साडी पुराण

साड्यांची नावे लक्षात राहावीत म्हणून मी त्या साडीच्या नावाशी खूणंगाठ बांधून ठेवते. एका साडीचे नाव आहे वल्कलम्‌. हे नांव पूर्वी ऋषी घालायचे त्या वल्कल या शब्दाशी मी जोडलेले आहे. म्हणजे ऋषी.. साडी...वल्कलं असं मी मनात ठेवलेलं आहे. खरं म्हणजे साडी आणि ऋषी ही जोडी जरा विजोडच वाटते..पण मला लक्षात ठेवायला सोपे आहे. मला हलकी/भारी कुठलीही साडी आवडते. नवीन साडी मिळाली याचाच आनंद वाटतो.

साडी हा माझा जरा वीक पॉईंट आहे. तसा तो प्रत्येक बाईचा असतोच... पण माझा जरा वेगळा  म्हणजे.. इंग्रजीच्या अर्थाने वीक आहे. इतकी वर्ष साड्या नेसूनही साडी या विषयावरच माझं ज्ञान अजूनही कच्चंच आहे.

 साडीचा पोत बघून तिची किंमत मला कधीच सांगता येत नाही. मैत्रिणी मात्र अगदी परीक्षा घेतल्यासारखे अवघड प्रश्न विचारत असतात.
"नीता सेलमध्ये अगदी स्वस्तात ही निळी साडी घेतली .. काय किंमत असेल?”
"स्वस्तात म्हणजे  दोनशेला घेतली असावी असं समजून मी दोनशे” म्हटलं तर ती रागाने नुसती लाल झाली.
"सेल झाला तरी इतक्या कमी किमतीत मिळणार आहे का ? तू आणून दाखव बघू ..तुला विचारलं हेच चुकलं ..तुला साडीतलं काही म्हणजे काही कळतं नाही. तीनशेला घेतली. बाहेर हीची किंमत पाचशे आहे.” रागाने ती बोलत होती.

 आता या अनुभवावरून मी शहाणी झाले आहे. नंतर एका मैत्रिणीने  साडीची किंमत विचारली.
  मी लगेच विचारले,
"सातशेला घेतलीस का गं?”
 विचारणारीची कळी खुलली.  
ती म्हणाली, "अग फक्त चारशेला घेतली. तू ही सातशेला  घेशील. तुला कोणीही हातोहात फसवेल. तुला साडीतलं ओ का ठो कळत नाही.”
"हो गं काय करू गं..खरंच मला अजूनही लक्षात येत नाही...” मी म्हणाले..

साडीतले लाल, पिवळा, निळा जांभळा,  हिरवा हे ठळक रंग मला कळतात. त्या रंगाचे जे उपरंग असतात ते आले की माझा घोटाळा सुरू होतो....
 एके दिवशी कॉटनची पिवळी साडी आवडली म्हणून मी ती दुकानातून घेऊन आले. जरा वेळाने  सुधाचा फोन आला म्हणून तिला सहज..
"साडी घेतली...” असे सांगितले.
 तिने विचारले, "पिवळा म्हणजे कुठला पिवळा रंग?” मला काही अर्थबोध होईना. म्हणून म्हटले, "अगं पिवळा आहे एवढं खरं”
"अगं पण .. म्हणजे गोल्डन येलो, हळदी का सनपलॉवर यलो?”
समोर साडी असुनही मला काही सांगता येईना...तोपर्यंत तिचा पुढचा प्रश्न तयार होता...."मग ब्राऊनिश येलो आहे का?”
 साडीकडे निरखून पाहिल्यावर लक्षात आले तो तसाही नव्हता.... म्हणून तिला म्हटलं, "तू प्रत्यक्ष येऊन पहा ग.. मला काही समजत  नाहीये.” असं म्हणून मी फोन ठेवून दिला आणि हुश्श केलं...

 दोन दिवसांनी सुधा घरी आली होती. तिने साडी पाहिली आणि म्हणाली, "अगं एवढं कसं कळत नाही तुला हा ब्राईट यलो आहे..” झालं म्हणजे तिसराच रंग होता साडीचा....

मला आवडलेली पटोला मी अठराशेला घेऊन आले. किंमत सांगितल्यावर माझी मैत्रीण किंचाळलीच...”अगं तुला पटोला घ्यायची होती तर मला सांगायचं नाहीस का ? सेल होता तेव्हा घेतली असतीस..ईतकी घाई का केलीस? बघ आता किती महाग पडली...”

 बापरे सुमारे दहा मिनिटें ती मला बोलत होती. बरं एकदा बोलून बाईनी गप्प बसावं की नाही ?  परत एकदा एका कार्यक्रमात मी ती साडी नेसलेली दिसली की तिचं  सुरू झालं .... तिने सगळ्यांना मी किती महागात साडी घेतली याचं साग्रसंगीत वर्णन करून सांगितलं.  बाकीच्या बायका अगदी आश्चर्यचकित होऊन तिचं बोलणं ऐकत होत्या. तीला साथ देत होत्या...त्यातील एकीने पटोला चौदाशेला दुसरीने बाराशेला आणि तिसरीने तर हजारलाच घेतलेली होती..... मला तर वाटतं बायका जास्ती असत्या तर पाचशेलाही पटोला घेणारी कदाचित त्या दिवशी मला भेटली असती....हिरवी साडी घेऊन आले तेव्हा तर फारच गंमत झाली.... मैत्रिणीला कौतुकांनी ती दाखवली ती म्हणाली, "अगं नीता हा हिरवा रंग नाहीये..  हा  तर रामा कलर आहे.”

