सटी आणि सुईण

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात या सटी देवीची पूजा जास्त प्रचलित आहे. रस्त्याच्या कडेला किंवा चौरस्त्यावरील दगडावर दिसणाऱ्या लाल रेघा, अर्पण केलेले अन्न आणि कापलेला लिंबू ह्या सटवीच्या व्रताच्या खुणा. रात्रीच्या वेळेस उपासक स्त्रीद्वारे हे क्रियाकर्म केलेले असते. सटवी, सटुआई, सटी, षष्ठी, रानसटवाई, छटी, घोडा सटवाई या नावांनी ओळखली जाणारी ही मातृदेवता आहे तरी कोण?

  काही दिवसांपूर्वी जन्मलेल्या बाळाच्या रडण्याचा आवाज घरात येतोय. बाहेरच्या बाजूला काही साहित्याची जमवाजमव चाललीय. एक आदेशवजा आवाज ही जमवाजमव करून घेतोय.  ‘मालटा'  नावाने ओळखला जाणारा दगडी दिवा, जाते, पाटा-वरवंटा अशा दगडी साहीत्याची यादी केली जातेय. कधीकाळी नेहमीच्या वापरात असलेल्या या वस्तू,  पण सध्याच्या काळात मिळवणे दगडासारखेच कठीण झाल्यासारख्या. ही सर्व धामधुम चालली आहे ती जन्माला आलेल्या बालकाला कुठलीही बाधा होऊ नये, त्याला चांगले आयुष्य व आरोग्य लाभावे या हेतूने केल्या जाणाऱ्या पाचवीची. ‘सुईण' म्हणून ओळखल्या जाणारी महिला या विधीची सूत्रधार असते. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे कधीकाळी प्रसूतीतज्ञ म्हणून काम पाहणाऱ्या या महिलांचे कार्यक्षेत्र आता किरकोळ विधींपुरतेच उरले आहे.

सहसा मुलीकडे होणारा हा विधी. संपूर्ण महाराष्ट्रात थोड्याफार साम्य-भेदाने हा विधी होताना दिसतो. या विधीवेळी लहान बाळाला वस्त्रांशिवाय निंगडीच्या म्हणजेच निरगुडीच्या पानांवर झोपवले जाते. या पानांवरून उचलण्याचा मान आत्याचा असतो. पाचवीच्या या विधीमध्ये एका सुपात तांदळावर कलश ठेवतात. त्यावर नारळ ठेवून केळीच्या पानाचा लहानसा भाग उभा केला जातो. समोर पानाचे पाच विडे मांडून त्या विड्यांवर सुपारी, बदाम, खारीक, अक्रोड, हळकुंड यांसारखे पदार्थ मांडले जातात.  घुगऱ्या, उकडीच्या पीठाचे मुटके, पिठाचा दिवा बनवला जातो. सुईणीच्या हस्ते बाळंतिणीच्या खाटेच्या चार पायांजवळ चार पीठाचे दिवे व एक दिवा मोरीजवळ ठेवले जातात. काही ठिकाणच्या विधींमध्ये नाममात्र फरक असतो. इथे पाट्यावर वरवंटा ठेवून सात विड्याची पाने देठ खाली करून वरवंट्याला टेकून ठेवतात. पानाच्या टोकांना शेंदूर लावतात. काजळाची दोन बोटे प्रत्येक पानाला दोन डोळे म्हणून लावतात. काही ठिकाणी रुईच्या पानांवर ‘सटी व लाठा' अशी दोन चित्रे काढली जातात. समोर पीठाचे सात दिवे व पाटयाच्या चार कोपऱ्यांना चार पीठाचे दिवे लावतात. प्राचीन परंपरेची जपणूक करणारा मालटा हा दगडी दिवा पाट्याच्या मध्यभागी लावतात. नंतर पूजन करून नैवैद्य दाखवला जातो.

    या सर्व विधीमध्ये सुईण म्हणून काम पाहणाऱ्या महिलेला प्रत्यक्षरित्या नाममात्र मानधन मिळते, मात्र पाट्याजवळ ठेवलेले पैसे दक्षिणा म्हणून प्राप्त करता येतात. यासह काही वेळा बाळाच्या आत्याकडूनही चांगली बिदागी मिळते. ‘सुईण' हा पूर्णवेळ व्यवसाय नसल्याने प्रासंगिक स्वरूपातील कमाईवर या महिला उदरनिर्वाह करतात. इतर वेळेस मात्र त्यांना वेगळा पर्याय स्विकारलेला असतो.

