आधी आपला भारत पाहुन घेऊ या !
आपला देश विविधतेने नटलेला आहे. दुसऱ्याच कोणत्यातरी देशात आलो की काय असे वाटायला लावणारे एकदम भिन्न हवामान, वातावरण इथल्या काही राज्यांत आढळून येईल. सद्यस्थितीत मात्र या देशात हिंदु विरुध्द हिंदु, बहुसंख्य विरुध्द अल्पसंख्य, एक भाषा विरुध्द दुसरी भाषा, एक प्रांत विरुध्द दुसरा प्रांत असे विचित्र वातावरण पाहायला मिळतेय. साऱ्यांनी विशाल दृष्टिकोन ठेवून हा सारा देश आपला आहे, त्याची एकता, अखंडता टिकवण्याची जबाबदारीही आपलीच आहे असे समजून पर्यटन केल्यास, ठिकठिकाणचे जनजीवन, रुढी, परंपरा समजून घेतल्यास परस्पर सौहार्दाची भावना वाढण्यास मदत होईल.
ठिकाण होते उत्तराखंड राज्यातील कौसानी. ..आणि हॅाटेल होते पार जंगलात झाडाआड लपलेले हिमालयन माऊण्ट व्ह्यु रिसॉर्ट त्या बाराजणांच्या प्रवासी समुहात सारेचजण पन्नाशी, साठीच्या घरातले. एक बुजुर्ग तर पार पंच्याऐंशी वर्षांचीही मजल गाठलेले. त्यातील एकीला रात्रीची थंडी बाधली. महिना मार्चचा व तारीख होती १७ मार्च २०२५. त्याच वेळी इकडे महाराष्ट्रात सुर्य आग ओकत होता आणि दिवसाचे तापमान ३२ ते ३४ अंशापर्यंत पोहचले होते. तर तिकडे उत्तराखंडातील कौसानीमध्ये रात्रीचे तापमान होते ६ अंश; तर दिवसा १२ ते १५ अंश. ‘त्या' साठीपुढील महिलेने स्वेटर सोबत न घेण्याचा ‘पराक्रम' केल्याने बोचऱ्या थंडीने तिला पुरेपुर सतावले व ती थरथर कापू लागली. मग सहकारी प्रवासी महिलांनी स्वतःकडील गरम वस्त्रे तिला देऊ केली. आता हिची अशीच अवस्था दुसऱ्या दिवशी सकाळी राहिली तर विविध ठिकाणच्या स्थळदर्शनासाठी जायचे तरी कसे हा प्रश्न सर्वांना सतावत होता; पण आश्चर्यकारकरित्या तिला आराम पडला, झोप चांगली लागली व सकाळी पुढच्या प्रवासाला निघायला ती ठणठणीत झाली. सकाळी तेथील बर्फाच्छादित डोंगररांगा पाहणाऱ्यांची तबियत खुश करीत होत्या. पांढरेशुभ्र पर्वतांचे कडे जणू पाहणाऱ्यांना आपल्याकडे आमंत्रित करीत होते.
हा अनुभव आमच्या बारा जणांच्या समुहाने नुकताच देवभूमी उत्तराखंडच्या दहा दिवसीय पर्यटनात घ्ोतला. ‘उत्तराखंड' हे राज्य भल्यामोठ्या उत्तर प्रदेशचाच एक भाग होते. २००० साली ते वेगळे करुन त्याचे नाव ‘उत्तरांचल' असे ठेवण्यात आले होते, त्यानंतर १ जानेवारी २००७ रोजी त्याला ‘उत्तराखंड' हे नाव मिळाले. गोऱ्यापान, सफरचंदासारखे गाल असणाऱ्या महिला, विवाहित महिलांच्या भांगेत जांभळट लाल रंगाचे शोभून दिसणारे कुंकू, विनाभरवशाच्या ऋतूबदलामुळे अंगभर व गरम कपडे परिधान करणारे तेथील नागरिक, डोंगररांगांमधील रहिवासामुळे आलेला अंगभूत पहाडी काटकपणा, केदारनाथ-बद्रीनाथ-गंगोत्री-यमनोत्री या चार धामांमुळे राज्याच्या धार्मिक व पर्यटनदृष्ट्या असलेल्या वेगळेपणाची जाणीव, स्वभावातील नम्रता, हिंदी भाषेची शुध्दता हे सारे आपल्याला त्या राज्यातील भटकंती करताना लक्षात येते. चार धाम यात्रा ही दमछाक करणारी, वर्षाच्या विशिष्ट महिन्यांतच करता येणारी, किमान चौदा ते सोळा दिवस घेणारी असल्याने आम्ही या पर्यटनाची आखणी करताना चार धाम वगळून नैनिताल-भीमताल, कौसानी, मनसादेवी, चंडीदेवी, जिम कार्बेट, रानीखेत, हरिद्वार, ऋषिकेश असा बेत योजला होता. सर्वच पहाडी पर्यटनांच्या ठिकाणचे रस्ते अरुंद, छोटे, वाहतुकीसाठी अवघड असल्याने घाट भागात नेहमीच काेंडी होते. तशीच ती भीमतालहुन नैनितालकडे जाताना सोबतीला रविवार आल्याने मोठ्या प्रमाणावर झाली. आम्ही त्या वाहतुकीत अडकून पडलो व शेवटी पुढे न जाताच माघारी वळलो आणि पुन्हा घाटातून खाली उतरुन भीमतलावाकडे वळलो, तेथे बोटींग केले आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी नैनिताल पाहुन घेतले.
