गुढीपाडवा...आणि संभाजी महाराजांची हत्या

चैत्र शुद्ध प्रतिपदा हा हिंदूंचा सर्वात मोठा सण. हिंदूचा नववर्षारंभ. हा सण हिंदूंनी साजरा करू नये म्हणूनच फाल्गुन अमावास्येला त्याने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली. त्याने ज्या उद्देशाने हा डाव साधला तोच डाव यशस्वी करण्याचा दुर्दैवी प्रयत्न आजची काही धर्मद्वेषी मंडळी करत आहेत. संभाजी महाराजांची हत्या ब्राह्मणांनी मनुस्मृतीनुसार केल्याचा विखारी प्रचार करताना काही लोक आढळतात. सामाजिक माध्यमांतून तशा पोस्ट पसरवल्या जातात. ब्राह्मणद्वेषाची कावीळ झालेले हे महाभाग वर्षभर संभाजी महाराजांचे नावही घेत नाहीत.

हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या क्रूरकर्मा औरंगजेबाने अत्यंत हाल हाल करून फाल्गुन अमावास्येच्या रात्री केली. याविषयीचे सविस्तर दाखले इतिहासकारांनी त्यावेळीच मांडले आहेत. मागील महिन्यात प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटाने हा सत्य इतिहास जगासमोर मांडला. असे असताना काही जात्यंध शक्ती समाजात दुही माजवण्याच्या उद्देशाने गुढीपाडवा जवळ आला की संभाजी महाराजांची हत्या ब्राह्मणांनी मनुस्मृतीनुसार केल्याचा विखारी प्रचार करताना आढळतात. सामाजिक माध्यमांतून तशा पोस्ट पसरवल्या जातात. ब्राह्मणद्वेषाची कावीळ झालेले हे महाभाग वर्षभर संभाजी महाराजांचे नावही घेत नाहीत; मात्र गुढीपाडवा जवळ आला की हा सण संभाजी महाराजांच्या हत्येप्रित्यर्थ ब्राह्मणांनी साजरा करण्यास सुरुवात केल्याचे ढोल बडवून सांगू लागतात.

रावणाचा वध करून प्रभू श्रीराम वनवासातून परतल्याच्या आनंद महाराष्ट्र प्रदेशात गुढ्या उभारून साजरा केल्याचा इतिहास आहे. आनंद साजरा करण्यासाठी महाराष्ट्रात पूर्वीपासून गुढ्या उभारत असल्याचा उल्लेख शिवकालीन इतिहासातच नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वकाळातील उपलब्ध पत्रव्यवहारांतूनही, संतांच्या अभंगांतून, इतिहासकालीन दाखल्यातून आढळतो. इतिहासाचार्य वि.के.राजवाडे यांनी ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने', या नावाने इतिहासाचे अनेक खंड प्रसिद्ध केले आहेत ज्यामध्ये इतिहासकालीन विविध पत्र आणि दस्तावेज संग्रहित आहेत. त्यातील एका पत्रात ‘गुढी पाडवा' या सणाचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो.  या पात्रात असा उल्लेख आहे की ‘गुढीपाडवा या सणानिमित्त निराजी पंडित आपल्या घरी आले होते.' हे पत्र नारायण शेणवी या मुंबईच्या वकिलाने मुंबईच्या गव्हर्नरला लिहिले आहे. हे निराजी पंडित म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील एक सदस्य होते आणि ते आपल्या घरी गुढीपाडव्यानिमित्त आल्याचा उल्लेख सापडतो. यावरून हे स्पष्ट होते की शिवरायांच्या काळातही गुढीपाडवा सण साजरा केला जात असे.

 आपल्या संतांनीदेखील गुढीपाडव्याचा उल्लेख अनेक ओव्या आणि अभंग यांतून केला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली  ज्ञानेश्वरीतील अध्याय क्रमांक ४ ओवी क्रमांक ५२ मध्ये लिहितात ‘अधर्माची अवधी तोडी। दोषांची लिहिली फाडी। सज्जनांकरवी गुढी। सुखाची उभवी।।' ज्ञानेश्वरीतील अध्याय क्रमांक ६ ओवी क्रमांक ५२ मध्ये पुढील ओळी आढळतात ‘ऐके संन्यासी तोची योगी। ऐसी एकवाक्यतेची जगी। गुढी उभविली अनेगी। शास्त्रांतरी ।।' तर अध्याय क्रमांक १४ ओवी क्रमांक ४१० मध्ये माऊली म्हणतात ‘माझी अवसरी ते फेडी। विजयाची सांगे गुढी। येरू जीवी म्हणे सांडी। गोवी यिया।।'   संत एकनाथ महाराज भागवतात श्रीराम चरित्र वर्णन करताना म्हणतात ‘फेडावया देवाची साकडी। स्वधर्म वाढवावया वाढी। नामे मोक्षाची उभवावया गुढी। सूर्यवंशा गाढी दशा आली?' पुढे श्रीकृष्ण चरित्रात ते म्हणतात, ‘गुढीयेसी सांगू आले। कंस चाणुर मर्दिले।। हर्षे नाचताती भोजे। जिंकियेले यादवराजे।। गुढी आली वृंदावना। मथुरा दिली उग्रसेना।।झाला त्रिभुवनी उल्हास। लळीत गाये भानुदास।।' शिवकालीन खंडात होऊन केलेले   जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज गुढीचे वर्णन करताना म्हणतात ‘ब्रह्मानंदे लोक सकळ नाचती। गुढीया उभविती घरोघरी।। ' एके ठिकाणी महाराज लिहितात, ‘गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा। बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी। गुढिया तोरणे करिती कथा गाती गाणे। तुका म्हणे छंदे येणे वेधिली गोविंदे।।' संत चोखामेळा यांचा पुढील अभंग तर सर्वश्रुत आहे, ‘टाळी वाजवावी गुढी उभारावी। वाट ही  चालावी पंढरीची '   यासंदर्भात संशोधनच करायचे म्हटले तर शेकडो पुरावे सापडतील, त्यामुळे छत्रपती संभाजी संभाजी महाराजांच्या हत्येचा संबंध गुढीपाडवा या प्राचीन सणाशी जोडण्याचा जात्यंध शक्तींचा अपप्रचार केवळ सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठीच असल्याचे स्पष्ट होते. क्रूरकर्मा औरंगजेब हा अत्यंत निष्ठुर आणि धर्मांध होता. छत्रपती संभाजी महाराजांना पकडून एक महिना त्याने महाराजांवर अनन्वित अत्याचार केले. धर्मांतरण करण्यास दबाव आणला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि आई जिजाऊंच्या संस्कारांतून मोठे झालेल्या शंभू राजांनी प्राण त्यागणे पसंत केले; मात्र हिंदू धर्म त्यागला नाही. शंभूराजांची र्धमनिष्ठा औरंग्याच्या जिव्हारी  खुपली.

चैत्र शुद्ध प्रतिपदा हा हिंदूंचा सर्वात मोठा सण. हिंदूचा नववर्षारंभ. हा सण हिंदूंनी साजरा करू नये म्हणूनच फाल्गुन अमावास्येला त्याने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली. त्याने ज्या उद्देशाने हा डाव साधला तोच डाव यशस्वी करण्याचा दुर्दैवी  प्रयत्न आजची काही धर्मद्वेषी मंडळी करत आहेत. हल्ली गुढ्यांऐवजी घरांवर भगवे ध्वज उभारण्याचे आवाहन करणारे संदेशही सामाजिक माध्यमांतून पसरवले जाऊ लागले आहेत. भगवे ध्वज ही स्वराज्याची पताका तसेच हिंदू धर्माचे प्रतीक असल्याने घरावर अवश्य लावावेत; मात्र केवळ एक दिवसासाठी नव्हे, तर ते कायमस्वरूमी घरावर लावावेत. गुढीपाडव्याला मात्र हिंदू नववर्षाचे स्वागत शास्त्रोक्तरीत्या दारासमोर गुढी उभारूनच करावे.  - सौ. मोक्षदा घाणेकर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मातृभाषेतून शिक्षण ही काळाची गरज