असामान्य मुलांची शाळा
या शाळेला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या मुलांचे कौतुक तर वाटतेच; पण त्यांच्या कौशल्याचे आश्चर्य वाटत राहते. नाशिकमधल्या पारंपारिक तीर्थक्षेत्राहून पवित्र असे हे प्रयासराज तीर्थ हे प्रत्येकाने निदान शिक्षकाने तरी जाऊन पाहायला हवेच हवे.
शाळा ही आहे सगळ्यात वेगळी
मानवतेच्या संस्कारांचा होतो परिपाठ
मुलांच्या भवितव्याचा सतत असतो ध्यास
मार्गदर्शक गुरुजी लाभले खास
ही केवळ शाळा नसून एक तीर्थक्षेत्र आहे. हे नाशिकमध्ये हिवाळी नावाच्या गावात ठाणापाडा आदिवासी पाड्यात आहे. ही जिल्हा परिषदेची ३६५ दिवस अखंडपणे बारा तास भरणारी शाळा आहे. येथे विद्यार्थी तसेच शिक्षकदेखील आनंदाने येत असतात. विशेष म्हणजे या शाळेला दिवाळी नाही की रविवारी किंवा कुठलीही स्थानिक सुट्टी नसते.
या शाळेचे कर्ताकरविता आहेत, श्री. केशव गावित गुरुजी. डी.एड झाल्यावर शासनाकडून व यांच्यावर जबाबदारी सोपवली गेली. बियाणं कसदार असलं की कुठल्याही मातीत टाकलं तरी जोमदारपणे वाढतं असे हे गुरुजी स्वतः तिथे रुजलेत; पण त्यांनी आजतागायत तेथे असंख्य रोपे फुलवली आहेत, नव्हे तर नव्या पिकांसाठी बियाणी तयार करण्याचा अखंड यज्ञ सुरु ठेवला आहे.
या शाळेत बालवाडीपासून सातवीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेला बालवाडीपासून सातवीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेला वेळापत्रक नाही पण बांधीव कृति कार्यक्रम आहे. सकाळी ९ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत या सत्रात शाळा भरते. यात पर्यावरण बांधकाम याचा अंतर्भाव आहे. तसेच या शाळेला एकही खिडकी नाही; पण दाही दिशातून येणारा उजेड व वारा शाळेला मोकळा श्वास देतो. तसेच भिंती असलेल्या वर्गखोल्या पण इथे दिसून येत नाही तरी सुध्दा ज्ञानाच्या खोलीपर्यंत स्वतंत्रपणे जाऊ शकतात. तसेच या शाळेची आधुनिकता म्हणजे या शाळेत आतापर्यंत कोणत्याही शाळेत आढळून न येणारे ॲम्फीथिएटर आहे. अद्ययावत वाचनालय, संगणक कक्ष, बोलक्या भिंती, गोशाळा आहे. परसबाग उभारली असून त्यामागे केशव गुरुजींचे मार्गदर्शन प्रेरित आहे. नेमलेला अभ्यासक्रम जून ते ऑक्टोबरच्या कालावधीत पूर्ण केला जातो. नंतर मुलांच्या मानसिक कौशल्याच्या अभ्यासाला सुरुवात होते. एकाच वेळी डावा व उजवा मेंदू कार्यरत राहण्याचे कौशल्याचे ज्ञान दिले जाते. सर्वात महत्त्वाचे तसेच आश्चर्यकारक म्हणजे या शाळेतील विद्यार्थी दोन्ही हातांनी दोन वेगवेगळी कामे एकाच वेळी करतात हे बघितल्यावर आपण पण तोंडात बोट घालतो. डावा हात जर एक ते दहा लिहित असतील तर त्याचवेळी उजवा हात अकरा ते वीस पाढे लिहितो. डावा हात मराठी शब्द लिहित असेल तर त्याच्याच समोर योग्य अंतरावर त्याच वेळी त्याच अर्थाचा इंग्रजी शब्द लिहिला जातो. डाव्या हाताने लिहिलेल्या इंग्रजी किंवा मराठी शब्दांची दर्पण प्रतिमा (mirror image) उजवा हात लिहितो. डाव्या उजव्या हातांची कामे चाललेली असताना तोंडाने संविधानाची कुठलीही कलमे अचूक सांगता येतात. ही नुसती पाठांतराची पोपटपंची नसून विद्यार्थी त्याचा आत्मविश्वासाने अर्थही सांगू शकतात. रंगाच्या सुसंगत रचना करणारे ठोकळे काही मिनिटात एका ओळीत फिरवण्याचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले.
