‘होळी' सणाचे पावित्र्य राखा !

 जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने समस्त युवावर्गाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर महिलांच्या सन्मानार्थ स्टेटस आणि पोस्ट लावल्या होत्या तोच युवावर्ग आज होळीचे निमित्त साधून महिलांवर पाण्याने भरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या फेकताना दिसत आहे. धुलीवंदनाला मद्यपान करून रस्त्यांवर धिंगाणा घातला जातो, महिलांना पाहून अश्लील शेरेबाजी केली जाती. लोकांना आणि गाड्या अडवून जबरदस्तीने पैसे उकळले जातात. या अपप्रकारांना रोखण्यासाठी दरवर्षी पोलिसांना शासनाकडून आदेश द्यावे लागतात, याची खरेतर आपल्याला लाज वाटायला हवी.

दुष्प्रवृत्ती आणि अयोग्य विचार यांची होळी करून सत्प्रवृत्ती जोपासण्याचा संकल्प करण्याचा सण म्हणजे होळी. भारतात स्थानपरत्वे हा सण साजरा करण्याच्या पद्धतीही भिन्न भिन्न असल्याच्या पाहायला मिळतात. होळी साजरी करण्यामागील कथाही राज्यानुसार आणि चालीरीतीनुसार वेगवेगळ्या सांगितल्या जातात. काही प्रदेशात होळीला अधिक महत्व दिले जाते, तर काही ठिकाणी होळीनंतर येणाऱ्या रंगपंचमीला. गेल्या काही वर्षांत शहरासारख्या ठिकाणी होळी सणामध्ये गैरप्रकारांचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झालेला पाहायला मिळतो ज्यामुळे या सणाचे पावित्र्य कुठेतरी कमी होऊ लागले आहे. होळीचे निमित्त करून आठवडाभर आधीपासूनच इमारतींच्या गच्चीवरुन, रेल्वे गाड्या, बसेसवर पाण्याने भरलेले फुगे, प्लास्टिक पिशव्या फेकून मारल्या जातात. यांमध्ये शालेय आणि महाविद्यालयीन मुलींसह नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या तरुणींना खासकरून लक्ष्य केले जाते. नुकत्याच पार पडलेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने समस्त युवावर्गाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर महिलांच्या सन्मानार्थ स्टेटस आणि पोस्ट लावल्या होत्या तोच युवावर्ग आज होळीचे निमित्त साधून महिलांवर पाण्याने भरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या फेकताना दिसत आहे.

आज आपण येणा-जाणाऱ्या महिलांवर ज्याप्रमाणे पाण्याच्या पिशव्या फेकून मारत आहोत, कुठेतरी आपल्या आईला, बहिणीला आणि प्रियजनांनाही अशा प्रकारच्या त्रासाचा सामना करावा लागत असेल याचा विचार ही मंडळी केव्हा करणार? दरवर्षी केवळ पाण्याने भरलेले फुगे आणि पिशव्या मारण्यामुळे कितीतरी अपघात घडतात, कितीतरी जणांना आपले डोळे गमवावे लागतात, तर कित्येकांना कायमस्वरूपी अपंगत्व येते. मागील ५-६ वर्षांपासून होळीच्या निमित्ताने फुग्यांना पर्याय म्हणून पातळ प्लास्टिक पिशव्या विक्रीसाठी बाजारात येऊ लागल्या आहेत. धूलिवंदनाच्या दिवशी दुपारीच या प्लास्टिक पिशव्यांचा खच रस्त्यावर साचलेला पाहायला मिळतो. हवेसोबत उडत जाऊन या पिशव्या नाल्यांत आणि गटारांत साचतात. २६ जुलै २००५ या दिवशी मुंबईत महाप्रलय आला होता, ज्याला मुख्यत्वे कारणीभूत प्लास्टिक पिशव्याच होत्या. वर्षभर प्लास्टिक निर्मूलनासाठी प्रयत्न करणारे पालिका प्रशासन होळीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात वितरित होणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांवर कायदेशीर कारवाई करताना कुठे दिसत नाही. काही ठिकाणी परस्परांतील वैमनस्य काढण्यासाठी इतरांच्या वस्तू चोरून त्या होळीत जाळल्या जातात. होळीच्या ठिकाणी बोंब मारण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे; मात्र हल्ली या प्रथेच्या आड कुणाचे तरी नाव घेऊन घाणेरड्या शिव्या घातल्या जातात.

धुलीवंदनाच्या दिवशी एकमेकांना रासायनिक रंग फासले जातात ज्यामुळे बऱ्याचदा गंभीर स्वरूपाचे त्वचाविकार होतात. नासकी अंडी फेकून मारली जातात, मद्यपान करून रस्त्यांवर धिंगाणा घातला जातो, महिलांना पाहून अश्लील शेरेबाजी केली जाती. लोकांना आणि गाड्या अडवून जबरदस्तीने पैसे उकळले जातात. या अपप्रकारांना रोखण्यासाठी दरवर्षी पोलिसांना शासनाकडून आदेश द्यावे लागतात, याची खरेतर आपल्याला लाज वाटायला हवी. हिंदू धर्मातील प्रत्येक सण आणि उत्सव यामागे लोककल्याणाचा आणि सामाजिक एकोप्याचा उदात्त हेतू दडलेला आहे.  होळीसारख्या पवित्र सणामध्ये शिरलेल्या गैरप्रकारामुळे या दिवसांत अनेक जण घराबाहेर पडणे टाळू लागले आहेत. सणांमागील शास्त्र लक्षात घेऊन ते साजरे केल्यास मनुष्याला त्यातून आनंद मिळतोः मात्र होळीसारख्या पवित्र सणाला आलेले ओंगळवाणे स्वरूप पाहता आपणच आपल्या धर्माची अवहेलना करत आहोत हे हिंदू केव्हा जाणणार आहेत ? - जगन घाणेकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 होली है भाई होली है