इंदुलकरची पार्टी

आज २६ तारखेला अचानक इंदुलकरचा फोन आला, "३१ तारखेला काय करतोयस?”
"काही विशेष नाही बाबा, काय ३१ तारखेला पार्टी वगैरे करणार आहेस की काय?”
"करू ना, पण त्यासाठी तुला इकडे यावे लागेल”.
"हो येतो ना, फक्त बायकोची परवानगी मिळाली की झालं.”
"ये ये मी वाट पाहतो,”
 मी बायकोला म्हटलं, इंदुलकर ३१ तारखेला बोलावतोय, बहुतेक कसली तरी पार्टी द्यायचा विचार चाललाय त्याचा.”
"आज खूप वर्षांनी इंदुलकरला आठवण झाली तुमची, पण जा तुम्ही, तसा तुमचा तो जवळचा मित्र आहे.”
"नुसता मित्र? अगं चार वर्ष तो आणि मी रूम पार्टनर होतो, त्याच्या आणि माझ्या लग्नाआधी आम्ही सतत बरोबर असायचो.” 

"हो म्हणजे लग्न झालं तुमचं आणि तुमची मैत्री कमी झाली का?”
"कमी झाली नाही, पण माझी बदली झाली आणि तो वेगळ्या गावात मी वेगळ्या गावात, हळूहळू संबंध लांब लांब जातात.”
"मग ३१ ला जाणार का तुम्ही?”
"हो एवढी इंदुलकर पार्टी देतोय, तर जायलाच हवे.”
"पण जरा घेणे-बिणे जरा सबुरीने.”
"अगं तुला माहित आहे, मी फारसा घेतच नाही आणि इंदुलकरपण घेणाऱ्यापैकी नाही.”
 मग इंदुलकर पार्टी कसली देतोय?”
"काय कळत नाही, त्याची आता ६५ जवळ आली म्हणून देत असेल कदाचित.”

 आणि मी मोठ्याने हसलो. इंदुलकर डोळ्यासमोर दिसू लागला. तो आणि मी दोघेही २०-२१ वर्षातले. तो पनवेल होऊन बदली होऊन आलेला आणि मी तासगावचा, माझी पहिलीच नोकरी. मी घर सोडून प्रथमच बाहेर राहत होतो, पुण्यासारख्या मोठ्या शहरात एकटं कसं राहायचं हा मला प्रश्न होता, पण माझ्याच कंपनीत इंदुलकर मला भेटला, कोथरूडला एक छोटा पलॅट भाड्याने घेऊन राहत होता, त्याची ओळख झाली आणि तो मला म्हणाला,  माझ्याबरोबर माझा पलॅट शेअर कर, मलापण निम्मे भाडे दे, माझा तेवढा खर्च कमी होईल आणि मला पार्टनर मिळेल. आणि इंदुलकर आणि मी पुढचे पाच वर्ष रूम पार्टनर झालो. त्याच्याकडे जुनी मोटरसायकल होती, त्यामुळे कंपनीत जाणे येणे एकत्रच होते, जेवणाचे डबे येत होते, पण चहा नाश्ता आम्हीच रूमवर करत होतो. खूप मित्र रूमवर यायचे, भरपूर गप्पाटप्पा, नाटक सिनेमा, वेगवेगळ्या किल्ल्यांवर पिकनिक सारे जोरात होते. इंदुलकर माझ्यापेक्षा खूप हुशार होता, कंपनीतपण तो झरझर वर जात होता, पण त्याचे लग्न झाले आणि आमची जोडी फुटली. त्याची बायको अलिबागची, त्यांच्याच नात्यातली. त्यांच्या लग्नात माझी खूप धावपळ सुरू होती. त्याच्या लग्नानंतर मी त्याचा पलॅट सोडला आणि होस्टेलवर राहू लागलो, पण त्याच्याकडे जाणे येणे असायचेच, मांसाहार असला की तो मला मुद्दाम बोलून घ्यायचा. त्याची बायको चिकन बिर्याणी छान करायची.

 दोन वर्षाने मी कंपनी सोडली आणि कोल्हापूरची कंपनी पकडली. मग माझे लग्न झाले, माझ्या लग्नात इंदुलकर पती-पत्नी धावपळ करत होती, इंदुलकरनेपण नंतर ती कंपनी सोडली आणि जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीत सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तो नोकरीला लागला. आता त्याचा पगार दुप्पट झाला, पण फिरतीपण लागली. महिन्यातले काही दिवस तो फिरतीवर असायचा. मग त्याला मुलगा झाल्याची बातमी कळली. अधूनमधून तो मला पोस्टाने मुलाचे फोटो पाठवत असायचा. मला नंतर एक मुलगी झाली. मी माझ्या नोकरीत आणि संसारात अडकलो. इंदुलकरकडे जाणे-येणे कमी झाले. इंदुलकरचा मुलगा बारावीनंतर इंजिनिअरिंगला गेल्याचे कळले. त्याच दरम्यान इंदुलकरची मराठवाड्यात पोस्टिंग झाली. त्यामुळे महिन्यातले बरेच दिवस तो लातूर उस्मानाबाद भागात जाऊ लागला. पुण्यात त्याची बायको आणि मुलगा. इंदुलकरचा मुलगा इंजिनियर झाला आणि मग त्याने त्याला एम एस साठी अमेरिकेत पाठवले. मुलगा अमेरिकेत जाण्याआधी ती दोघं आमच्या घरी कोल्हापुरात येऊन गेली. पुन्हा आम्ही खूप दिवसांनी गप्पा मारल्या. मग मोबाईलचे युग आले आणि आम्ही व्हाट्‌सअपवर रोजच भेटायला लागलो, इंदुलकरच्या मुलाला अमेरिकेत नोकरी लागल्याचे इंदुलकरने मला कळवले आणि पुढच्याच महिन्यात त्याच्या मुलाचे लग्न ठरल्याचे आणि लग्नाचे आमंत्रण त्याने पाठवले.

लग्न पुण्यात होते, इंदुरकरच्या मुलाने त्याच्याच इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या मुलीशी लग्न जमवले होते. आम्ही दोघं आदल्या दिवशी पुण्यात लग्नासाठी गेलो. इंदुलकरशी चेष्टा मस्करी करत होतो, पण इंदुलकर वहिनी आमच्याशी व्यवस्थित बोलत नव्हती हे माझ्या लक्षात येत होते. काहीतरी बिनसल्याचे आमच्या लक्षात आले, इंदुलकरच्या मुलाची बायको इंदुलकरच्या मुलाला तेवढी शोभूत दिसत नाही असे माझ्या बायकोचे म्हणणे. मी तिच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले, पण रूपाने नसेल, पण गुणी मुलगी असेल, असे मला वाटले.  इंदुलकर निवृत्त झाल्याची बातमी मला कळली, त्याने मराठवाड्यात खूप त्रास सहन केला होता, आता पुण्यात येऊन दोघं नवरा-बायको आनंदाने राहत असतील असे माझे मत झाले, मुलाबरोबर सुनबाईपण अमेरिकेला गेल्याची मला बातमी होती. निवृत्तीनंतरही इंदुलकर कुठेतरी जॉब करत होता याचीही मला बातमी कळली. पण हल्ली इंदुलकर सोशल मीडियावरपण कमी झाला होता. मी त्याच्यासाठी सोशल मीडियावर काही टाकले तर त्याचे उत्तर तो फारसे देत नव्हता आणि आज अचानक इंदुलकरचा मला फोन ३१ तारीखला काय करतोस?