मुले स्वतःच यूट्यूबवर बघून वाद्य शिकतात तसेच गाणी पण शिकतात. विविध भाषांचे ज्ञान अवगत करतात. पाचवी-सहावीचे विद्यार्थी हे खालच्या वर्गातील मुलांना मार्गदर्शन करतात.
वरील कौशल्ये माझ्याही अंगात नाही असे गुरुवर्य केशव गुरुजी प्रांजळपणे सांगतात. कशी आत्मसात करता येतील याविषयी मार्गदर्शन करतात. पुढे प्रोत्साहनाने त्याचे नेतृत्व करतात. गो पालन म्हणून अभ्यासक्रमातल्या विषयानुसार गायीवर माया, गोठा साफ करणे, परसबाग फुलवणे, झाडांना पाणी घालणे ही कामे आवडीने करतात. कुंडीत पाणी जास्त झाले तर ते ओघळ शाळेत आले तर बालवाडीच्या मुलांचे चिमुकले हात फडक्याने ते पाणी टिपून झाडाच्या मुळांशी जाऊन पिळतात. थोडक्यात पाण्याचं महत्व पटल्याने पाणी वाया घालवत नाही. मुलांना मिळणारी केळी खाऊन झाल्यावर त्याची साल गोमातेच्या मुखी घालतात.
केशव गुरुजींचा सुरुवातीचा हा प्रवास खूपच खडतर होता. अनेक दानशूरांनी केलेल्या मदतीने या शाळेच्या दोन वेळेच्या भोजनाची कायमस्वरुपी सोय श्री.रमेश आणि उमा अय्यर दाम्पत्याने केली आहे. विशेष म्हणजे नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि शिक्षणमंत्र्यांसह इतर मंत्रीही भाषणात जास्त वेळ न दवडता मुलांसोबत संपूर्णपणे बोलण्यात रमले होते.
शासनाने गुरुजींच्या कामाची योग्य दखल घेतल्यामुळे त्यांची बदली केलेली नाही. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना भारताच्या राजधानी दिल्लीत येण्याचे निमंत्रण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देऊन त्यांचा गौरव केला आहे. या शाळेतील माजी विद्यार्थी एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी अभ्यासात गर्क झाले आहेत. इथल्या चिमुकल्यांचे शास्त्रज्ञ, चित्रकार, शिक्षक, शेतकरी, भाषा अभ्यासक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहेत. ही स्वप्ने केशव गुरुजींच्या त्यांच्या पाठीशी असलेला हात मुलांच्या स्वप्नांना आकार देणार आहे. ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण पद्धतीची सांगड डोळसपणे त्यांनी घातली आहे. अनन्या ही सरांची एकुलती एक मुलगी सुद्धा या शाळेत सर्वांबरोबर शिकून सर्व कौशल्ये तिने या वयात आत्मसात करुन घेतली आहे. गुरुजींनी स्वतः आजवर नाटक, सिनेमा यांची चैन केली नाही तसेच घरातल्या कार्यक्रमात पण ते जरुरी पुरते जाऊन येतात. त्यांची पत्नी सविता आणि आई-वडिल, भावंडं यांचा संपूर्ण पाठिंबा असल्यामुळे गुरुजी हे शैक्षणिक कार्य अतिशय नेटाने, प्रामाणिकपणे आणि आनंदाने पार पाडू शकतात. या कार्यासाठी त्यांचे गोडवे किती गावेत! किती त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळावित इतके ते महान आहेत.
या शाळेला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या मुलांचे कौतुक तर वाटतेच; पण त्यांच्या कौशल्याचे आश्चर्य वाटत राहते. नाशिकमधल्या पारंपारिक तीर्थक्षेत्राहून पवित्र असे हे प्रयासराज तीर्थ हे प्रत्येकाने निदान शिक्षकाने तरी जाऊन पाहायला हवेच हवे.
राजकारण, जातीधर्मकारण या बाहेर जाऊन संविधानाचे मर्म मुलांच्या मनात रुजवून त्यांचे शेत पिकवणाऱ्या तसेच व्यावहारिक प्रलोभनापासून आश्चर्यकारक रितीने लांब राहून या ऋषीतुल्य केशव गुरुजींना सॅल्यूट. - लीना बल्लाळ