महिला आणि त्यांची सुरक्षा
आजच्या स्त्रीपुढे कोण्या मॉडेलचा किंवा नटीचा आदर्श असून चालणार नाही. आजच्या स्त्रीपुढे आदर्श हवा आपल्या पराक्रमाने शत्रूला नामोहरम करणाऱ्या झाशीच्या राणीचा, अहील्याबाई होळकरांचा, वीरमाता जिजाऊंचा, राणी पद्मिनीचा आणि राणी चेन्नम्माचा. जेव्हा प्रत्येक स्त्री स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम होईल, तेव्हा कोणाची हिम्मत होणार नाही तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची.
८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. भारतातही या दिवसाची विशेष क्रेझ असते. आपल्या कर्तृत्वाने नावलौकिक मिळवलेल्या स्त्रियांचा या दिवशी विविध कार्यक्रमांतून, वृत्तवाहिन्यांतून, वृत्तपत्रांतून गौरव केला जातो. महिला दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन विक्रीच्या संकेतस्थळांवरसुद्धा महिलांसाठी विशेष सवलती दिल्या जातात. खासगी कार्यालयांतून महिला अधिकाऱ्यांचा गौरव केला जातो, हे सर्व पाहिल्यावर एक प्रश्न पडतो की स्त्री ही केवळ एक दिवस गौरवण्याची बाब आहे का ? या भारतभूमीचा, येथील प्राचीन हिंदू संस्कृतीचा अभ्यास केल्यास येथे स्त्रीला नेहमीच सर्वोच्च स्थान दिले गेल्याचे लक्षात येईल. हिंदू धर्मशास्त्राने स्त्रीला शक्तिरूप मानले आहे. कोणतेही कार्य असो वा संकल्प, त्यासाठी शक्ती अनिवार्य आहे. शक्तीविना कोणताही जीव अथवा वस्तू निर्जीव स्वरूप असते. शक्तीचा सन्मान करणारी या देशात ५१ शक्तिपीठे आहेत, त्यांतील साडेतीन शक्तिपीठे आपल्या महाराष्ट्रात आहेत. सज्जनांच्या रक्षणार्थ आणि दृष्टांच्या संहारार्थ शक्तीने आपले मारक रूप वेळोवेळी प्रकट करून असुरी शक्तीचा विनाश केल्याचे आपण धार्मिक कथांतून, मालिकांतून वाचले आणि पाहिले आहे. ज्या दृष्ट शक्तींपुढे देवताही हतबल झाल्या अशांचा नाश देवींनी आपल्या अगाध सामर्थ्याने केला आहे. रामायण घडले ते माता सीतेच्या हरणामुळे, महाभारत घडले द्रौपदीच्या अपमानामुळे. स्त्रीचा सन्मान करण्याची आणि तिच्या रक्षणासाठी सर्वस्व पणाला लावण्याची शिकवण येथील संस्कृती आपल्याला देते. वीरमाता जिजाउंनी शिवाजी महाराजांना बालपणीच शौर्याचे, अन्यायाच्या प्रतिशोधाचे, जनतेचे सर्वस्वी कल्याणाचे बाळकडू पाजले नसते, तर कदाचित या देशाला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय लाभले नसते. एव्हढा गौरवशाली इतिहास ज्या भारतभूमीला लाभला आहे त्या भारतात आज स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये स्त्री अत्याचाराच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. बलात्कार, विनयभंग, अपहरण, कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये आजही दिवसागणिक वाढ होत आहे. २०२० पर्यंत महाराष्ट्रात स्त्री अत्याचाराच्या प्रतिदिन सरासरी ८८ घटना घडत होत्या, २०२३ मध्ये हाच आकडा १२६ पर्यंत पोहोचला. गेल्या वर्षभरात तर यामध्ये आणखी वाढ झाली आहे. मागील ५ वर्षांत राज्यात दोन सरकारे आली; मात्र स्त्री अत्याचाराचा आलेख खाली आणणे कोणालाही जमलेले नाही. विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात मागील ४० दिवसांत लैगिक अत्याचाराच्या ५६ घटना घडल्या. स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्काराने तर राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली. मुंबईची स्थितीही त्याहून वेगळी नाही. शाळकरी मुलीच काय वृद्धाही वासनांधांच्या अत्याचारापासून वाचलेल्या नाहीत. महिला अत्याचाराच्या घटनांच्या बाबतीत बदनामीच्या भयापोटी किंवा अन्य दबावामुळे सर्वच गुन्ह्यांची नोंद पोलीस दरबारी होत नाही त्यामुळे सरकार दरबारी असलेल्या आकड्यांपेक्षा प्रत्यक्ष आकडा कित्येक पटीने अधिक असतो.
