आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा
उन्हाचा तडाखा हळूहळू संपूर्ण राज्यभर वाढत चालला आहे. एप्रिल मे महिन्यामध्ये तर उष्णतेने सर्वत्र काहिली होणार असल्याची चिन्हे आहेत. गरम हवा व असहाय करणारे उन यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते व परिणामी थकवा, चक्कर अशा समस्या वाढताना दिसत आहेत. उन्हामुळे अचानक बेशुद्धावस्था येण्यासारखी लक्षणे अनेकांमध्ये दिसू लागलेली आहेत. उष्माघात होण्याइतके कडक तापमान अजून दिसत नसले, तरी त्यापासून बचाव करण्यासाठी वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे.
गेल्या काही दिवसांमधील विषम हवामान संपून उन्हाचा तडाखा हळूहळू वाढू लागला आहे. अशा वातावरणात ऊन बाधून त्याचा त्रास होण्याचे प्रमाण मोठे असते. उन्हाचा त्रास झालेल्या रुग्णांमध्ये सध्या शरीरातील पाणी कमी होणे (डीहायड्रेशन) आणि थकवा येणे ही लक्षणे प्रामुख्याने पाहायला मिळतात. ज्यांना काम धंदयानिमित्त सतत उन्हात बाहेर फिरावे लागते त्यांच्यात अतिउन्हामुळे चेहऱ्याला आणि त्वचेला खाज सुटते, त्वचा लाल होणे, त्यावर पुरळही उठते. उष्माघात होण्याइतके कडक तापमान सध्या दिसत नसले, तरी तापमान वाढत असल्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. ऊन बाधून अचानक बेशुध्द पडणे, रक्तदाब अचानक कमी होणे अशी लक्षणे उष्माघातात दिसतात. उष्माघातावर त्वरित उपचार न केल्यास तो जिवावर बेतू शकतो.
मार्च महिन्यापासुनच राज्याच्या अनेक भागांतील पारा मोठया प्रमाणावर वाढला आहे. थोडक्यात उष्णतेची लाट सर्वत्र आहे. सर्वसाधारणपणे एखादया भागात सलग तीन दिवस नेहमीच्या तापमानापेक्षा वातावरणातील तापमान ३ डिग्री सेल्सियसने जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट म्हणून संबोधले जाते किंवा एखदया भागात सलग दोन दिवसांसाठी ४५ डिग्री सेल्सीयसपेक्षा जास्त तापमान असेल अशा अवस्थेतही उष्णतेची लाट आहे असे म्हणता येईल. भारताच्या उत्तर भागात दरवर्षी ५ ते ६ उष्णतेच्या लाटा येतात. हे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढताना दिसत आहे. १९९२ ते २०१५ या कालावधीत भारतात उष्णतेच्या लाटेमुळे २२,५६२ इतक्या लोकांनी आपला जीव गमावला आहे. पक्षी, प्राणी, वनस्पती यांचीदेखील झालेली हानी मोठी आहे. मार्च ते जून या काळात या उष्णतेच्या लाटा दिसून येतात. ३७ डिग्री सेल्सियसच्या वर तापमान गेल्यास मानवी शरीर वातावरणातील उष्मा शोषून घेऊ लागते व त्याचे विपरीत परिणाम मनुष्यच्या शरीरावर होताना दिसतात. उष्णतेच्या लाटेमुळे होणारी जिवितहानी लक्षात घेता उन्हामुळे होणारे नुकसान टाळण्याकरीता अहमदाबाद महानगरपालिकेने सन २०१५ साली हिट ॲक्शन प्लॅन अर्थात उष्मा प्रतिबंधक कृतीयोजना आखणे सुरु केले. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात नागपूर, चंद्रपूर या उष्णताबहूल भागातील महानगरपालिकांनी उष्मा प्रतिबंधक कृतियोजना अंमलबजावणी सुरु केली आहे. उन्हात कष्टाची कामे करणारे लोक, वृध्द व लहान मुले, स्थूल, अयोग्य कपडे घातलेले, पुरेशी झोप न घेतलेले लोक, गरोदर महिला, मधूमेह, ह्रदयरोग असलेले लोक, अपस्मार रुग्ण, दारुचे व्यसन असलेले लोक यांना उन्हाचा त्रास सव्रााधिक जाणवतो. उष्णतेच्या किरकोळ त्रासामध्ये शरीरावर व्रण उमटणे, हातापायाला गोळे येणे, चक्कर येणे अशा स्वरुपाचा त्रास जाणवतो तर गंभीर उष्णतेच्या त्रासात उष्माघाताचा समावेश होतो. यामध्ये व्यक्तीचा मृत्यूदेखील होऊ शकतो. उष्णतेचा त्रास कमी होण्यासाठी प्रशासकीय पातळीवर विविध विभागांचा समन्वय साधणे आवश्यक आहे. ज्यायोगे सार्वजनिक ठिकाणी जसे रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, बाजारपेठा, बँका, पेट्रोल पंप, मंदिरे, मुख्य रस्ते या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करणे, उन्हात लोकांना विश्रांतीसाठी थंड सावलीच्या जागा निर्माण करणे, इमारत परिसराला उष्मा विरोधी रंग लावणे, कार्यालये, शाळा, महाविदयालये यांच्या कामाच्या वेळा बदलणे स्वसंरक्षणासाठी लोकांचे प्रबोधन करणे या बाबी करता येतील. उष्णतेच्या काळात पुरेसे पाणी प्यायला हवे, हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरा, उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरा. उन्हात जाताना टोपी खाली ओलसर कपडा ठेवा, पाळीव प्राण्यांना सावलीत ठेवा, ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा. या काळात शक्यतो घर कार्यालयाबाहेर पडणे टाळा. कष्टाची कामे उन्हात करु नका, पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका, बडद रंगाचे जाड तंग कपडे परिधान करु नका, उन्हाच्या काळात स्वयंपाक करणे टाळा, स्वयंपाक घर हवेशिर ठेवा, मद्य, चहा, कॉफी, शितपेये टाळा, खूप प्रथिनयुक्त अन्न आणि शिळे अन्न खाऊ नका. उष्माघातापासुन आपला व आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी सर्वांनी योग्य दक्षता घ्यावी. - वैभव मोहन पाटील