आनंदाचा क्षण होळी सण
भारत संस्कृतीप्रधान, कृषिप्रधान देश असल्यामुळे साजऱ्या होणाऱ्या अनेक सणांपैकी होळी या सणाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले दिसते. अनेक राज्यात तो वेगवेगळ्या पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. विशेषकरुन नेपाळी लोकांमध्ये हा सण फार महत्वाचा मानला जातो आणि ते खूप आनंदाने हा सण साजरा करतात.
हा सण साजरा करण्याची परंपरा वेगळी आहे; पण तितकीच ती खास आकर्षक आहे. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेपासून त्याची सुरुवात होते. या काळात येणाऱ्या वसंताच्या आनंदाची किनार असते. वसंतोत्सवाला सुरुवात होते. वसंताच्या आगमनाने निसर्गात काही बदल घडून येतात.
होळी सण साजरा करण्यामागे वाईटावर चांगल्याचा विजय मिळविण्याचे प्रतीक होय. प्राचीन काळापासून हे सर्व प्रचलीत आहे. हा सण सुरुवातीला बंगालमध्ये खेळला जात असला तरी तो भारतातील ब्रज या प्रदेशातील भगवान श्रीकृष्णाच्या मथुरा, वृंदावन, बरसाना आणि नंदागाव या शहरात मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा केला जात असे. म्हणूनच त्या ठिकाणी ह्या काळात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. होळी या सणाला रंगाचा सण म्हणून म्हटले जाते. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात आणि पेटलेल्या होळीभोवती प्रदक्षिणा घालतात तसेच होळीची पूजा करून नारळ अर्पण करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. हेच होलिकादहन असून समाजातील दुष्ट प्रवृत्ती, वाईट चालीरितींचा नाश केला जातो.
राथा अणि कृष्ण यांच्या प्रेमाचे वर्णन असणारे होळी सणाचे संदर्भ दिसून येतात. ‘गर्ग संहिता' या ग्रंथात कृष्णाने साजरी केल्याचा उल्लेख नमूद केला आहे. होळी पेटण्यामागे शास्त्रीय कारण असे की थंडीनंतर सुरु होणाऱ्या उन्हाळ्याचा ऋतू संधिकाळमध्ये रोगजंतूचा प्रसार होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे रोगजंतूचा नाश करण्यासाठी तसेच त्रासदायक कीटकाचा नाश करण्यासाठी होलीदहन केले जाते.
होलीदहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. वाळलेली पाने, लाकडे एकत्र करून जाळणे हा होळीचा उद्देश असतो त्यामुळे आपल्या मनातील मलीनता नष्ट होऊन ते निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते. तसेच गव्हाचे पीक आलेले असते, त्याच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. ते अग्निदेवतेला समर्पित केले जाते. दुसऱ्या दिवशी धुलीवंदन म्हणजे धुळवड खेळली जाते. लहानापासून वयोवृद्धांपर्यंत सगळे एकत्र येऊन एकमेकांच्या अंगावर तयार केलेल्या खास नैसर्गिक रंगांची उधळण करून मजा लुटतात. मुख्य म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन एकतेने बंधूभावाने सण साजरा करणे हा हेतु असतो. आपापसातील द्वेष, भांडणे, हेवेदावे विसरून हा सण साजरा करण्यातच आनंद असतो. - लीना बल्लाळ