स्त्री : कालची, आजची अन्‌ उद्याची

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रीने शिवाजी घडवला. हे केवळ इतिहासकालीन स्त्री व्यक्तिमत्व नव्हे, तर युगायुगात आपल्या बालकाला देशाचा संस्कारक्षम व चारित्र्यवान नागरिक घडवणाऱ्या मातेचे विशेषण आहे. उद्याची स्त्री ही बहुआयामी बहुविध जबाबदाऱ्या सांभाळायला समर्थ असेल पण तिच्यातील या सामर्थ्याची जाणीव करून देण्याचं महत्‌कार्य मात्र आजच्या स्त्रीलाच करायचं आहे.

विश्वकर्माने आपल्या जवळचे सारे सौंदर्य, प्रेमभाव, सर्व गुण, असीम तेज ,आणि संपूर्ण शक्ती ओतून घडवलेली मूर्ती म्हणजे स्त्री. स्त्रीच्या उदरातून जन्माला आले अख्खे विश्व म्हणूनच स्त्री ही विश्वाची जननी संबोधली जाते. स्त्रीमध्ये ब्रह्मा विष्णू दोघांचे गुण संघटित आहेत. अशी स्त्री मग कुठल्याही भूत, वर्तमान वा भविष्यकाळातली असो, तिचे सामर्थ्य कमी होत नाही किंवा तिचे आद्य कर्तव्य बदलत नाही. जगाच्या विस्तारासाठी तिची रचना झाली आहे. आजच्या स्त्रीचं कुटुंबातील स्थान आणि तिची कर्तव्य ठरवताना कालच्या आणि आजच्या बदललेल्या परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे.

कालची स्त्री : कालच्या स्त्रीचं कार्यक्षेत्र फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच मय्राादित होतं. पुरुषाची अर्धांगिनी ती खऱ्या अर्थाने होती.पुरुषांनी अर्थार्जन करून आपल्या संसाराला हातभार लावायचा तर स्त्रीने संपूर्ण घर सांभाळायचे. त्याकाळी घरातल्या अबालवृद्धांची काळजी, मुलांचं संगोपन आणि नातेसंबंध जपणे ही स्त्रीची प्रमुख जबाबदारी होती.

 संसाराची जबाबदारी उचलण्यासाठी तिला बाहेर जाऊन शिक्षण घेण्याची आवश्यकता वाटली नाही. ती अशिक्षित असूनदेखील संस्कारक्षम होती. त्या काळात जिजाऊने शूर लढवय्या, लयाला जाणारं हिंदू राज्य पुनस्थ्राापित करणारा ,स्वधर्म जागवणारा, यवनांच्या कठीण कारकिर्दीला छेद देणारा, सुसंस्कारी शिवबा घडवला. जिजाऊ बरोबर त्या संपूर्ण पिढीतील स्त्रियां त्याच वाटेने गेल्या. कुटुंबाविषयीचा जिव्हाळा, देशाभिमान, स्वधर्माबद्दल आस्था, मुलांवर शालीन पण कणखर संस्कार हे कालच्या स्त्रीचे वैशिष्ट्य होते. दुसऱ्यांसाठी जगण्यात, आपल्यासाठी मरण्यात त्यांना धन्यता वाटत होती. त्या आदर्श माता आदर्श पत्नी आणि आदर्श गृहिणी होत्या.

आज स्त्रीशक्ती जागृतीच्या युगात स्त्री शिक्षणाच्या प्रसारामुळे स्त्रीला समाजात एक स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झालंआहे. काळ बदलला आहे. आजची सुशिक्षित स्त्री फक्त चूल आणि मूल एवढ्या दोनच गोष्टीत रमू शकत नाही. तिचं कार्यक्षेत्र विस्तारलं आहे. आजच्या काळात प्रत्येक पावलावर आ वासून उभ्या असलेल्या समस्यांवर उत्तर शोधताना आर्थिक व्यवस्थेतही  लक्ष घालणं तिला आवश्यक झालं आहे. शिवाय व्यक्तिमत्व विकासाच्या युगात तिलाही स्वतंत्र अस्तित्व आणि स्वतःचे व्यक्तिमत्व विकसित करण्याचा नोकरी न करणाऱ्या स्त्रियांनादेखील क्लब, पाटर्या, महिला मंडळें आणि समाजकार्य यासारखी अनेक व्यक्तिमत्व विकासाची दालने खुली झाली आहेत. त्यामुळे आजची स्त्री पूर्णतः गृह समर्पित राहू शकत नाही. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांकडे थोडं दुर्लक्ष होऊ लागलय. तसेच आजच्या "कुटुंब छोटे सुख मोठे” या मूलमंत्रामुळे आई-वडिलांच्या मोठमोठ्या अपेक्षांच्या भाराखाली दबलेली आजची पिढी वैतागलेली आणि घरातल्या प्रेमळ वातावरणाला मुकल्यामुळे पोरकी झालेली आहे. स्त्रीला जगनिर्माती म्हटल्या जातं. मातृत्वाच्या वरदानामुळे कुटुंबातील तिचं स्थान आजही अबाधित आहे .तेव्हा कितीही महत्त्वाकांक्षा जोपासल्या तरी तिला मातेच्या आद्य कर्तव्याचा विसर पडता कामा नये आणि म्हणूनच आजच्या स्त्रीला आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ होऊन आपल्या महत्त्वाकांक्षांना थोडी मुरड घालणं आवश्यक झालं आहे. नवीन युगातल्या नव्या समस्या घेऊन आलेल्या नव्या पिढीला धकाधकीच्या जीवनाशी टक्कर द्यायला समर्थ बनवणे योग्यायोग्यतेचा विचार करायला शिकवणे हे आजच्या मातेची महत्त्वाची जबाबदारी आहे. एवढेच नव्हे, तर तिला फक्त आजचाच विचार नाही तर उद्याचा ही विचार करायचा आहे. आजच्या मातेला उद्याची ही माता घडवायची आहे.

