जप तप कर्म क्रिया नेम धर्म। वाउगाची श्रम व्यर्थ जाय

श्रीराम
सर्व साधनांतील श्रम, समस्या, मर्यादा हे समर्थांनी स्पष्ट केले आणि एक निःसंदिग्ध निष्कर्ष लोकांसमोर ठेवला की नाम हेच सर्व साधनांचे सार आहे. माणसाने सारे संशय सोडून नामावर विश्वास ठेवावा. नामसाधनाचे श्रेष्ठत्व सांगताना समर्थ म्हणतात की इतर साधनांची परिपूर्ती होण्यासाठीही नामच घ्यावे लागते.

नव्हे कर्म ना धर्म ना योग कांहीं।
नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं।
म्हणे दास विश्वास नामीं धरावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा । श्रीराम ७६।

अनेक जन्मांचे सुकृत म्हणून माणसाला आपल्याला भगवंत भेटावा अशी इच्छा निर्माण होते. त्याला जाणूनघ्यावे अशी जिज्ञासा निर्माण होते. त्यासाठी कोणाचे काही ऐकून, पाहून, वाचून तो तशा प्रयत्नांना लागतो. कर्म, धर्म, योग, इ. मार्गांचा तो अवलंब करून पाहतो. पण ही साधने कठीण आहेत, हे मार्ग बिकट आहेत. त्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. देहाला कष्ट होतात. मनाला फार आवरावे लागते. द्रव्य खर्च करावे लागते. सर्व साधनांतील श्रम, समस्या, मर्यादा हे समर्थांनी स्पष्ट केले आणि एक निःसंदिग्ध निष्कर्ष लोकांसमोर ठेवला की नाम हेच सर्व साधनांचे सार आहे. माणसाने सारे संशय सोडून नामावर विश्वास ठेवावा.

नामसाधनाचे श्रेष्ठत्व सांगताना समर्थ म्हणतात की इतर साधनांची परिपूर्ती होण्यासाठीही नामचघ्यावे लागते. तरच त्या साधनातील दोषांचे, न्युनतेचे निवारण होते. "मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तीहीनं सुरेश्वर। यत्पूजितं मयादेव परिपूर्ण तदस्तुमे  न्युनं संपूर्णतां याति यद्योवन्दे तमच्युतम ।” कोणतेही यज्ञ, याग, पूजाविधी इ.कर्म केल्यानंतर भगवंताला शरण जाऊन असे आळवावेच लागते की, "मला मंत्रोच्चार नीट करता येत नाहीत, क्रिया नीट करता येत नाहीत. त्यामुळे माझ्या ह्या कर्मात जे दोष आले असतील त्याबद्दल क्षमा करा. जे न्यून राहिले असेल ते पूर्ण करून घ्या. आणि यथाशक्ती यथामती केलेले माझे कर्म स्वीकारून घ्या.” अशी याचना, प्रार्थना केल्याशिवाय कोणतेही धर्म-कर्म यथासांग झाले असे मानता येतनाही. नाथमहाराज म्हणतात, ”न करिता भगवत्भजन। वेदाध्ययन यज्ञ दान। येणेचि आम्ही जाऊ तरून।म्हणती ते जन महामूढ (ना.भा.२६-२८१) ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, "जप तप कर्म क्रिया नेमधर्म। वाउगाची श्रम व्यर्थ जाय”(हरिपाठ १९-२). कलियुगात शास्त्र यथार्थपणे जाणू शकणा-या तज्ञांचाअभाव, वेळेचा अभाव, इच्छाशक्तीचा अभाव अशा अनेक कारणांमुळे कर्मे यथासांग घडत नाहीत. म्हणूनचहरि स्मरण करून कर्म ईश्वराला अर्पण करावे लागते. तेव्हा ते परिपूर्ण होते. तात्पर्य असे की कर्माचीशुध्दता राहणे व अशुध्दता जाणे हे सर्व शेवटी नामावरच अवलंबून असते. "कर्मी कर्म विगूण होत। तेथस्मरावा मी अच्युत। नामे न्युन ते संपूर्ण होत। हे सामर्थ्य नामाचे”(ना.भा.१०-४६०)
धर्म कशाला म्हणावे याबाबत विद्वानांची निरनिराळी मते आहेत. वर्ण-आश्रमाप्रमाणे आचरण, अहिंसा, मानवता, प्रजा धारणा अशाधर्माच्या वेगवेगळ्या व्याख्या केल्या जातात. पण स्वतः भगवान्‌ उध्दवाला धर्माचे गुह्य सांगताना म्हणतात, "ऐक उध्दवा निज वर्म। गुह्य सांगेन मी परम। माझी भक्ती जे सप्रेम। उत्तम धर्म तो जाण”(ना.भा.१०-३४९) समर्थ म्हणतात, "सकळ धर्मामध्ये धर्म। स्वरूपी राहणे स्वधर्म” योग म्हणजे अष्टांग योग. यातयम,नियम, आसन इ. साठी शारीरिक व मानसिक श्रम करावे लागतात. शरीराची लवचिकता लागते. शरीर-मनावर विलक्षण ताबा असावा लागतो. चित्तवृत्तींचा निरोध करून मनाची एकाग्रता साधावी लागते. हे सोपे नाही. मन एकाग्र होण्यासाठी नामाचाच आधार घ्यावा लागतो. जरी रूपाचे ध्यान करायचे ठरवले तरी त्या रूपालाही काहीतरी नाम द्यावेच लागते. माणसाने आपल्या जीवनात फार काही पुरुषार्थ न करता फक्त विषयांचे भोग घेण्यातच रमायचे ठरवले तरी त्यापासून वायमचा आनंद काही लाभत नाही. क्षणिक समाधान,नव्या वासना, अतृप्ती, अति भोगांमुळे येणारे अनारोग्य, त्यामुळे विषय समोर असूनही ते भोगण्याचीअसमर्थता यातून केवळ दुःख निर्माण होते. भोग दुःखदायक ठरतात म्हणून विषयांचा त्याग करावा म्हटलेतर तेही कठीण असते. जगात वावरायचे तर विषयांचा योग्य प्रमाणात उपभोग घेणे अनिवार्य असते.विषयांचा त्याग न करता आसक्तीचा त्याग करणे उचित आणि अपेक्षित आहे. पण तेही जमत नाही. कर्मात निरपेक्षता, निष्कामता येण्यासाठी भगवंताचा, पर्यायाने त्याच्या नामाचा आधार घ्यावाच लागतो. सारांश असा की या ना त्या प्रकारे नाम हेच आपले तारक आहे. ज्या नामाने अनेक भक्त तरले, त्यांचे ऐहिक तसेच पारलौकिक कल्याण झाले त्या नामावर दृढ विश्वास ठेवून आपलेही इहपर कल्याण साधून घ्यावे. नामाचा अभ्यास करावा. पहाटेची शांत प्रसन्न वेळ अभ्यासासाठी उत्तम समजली जाते. म्हणून, ”प्रभाते मनी रामचिंतीत जावा”. दिवसाची सुरवात नामस्मरणाने करावी. कोणत्याही कार्याची सुरवात भगवंताच्या स्मरणाने करावी. जीवनात लवकरात लवकर भगवंताच्या भक्तीला लागावे आणि आपल्या उध्दाराची व्यवस्था लावून घ्यावी. जय जय रघुवीर समर्थ   - सौ. आसावरी भोईर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

‘सजग नागरिक मंच नवी मुंबई'चा आग्रह