कोणत्या अँगलने पाहता?

 कोणत्याही गोष्टीचे जसे फायदे असतात तसेच तोटेही. फायद्याचे प्रमाण प्रचंड असल्यास तोट्यांकडे थोडे दुर्लक्ष करता येते. प्रगती, विज्ञान, संशोधन, विकास, सुधारणा या साऱ्याकडे पारंपारिक, रुढीवादी नजरेने पाहुन त्याला नावे ठेवणारे अनेक कर्मठ लोक त्याचा लाभ घेत आपापले जीवन कसे सुकर करीत असतात हेही पाहता येईल. म्हणूनच पाहणाऱ्यांचा त्याकडे पाहण्याचा अँगल, दृष्टीकोन कसा आहे हे महत्वाचे ठरते.

   ‘करलो दुनिया मुठ्ठीमे' हाती आल्यानंतर काही वर्षांनी स्मार्ट फोन अवतरला आणि माहिती तंत्रज्ञानाचा जणू विस्फोटच झाला. त्याच क्षणाला जगाच्या एका कोपऱ्यातील घटना चलत्चित्रस्वरुपात जगाच्या पाठीवरील कोणत्याही भागात पाठवण्याची सोय उपलब्ध झाली आणि तिचा लाभ जनसामान्यही घेऊ लागले. फोन पे, गुगल पे, डिजी लॉकर, व्हाटस्‌ अपवरुन कागदपत्रे पाठवणे, घरी निरोप देणे, शुभेच्छा पाठवणे-प्राप्त करणे, बँकेत-पतपेढीत पैसे जमा करणे, विविध अर्थसंस्थांचे मासिक हप्ते भरणे अशा अनेक बाबींचा लाभ अगदी रस्त्यावर ठेले लावून धंदा करणारे किरकोळ विक्रेते, कामवाल्या महिला, नाका कामगार, बूट पॉलिशवाले अशा साध्या साध्या घटकांनाही कसा होत आहे हे आपण पाहात आहोत. त्याचवेळी या साऱ्याकडे वेगळ्या नजरेने, वेगळ्या अँगलने पाहणारेही अनेकजण आहेत.

   ‘डिजिटल क्रांतीमुळे नवीन पिढी बिघडली, त्यांना अश्लिल साईट्‌स, कामुक चित्रे, मादक व्हिडिओज पाहण्याची चटक लागली, त्यामुळे लफडी वाढली, गैरवर्तन वाढले'  अशा तक्रारी करणारे अनेकजण आहेत व ते सारे वर सांगितलेले डिजिटल क्रांतीचे लाभ बिनदिवकतपणे घेत असतात हेही तेवढेच खरे! सुरीने कांदा कापता येतो आणि एखाद्याची मानही ! काय कापायचे आहे हे ज्याने आपापल्या सद्‌सद्‌विवेकबुध्दीला स्मरुन ठरवायचे आहे. कोणत्याही गोष्टीचे जसे फायदे असतात तसेच तोटेही. फायद्याचे प्रमाण प्रचंड असल्यास तोट्यांकडे थोडे दुर्लक्ष करता येते.  जगभरात वेगवेगळ्या क्रांती झाल्या आहेत. कृषी क्रांती, औद्योगिक क्रांती, हरित क्रांती, दुग्धक्रांती वगैरे वगैरे. विमाने आली, विमानतळ आले..त्यामुळे ध्वनि व हवाई प्रदूषणही आले. पण त्यामुळे जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाणे सुलभ झाले. त्याकडे सकारात्मक नजरेने पाहिले व त्याचे स्वागत केले की त्रास कमी होतो.

   माध्यम जगतामध्ये अँगल अर्थात दृष्टीकोन हा अत्यंत मोलाची भूमिका बजावत असतो. एकाच घटनेकडे वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, देशाचे लोक  त्याचप्रमाणे वेगवेगळ्या देशातील पत्रकारही वेगवेगळ्या नजरेने पाहात असतात. एकाच देशातील एकाच घटनेचे वार्तांकन वेगवेगळ्या दृष्टीकोनाचे, विचारसरणीचे लोक वेगवेगळ्या पध्दतीने करीत असतात. ज्या राज ठाकरे यांनी ‘हिंदु जननायक' हे बिरुद धारण करायला घेतले, तेच त्यांच्याच पक्षातील एकनिष्ठ व ज्येष्ठ नेते, माजी आमदार, माजी मंत्री बाळा नांदगावकर यांनी त्यांना कुंभमेळ्यातून आणलेले गंगाजल दिल्यावर काय म्हणाले..‘अरे हाड..असले पाणी कोण प्राशन करील?' असे जाहीरपणे बोलून अनेकांचा रोष ओढवून घेतला आहे. हेच म्हणणे त्यांना नांदगावकर यांना व्यक्तिगतरित्या सांगता आले असते. पण ठाकरे यांनी तो अँगल घेणे टाळले. राज ठाकरे यांना राज्यात एकेकाळी १३ आमदारांपर्यंत पोहचता आले होते.. वेगळ्या अँगलने त्यांना आता शून्यावर आणून ठेवले आहे.

