची आवश्यकता आज निर्माण झाली आहे. कारण आता हिंदूंनी केवळ नववर्ष स्वागतयात्रांच्या निमित्ताने एकजुटीचा अविष्कार घडवणे पुरेसे नाही; तर हिंदूंसमोरील प्रत्येक संकटासाठी आपली संघटनशक्ती दाखवण्याची वेळ आली आहे.
गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि पहिला सण. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मितीही याच दिवशी केली. महाराष्ट्रात या दिवसाचे स्वागत दारोदारी गुढ्या उभारून केले जाते. या दिवशी पारंपरिक वेशभूषा परिधान करून एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. हल्लीच्या पिढीवर सामाजिक माध्यमे, इंटरनेट यांचा प्रभाव अधिक असल्याने हल्ली शुभेच्छा प्रत्यक्ष भेटून देण्याऐवजी व्हाट्सअप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून दिल्या जाऊ लागल्या आहेत. मुंबई ठाणे, पुणेसह काही प्रमुख शहरांमध्ये या दिवशी नववर्ष स्वागतयात्रा काढल्या जातात. विविध सामाजिक संस्था, सांस्कृतिक मंडळे, संप्रदाय, संघटना यांचे प्रतिनिधी या स्वागतयात्रांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. विविध मंगलवाद्यांसह ढोल ताशा पथकांचे संचलन या स्वागतयात्रांचे प्रमुख आकर्षण असते. काही ठिकाणी या यात्रांमध्ये समाज प्रबोधनात्मक देखावे सादर केले जातात, पारंपरिक खेळांची आणि शौर्य जागरणाची प्रात्यक्षिके यानिमित्ताने पाहायला मिळतात. ज्वलंत सामाजिक विषयावर भाष्य करणारे प्रबोधनात्मक फलक या स्वागतयात्रांचे प्रमुख वैशिष्ट्य असते. पारंपरिक दागिन्यांसह नऊवारी साडी परिधान करून दुचाकीस्वार तरुणी या स्वागतयात्रांची शोभा वाढवतात, स्वागतयात्रांच्या स्वागतार्थ यात्रामार्गावर ठिकठिकाणी सुबक रांगोळ्या काढल्या जातात, स्वागताचे पलेक्स लावले जातात, या स्वागतयात्रांचे अनेक ठिकाणी सवाष्ण स्त्रिया औक्षण करून स्वागत करतात; तर काही ठिकाणी या स्वागतयात्रांवर पुष्पवर्षाव केला जातो.
यानिमित्ताने सर्वत्र वातावरण भगवामय झालेले असते. स्वागतयात्रांच्या समारोपाच्या ठिकाणी काही वेळा मान्यवरांची भाषणे होतात. या भाषणांतून हिंदू संघटनांचे महत्व सांगितले जाते. भाषणे संपल्यावर सहभागी प्रत्येक जण आपापल्या मार्गाने मार्गस्थ होतो. गुढीपाडव्याच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या स्वागतयात्रांमध्ये लोक आपली जात, पक्ष, संघटना विसरून एक हिंदू म्हणून सहभागी होतात. हिंदूंच्या संघटनशक्तीचे अभूतपूर्व दर्शन या स्वागतयात्रांतून घडते. खरेतर हे संघटन केवळ स्वागतयात्रांच्या निमित्ताने नव्हे तर ते कायमस्वरूपी दिसण्याची आवश्यकता आज निर्माण झाली आहे.
ज्या भारतभूमीत एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता, प्रत्येक खेडी स्वयंपूर्ण होती त्या भारतावर आज कोट्यवधी रुपयांचे कर्ज आहे. देशावर चालून आलेल्या यवनी आक्रमकांनी, इंग्रजांनी, पोर्तुगीजांनी या देशाचे सारे वैभव लुटले, तलवारीच्या जोरावर धर्मांतरे घडवून आणली, बाया बापड्यांच्या अब्रू लुटल्या, इथल्या नागरिकांवर अनन्वित अत्याचार केले. त्याकाळी असलेले राजे महाराजे शूरवीर आणि सामर्थ्यशाली होते; मात्र नागरिक जातीपातींत विभागले होते. हिंदूंमधील याच फुटीचा लाभ इंग्रजांनी घ्ोतला. फोडा आणि राज्य करा नीतीचा अवलंब केला. मूठभर इंग्रजांनी अवाढव्य हिंदुस्थानावर दीडशेहून अधिक वर्षे राज्य केले. जातीपातीत इंग्रजांनी निर्माण केलेली दरी स्वातंत्र्यानंतरही कायम ठेवण्याचे काम नंतरच्या राजकारणी मंडळींनी केले. आजही हे कार्य