तिसरा टप्पा
सुरुवातीला बाळबोध असताना आई शिकवते, समजायला लागल्यानंतर गुरुजी शिकवतात अन् आत्मसाक्षर झाल्यावर म्हणजेच ठराविक वयाचा टप्पा ओलांडल्यानंतर अनुभवच माणसाला वेगळ्या उंचीवर नेऊ शकतात! उर्वारित आयुष्याला तेच चकाकी देऊ शकतात! अन् प्रगतीची अनेक शिखरेही पदाक्रांत करतांना तेच आपल्या सदैव पाठीशी राहणार एवढं मात्र नक्की. जगातल्या अनेकांनी प्रगतीची घोडदौड केली ती यानंतरच म्हणूनच मी तर म्हणेल हा ‘तिसरा टप्पा' माणसाच्या जगण्यातला सर्वात गुणकारी
माणसाचं खरं आयुष्य सुरू होतं ते चाळीशीनंतरच! दिल्लीच्या साहित्य संमेलनात तारा भवाळकर यांचं अध्यक्षीय भाषण ऐकलं अन्मीही थोडा विचारगर्तेत अडकलो. आत्मपरीक्षण करायला लावणारं त्यांचं भाषण होतं. देशाच्या पंतप्रधानांनीही चांगलं मन लावून ऐकलं. विषय होता माणसाच्या शिक्षणाच्या सुरुवातीचा. त्यांच्या बोलण्याचा मतितार्थ असा होता की, माणूस पहिल्या वर्गात जातो अन् मग त्याचं शिक्षण सुरू होतं असं नाही. अगदी ते मुल जसं आईच्या मागे मागे बोलायला लागतं अन् खरी शिक्षणाची सुरुवात मुलांची तिथपासूनच सुरू होते; परंतु आपण शाळेच्या चार भिंतीच शैक्षणिक संस्था म्हणून ग्राह्य धरतो. तर ते विचार आपल्याला बाजूला ठेवावे लागतील. अगदी सर्वांनाच पटण्यासारखा साधा सरळ मुद्दा त्यांनी मांडला.
या माणसाच्या शिक्षणाची झालेली प्रत्यक्ष सुरुवात व आपण म्हणतो त्या खऱ्या अर्थाने चार भिंतीतलं त्याचं पूर्ण झालेलं शिक्षण डोक्यात घेतलं तर मला तरी वाटतं माणूस खऱ्या अर्थाने परिपक्व झाला असं म्हणता येणार नाही! तुम्ही म्हणाल कसं? आता तर याचं सगळं शिक्षण होऊन बसलं! आता काय राहिलं शिकायचं? याच्यापेक्षा काय शिकायचं? असे नानाविध प्रश्न सामान्य माणसाला पडणं साहजिक आहे. पण फार थोडी माणसं आपल्या चाकोरीबद्ध शिक्षणासोबत स्वतःच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देतात. जे देतात ते त्यासोबतच बऱ्यापैकी परिपक्व होतात; परंतु जे थोडं दुर्लाक्षित करतात. त्यांना या स्थितीला यायला अनुभवांची जोड द्यावी लागते. म्हणजेच शिक्षण, संसार, त्याचा असलेला उद्योगधंदा किंवा नोकरी आणि यासोबतच आलेले अनुभव यांची अशा कमी पक्व असलेल्या माणसावर चांगली मजबूत पकड येते. तेव्हा कमीत कमी तो चाळीशीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला असतो.
बऱ्याचदा समाजात चालता बोलता त्यालाही समजते की आपल्यात काहीतरी कुठेतरी कमतरता आहे. मग तो बऱ्यापैकी सुधारुन वागायचा किंवा चांगले गुण आत्मसात करायच्या वाटेला लागतो. झालेल्या चुकांवर पडदा व पुढे आयुष्याच्या पसाऱ्यात फक्त चांगल्या गोष्टी वेचत तो मार्गस्थ होत असतो. याच काळात त्याला चांगली विचारांची अन् माणसांची संगत लाभली तर तो अगदी इतरांना भारावून टाकेल अशा रस्त्याने निघालेला असतो. सामान्यपणे भूतकाळात वळून पाहिलं तर मागील मित्रपरिवार अन् वागणे व आताचे चकाकलेले आयुष्य यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. असे या जगात दुसरा जन्म मिळालेले बरेचजण विचार करू शकत नाही इतक्या उंचीवर पोहोचलेत! म्हणूनच मला या साहित्य संमेलनातील अध्यक्ष महोदयांनी माणूस आपल्या आईसोबत बोलायला लागल्यानंतर सांगितलेली ती खरी बालकाच्या शिक्षणाची सुरुवात व खऱ्या अर्थाने चाळीशीनंतर आत्मसाक्षर झालेला एक प्रौढ अशी सांगड घालावीशी वाटते.
बऱ्याचदा असं होतं की, माणूस चाळीशीच्या पुढे ढकलला की आपलं बऱ्यापैकी आवरलं असं म्हणायला लागतो. पोराबाळांचं शिक्षण, प्राथमिक गरजांपैकी अजूनपर्यंत सोय न लागलेली निवाऱ्याची व्यवस्था अन् पुढं लग्नकार्य यातच गुंतून शेवटी नोकरीला असला तर सेवानिवृत्तीकडे किंवा बाकीच्या धंद्यापाण्याला असला तर त्यातच तो काहीतरी खुटुरूटू करण्यापलीकडे तो दुसरं काहीही करण्याच्या फंद्यात पडलेला सर्वसामान्यपणे दिसून येत नाही; परंतु यापलीकडे जाऊन ज्यांनी खऱ्या अर्थाने नवीन दुसरा जन्म घेतला असं आपण म्हणूया असे जगात पुढं गेलेले खूप लोक आहेत की ज्यांनी त्यांच्या दुसऱ्या आयुष्यातच खूप काही केलं!
या दुसऱ्या आयुष्यात कोणताही मनुष्य जास्त गतीने पुढे जायचं कारण जर कोणी तपासलं तर ते म्हणजे त्याची अनुभवसिद्धता अन् विचारांनी वाढलेली प्रगल्भता. त्याच्याकडल्या ह्या दोन गोष्टी सोडल्या तर तोही सामान्य माणसासारखाच सर्वसामान्य म्हणता येईल. परंतु वर सांगितलेल्या दोन गोष्टी तास अर्ध्या तासात मिळतील इतक्या सोप्या सुद्धा नाहीत म्हणून अगोदरच्या आयुष्यात कमीत कमी माणसाने काही नाही जमलं तरी फक्त चांगले अनुभव जमवले तर त्याची स्वतःची पुढच्या आयुष्यासाठी श्रीमंती अन् प्रखर उजेडचा मार्ग आपोआप मिळेल जेणेकरून पहिल्यासारखं चाचपडत जाण्याची अजिबात गरज पडणार नाही.
म्हणूनच सुरुवातीला बाळबोध असताना आई शिकवते, समजायला लागल्यानंतर गुरुजी शिकवतात अन् आत्मसाक्षर झाल्यावर म्हणजेच ठराविक वयाचा टप्पा ओलांडल्यानंतर अनुभवच माणसाला वेगळ्या उंचीवर नेऊ शकतात! उर्वारित आयुष्याला तेच चकाकी देऊ शकतात! अन् प्रगतीची अनेक शिखरेही पदाक्रांत करतांना तेच आपल्या सदैव पाठीशी राहणार एवढं मात्र नक्की. जगातल्या अनेकांनी प्रगतीची घोडदौड केली ती यानंतरच म्हणूनच मी तर म्हणेल हा ‘तिसरा टप्पा' माणसाच्या जगण्यातला सर्वात गुणकारी ज्याने त्याच्याकडून जसे गुण घेतले तसा! जसं काही
पानी रे पानी तेरा रंग कैसा
जिसमे मिला दो लगे उस जैसा
-निवृत्ती मथुराबाई सयाजी जोरी, मंडळ कृषी अधिकारी, फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर