एक सत्य : कवीने मरणकळांना अर्पण केलेली कलाकृती
कवी आपले हे पुस्तक अर्पण करताना लिहितो, की त्यांना त्यांच्या बालपणी अमानुषतेने दिलेल्या खोल जखमेमुळे, तिच्या अजूनही भळभळण्यामुळे, यातना झाल्या..त्यातून प्रसववेदना झाल्या आणि ‘एक सत्य' ची निर्मिती झाली. कवीला ह्या यातना तडफडत ठेवतात; मरणकळा देतात.
‘एक सत्य'या पुस्तकाचे स्वरूप छोटेखानी; पण आतमध्ये दीर्घ कविता असे आहे. अंधाराचा निर्देशक अशा काळ्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगात पुस्तकाचे शीर्षक उठून दिसते. बाजूलाच पिवळ्या अक्षरात कवीचा नामोल्लेख आहे. मुखपृष्ठाच्या डाव्या कडेला विविध नृत्यकृती करणाऱ्या, विविधरंगी वक्र मनुष्याकृती, सरळ उभ्या ओळीत चितारलेल्या दिसतात. कवितेच्या भावविश्वाशी, अर्थाशी सांगड घालत समर्पक मुखपृष्ठ साकारण्यात चित्रकार श्री. सतीश भावसार साहित्यिक जगतात सुप्रसिद्ध आहेतच. पुस्तकातील अर्थपूर्ण चित्रे ही त्यांच्या अनुभवी, बोलक्या चित्रकारितेची साक्ष देतात.
कवी आपले हे पुस्तक अर्पण करताना लिहितो, की त्यांना त्यांच्या बालपणी अमानुषतेने दिलेल्या खोल जखमेमुळे, तिच्या अजूनही भळभळण्यामुळे, यातना झाल्या..त्यातून प्रसववेदना झाल्या आणि ‘एक सत्य' ची निर्मिती झाली. कवीला ह्या यातना तडफडत ठेवतात; मरणकळा देतात. याच मरणकळांना कवी प्रस्तुत कलाकृती अर्पण करतो.
आपण सर्व माणूस होऊ
अवघं विश्व कवेत घेऊ
असा विश्व कवेत घेणारा मानव बनण्याचं आशावादी स्वप्न पाहणारी कविता लिहिणारे कवी श्री. अनंत धनसरे यांचा एक सत्य हा दीर्घ कवितासंग्रह नुकताच वाचून संपवला. पण नुसता वाचून संपला म्हणून तो अडगळीच्या कपाटात ठेवण्यासारखा नक्कीच नाही. हा काव्यसंग्रह आपल्याला चिंतन, मनन व प्रगतीच्या दिशेने वर्तन करण्यास भाग पाडतो. आपल्या अवती-भवती समाजात ज्या जाचक रुढी-परंपरा, जातिभेद, उच्च- नीचता, समाजातील विषमता, गरिबी- श्रीमंती, अन्याय, अत्याचार, दुराचार, दुर्व्यवहार, काळाबाजार, लाच देणे-घेणे, अमानुषता, कोवळ्या मुली- महिलांवरील अतिप्रसंग, त्याचे त्यांना भोगावे लागणारे दुष्परिणाम, इत्यादी अनेक गोष्टींनी कवी व्यथित होतो.
सदर कविता जन्म घेते. याचा दाखला देणाऱ्या काही ओळी पाहू.
तू पाहतेस पाऊस,
गगनचुंबी इमारतीतल्यातुझ्या गॅलरीतून
मी बसलोय खोपटाला पकडून
कदाचित तेही जाईल
यंदाच्या पावसात वाहून...
आर्थिक विषमतेमुळे हवे असलेले प्रेम मिळणार नाही याची जाणीव कवितेच्या नायकाला आहे. तो तिला संवेदनशीलतेने बजावतो,
कवडीमोल माणसाशी तू करू नकोस सलगी
उद्या तुलाच अग्निपरीक्षा द्यायला लावतील
स्त्रीलाच दोषी समजून, तिलाच शिक्षा देणाऱ्या समाजाचे हे चित्रण आणखी पुढील ओळीतून गडदपणे मांडले आहे.
तेरी भी चूप
मेरी भी चूप
या बळजोरीची
खबरबात थूंकीसह गीळ
या कानाचं त्या कानाला नको
अंधारानं केलंय माझ्या अस्मितेला नागडं..
अशा बंबैय्या हिंदी शब्दांचा, बोलीभाषेतील शब्दांचा वापर बऱ्याच ठिकाणी आढळतो. कवितेचा नायक हा आर्थिक, सामाजिक निम्नस्तरातील आहे. तो फटकरे लावलेल्या झोपडीत राहतो. टीचभर पोटाच्या खळगीसाठी दिवसभर ‘गधामजुरी' करत राबतो. पण तो इमानदारीनं वागतो, त्याला सत्याची चाड आहे. तो कुणाची चाटुगिरी करत नाही. प्रसंगी दोन देईन आणि दोन घेईनही. ह्या बोटावरची थुंकी त्या बोटावर सहज झेलणे त्याला जमत नाही. हेराफेरी तर नाहीच नाही.