अविरतपणे सुरु आहे. राजकीय स्वार्थासाठी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे, जातीपातीसाठी लढण्याचे ही मंडळी आपल्या भाषणांतून जणू प्रशिक्षणच देत असतात. हिंदूंमध्ये असलेल्या ऐक्याच्या अभावामुळे आज कोणीही उठतो आणि हिंदूंच्या देवीदेवतांवर, श्रद्धास्थानांवर, साधू संतांवर अश्लाघ्य टीका करतो. हिंदूंच्या प्रथा परंपरांना अंधश्रद्धेचे लेबल लावून हिणवले जाते. हिंदूंच्या वंश विच्छेदासाठी कार्यरत असलेले लव्ह जिहादचे संकट आज देशभर थैमान घालत आहे, ज्या माध्यमातून दरवर्षी हजारो हिंदू मुली बाटवल्या जात आहेत. यावर प्रखरपणे भाष्य करणारा दि केरला स्टोरी चित्रपट देशभर गाजला. यामध्ये दाखवण्यात आलेली उदाहरणे केवळ प्रातिनिधिक आहेत. देशभरातील प्रत्येक राज्यात, प्रत्येक तालुक्यांत अशा स्टोरी घडलेल्या आहेत आणि घडत आहेत. लॅण्ड जिहादच्या माध्यमातून हिंदूंच्या जागा बळकावल्या जात आहेत. यासंदर्भात प्रबोधन करणारा दि काश्मीर फाईल चित्रपट आपण सर्वांनीच पहिला असेल. देशातील दुर्गम भागांत, आदिवासी पाड्यांत औषधी उपचार, दोन वेळचे जेवण देण्याच्या मोबदल्यात तेथील गरीब हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे. देशात धर्मांतरण बंदीचा कायदा आणण्यासाठी अनेक वर्षांपासून मागणी केली जात आहे; मात्र सरकार त्याकडे केवळ दुर्लक्ष करत आहे.
देशभरात प्रसिद्ध असलेली जवळपास सर्वच मंदिरे आज शासनाच्या अखत्यारीत आहेत. भाविकांनी या मंदिरांना श्रद्धेने दिलेल्या दानावर आज शासनाचा अंकुश आहे. भगवंताच्या चरणी अर्पण केलेल्या धनाचा वापर धर्मकार्यासाठी केला जायला हवा; मात्र या सरकार हा पैसा जलयुक्त शिवार, दुष्काळ निवारण, आंतरजातीय विवाह यांसारख्या शासकीय योजनांसाठी हवा तसा वापरते. सरकारी तिजोरीत पैसा संपल्याचे कारण देत मंदिरांच्या तिजोरीवर डल्ला मारला जातो. लहानपणापासून आपल्याला गाईच्या पोटात ३३ कोटी देवता असतात असे सांगितले गेल्यामुळे रस्त्यात येताजाता दिसणाऱ्या गाईच्या पोटाला हात लावून तो मस्तकाला लावण्याची सवय आपल्या अंगवळणी पडलेली आहे. हिंदूंना पूजनीय असलेल्या गाईच्या संरक्षणासाठी राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा करण्यात आला. देशात प्रथमच महाराष्ट्र राज्याने गाईला राज्यमातेचा दर्जा दिला; मात्र आजही प्रतिदिन मोठ्या प्रमाणात गोवंश कापला जात आहे. गोवंशाने भरलेल्या गाड्या कुठेना कुठे पकडल्या गेल्याच्या बातम्या प्रतिदिन वर्तमानपत्रांतून वाचायला मिळतात. मुक्त केलेल्या गोवंशांना जवळच्या गोशाळांमध्ये सोडले जाते. अशा हजारो गोशाळा आज राज्यात आहेत. सरकारी अनुदान केवळ मोजक्या गोशाळांना मिळते. अन्य गोशाळा सर्वस्वी गोप्रेमींच्या दानावर चालत आहेत. अपुऱ्या निधीमुळे अनेक गोशाळांना घरघर लागली आहे. दुष्काळी भागांत गोशाळांमध्ये चाऱ्याच्या अभावी गाई कुपोषणाने रुग्णाईत होत आहेत. हिंदूंनी मंदिरांत दिलेले दान सरकार गोवंश जगवण्यासाठी का वापरत नाही, असा गंभीर प्रश्न गोप्रेमींना पडला आहे. अशा एक ना अनेक समस्या आज हिंदूंसमोर आ वासून उभ्या आहेत. या सर्व समस्यांचे निवारण केवळ हिंदूंच्या संघटनातुन होऊ शकते. ‘संघे शक्ती कलौयुगे' हा कलियुगातील मूळमंत्र आहे. संघटनेत शक्ती असते. संकटांविरोधात लढण्याचे सामर्थ्य असते. त्यामुळे हिंदूंनी केवळ नववर्ष स्वागतयात्रांच्या निमित्ताने एकजुटीचा अविष्कार घडवणे पुरेसे नाही; तर हिंदूंसमोरील प्रत्येक संकटासाठी आपली संघटनशक्ती दाखवण्याची वेळ आली आहे. - जगन घाणेकर