     याच विधीला ‘सटी' असेही म्हटले जाते. ही सटी म्हणजे ‘सटवाई' किंवा ‘सटवी' या नावाने ओळखली जाणारी आणि प्राचीन काळापासून पुजली जाणारी मातृदेवता. अगदी शिवी म्हणून वापरला जाणारा हा शब्द खरंतर मूळ संस्कृत ‘षष्ठी' या शब्दापासून तयार झाला आहे. मुलाच्या जन्मानंतरच्या सहाव्या रात्री ‘सटवी देवीची शांती' करण्यासाठी रात्रभर दिवा लावून ठेवतात. पाट्यावर एक नारळ, कोरा कागद, पेन किंवा पेन्सिल, मुलगा असेल तर हातोडा व मुलगी असेल तर कोयती असे एक शस्त्रही ठेवतात व त्यांचे पूजन करतात. त्या रात्री देवी स्वतः येऊन त्या मुलाच्या कपाळावर त्याचे अदृश्य पण अटल भवितव्य आणि स्वभाववैशिष्ट्य लिहिते, असा समज आहे. यालाच ‘ब्रम्हलिखित' असे म्हटले जाते. सटीचा लेखाजोखा, न चुके ब्रम्हादिका अशी एक म्हण या देवीबाबत प्रचलित आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात या देवीची पूजा जास्त प्रचलित आहे. रस्त्याच्या कडेला किंवा चौरस्त्यावरील दगडावर दिसणाऱ्या लाल रेघा, अर्पण केलेले अन्न आणि कापलेला लिंबू ह्या सटवीच्या व्रताच्या खुणा. रात्रीच्या वेळेस उपासक स्त्रीद्वारे हे क्रियाकर्म केलेले असते. सटवी, सटुआई, सटी, षष्ठी, रानसटवाई, छटी, घोडा सटवाई या नावांनी ओळखली जाणारी ही मातृदेवता आहे तरी कोण?

या मातृकेशी विशिष्ट प्रकारचे नाते असलेल्या स्कंदाला ‘षष्ठीप्रिय' म्हणतात. स्कंद म्हणजेच शिवपुत्र कार्तिकेय. काश्यपसंहितेप्रमाणे षष्ठी ही स्कंदाची बहिण आहे. स्कंद व विशाख हे तिचे दोन भाऊ. तर याऊलट ‘देवी भागवत पुराण' व महाभारतानुसार ती स्कंदाची पत्नी आहे. इथे ती देवमेना या आणखी एका उपनावाने ओळखली जाते.

 सुश्रुतसंहिता षष्ठीला ‘रेवती' हे आणखी एक नाव देते.  कुषाणकाळातील एका मूर्तीमध्ये षष्ठी स्कंद आणि विशाख या दोघांमध्ये उभी असलेली दिसते. तिचे षष्ठी हे नाव सार्थक करणारी ही मूर्ती आहे. कारण या शिल्पात तिच्या खांद्यावर ओळीने पाच डोकी दिसतात. सटवाई देवी अनेक गावांची ग्रामदेवता आहे. हिच्या देवळाचे सहसा बांधकाम करीत नाहीत. फक्त आडोसा असतो. असे असले तरी गुप्त काळांत मात्र बांधकाम होत असल्याचे दिसते. स्कंदगुप्ताच्या काळातील एका लेखांत छंदक नावाच्या व्यक्तीने षष्ठीदेवीचे एक मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे. प्राचीन काळापासून या देवीला पुजले जात असले तरी  पुरूषांचा तिच्या पूजेशी काही संबंध नसतो. षष्ठी-सटी-सटवी म्हणजेच शक्तीचे दुर्गा हे रुप मानले असले तरी लोकमताप्रमाणे ती अविवाहित आहे. ‘म्हसोबाला नाही बायको आणि सटवीला नाही दादला' असे म्हटले जाते. याच कारणांमुळे ‘पाचवी-सटी' या कार्यक्रमाच्या वेळेस पुरुषांची उपस्थिती टाळली जाते. परंतु कालांतराने जसे दगडी दिव्याची जागा धातूच्या दिव्याने घ्ोतली, तसेच या ‘लेडीज स्पेशल' च्या कार्यक्रमात पुरूषांनीही शिरकाव केला. कोणत्याही कार्यक्रमाची सांगता ‘मांस-मद्या' शिवाय पूर्ण होऊ शकत नाही अशी श्रद्धा असणारा एक वर्ग या प्राचीन संस्कृतीला अर्वाचीन पद्धतीने साजरा करतोय. ‘अर्थ समस्या नावाची गोष्ट पाचवीलाच पुजलेल्या मुलींच्या पालकांसाठी ही नवी प्रथा अनर्थाकडे नेत आहे. यामुळे आधीच समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या मुलीकडील लोकांना हा ‘जादाचा भुर्दंड' बसतो. अर्थात संस्कृतीत घडणारे नवे बदल स्विकारायला हवेतच, पण हे बदल असंस्कृत नसतील याची काळजी घ्यायला हवी. या नव्या प्रथांना आवर घालायलाच हवा. देवी सटवाई आणि तिचा विधी पार पाडणारी सुईण या नव्या प्रथाकारांच्या भाळी सद्बुद्धी लिहो, ही सदीच्छा!  - तुषार म्हात्रे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

‘होळी' सणाचे पावित्र्य राखा !