  ऊद्याची जेट युगातली नवीन पिढी एकूणच ज्ञान प्रसाराच्या माध्यमांमुळे, विविध साधनांमुळे, चिकित्सा शास्त्रातल्या प्रगतीमुळे जास्त बुद्धिमान तल्लख, जास्त चौकस आणि तर्कट व जास्त जाणती राहणार आहे. "हम दो हमारा बस एक” एवढेच कुटुंब राहणार त्यामुळे आत्या, काका, मामा, मावशी ही नातीच नष्ट होणार. फक्त मी आणि माझं ही वृत्ती बळावणार. त्यामुळे तडजोड आणि कौटुंबिक जिव्हाळा ही वृत्तीच नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पुढे येणार ती फक्त एक एकट्या बुद्धिमत्तांची पिढी अंतरिक्षाला गवषणी घालण्याचं सामर्थ्य त्यांच्यात राहणार आहे; पण अंतरिक्षात उड्डाण केलं तरी पाय मात्र आपल्या जमिनीवरच राहू द्या. अर्थात आपल्या मूळ संस्कृतीचा विसर पडू देऊ नका, ही शिकवण देण्याची जबाबदारी आजच्या स्त्रीवर येऊन पडली आहे. एक पुरुष शिकला तर तो एकटाच शिक्षित होतो. पण एक स्त्री शिक्षित झाली तर सारे कुटुंब शिक्षित होते. संपूर्ण पिढीचा उत्कर्ष होतो. कुटुंबात स्त्री कन्या, भगिनी सखी, पत्नी आणि माता या रूपात वावरत असते. त्यापैकी मातेचे पवित्र गंभीर स्नेहमयी रूप सर्वात महत्त्वाचं कारण स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे. म्हणूनच स्वामी तिन्ही जगाचा आर्इाविना भिकारी आणि मातृदेवो भव या शब्दात थोरामोठ्यांनी मातेची महती प्रतिपादित केली आहे. चंदनाप्रमाणे झिजणारी निःस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आई. बालकाची प्रथम गुरु आई .तिच्या हृदयातून पाझरणाऱ्या पवित्र स्नेहानेच मुलांचे भावी जीवन घडत असतं, समृद्ध होत असतं.

    कुपुत्रो जायेतो क्वचिदपि कुमाता न भवती
    जिचे हाती पाळण्याची दोरी तीच जगाते उद्धरी

आज समानतेच्या युगात आपल्या बुद्धीच्या जोरावर स्त्री सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कार्य करते आहे. स्वयंपाक घर ते अवकाशा पर्यंत तिने प्रगतीचा पल्ला गाठला आहे .
ती सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीत येण्याचा प्रयत्न करते आहे. राजनैतिक, आर्थिक, व्यावसायिक, सार्वजनिक, धार्मिक सर्व क्षेत्रात ती पुढे येत आहे.
 कुळाचे नाव काय फक्त मुलगाच काढी?

 आता मुलांपेक्षाही पुढे मुलींची आघाडी.

                   इंदिरा, प्रतिभा निर्मला, सुषमा
                    जया रेखा जया ललिता हेमा
  पुरुषांच्या बरोबरीने मानाचं स्थान
    मिळवताहेत मोठा मान सन्मान

    आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मु , दिल्लीच्या मुख्यमंत्री श्रीमती रेखा गुप्ता पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करत आहेत हे स्त्रियांच्या प्रगतीचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. शेवटी स्त्री पुरुष समानतेचा कितीही डंका वाजवला तरी एक गोष्ट युवतींना सांगावीशी वाटते की स्त्रीने पुरुषाची कितीही बरोबरी केली तरी निसर्गावर मात करणे तिला शक्य नाही. निसर्गाने जिथे स्त्री आणि पुरुष यांच्यात शारीरिक भेदाची अभेद्य भिंत घातली आहे ती जगाच्या अंतापर्यंत ही तिला पाडणं शक्य नाही. पुरुषाचे घडणंच अशी की तो सर्व करून नामा निराळा राहू शकतो. पण स्त्रीला मात्र निसर्गानेच बंदी बनवले आहे. तिला जे भोग भोगावे लागतात ते पुरुषाला नाही. एखाद्या वेळेस घरी परतायला मुलाला जर वेळ लागला, उशीर झाला तर त्याची काळजी वाटते. पण मुलीला उशीर झाला तर तिची काळजी मात्र आणखी वेगळ्या प्रकारची असते. यावर कोणाचेही दुमत होणार नाही. म्हणून स्त्री पुरुष समानता ही कुठपर्यंत ताणली जावी याचा विचार आपल्या निसर्गदत्त मर्यादा ओळखूनच स्त्रीने करायला हवा.
         -श्रीमती मनीषा  प्रभाकर लिमये  

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

तिसरा टप्पा