 मी ३१ तारखेची संध्याकाळची बस पकडली आणि रात्री आठ वाजेपर्यंत पुण्यात पोहोचलो. इंदुरकरला कल्पना असल्याने तो मला स्वारगेटला घ्यायला आला होता. दोन-तीन वर्षानंतर इंदुलकर मला दिसत होता, माझ्या लक्षात आले यावेळी तो रोडावला होता, चेहऱ्यावरची रया गेली होती. मी त्याला बस स्टॅन्डवरच कडकडून मिठी मारली.

”का इंदुलकर, आज कसली पार्टी म्हणायची? मी गमतीने विचारले.
”इंदुलकरची पार्टी दुसरं काय? पार्टी द्यायला निमित्त लागतं काय?”
”मग काय बाटलीबिटली घेतलीस की नाही?”
”घेऊया वाटेत, मला माहिती आहे तू तसा पिणारा नाहीस आणि मीपण नाही, पण हल्ली मी थोडा थोडा पिऊ लागलोय बाबा”.
”म्हणजे रिटायरमेंटनंतर प्रगती दिसते की रे तुझी”, मी त्याची चेष्टा करत बोलत होतो.  स्कूटर चालू केल्यावर एका वाईन शॉपसमोर इंदुलकरने गाडी थांबवली, एक ओल्डबनची बाटली खरेदी केली. आम्ही त्याच्या घरी पोहोचलो. इंदुलकरने लॅचने पलॅटचा दरवाजा उघडला.

मी - वहिनी घरात नाही वाटतं?
इंदुलकर - असते केव्हा? अरे गेली अडीच वर्ष ती घरात नाहीये.
मी - काय म्हणतोस? मग आहे कुठे?
इंदुलकर - असेल कुठे कुठे, मला सांगून थोडीच जाते?
मी - अरे म्हणजे.... इंदुलकर - ते सर्व सांगण्यासाठीच मी तुला मुद्दाम बोलावले. तुला काय वाटले इंदुलकर पार्टी देणार? याच्या आधी कधी तुला पार्टीसाठी बोलावलं नाही ते?
मी - हो मला पण आश्चर्य वाटले, माझी बायकोपण तेच म्हणाली, इंदुरकर असे कधी पार्टीला बोलवत नाहीत.

इंदुलकरने बाटली टेबलावर घेतली, दोन ग्लास धुऊन घेतले, सोबत खायला म्हणून शेंगदाणे घेतले. बाटली फोडली आणि दारू दोन ग्लासात ओतली, त्यात सोडा ओतला. माझ्या हातात एक ग्लास देवून आपण दुसरा ग्लास घेतला, ग्लासाला ग्लास भिडवून, आपला ग्लास तोंडाला लावला,
इंदुलकर - घे, ही इंदुलकरची पार्टी.
मी ग्लास उचलला आणि एक घोट घेऊन खाली ठेवला.