मुंबईहुन उत्तराखंडमधील काठगोदामकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या ठिक नसल्याने तिकडे जाणाऱ्या विविध प्रवाशांना मुंबई ते दिल्ली व तेथून पुढे रेल्वे वा रस्ता मार्गे प्रवासाचा अवलंब करावा लागतो. आम्ही येता-जाता राजधानी एवस्प्रेसचा प्रवास निवडला होता. माझ्या सुगरण मैत्रीणींनी घरुन निघतानाच खिमा, भेजा फ्राय, चपात्या, पुलाव; मित्राने बोंबील चटणी, शेंगदाणा चटणी, तसेच आम्ही इतरांनी फळे, चिवडा, लाडू, फरसाण असा जामानिमा सोबत घेतल्याने प्रवासात आमची चंगळ होती. मुंबई-दिल्लीच्या तापमानात फारसा फरक आढळला नाही, पण उत्तराखंड राज्यात प्रवेशल्यावर तो लागलीच जाणवू लागला. दिल्लीहुन तिकडे जाताना दिल्लीसह उत्तरप्रदेश आणि मग उत्तराखंड असा तीन राज्यांचा प्रवास करावा लागतो. या साऱ्या रस्ता प्रवासात मी अनुभवले की तिकडेही अनेक ‘बॅनरजी' लोक आहेत, जे कोणत्याही प्रसंगी रस्तोरस्ती बॅनर लावून झळकवू पाहात असतात. तिथे मी होळीचे अनेक बॅनर्स पाहिले. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे महिलांना २१००/- रुपये देण्याबाबतचे बॅनरही त्यावर लावलेल्या रंगांच्या मागूनही पुसटसे दिसत होते. त्याखेरीज १२ एप्रिलला येणाऱ्या हनुमान जन्मोत्सवाचे, तसेच श्रीशिवमहापुराण कथेचे, विद्यमान मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना शुभेच्छा देणारे अनेक बॅनर्स पाहायला मिळाले. आपल्या महाराष्ट्रात प्रवास करताना चुलीवरचे जेवण, जोशी वडेवाले, आख्खा मसूर डाळ, नाशिक चिवडा, मामलेदार मिसळ, अमृततुल्य चहा, उपसरपंच चहा असल्या प्रकारचे बॅनर्स लक्ष वेधत असतात, पण त्यात कुठेही त्या-त्या हॉटेल मालकाचा फोटो नसतो. मात्र दिल्ली-उत्तरप्रदेश-उत्तराखंड प्रवासात अशा अनेक धाबा मालकांनी स्वतःचीही छबी त्या त्या पोस्टर्स-बॅनर्सवर झळकवलेली असल्याचे मी पाहिले.
जिम कार्बेट अभयारण्याची सफारी हा आमच्या पर्यटनाचा परमोच्च बिंदू होता. उघड्या जीपमधून त्या अभयारण्यात फिरताना ‘खाली उतरायचे नाही, कचरा टाकायचा नाही, जोरात बोलायचे नाही, गाणी वाजवायची नाहीत' अशा अटी शर्तींवर आपल्याला तेथे जाण्याची परवानगी मिळते. सोबतीला गाईड असतो. जीप चालवणारा ड्रायव्हर बघतो पुढे..पण उजवीकडील किंवा डावीकडील झाडांमध्ये विहरणारे वन्यजीव त्याला बरोब्बर कसे दिसतात हे मला न उलगडलेले कोडे आहे. आमच्या जीप ड्रायव्हरने असेच प्राणी बघून पुढे नेलेली जीप रिव्हर्स घेत पुन्हा ते प्राणी आम्हाला जवळून दाखवण्याचा मौका साधला. अशावेळी कुठलेही संरक्षण, जाळी नसलेल्या या जीपच्या समोर वाघ किंवा सिंह किंवा हत्ती आला तर? असा प्रश्न मनात येतो. आम्हाला तेथील भटकंतीत हरणांचा कळप, कोल्हा, मोर, हिमालयीन मोनाल, किंगफिशर पक्षी, तेथील जलप्रवाहात विविध प्रकारचे मासे पाहायला मिळाले. ‘वन्य जीव पाहण्यासाठी खूप सकाळी निघावे लागते, गाड्यांचे-प्रवाशांचे आवाज ऐकून प्राणी जंगलात, आतल्या भागात निघून जातात, तुम्ही एकवेळ येथे वाघाला दहा टक्केही पाहिले नसेल; पण या घनदाट वृक्षराजीत शिकारीच्या शोधात फिरणाऱ्या वाघाने मात्र नव्वद टक्के तुम्हाला पाहिलेले असते' अशी माहिती आमच्यासोबतच्या गाईडने पुरवली. नाही म्हणायला आम्हाला एका ठिकाणी हत्तीने ढीगभर हागून ठेवल्याचे पाहता आले. म्हणजेच या रस्त्याने हत्तींचा कळप पुढे गेला असावा असे गाईडने सांगितले.
