तेथे कर माझे जुळती

आपल्यावर गुलामगिरी लादणाऱ्या गोऱ्या साहेबांच्या देशातील, अर्थात्‌ ब्रिटनमधील एका हिंदू मंदिराबद्दल राजने ऐकले होते आणि एका शनिवारी तो त्या मंदिरात जायला निघाला. एकूण ३ बसेसचा प्रवास. तिसऱ्या बसच्या प्रवासात एका बस स्टॉपवर राज उतरला. तेथूनच त्या मंदिराकडे जाणारा रस्ता होता. कोणता रस्ता घ्यायचा? कसे जायचे? हे माहीत नव्हते म्हणून कोणाची मदत मिळते का हे तो पाहत होता आणि अचानक त्याचे लक्ष समोरील बंगल्यातील गार्डनमध्ये काम करणाऱ्या वयस्कर ब्रिटिश स्त्रीकडे गेले.

राज म्हणाला, "मॅम मला मंदिरात जायचे आहे. कोणत्या रस्त्याने जायचे आणि कसे जायचे तुम्ही मला मार्गदर्शन कराल का?”

"मुला, तुझी गाडी कुठे आहे? या ठिकाणी कारने जायला साधारणतः १५ मिनिटे लागतील. साधारणतः १२ मैल अंतर आहे.”
५ मैल म्हणजे ८ किलोमीटर. मग १२ मैल म्हणजे साधारणतः २० किलोमीटर, राजने आकडेमोड केली.
"माझ्याकडे गाडी नाही, मी चालत जाणार.”
"मुला हे कसे शक्य आहे? अरे हे अंतर जायला तुला ४-५ तास लागतील. मध्ये वाट चुकल्यास कोणतीही मदत मिळणार नाही.”
"मॅम, माझ्या मनात या मंदिरात जाण्याची तीव्र इच्छा आहे. मला तिथे जायचेच आहे. मी जाईन चालत फक्त तुम्ही मला कसे जायचे त्याचे मार्गदर्शन करा,” राज दृढ निश्चयाने म्हणाला.

"मुला, तुला खात्री आहे, तू एवढे अंतर चालशील?”
"हो मॅम,” राज आत्मविश्वासाने म्हणाला.
"थांब जरा,” मॅम हळूवारपणे म्हणाल्या. त्या घरात गेल्या आणि दोन मिनिटांनी बाहेर येत म्हणाल्या, ”बस गाडीत, मी तुला नेते.” अहो आश्चर्यम! एक गोरी मॅडम एका काळ्या माणसाला मदत करत होती, त्यांच्या देशात, ब्रिटनमध्ये.

मॅम अतिशय शांतपणे आणि तितक्याच सराइतपणे गाडी चालवत होत्या. राजला आश्चर्य वाटले गाडीतील गणपतीची मूर्ती बघून. बहुधा कोणा भारतीयाकडून मॅमने गाडी घेतली असावी. आणि काय आश्चर्य! आता गाडीत दिसत होती वि्ीलाची मूर्ती, नंतर रामराया. नंतर सदगुरू दत्त महाराज. सगळंच अदभुत. राज अवाक् झाला.
१५ ते २० मिनिटांत ते मंदिरात पोहोचले. मॅमनी विचारलं, "तुला दर्शन घ्यायला किती वेळ लागेल?”

"५ ते १० मिनिटे.” राज ऊत्तरला.
"टेक युवर टाइम, मी थांबते,” मॅम म्हणाल्या.
दर्शन घेऊन राज परतला. गाडी तिथेच होती परंतु मॅम गाडीत नव्हत्या. स्मोकिंगसाठी बाहेर गेल्या असाव्यात त्याच्या मनात विचार आला आणि त्यांची वाट पाहत तो गाडीपाशी थांबला.

"मुला, झाले का तुला तुझ्या देवाचे दर्शन? घाई तर झाली नाही ना? मी नुकतेच बाहेर जाऊन आले,” म्हणत मॅमने गाडीचा दरवाजा उघडला. म्हणजे मॅम गाडीतच होत्या तर! मग मला त्या गाडीत कशा दिसल्या नाहीत? नुकत्याच बाहेरून आल्यात तर, येताना कशा दिसल्या नाहीत? कदाचित गाडीच्या काळ्या काचा आणि माझा काळा गॉगल यामुळे मला त्या दिसल्या नसाव्यात, राजने स्वतःचे समाधान करून घेतले.

त्यांच्या घरी पोहोचल्यानंतर राजने त्यांचा निरोप घेताना त्यांना वाकून नमस्कार केला. "गॉड ब्लेस यु,”  मॅम म्हणाल्या.

"मुला, तुझी बस येते आहे, मॅमने म्हणाल्या. राज बस स्टॉपवर पोहोचला परंतु बस कुठेही दिसत नव्हती. दोन मिनिटांनी त्याला दूरवर बस दिसली. राजला आश्चर्य वाटले, मॅमना बस येतेय हे कसे समजले?

राज बसमध्ये बसला. मॅमला आणि त्यांच्या बंगल्याला नमस्कार करावा अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. पण काय ते आश्चर्य! त्याला ना दिसल्या मॅम, ना त्यांची कार ना त्यांचा बंगला. बहुधा बसच्या काळ्या काचा आणि त्याच्या काळ्या गॉगलमुळे.

राज घरी पोहोचला, मनात सारखे तेच विचार होते. त्या मॅमनी कोणताही परिचय नसताना मला इतक्या दूरवरच्या मंदिरात का नेले? गाडीत वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती कशा दिसल्या? मंदिरातून निघताना मॅम गाडीत कशा दिसल्या नाहीत? त्या नकळत गाडीत शिरल्या की काय? परतीची बस मॅमना कशी दिसली? बसमध्ये बसल्यावर मला एवढा मोठा बंगला कसा दिसला नाही? विचारांच्या तंद्रीतच त्याचा डोळा लागला.

हे खरंच घडलं होतं की नुसता भास होता? या विचाराने राज खाडकन जागा झाला. साधारणतः रात्रीचे दोन वाजले असावेत. त्याने काल घातलेल्या शर्ट, पँटचे खिसे तपासले. खिशात बसचे तिकीट नव्हतं. म्हणजे तो निव्वळ भास होता. थोडासा निवांत होत तो झोपण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं की तो जनरली जुनी, वापरलेली तिकीटे डस्टबिनमध्ये टाकतो. त्याने डस्टबिन बघितली. डस्टबिनमध्ये अगदी वरच कालचे तिकीट होते. म्हणजे तो भास नव्हता तर वास्तव होते.

मंदिरात जाण्याची तीव्र इच्छा पूर्ण झाली होती त्याचा आनंद तर होताच; पण हे सर्व होताना कोणत्यातरी अलौकिक, अदभुत शक्तीची प्रतीची आली होती. सर्व काही अनाकलनीय होते, अविश्वसनीय होते.

त्या गोऱ्या मॅमच तर परमेश्वर नव्हत्या ना? म्हणजे साक्षात देवानेच तर नेले नव्हते ना मला त्याच्याच दर्शनाला, स्वतःच गाडी चालवत?
त्या मध्यरात्रीही राजचे हात जोडले गेले आणि तो पुटपुटला...

दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती
आणि पुढच्याच क्षणी राजला स्पष्टपणे ऐकू आले, "गॅाड ब्लेस यु.”
मनातील सर्व शंकांचे निरसन झाले होते. सद्‌गदित होत राजने स्वतःला निद्रेच्या स्वाधीन केले.
-दिलीप कजगावकर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

एक सत्य :  कवीने मरणकळांना अर्पण केलेली कलाकृती