इंदुलकर - अन्या, आपण अगदी २२ वर्षाचे होतो, तेव्हापासूनची आपली मैत्री आहे. याचा अर्थ अगदी आपल्या तरुणपणापासून आपण एकमेकाला ओळखतो. पाच वर्षे तर आपण सतत बरोबर असायचं. मग तू कंपनी बदलीस आणि कोल्हापूरला गेलास. माझं लग्न झालं आणि नंतर मीपण नोकरी बदलली. आपण तसे आता फारसे भेटत नाही, पण जीवाभावाचा मित्र म्हटला की तूच आठवतोस. आज माझ्या जिवाभावाच्या मित्राला मला काही सांगायचं, म्हणून मी मुद्दाम बोलावलं, ही आपली लहानशी पार्टी हे निमित्त. बाकी तुला दारू प्यायला आवडत नाही आणि मलापण हल्ली हल्ली पर्यंत आवडत नव्हती...पण हल्ली मी थोडी थोडी दारू प्यायला लागलोय. डोक्यावरचा ताण थोडा कमी व्हावा म्हणून. अन्या, माझ्या लग्नाला तू होतास, आज तुला स्पष्टपणे मला सांगायचंय, माझ्या बायकोने माझा कधी विचारच केला नाही. मी लातूर, उस्मानाबादसारख्या उष्ण भागात नोकरी करतो, मी पण थकून जाऊ शकतो पण हिला त्याची किंमत नव्हती. सहा दिवस नोकरी करून म्हणजे अनेक गावात फिरून मी शनिवारी रात्री बारा तासाचा प्रवास करून पुण्यात यायचो तेव्हा माझ्यासाठी जेवण पण तयार नसायचं. मग मी एसटी स्टँडवर उतरून काही बाही थोडेफार खायचं आणि घरी यायचं. घरी आल्यावर आमच्या बाईसाहेब आणि चिरंजीव गाढ झोपी गेलेले असायचे. मीच लॅचने घर उघडायचं आणि झोपी जायचं. रविवारी सगळा दिवस घरातला किराणा भरणे, भाजीने फ्रिज भरणे, या सर्वांचे इस्त्रीचे कपडे आणणे आणि सायंकाळच्या बसने पुन्हा बारा तासाचा प्रवास करून मराठवाड्यात पोहोचणे हे की माझे गेल्या कित्येक वर्षाचे रुटीन आहे. सतत मोटरसायकलवर फिरणे आणि वयामुळेपण माझे थोडेफार पोट सुटले, त्यामुळे माझी बायको ज्याला त्याला ”माझा नवरा तिकडे जाऊन खूप दारू पितो म्हणून त्याचे पोट सुटले असे सांगू लागली. शेवटी कंटाळून मी तिला म्हटले "माझा सर्व पगार मी तुझ्या हाती देतो, महिन्याच्या खर्चासाठी फक्त पाच हजार रुपये त्यातले घेतो, त्या पाच हजारात तिकडे राहणे दोन वेळचे जेवण चहापाणी एवढे करून दारू प्यायला माझ्याकडे पैसे राहतील का? तुम्ही इकडे पुण्यात मजेत राहता, तुला किंवा आमोदला जे काही हवे ते घेण्याची पूर्ण मुभा आहे, आमचे एक शिक्षण, क्लास यासाठी कधीही आम्ही पैसे कमी करत नाही, मी लातूर, उस्मानाबाद भागात कसा राहतो आणि काय जेवण खातो हे तुम्ही एकदा बघाच, दारू प्यायची गोष्ट सोडून द्या.”

 असे म्हणूनही तिच्या बोलण्यात काही फरक पडत नव्हता. तिला आपल्या बहिणीची आणि आपल्या भावजीचे मोठे कौतुक. बहिण आणि भाऊजी युरोपच्या टूरवर गेली, म्हणून मला सतत टोमणे मारत होती. पण हिची बहीण बँकेत नोकरी करते हे ती विसरते. इथे माझा एकट्याचा पगार आणि मुलाचे शिक्षण क्लास, एवढे सर्व सांभाळून युरोप टूर करणे कसे शक्य आहे? मुलगा नोकरीला लागला की आपण युरोप टूर करू, हे मी तिला वारंवार सांगितले.

 दुर्दैवाने आमचा आमोद फारसा हुशार निघाला नाही, त्याला बारावीला अगदी कमी मार्क पडले. त्याचाही दोष ती मला सतत देत राहिली. बापाचे लक्ष नाही म्हणून मुलगा असा भरकटला असे तिचे म्हणणे. भरपूर पैसे भरून मी अमोलला एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. कॉलेजमध्ये त्याचा परफॉर्म दिसेना म्हणून त्याला महागडा क्लास लावला. मी उस्मानाबाद पुणे उस्मानाबाद हे सर्व करतच होतो. शेवटी एकदा आमोद इंजिनियर झाला. इथे त्याला कुठली नोकरी मिळेना. म्हणून त्याने अमेरिकेत जाऊन एम एस करण्याचे ठरवले. आमचा एकुलता एक मुलगा, तो शिकावा अशी माझी ईच्छा. त्याच्या आईचीपण त्याने अमेरिकेत जाऊन एम एस करावं अशी अपेक्षा, कारण तिची भाचीपण अमेरिकेत एम एस करत होती म्हणून. शेवटी तीस लाखाचे एज्युकेशन लोन घेऊन आमोद अमेरिकेला गेला.

 इंदुलकरने आपला ग्लास संपवला, आणखी बाटलीतली दारू थोडी पुन्हा आपल्या ग्लासात ओतली. माझ्या ग्लासकडे पाहतो उद्‌गारला  ”अन्या, तू अगदीच स्लो रे, पार्टी घायला आलास नव्हे? का माझ्या बोलण्यात अडकलास,”

मी म्हणालो "तू बोल रे इंदुलकर, तू मला तुझा जवळचा मित्र समजून तुझी वैयक्तिक कहाणी सांगतोस, ते ऐकतोय मी.
इंदुलकर - कहाणी म्हणालास रे अन्या, खरंच कहाणीच, ‘एका दुर्दवी पुरुषाची'.
मी - असं म्हणू नकोस इंदुलकर.
इंदुलकर - मी पुढे काय सांगतो ते ऐक आणि मग ठरव मी सुदैवी की दुर्दैवी?  मला साठ वर्षे झाली आणि मी निवृत्त झालो, मला पेन्शन वगैरे काही मिळणार नव्हतीच, पण आमोदचं एम एस पूर्ण होत आलं ही जमेची बाजू. मी पुण्यात राहायला आलो आणि पुन्हा घरात धुसफुस सुरू झाले. युरोप टूरला जायचं म्हणून मागणी येऊ लागली. मी म्हणत होतो थोडे दिवस थांब. एकदा अमोलला नोकरी मिळू दे त्याचं लग्न होऊ दे मग आपण जाऊ, पण पुढे काय होणार याची मला त्यावेळी कल्पना नव्हती.
मी - पुढे काय झालं?
इंदुलकर - आमोद एम एस झाला आणि त्याला तिकडे नोकरी मिळाली. आमचा आनंद विरतो न विरतो एवढ्यात आमोदने आपण लग्न करत असल्याची बातमी आम्हाला दिली. त्याची कॉलेजमधली मैत्रीण आणि आमच्या शेजारच्या वाडीत राहणारी कल्पना हिच्याशी त्याने लग्न ठरवलं होतं. कल्पनापूर्वीसुद्धा आमच्या घरी येत होती. मला ती फारशी आवडत नसली तरी आपल्या मुलाने लग्न तिच्याशी ठरवले म्हणून मी गप्प बसलो. पण त्याच्या आईला ती अजिबात पसंत नव्हती. तिच्याशी तू लग्न करायचं नाही म्हणून ती मुलाशी भांडू लागली. मला सांगायला लागली, तू अमोलला सांग आणि हे लग्न मोडून टाका.