कोणत्याही ठिकाणच्या प्रार्थनास्थळी जसा भोळ्या भाविकांच्या श्रध्देचा लाभ उठवला जातो तसे येथेही होत होेते. अमूक ठिकाणीच चपला ठेवा..मग तेथूनच हार-फुले-आरतीचे ताट घ्या, इथे वाका, तिथे माथा टेका, सोबत काहीतरी दक्षिणा टाका असेही पाहता आले. हरिद्वार येथून गंगा वाहते त्या ठिकाणाहुन जवळच असलेल्या ‘हॉटेल शिवमूर्ती' येथे आमचा मुक्काम होता. आमच्यातील काहीजणांनी तेथे डुबकी मारण्याची संधी घेतली. ‘हरी की पौडी' येथे सायंकाळी गंगारती होते. तेथे पोहचायला आम्हाला काहीसा विलंब झाला. त्यामुळे त्या आरतीचा लाभ घेऊन परतणाऱ्यांची अतिप्रचंड गर्दीही अनुभवली. बाहेरच अनेक हॉटेलवाल्यांनी गरीबांना भोजन देणाऱ्यांसाठी सोय केली होती. विशिष्ट रवकम आपण त्यांना दिली की त्या रकमेत ते दहा जणांसाठी तयार ताटे करुन हाती सोपवत; आपण ते गरीबांना द्यायचे. तेही पुण्य अनेकजण पदरात बांधताना दिसून आले. अन्नदान श्रेष्ठदान. अंध, अपंग, निराधार, बेवारस मुले-मुली, घरच्यांनी सोडून दिलेल्या गरजू व्यक्तींना अन्न दिले तर नक्कीच ते पुण्यकर्म होय. पण ते अन्न घेण्याच्या रांगेत अनेक हातीपायी धडधाकट तरुण पुरुष, महिला इतरांना धक्काबुक्की करताना पाहायला मिळाल्याची खंत वाटत राहिली.
उत्तराखंड हे विशिष्ट प्रकारच्या झाडे, फुलांसाठी सुप्रसिध्द आहे. टुंड्रा, साग, ओक, पाईन, देवदार, बांबू, सेमल यांच्यासह ब्राह्मी, अश्वगंधा, कुथ अशा कैक औषधी वनस्पती येथे आढळतात. फुलांच्या बाबतीत म्हणाल तर बुरांश, रोडोडेंड्रोन डॉन अशी फुले आपल्याला भुरळ पाडतात. मात्र ह्या फुलांची झाडे आपण आपल्याकडे आणून लावल्यास ती जगत नाहीत, कारण आपल्या राज्याचे वातावरण त्याला पोषक नाही. हरिद्वार मुक्कामानंतर आमचा दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास सुरु होणार होता. मग तेथे आम्ही कपडे, साड्या, प्रसाद, खाऊ खरेदीचा आनंद लुटला. रात्री फेअरवेल कार्यक्रम आयोजित करुन आमच्या सहलीचे सुयोग्य नियोजन करणारे टूर ऑपरेटर श्री. कुंदन चौधरी, सोबत त्यांनी घेतलेले स्वयंपाकी (ज्यांच्या चवदार रांधण्यामुळे आमचे कुणाचेही पोट बिघडले नाही..अगदी घरच्यासारखे चहा-कॉफीसह शाकाहारी-मांसाहारी जेवण, बटाटेवडे, उपमा, कांदा भजी, बटाटा भजी, सूप, मिरची वडे, अंडा वडे, मेदू वडे-चटणी, पुलाव, चपात्या, भाकऱ्या हे सारे मिळाले..) त्यांचाही आम्ही यथोचित सन्मान केला. या प्रवासात सोबत असणाऱ्या माझ्या पंच्याऐंशी वर्षीय सासऱ्यांचा जन्मदिवसही आम्ही त्याच कार्यक्रमात केक कापून साजरा केला. आमच्यापैकी अनेकांचे पासपोर्ट बनलेले असल्याने परदेशात तर केंद्व्हाही जाऊ शकतो; पण आधी आपला भारत देश, तेथील विविध राज्ये, लोकजीवन, चालीरिती, सणवार, परदेशीयांनाही भुरळ घालणारी ठिकाणे आधी पाहुन घेऊ या विचाराने हरिद्वार मुवकामीच पुढच्या वर्षी भारतातील कोणत्या ठिकाणांची सहल आयोजित करायची याची चाचपणी करुन घेतली.
- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई