पुनर्भेेटीचा दिला भरवसा
माणसाला माणसाशी बांधून ठेवणारे नाते म्हणजे मैत्री. ही मैत्री टिकून राहण्यासाठीच गेटटुगेदर आवश्यक आहे.
आम्ही १९७७ साली पी. आर. हायस्कुल भिवंडी येथून दहावीची परीक्षा पास झालो. त्यानंतर आम्ही अनेक वेळा गेट टुगेदर केले आहे. पुन्हा एकदा आपण गेट टुगेदर करू असा विचार दोन महिन्यापासून सुरु होता; पण व्हाट्सअप ग्रुपवर फक्त चर्चा सुरु होती होती. अखेर आमचा र्वगमित्र संजय घनवटकर याच्या अलिबाग येथे ऑरबीट अडव्हेनचर या रिसॉर्टवर २८ फेब्रुवारी रोजी सर्वांनी जमायचं नक्की झालं. त्यानंतर कोण कोण येणार आहे ते कळवा असा मेसेज आल्यानंतर अनेकांनी काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे सर्वांनी असे ठरवले की आता तारीख आणि ठिकाण बदलायचे नाही. जे येतील त्यांच्यासह आणि येणार नाहीत त्यांच्या शिवाय आपण जायचंच.
सुरुवातीला प्रतिसाद कमी होता परंतु नंतर प्रतिसाद चांगला मिळाला. नरेंद्र वगळ, राजेंद्र गुर्जर, सुधीर पिंपळे, मुकुंद क्षत्रिय, अशोक पातकर, किशोर आंबवणे, मकरंद कुलकर्णी, अरुण भोईर, राजेंद्र घैसास, साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष, ज्योती चाफेकर, रश्मी चाफेकर, संजय घनवटकर, योजना कुंभार, सुरेखा पाटील, आशा गडकरी असे सर्वजण भिवंडी, ठाणे, दादर, कर्जत, बदलापूर, डोंबिवली, तळेगाव येथून रिसॉर्टवर पोहोचलो.
सर्वांचा चहा नास्ता झाल्यानंतर रिसॉर्टवर फेरफटका मारला. एक एकर जागेत झोपाळे, स्विमिंग पूल, राहण्यासाठी उत्तम खोल्या बांधण्यात आल्या असून धनवटकर यांनी स्वतःसाठी बांधलेल्या बंगल्याला वापरलेला शंभर वर्षापूर्वीचा आकर्षक दरवाजा सर्वांचे लक्ष वेधून घेतो. ह्या जागेत सर्वप्रकारच्या भाज्यांची लागवड करण्यात येते. फुलं, फळं यांची अनेक झाडांची लागवड केल्यामुळे पर्यटक येथे पुन्हा पुन्हा येतात. रिसॉर्टवर फिरून झाल्यावर जवळच असलेल्या समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारला.
दुपारी सुग्रास व्हेज/नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर सर्वजण जुन्या आठवणींत रमले. ज्यांना रात्री वस्ती करणे शक्य नव्हते अशा तिघी मैत्रिणी घरी गेल्या व बाकीच्यांनी रात्री पोपटीचा आस्वाद घेतला, आकाश दर्शन घेतले. संजय घनवटकर व त्याचा पुत्र आदित्य यांच्या आदरातिथ्याने सर्वजण भारावले.
दोन वर्षानंतर आम्ही शाळा सोडून पन्नास वर्ष होणार असल्याने त्यावर्षी जास्तीत जास्त संख्येने जमून ऐतिहासिक गेट टुगेदर करण्याचे सर्वांनी ठरवले. त्यावेळेस सर्वांचा फोटोसह परिचय व शाळे संदर्भातील आठवणी असलेली स्मरणिका काढण्याचा व प्रत्येकाला स्मृतीचिन्ह देण्यासंदर्भात विचार करण्यासाठी पाच जणांची कमिटी स्थापन करण्याचे ठरले आहे. हे पाचजण कार्यक्रमाचे ठिकाण, दिवस, वर्गणी इत्यादी बाबत चर्चा करून व्हाट्सअप ग्रुपवर माहिती देतील व हे ऐतिहासिक गेट टुगेदर यशस्वी करतील यात शंकाच नाही. - सौ. प्रिया (आशा) गडकरी