 तिच्यासमोरच एकदा आमोदला सांगितलं, "तुझ्या आईला कल्पना पसंत नाही आहे, तेव्हा तू दुसऱ्या मुलीचा विचार करावास.” पण आमोदने अमान्य केले, त्याला तिच्याशीच लग्न करायचे होते, मी गप्प बसलो. पण त्याची आई कसलेच सहकार्य करेना. आमोदला लग्न करून अमेरिकेला जायचे होते म्हणून मला तातडीने लग्नाची तयारी करावी लागली. मी कल्पनाच्या घरी जाऊन तिच्या आई-बाबांना ही बातमी सांगितली. अर्थात त्यांना त्याची कल्पना होतीच, त्यांच्या मुलीला आमोदच्या रूपाने लॉटरी लागली होती. त्यामुळे ते खुश होते. वीस दिवसात लग्न करायचे म्हणून मी हॉल शोधू लागलो, या काळात माझ्या बायकोने माझ्याशी अबोला ठेवला होता. जाता येता मला टोमणे मारत होती. मी लग्नाला येणारच नाही असे ठणकावून सांगत होते. पण आपल्या मुलाच्या लग्नाला विरोध करून, तो कायमचा दुरावला असता  म्हणून मान खाली घालून मी लग्नाची सर्व तयारी करत होतो. शेवटी मी हॉल शोधलाच, कल्पना पुण्यातच होती. तिला बरोबर घेऊन तिचे कपडे घेतले, लग्न पत्रिका छापल्या, तिचे आई-वडील बिनधास्त होते. कारण त्यांचा होणारा जावई त्यांच्या मर्जीत होता, माझ्या बायकोचे कसलेच सहकार्य नव्हते. उलट जसजसे लग्न जवळ आले तसा तिचा ताप सुरु झाला. तिने आमच्या जवळच्या नातेवाईकांना फोन करून सांगितले, या आमच्या लग्नाच्या पुण्य वचनाला मी बसणार नाही, माझ्या नवऱ्याने मला न विचारता हे लग्न ठरवले, मी लग्नाच्या काळात बेंगलोरला निघून जाणार आहे. अन्या, या काळात मी कसल्या मनस्थितीतून जात असेल याची तुला कल्पना येईल, लग्नाची आमंत्रण इकडे मी करत होतो हृदयात चलबिचल होत होती, लोकांसमोर तमाशा होण्याची शक्यता होती. मी तिच्या माहेरी जाऊन तिच्या आईला याची सर्व कल्पना दिली. आईने तिला काही झाले तरी लग्नाचे पुण्य वचन करायचेच, असा दम मारला, तेव्हा ती आदल्या दिवशी बेंगलोरहुन हजर झाली.

 तुम्ही जवळचे नातेवाईक मित्रमंडळी आप्तेष्ट लग्नासाठी आदल्या दिवशी आला होता, त्याच्या आधी काही तास माझी बायको आपल्या मुलाच्या लग्नासाठी बेंगलोरहुन आली होती. आल्यापासून गुश्यात होती, माझ्याशी किंवा आपल्या मुलाशी एक शब्द बोलत नव्हती. तिची आई तिथे हजर होते म्हणून बरे. पुण्य वचनाच्या वेळी तिच्या आईने जबरदस्तीने तिला माझ्या शेजारी बसवले. माझ्या हाताला हातसुद्धा न लावता कसेबसे पुण्य वचन आटोपले.

मी - ते लक्षात येत होतं, माझी बायकोपण म्हणाली, इंदुलकर वहिनीने आमच्याकडे लक्षपण दिलं नाही.
इंदुलकर - तुमच्याचकडे काय तिने कोणाकडेही लक्ष दिले नाही.

 कसंबसं लग्न आटोपलं आणि दुसऱ्या दिवसापासून तिने भांडणाला सुरवात केली. कल्पनाला ती बघूनच घेईना. या भांडणाला कंटाळून आमोद सासुरवाडीला जाऊन राहिला. दहा-बारा दिवसानंतर तो अमेरिकेला गेला, कल्पना आपल्या आई-वडिलांकडेच होती. पंधरा दिवसानंतर माझी मेव्हणी आणि तिचा नवरा म्हणजे हिची बहीण आणि हिचा नवरा अमेरिकेला जायचे होते, त्या त्या बहिणीचा धाकट्या बहिणीकडे त्याची बायको आणि त्यांचा सहा महिन्याचा मुलगा मुंबईला होता. ती दोघं नोकरी करणारी, त्यांना लहान मुलाला सांभाळणार कोणीतरी हवं होतं, हिला आपल्याकडे बोलावलं आणि ही आपले कपडे घेऊन त्या बहिणीकडे गेली. ती गेली अडीच वर्षे तिकडेच आहे. पहिले एक वर्षभर मी चार-पाच वेळा जाऊन घरी चलण्याची सूचना केली, पण ही माझी बायको मला ओळखच दाखवत नव्हती. कोणीतरी अनोळखी इसम असावा, तसे माझ्याशी बोलतपण नव्हती. तिच्या बहिणीला आणि भाऊजीला मी याबद्दल सांगितले, त्यांचे म्हणणे कोणी आपल्याकडे आलेल्याला मी हाकलून देऊ शकत नाही, मग मात्र गेली एक-दीड वर्षे मी तिकडे गेलेलो नाही. मध्यंतरी माझी आई वारली, तेव्हापण ती आली नाही.

मी - हे सारे विचित्रच आहे, खरंतर आता तुम्ही दोघांनी साठी पार केलेली आहे, नवरा बायकोला एकमेकाची गरज असते. आयुष्यातील शेवटचे दिवस एकमेकांच्या सोबतीने राहायला हवे.

इंदुलकर - पण हे तिला कळत नाही त्याचे काय?
मी -आणि आमोद? त्याचे काय म्हणणे?
इंदुलकर -तो तिच्याशी बोलतच नाही.
मी - आणि तुला फोन करतो की नाही?
इंदुलकर - बघा मी तुला म्हणालो अन्या, मी दुर्दैवी माणूस आहे म्हणून. माझा मुलगा किंवा माझी सून मला फोन पण करत नाहीत.
मी - का? आश्चर्य आहें.
इंदुलकर- अमोलला अमेरिकेला जाताना शिक्षणासाठी ३० लाखाचं एज्युकेशन लोन घेतल्याचे तुला सांगितलं, आता नोकरी लागल्यावर त्याने ते कर्ज फेडावे अशी अपेक्षा असते ना आपली.
मी - अर्थात, त्यानेच फेडायला हवं.
इंदुलकर - लग्न झाल्यानंतर त्याने थोडे पैसे बँकेत भरले, पण ते पैसे एवढे कमी होते की त्याने व्याजसुद्धा पूर्ण होईना. मी त्या कर्जाला जामीन होतो. माझ्याकडे बँक सतत कर्जाचे हप्ते मागू लागले. आपल्यासारखे मध्यमवर्गीय लोक बँकेने पैशासाठी फोन करणे हे आपल्याला सहन होत नाही. म्हणून रागाने माझे कंपनीकडून मिळालेल्या पैशातून मी सर्व कर्ज फेडून टाकले आणि मी  कंगाल  झालो.

मी -काय म्हणतोस? तू सर्व कर्ज फेडलेस?
इंदुलकर उठला आणि कपाटातून बँकेचे स्टेटमेंट घेऊन आला,
इंदुलकर - अन्या हे बँकेचे स्टेटमेंट बघ. कर्ज घेतलेले कर्ज फेडलेले व्याज भरलेले, २८ लाख कोणी भरले हे पण त्यावर आहे. मी खोटं सांगत असेल तर तू तुझ्या डोळ्यांनी खात्री कर.

   मी ते बँकेचे स्टेटमेंट पाहिले, एका नजरेत मला कळले इंदुलकर सत्य बोलतो आहे.
इंदुलकर - हे सर्व कर्ज मी भरल्याचे आमोदला कळल्यापासून त्याने फोन करण्याचे बंद केले. कारण त्याचे काम झाले होते. मी तुला मगाशी म्हटलो, माझ्या मुलाच्या बाबतीतसुद्धा मी दुर्दैवी आहे. माझा मुलगा आणि सून तिच्या आई-वडिलांना फोन करतात, पण मला फोन करत नाहीत. हल्ली माझ्या सुनेला दिवस गेल्याचे तिच्या वडिलांनी मला फोन करून सांगितले, तेव्हा मला कळले. तुला खोटे वाटत असेल तर हा व्हाट्‌सअप बघ.

 इंदुलकरने व्हाट्‌सअप उघडून मला व्हाट्‌सअप दाखवला. सुनेच्या वडिलांचा व्हाट्‌सअप होता, आपल्या मुलीला दिवस गेल्याचे कळवण्याचा.

मी - मग सुनेला दिवस कळल्याचे तुझ्या बायकोला कळले का?
इंदुलकर - काय माहित? तिने जर माझ्याशी संपर्क सोडला तर मला कसे कळणार?
मी - हे काय चाललं आहे इंदुलकर? कसली अवदसा आली आहे सर्वांना?
इंदुलकर - खरं आहे अन्या, अवदसा आली आहे सर्वांना, वयाच्या या टप्प्यात आनंदाने सुखाने राहावे ते सोडून ती बहिणीकडे जाऊन राहिली आहे.
मी - तू कुठेतरी नोकरी करत होतास ना? अजून करतोयस का?
इंदुलकर - नोकरी अजूनही करतो रे मी, जॉन्सन अँड जॉन्सनचा डेपो आहे ना इथे, तिथे मला त्यांनी बोलावून घेतलं, मला तीस हजार रुपये पगार दिला, मी तिथे आनंदाने नोकरी करत होतो.
मी -करत होतो म्हणजे?
इंदुलकर - करत होतो म्हणजे आता मी सोडणार ती नोकरी, कुणासाठी या वयात नोकरी करायची रे अन्या? कुणासाठी पैसे कमवायचे? जिच्यासाठी कमवायचे तिला अक्कल नाही, मीपण आता माझ्या मनाची तयारी केली आहे अन्या,
मी - कसली तयारी इंदुलकर?
इंदुलकर - मी आता हा सगळा संसार सोडणार आहे, मुलगा असून तिकडे अमेरिकेत मजेत आहेत, त्यांना बाबाची गरज नाही, बायकोला नवऱ्याची गरज नाही, हा माझा ब्लॉक मी विकणार आहे, साताऱ्यात एक मी प्लॉट घेऊन ठेवला होता, तोसुद्धा विकणार आहे.  मी - आणि कुठे जाणार इंदुलकर?
इंदुलकर - मी नाशिकजवळ एक आश्रम पाहून ठेवला आहे, त्या आश्रमामध्ये अशी अट आहे, जोपर्यंत तुम्ही तब्येतीने धडधाकट आहात, तोपर्यंत वृद्धांची काळजी घ्यायची, त्यानंतर जेव्हा तुमची काळजी घ्यायची असेल, तेव्हा आश्रम तुमची काळजी घेईल, म्हणजेच माझ्यासारखे जे नवीन धडधाकट वृद्ध तिथे येतील ते आमच्यासारख्या म्हाताऱ्यांची काळजी घेतील.

 मी हा ब्लॉक आणि साताऱ्याचा प्लॉट विकून बँकेत पैसे जमा करून ठेवणार आहे. आणि त्या आश्रमात लवकरच जॉईन होणार आहे.
   मी सुन्न होऊन ऐकत होतो, इंदुलकरच्या आयुष्यात काय चालले आहे हे माझ्या लक्षात येईना. इंदुलकर म्हणाला हे खरेच, तो एक दुर्दैवी पुरुष आहे, ज्याला अशी बायको आणि असा मुलगा मिळाला.

  हातातील ग्लास संपत आले होते. चटपट चार अंडी फोडली आणि अंड्याचे आमलेट करू लागला. पाव आणलेला होता तो तव्यावर गरम करू लागला.
इंदुलकर - या अडीच वर्षात मी उत्तम जेवण करायला शिकलो रे अन्या, घर आवरायला शिकलो.

अन्या चेहऱ्यावर केविलवाणे हसू आणून मला सांगत होता. आम्ही आमलेट पाव खाल्ला, दोघांनी झोपण्याचा प्रयत्न केला, मला झोप येतच नव्हती, या कुशीवरून त्या कुशीवर वळताना इंदुलकरकडे पाहत होतो.

 इंदुरकर डोळे उघडे ठेवून चक्क जागा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी कोल्हापूरला परतलो. चार महिन्यानंतर इंदुलकरचा मेसेज आला "मी नाशिकच्या आश्रमात आज प्रवेश घेतला.” - प्रदीप केळुसकर   

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मैत्रीचं नातं हे फार वेगळंच!