   या कुंभमेळ्याकडे याच हिंदुस्थानातील कम्युनिस्ट, मुसलमान, हिंदु धर्मातील अन्य विचारवंत, बौध्दधर्मीय लोक, परदेशस्थ विचारवंत, विविध अन्यधर्मीय यांनी कोणत्या अँगलने बघून काय काय मते मांडली ते सारे आता माध्यमक्रांतीमुळे सर्वांना वाचता, पाहता आले आहे.  ‘तिथे स्नानाला गेलेले सारे पापी होते', ‘पाप धुण्यासाठी त्यांनी कुंभमेळ्याची वाट धरली' येथपासून ते छावाफेम विकी कौशल-कतरिना कैफ, अक्षय कुमार, प्रिति झिंटा, राजकुमार राव, मिलिंद सोमण, सुनिल ग्रोव्हर, कैलाश खेर, कबिर खान, विद्युत जामवाल, अनुपम खेर, तमन्ना भाटिया, बोनी कपूर, जुही चावला तसेच क्रिकेट विश्वातील सुनिल गावस्कर, सुरेश रैना, अनिल कुंबळे, आर पी सिंग, मुष्टीयोध्दा मेरी कोम यांनी कुंभमेळ्यात स्नानाचा लाभ घेतला हे सर्वांनी पाहिले आहे. मागील महिन्यात नवी मुंबईत खारघर येथे मुस्लिमधर्मीयांचा सत्संग म्हणजेच इज्तेमा भरला होता. त्यावेळी तेथे आलेल्या दोन मुस्लिम व्यक्तींनी शिवकुमार रोशनलाल शर्मा या वाशीमधील आय टी इंजिनियर गृहस्थाची डोक्यात हेल्मेट मारुन हत्या केली व आता ते दोघेही गजाआड आहेत. धर्मासाठी, अमन-शांतीसाठी, परस्परांतील सलोखा-सौहार्द-सद्‌विचारांच्या प्रचार प्रसारासाठी आलेलेच जर असे खुनी बनून दुसऱ्या शहरातील अन्यधर्मियांचे शांततामय जीवन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन असे धोक्यात आणत असतील तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय या धार्मिक संघटनांच्या कार्यक्रमांना परवानगी देताना यापुढे याही अँगलने विचार करील हे नक्कीच.

   माध्यमकर्मी लोकांसाठी तर हा अँंगल अत्यंत महत्वाचा ठरतो. पाकिस्तान हे आपले शत्रुराष्ट्र आहे हे आजवरच्या विविध घटनांतून पुराव्यांनिशी सिध्द झालेले आहे. धर्मावर आधारीत अखंड हिंदुस्थानची फाळणी झाल्यावरही काही मुसलमानांनी याच हिंदुस्थानला आपली जन्मभूमी, कर्मभूमी मानले व या देशाशीच इमान राखले, या मातीशी ते कृतज्ञ राहिले. त्यातीलच एक भारतीय संघातील क्रिकेटपटू मोहम्मद शमी. भर रमझानच्या महिन्यात रोजे न पाळता तो या मातृभूमी हिंदुस्थानच्या संघासाठी खेळला. या घटनेचा अँगल बदलून अनेक मुसलमानांनी, त्यांच्या काही तथाकथित धर्मगुरुंनी ‘मोहम्मद शमी धर्मद्रोही आहे, त्याने मुस्लिमांच्या परंपरांचे पालन केले नाही' अशी बकबक केली. त्याचेही वार्तांकन विविध प्रसारमाध्यमांतून पाहायला, वाचायला मिळाले. तर अनेक मुस्लिम धर्मगुरुंनीही  ‘शमीने केले ते योग्यच केले, त्याने देशाला धर्मापेक्षा अधिक महत्व दिले' असे वक्तव्य केले. हाच तो बदललेला अँगल व उदारमतवादी, देशप्रेमी वृत्ती होय. भारतीय सैन्यातील जवान पाकिस्तानी घुसखोरांशी लढताना मृत्युमुखी पडले तर भारतीय प्रसारमाध्यमांतून त्यांचे वर्णन ‘देशासाठी शहीद झाले', ‘त्यांनी हौतात्म्य पत्करले' असे येते. पण भारतातच राहुन भारताशी बेईमान झालेले अनेक मुस्लिम नागरिक हे पाकिस्तानी घुसखोर, दहशतवादी, फुटीर लोक भारतात शिरले तर त्यांना आसरा देताना काश्मिरमध्ये आपल्या सैन्यदलाला वेळोवेळी आढळून आले आहे. भारतीय वीर जवानांनी अशा घुसखोरांना मारले तर त्यांचे वर्णन आपली प्रसारमाध्यमे कसे करतील? ‘घुसखोरांचा खातमा केला', ‘दहशतवाद्यांना कंठस्नान घातले', ‘अतिरेक्यांना टिपले', ‘घरात घुसुन मारले' अशा स्वरुपाचा अँगल त्या बातम्यांना दिला जात असल्याचे तुम्ही-आम्ही वाचत असतो.