खरं सांगते  तेव्हा रामा हा रंग आहे हे मला कळले. नंतर तिने मला बराच वेळ समजवून सांगितले तरी हिरवा रंग "रामा”  कधी होतो हे मला कळलेच नाही. शेवटी बिचारीने...हरे रामा...” म्हणून कपाळाला हात लावला. नंतर घरी आलेल्या मैत्रिणीला कौतुकाने  मी सांगितले, "बघ मी नवीन रामा कलरची साडी घेतली.”  तर तिने विचारलं,
"तू यातला मजिंठा कलर का नाही घेतलास?” तो खूप छान दिसतो.
 मला अजिंठ्याची लेणी माहीत होती. हे मजिंठा मी प्रथमच ऐकत होते.... तरी अज्ञान ऊघडं पडू नये म्हणून मी म्हटलं,
"अगं त्यांच्याकडे मजिंठा  कलरच नव्हता..”
"लाजरीकडून घेतलीस ना ? त्यांनी यातल्या मजिंठा कलरच्या साड्या शोकेस ला लावल्या आहेत.” यावर मात्र मी गप्प बसले. असे फजितीचे प्रसंग माझ्यावर वरचे वर येत असतात...

दुकानातली जी साडी आवडेल ती मी घेऊन येते. देताना दुकानदार त्या साडीचं नाव सांगतो. पण घरी येईपर्यंत मी ते विसरून जाते. मग मैत्रिणींनी विचारले, कुठली साडी आणलीस ? की उत्तर देता येत नाही. त्या दिवशी मात्र मी नांव पक्के लक्षात ठेवले होते. मैत्रिणीला उत्साहाने सांगितले, ”मणिपूर सिल्क घेतली.”  तिने साडी हातात घेतली आणि म्हणाली, ”अग ही मणिपूर नाही काही....ही तर  ढाका सिल्क आहे.”

"पण दुकानदारांनी ही मणिपूर म्हणून सांगितलं.”अगं त्याला काय कळतंय मी सांगते ना..ही ढाका सिल्कच...” ती ठामपणे म्हणाली.

बघा ...म्हणजे दुकानदारांपेक्षा माझ्या मैत्रिणीचं ज्ञान जास्ती आहे. साड्या बघताक्षणीच फटाफट त्यांची नांवे सांगणाऱ्या माझ्या मैत्रिणींच्या अफाट ज्ञानाचे मला फार कौतुक वाटते. मी बेळगाव सिल्क घेतली तेव्हा फार गंमत झाली. शेजारच्या काकूंकडे त्याच वेळेस त्यांच्या कानडी वहिनी आल्या होत्या. काकूंना बेळगाव सिल्क दाखवायला गेले. त्यांच्या वहिनी जवळच बसल्या होत्या. साडी हातात घेऊन त्या म्हणाल्या, "अहो हे बेळगाव सिल्क नव्हे हो.. आमचं बेळगाव सिल्क कसं घट्ट असतंय.. हे कसले हो पातळं.. हे बेळगाव नाहीच बघा.”

"वहिनी, इथे हेच बेळगाव सिल्क म्हणून विकतात.” यावर काकू म्हणाल्या,  "तुमच्या पुण्यातले लोक लबाडं बघा.. कशालाही काहीही म्हणतात.. आणि तुमच्या गळी मारतात फसवतात ..”
"वहिनी पुण्यात यालाच बेळगाव सिल्क म्हणतात...” काकूंनी बोलायचं प्रयत्न केला.....पण वहिनी ऐकून घेईनात...
"लोक काही म्हणत हो ..हे बेळगाव सिल्क नव्हे बघा ...माझं आणलं नाही ..नाहीतर इथेच फरक दाखवला असता...”
 काकू त्यांना परत पटवायला लागल्या; पण वहिनीपण ठाम होत्या... आता हा  बेळगाव प्रश्न असल्याने हा लवकर सुटायचे चिन्ह दिसेना तेव्हा मी माझी बेळगाव सिल्क घेऊन तिथून हळूच निघून आले.

साड्यांची नावे लक्षात राहावीत म्हणून मी त्या साडीच्या नावाशी खूणंगाठ बांधून ठेवते.
एका साडीचे नाव आहे वल्कलम्‌. हे नांव पूर्वी ऋषी घालायचे त्या वल्कल या शब्दाशी मी जोडलेले आहे. म्हणजे ऋषी.. साडी...वल्कलं असं मी मनात ठेवलेल आहे. खरं म्हणजे साडी आणि ऋषी ही जोडी जरा विजोडच वाटते..पण मला लक्षात ठेवायला सोपे आहे. मला हलकी/भारी कुठलीही साडी आवडते. नवीन साडी मिळाली याचाच आनंद वाटतो. त्या दिवशीची साडी बघून मैत्रीण म्हणाली, "नीता साडी दिसायला छान आहे... पण टिकेल असं वाटत नाही.”

इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर आता एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे. मग तीच तिला सांगितली म्हटलं. ..."अगं संत सज्जनांनी सांगून ठेवलेले आहे हा देह नश्वर आहे... मग तिथे त्यावरच्या साडीची काय कथा? टिकेल तेवढे दिवसं आनंदानी  वापरायची.. हा देह आहे तोपर्यंत आला दिवस मजेत  घालवायचा मग पुढचे पुढे बघू ....”
काय खरं की नाही?.. - नीता चंद्रकांत कुलकर्णी 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

उन्हाळ्यात शाळा : गुणवत्तावाढ की मानसिक दमन?