राज्यातील प्रतिदिन होणाऱ्या स्त्री अत्याचाराच्या वाढत्या घटना मनाला अस्वस्थ करणाऱ्या आहेत. पोलीस असो, शिक्षण असो वा वैद्यकीय क्षेत्र कोणतेच क्षेत्र आज महिलांसाठी सुरक्षित राहिलेले नाही. ज्या क्षेत्रांवर महिला पूर्वी डोळे झाकून विश्वास ठेवत असत त्या क्षेत्रातही वासनांधांचा भरणा झाला आहे. चरितार्थ चालवण्यासाठी नोकरीनिमित्त घराबाहेर पडणारी स्त्री खासगी कंपन्यांतील लैगिक शोषणाला बळी पडू लागली आहे. नात्यातील मंडळींकडून केल्या जाणाऱ्या शोषणाचे प्रमाणही वाढू लागले आहे. स्त्रीच्या निर्बलतेचा फायदा घेऊन संधी साधण्यासाठी टपून बसलेल्या वासनांधांची संख्या समाजात वाढू लागली आहे. स्त्री अत्याचारविरोधी कायदे अधिक कठोर करूनही स्त्री अत्याचारांच्या घटनांमध्ये तिळमात्र घट न होता वाढच होत चालली आहे. पोलीस ठाण्यामध्ये नोंद झालेल्या गुन्ह्यांपैकी किती गुन्हे न्यायालयात तग धरतात आणि किती गुन्हेगारांना शिक्षा मिळते? गुन्हेगारी कृत्यांना चाप बसण्यासाठी आणि गुन्ह्यांची मीमांसा करून गुन्हेगारांना दंडित करण्यासाठी देशात न्यायपालिका कार्यरत आहे; मात्र न्यायपालिकेचा रटाळ कारभार, या दरम्यान गुन्हेगारांना पुरावे नष्ट करण्यास मिळणारी मोकळीक, पोलिसांवरील राजकीय दबाव, पोलीस व्यवस्थेतील भ्रष्टाचार यांमुळे उशिरा मिळाला तरी तो न्याय असेलच याची शाश्वती नसते. महिला अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी राज्यात दामिनी आणि निर्भया पथक कार्यरत आहेत. मात्र स्त्री अत्याचाराचा वाढता आलेख पाहता त्यांना अधिक सक्षम करण्याची आज आवश्यकता आहे. बलात्कारासारख्या घटनांमध्ये गुन्हेगारांना शिक्षा मिळण्याचे प्रमाण आपल्याकडे अगदीच नगण्य आहे, परिणामी गुन्हेगारांमधील भय लुप्त होत चालले असून अशा स्वरूपाचे गुन्हे गेल्या काही वर्षांत कमालीचे वाढले आहेत. रांझेगावच्या पाटलाने एका अबला स्त्रीवर अत्याचार केल्याचे कळताच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे हात पाय तोडण्याचे आदेश देऊन अशा गुन्ह्यांविषयी रयतेमध्ये कायमस्वरूपी भय निर्माण केलेच शिवाय स्वराज्यातील स्त्रियांनाही सुरक्षित केले. स्त्री अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये तत्परतेने आणि कठोर शासन केले गेले तरच गुन्हेगारांमध्ये भय निर्माण होते, हेच या प्रसंगातून सिद्ध होते. त्यामुळे स्त्री अत्याचाराचा चढता आलेख थांबवायचा असेल तर शिक्षाही स्वराज्याप्रमाणेच असायला हवी.
आजच्या स्त्रीपुढे कोण्या मॉडेलचा किंवा नटीचा आदर्श असून चालणार नाही. आजच्या स्त्रीपुढे आदर्श हवा आपल्या पराक्रमाने शत्रूला नामोहरम करणाऱ्या झाशीच्या राणीचा, अहील्याबाई होळकरांचा, वीरमाता जिजाऊंचा, राणी पद्मिनीचा आणि राणी चेन्नम्माचा. जेव्हा प्रत्येक स्त्री स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम होईल, तेव्हा कोणाची हिम्मत होणार नाही तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची. यासाठी प्रत्येक शाळेमधून मुलींसाठी स्वरक्षण प्रशिक्षणाचे नियमितपणे धडे दिले जावेत. येणाऱ्या प्रतिकूल प्रसंगाला कसे सामोरे जावे आणि त्याचा प्रतिकार कसा करावा याचे अद्यावत ज्ञान प्रत्येक मुलीला शालेय जीवनापासूनच दिले जावे. जेणेकरून आज नाहीतर येणाऱ्या काही वर्षांत याचे सकारात्मक परिणाम आपल्याला नक्कीच दिसतील. राज्य सरकारने यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असून स्वरक्षणासाठी सिद्ध होणाऱ्या मुली भविष्यात समाजातील वाढत्या स्त्री अत्याचारावर नक्कीच अंकुश आणू शकतात. ज्या दिवशी स्त्री अत्याचाराच्या आलेखला उतरती कळा लागेल, ज्या दिनी स्त्रियांविषयी सन्मानाची भावना समस्त समाजात निर्माण होईल तोच खऱ्या अर्थाने महिला दिन असेल. - जगन घाणेकर