   भारतात जातीयवाद, धार्मिकवाद, प्रांतवाद, भाषिकवाद हे वेळोवेळी घातक स्वरुप धारण करत असतात. पत्रकारांनी कितीही तटस्थ असल्याचे दाखवले तरी त्यातून आपला-परका दाखवण्याचा अँगल काही लपून राहात नाही. विराट कोहलीवर ताव झाडून लिहीणाऱ्या दिल्लीकर पत्रकारांचा हात सचिन तेंडुलकर, अजिंवय रहाणे या मुंबईकर क्रिकेटपटुंबद्दल लिहिताना आखडत असतो.  महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात दोन्ही राज्यांतील एकमेकांच्या एस.टींवर अधूनमधून दगडफेक होणे, वाहक-चालकाच्या तोंडाला काळे फासणे हे प्रकार घडून येतात. हिंदु-मुसलमान वाद हा देशाच्या निर्मितीपासून जणू पाचवीलाच पूजला आहे. त्याला खतपाणी घालण्याचे काम हा देश न सोडता येथेच राहुन भारतीयांना त्रास देत पाकिस्तानधार्जिणे वागणाऱ्या अनेक मुसलमानांनी इमानेइतबारे केले आहे, करीत असतात. ‘छावा' चित्रपटावरुन निर्माण झालेले विविध वाद त्याचेच प्रत्यंतर देतात. नवी मुंबईत कोपरखैरणेमधील बालाजी चित्रपटगृहात ‘छावा' चित्रपट दाखवला जात असताना काही मुसलमान प्रेक्षक संभाजी राजांच्या छळवादाच्या दृश्यांच्या वेळी हसत होते व आक्षेपार्ह टिकाटिप्पणी करीत होते. त्याचा ‘प्रसाद' अन्य प्रेक्षकांनी त्यांना गुडघे टेकून माफी मागायला लावत जाहीरपणे दिला. पाकिस्तानला जवळचे मानणाऱ्या भारतातील अनेक देशद्रोही यवनांनी  ‘मराठ्यांनी पडद्यावर औरंगजेबाला हरवून बदला घेतला' अशा प्रकारच्या शेकडो पोस्ट्‌स समाजमाध्यमांवरुन व्हायरल केल्या आहेत. याचाच अर्थ असा की भारतात राहुन या देशाच्या शत्रु असणाऱ्यांप्रति सहानुभूती असणारे अनेकजण भारतात राहात आहेत, जे देशाच्या एकता-अखंडतेला बाधक आहे, याही अंँगलने वार्तांकन केले गेले आहे.  

   गेले काही वर्षे आरक्षणाच्या वादाने महाराष्ट्र राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. तशात बीडमध्ये संतोष देशमुखांची क्रूर हत्या झाली. त्यात वाल्मिक कराड व अन्य चार पाच जणांसह मंत्रीपद सोडावे लागणाऱ्या धनंजय  मुंडे यांचे नाव वारंवार घेतले गेले, काहीजणांना अटक करुन त्यांच्यावर आरोपही दाखल करण्यात आले आहे. या वादाला काहीसा जातीयवादाचाही अँगल आहे. मराठा विरुध्द वंजारी/वंजारा असा तो वाद चिघळू नये म्हणून बीडमध्ये काही सरकारी कार्यालयांतून आडनावांऐवजी केवळ नावानेच एकमेकांना हाक मारावी, ओळखावे असा मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न झाला. जातीपातीच्या तटबंदी, उच्च-कनिष्ठ  वाद यातून आर एस एस च्या कार्यकर्त्या सवर्णांचे वर्णन अनेक ठिकाणी ‘संघोटे', तर रामाला मानणाऱ्यांना ‘रामटे' असे केले जात असल्याचे समाजमाध्यमांवर नजर टाकल्यावर दिसून येईल. आजही अनेक वर्णवर्चस्ववादी लोक स्वतःला देवाचा अवतार मानून ‘आम्ही ब्रह्मदेवाच्या तोंडातून जन्म घेतल्याचे' दावे करत असतात. आजच्या संगणक युगात असे बोलणे हे भंपक असून त्याचा वेळोवेळी समाचार रोखठोक अँगल दाखवून अनेक विचारवंतांनी घेतला आहे.

   ...त्यामुळे मानवतावादाचा, चांगुलपणाचा, परस्पर आदराचा, देशप्रेमाचा, विज्ञानवादाचा, विवेकवादाचा अँगल हाच खरा व सर्वांच्या भल्याचा अँगल आहे. त्याच अँगलने होळीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

-राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक : आपलं नवे शहर, नवी मुंबई

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

आनंदाचा क्षण होळी सण