तो म्हणतो,
मी मुंगीच्या डोळ्यांनी पाहीन
तिच्या कानांनी ऐकीन सत्याचं गाणं
जगाने पायाखाली चिरडले तरी
मला उलगडू दे सत्याचे पदर...
चातुर्वर्ण्य पध्दतीने पुढे पुढे चौथ्या वर्णावर प्रगतीबाबत अन्याय होत गेला. कवी लिहितो,
जातीची विषवल्ली पेरत येतो
त्रिकोण काटकोन काढत बसलो.
आपण उगाचंच कोनमापकाने
त्रिकोण काटकोन काढत बसलो
त्रिकोणाच्या दोन बाजू असमानता दर्शवतात
मोठ्या बाजूसमोरील कोन चिरडले जातात मुंगसांच्या सत्तेत, कधी मनुच्या खोडरबरने तुच्छतेने खोडले जातात. आज जरी एवढा अन्याय होत नसला तरी कधीकाळी होतेच ना.. किती भयानक!
कवी लिहितो,
मला साफ करू दे माणसांच्या मेंदूला लागलेली वाळवी
ही घाण मला माणूस होऊ देत नाही
माणूस माणसाशी माणसाप्रमाणे कधी वागेल? असा प्रश्न विचारत तो समाजव्यवस्थेला विनवतो,
मला माणसासारखं घडव
मला बुद्धासारखं नटव आणखी पुढे
-निद्रिस्त मनुष्याला येऊ दे जाग
प्रज्ञेनं उजळू देत मे़दूतील जागृतीची केंद्र
समाजसुधारण्याबाबत किती ही तळमळ!
भौतिक साधनांनी जग जवळ आलंय..पण माणूस..? आमची निसर्गकन्या बहिणाबाई म्हणते, मानसा मानसा कानूस तू झाला या ओळी आठवल्याशिवाय राहवत नाहीत.
माणूसच माणसाला गुलाम बनवतो, त्याचे हक्क अधिकार नाकारतो, कधी एकमेकांच्या उरावर बसतो कधी युद्ध करतो..समाजाचं आणि निसर्गाचंही स्वास्थ्य माणूसच बिघडवतो
कवी लिहितो, जगानं खून केलाय वैश्विक मूल्यांचा
सामाजिक भोंगळ कारभार, अनेक प्रश्न..आजूबाजूला रक्तपात,खून, दरोडे, संप, मोर्चे, कुठे निरागस रडणारी बालके, किंचाळत हाकारणाऱ्या माता, भगिनी... पण बिनकानांचं जग..चाललंय सरळ रेषेत..!
यातून कवीला त्याच्या आज्याने सांगितलेली खविसाची गोष्ट आठवते. खवीस-बिवीस कोणी नसून माणसातलाच सैतान होय. पण बंद गटाराला जसं झाकण घालतात तसं सामाजिक अनिष्टतेवर सुसंस्कृतपणाचं आवरण असतं.. त्यात सत्य दडपलं जातं..आत मात्र खदखदणारा लाव्हा (सत्य) लवलवत असतो... तो बाहेर येण्यासाठी जमिनीला हादरे देतो. या ज्वालामुखीत रोज मरतंय कोणी न कोणी.. कदाचित अख्ख जगच..!
कवीला ज्ञानेंद्रियांचा कोळसा झालेल्या माणसांच्या जगात माणसाची निरर्थक भटकंती चालू असलेली दिसते. छोट्या छोट्या ओळींतून कवी मोठं सत्य उघड करतो. त्याच्याच शब्दांत,
चवीतला ‘च' अन् वासातला ‘व'
व्यवस्थेने गिळून घेतला...
कुठे पैशाचा पाऊस पडतो कुठे रक्ताचा
सुख-दुःखाची गोळाबेरीज...मृगजळातील सारेच आकडे फसवे असतात
माणसाचा गर्व, इर्षा, आसक्ती, अमानुषता माकडहाडापासून मोडली पाहिजे,
गुढघ्यातून वाकवली पाहिजे
कवीला फक्त माणुसकी असलेला माणूस अभिप्रेत आहे. स्त्री -दास्यपरंपरेचा कवी धिक्कार करतो. शोषणाची जीर्ण चौकट मोडून टाकून, झलकारी देवीप्रमाणे लढवय्यी बनून, बिनधास्त, बेधडक मुक्तीच्या मशाली नाचवत खोट्या, बीभत्स संस्कृतीचे मनोरे पडून टाकण्याचा आग्रह तो स्रीला करतो. जगात सुसंस्कृतता, सभ्यता, समानता, एकता, शांती, समाधान, सुख सदा नांदावेत अशी सार्थ, समर्पक अभिलाषा धरणारी एक सत्य ही दीर्घ कविता वाचनीय व निश्चितच चिंतनीयही आहे. प्रस्तुत समाजव्यवस्थेवर भाष्य करत ती सत्याचा पुरस्कार करते. वाचकाला अंतर्मुख करते. साहित्य क्षेत्रात महत्त्वाची भर टाकणारा एक सत्य सारखा काव्यसंग्रह समाजमनात नक्कीच प्रकाश टाकेल.
एक सत्य - कवी अनंत धनसरे पृष्ठे - १००, किंमत- रु.१८०
पद्मगंधा प्रकाशन, स्वाती धनसरे, सिद्धार्थ कॉलनी, चेंबूर
पुष्पा कोल्हे