सासूला ‘आई' नव्हे, मावशी म्हणा!
मी नेहेमीच बायकोला खुश करण्याची संधी शोधत असतो आणि मी तर म्हणीन की सगळ्यांनीच अशा संधींच्या शोधात राहायला पाहिजे. बायको खुश असेल तर काय काय मज्जा येते.. ये तो सभी जानते है. आज अनायासे अशी संधी चालत आली होती. सकाळी चहा घेतांना बायकोला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विचार केला, बायकोला घेऊन जरा बाहेर फिरून यावं. तेवढ्यात बायकोला मैत्रिणीचा फोन आला. बायकोने मला खूण करून सांगितले - तुम्ही जाऊन या, मला वेळ लागेल. आज बऱ्याच गॅपनंतर सकाळी नेहेमीच्या रस्त्याने फिरायला बाहेर पडलो होतो.
एकटाच असल्यामुळे इधर उधर बघत बघत फिरणे सुरु झाले. मनात सहज विचार आला - अरे, आज जागतिक महिला दिवस आहे आणि आज नेहेमीच्या ठिकाणी मेघना आणि मनवा या मैत्रिणी भेटल्या तर काय मज्जा येईल, त्यांना शुभेच्छा देता येतील आणि त्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद बघता येईल. फिरण्याच्या रस्त्यावर डावीकडे एक मारुती मंदिर आहे. तिथे नेहेमी मी थांबतो, नमस्कार करतो आणि पुढे जातो. तिथे बाहेर एक फळा आहे, त्यावर मराठी/इंग्रजी/हिंदीमध्येे सुविचार लिहिलेले असतात. आजचा सुविचार होता - Strong will will always result in reality. माझी आताची इच्छा आहे मेघना आणि मनवा भेटाव्या. मी नमस्कार केला आणि पुढे निघालो.
मृत्युंजय मंदिराच्या जवळच्या चहाच्या दुकानापर्यंत पोहोचलो आणि ओळखीचा म्हणजे मेघना आणि मनवा यांचा आवाज आला - काका, आहात कुठे ? कित्येक महिन्यात भेट नाही. आमचं काही चुकलं कां ? वगैरे, अशी प्रश्नांची सरबत्ती माझ्यावर सुरु झाली.
मी - सांगतो, सांगतो, असे म्हणेपर्यंत..
चहावाले दादा ः काका, हमसे या हमारी चाय से कुछ नाराजी हो तो बतावो. आज शक्कर थोडी जाडा डालू क्या, या अद्रक जादा डालू.
मी : सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे, पण आधी माझं ऐका
मी : आज एक खास दिवस आहे - जागतिक महिला दिवस. मेघना आणि मनवा तुम्हाला जागतिक महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या मैत्रिणींनापण शुभेच्छा द्या.
मेघना आणि मनवा : काका, धन्यवाद. आज पहिल्या शुभेच्छा तुमच्याकडूनच मिळाल्या, मजा आली.
चहावाल्या काकांना मी बाहेर बोलावलं. त्यांनीपण शुभेच्छा दिल्या.
आणि गम्मत म्हणजे आजूबाजूला उभे असणाऱ्या चहा पिणाऱ्या सगळ्यांनीच मेघना आणि मनवा यांना शुभेच्छा दिल्या. मेघना आणि मनवा एकदम खुश झाल्या. त्यांनी सगळ्यांना थँक्स दिल्या. तेवढ्यात आमच्या हातात गरमागरम चहाचे ग्लास आले.
चहावाले दादा : आजकी चाय मेरी तरफसे. बहोत दिनोके बाद आप तीनोको साथ देखकर मजा आ गया. आम्ही दादांना थँक्स दिले आणि चहा पिता पिता आमच्या गप्पा सुरु झाल्या.
मनवा : काका, आजच्या दिवसामागची हिस्ट्री काय आहे, ते माहित आहे का ?
मी : नक्कीच. बाहेरची कामे करतांना पुरुष आणि स्त्रिया यांना समान हक्क मिळावेत म्हणून पूर्वी जगभर आंदोलने झाली / निदर्शने झाली आणि स्त्रियांना त्यात यश मिळाले आणि हा आनंद साजरा करण्याकरता ८ मार्च १९१७ या दिवशी ”जागतिक महिला दिन” चा जन्म झाला. जगातल्या बहुतेक सगळ्याच देशांमध्ये हा दिवस साजरा होतो. काही देशात या दिवशी सुटीपण असते.
मेघना : पूर्वी झालेल्या आंदोलनांमुळे स्त्रियांचा खरंच खूप फायदा झाला आहे. आता बहुतेक देशात स्त्रियांना समान हक्क मिळाले आहेत. सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्रिया आज कार्यरत आहेत. काही ठिकाणी त्या उच्च पदांवर काम करत आहेत आणि काही ठिकाणी तर त्या सर्वोच्च पदांवरपण कार्यरत आहेत.
मनवा : मैदानी खेळांमध्ये पण स्त्रिया पुढे आहेत. राजकारणातपण पुढे आहेत. या क्षेत्रात तर पंतप्रधान/राष्ट्रपती या पदांपर्यंतपण आपल्या आणि जगभरातल्या महिला पोहोचल्या आहेत. ही नक्कीच सगळ्यांना त्यांचा अभिमान वाटावा अशीच बाब आहे. आता तर मंगळावर उतरणारी पहिली व्यक्ती हा बहुमान स्त्रीला मिळणार आहे, असे सांगतात.
मेघना : कला क्षेत्रामधे, जसे चित्रकला, गाणी, नृत्य, साहित्य, सिनेमा वगैरेमधेपण स्त्रिया आघाडीवर आहेत.
मी : खरंच अभिमान वाटावा असंच आहे. पण सिनेमा /टीव्ही या क्षेत्रांमध्ये आघाडी घेण्याकरता त्यांनी निवडलेली अंगप्रदर्शनाची वाट मात्र मनाला खटकते. पैशांकरता आणि/किंवा ग्लॅमरकरता अगदी खालच्या थरापर्यंत अंगप्रदर्शन पोहोचले आहे. सिनेमा आणि टीव्हीवरचे ग्लॅमर बघून घराघरातल्या स्त्रिया याचे अनुकरण करत आहेत आणि अगदी लहान लहान मुलींना या ग्लॅमरमध्ये ओढत आहेत. आता लहान मुलींना बाहेर पडतांना फॅशनेबल तोकडे कपडेच पाहिजे असतात. आया लिपस्टिक, आयब्रो, आयलायनर, परपयुम असे सगळे त्यांना लावून त्यांचे कौतुक करत असतात, थोड्या थोड्या वेळानी या सगळ्यांवर पुन्हा पुन्हा हात फिरवत असतात आणि त्यांचे निरनिराळ्या अँगलमधून सारखे फोटो काढत असतात. यामुळे कळत नकळत लहान वयातच मुलींमध्ये मॉडर्न फॅशनचे विषारी बीज पेरले जात आहे. परदेशी संस्कृतीचे असे अनुकरण आपल्या संस्कृतीला कुठपर्यंत घेऊन जाईल, हे काळचं ठरवेल.
मनवा : तुमचे म्हणणे एकदम मान्य. पैशापुढे माणूस बुद्धी गहाण ठेवतो, हे जागतिक सत्य आहे, पण ग्लॅमरपुढे स्त्रियापण बुद्धी गहाण ठेवतात हे न रुचणारे सत्य आहे. स्त्रिया या बाबतीत बदलतील अशी शेजारीच असलेल्या देवळामधल्या देवतेला आपण ाार्थना करूया..
मी : नक्कीच
मेघना : जागतिक महिला दिन सुरु करण्यामागचा जो मूळ उद्देश होता, तो आता पूर्ण होऊनही बरीच वर्ष झाली आहेत. त्यामुळे सध्यातरी या दिवसाचं महत्व फक्त शुभेच्छांची देवाणघेवाण करणे इतपतच राहिलं आहे, आणि जागतिक दिवस आहे, या नावाखाली, काही सत्कार समारंभ, कुठे रॅली, असे ओघाने येतेच.
मी : बाहेरच्या जगामधे समान हक्क मिळालेल्या स्त्रियांना आपल्या घरांमध्ये पण समान हक्क आहेत कां ?
मनवा : सगळ्या स्त्रियांनी जर मनापासून याचं उत्तर दिलं, तर ‘नाही असेच त्यांचं उत्तर येईल. जागतिक महिला दिनाच्या दिवशी त्यांना नुसत्या ”हॅपी महिला दिन” अशा शुभेच्छा देऊन त्या घरामधे आनंदित होतील का? स्त्रीशिवाय घराला घरपण येत नाही असं म्हणतात. मग या स्त्रीला घरामध्ये आनंद देण्याकरता, आपण घरातली मंडळी हिच्याकरता काय वेगळं करतो ? बहुतेकांकडून उत्तर येईल - काहीच वेगळं करत नाही.
मेघना : प्रत्येक घरात स्त्री ही आई म्हणून रोल करत असते, बायको म्हणून रोल करत असते, सून म्हणून रोल करत असते आणि बाहेर नोकरी, व्यवसाय हेपण करत असते. असे असूनही, घरातले सगळे जण हिला "टेकन फॉर ग्रंटेड” म्हणून घेत असतात. घरातलं सैपाक पाणी/आवराआवर/मुलांचे डबे भरणे/मुलांची शाळेची तयारी/किराणा आणणे/ भाजी बाजार आणि सगळी अवांतर कामे, ह्या सगळ्या तिच्याच जबाबदाऱ्या असतात. ती घरात असतांना सगळेजण, हे कुठे आहे ते कुठे आहे / हे दे /ते दे , असा तगादा तिच्या मागे लावत असतात. सकाळी ऑफिसला जातांना मोबाईलसकट सगळे साहित्य आपल्या हातात यावे अशी नवऱ्याची बायकोकडून अपेक्षा असते. मग नोकरीला जाणाऱ्या स्त्रीने नवऱ्याकडून अशी अपेक्षा का करू नये?
मनवा : मुलगा आणि सून दोघेही ऑफिसला निघतांना डबा, पाणी, मोबाईल असे सगळे त्यांच्या हातात देणारे सासू / सासरे कुणाच्या बघण्यात आहेत का ?
मी : कधी ऐकण्यात नाही. किंवा कुठल्या टीव्ही सिरीयलमधेपण नाहीत
मनवा : किती नवरे घरी जातांना बायकोकरता प्रेमाने गजरा घेऊन जातात/बायको ऑफिसमधून आल्यावर तिच्या ऑफिसच्या कामाबद्दल चौकशी करतात/तू दमली असशील, जरा गाणी वगैरे ऐक, मी चहा करतो /कुकर लावतो/वगैरे, असे म्हणतात. कितीजण तिला सैपाकघरातून तिचा हात धरून सोपयापर्यंत घेऊन जातात आणि प्रेमाने खाली बसवतात? आणि हातात चहाचा कप देतात ! उत्तर येईल बोटावर मोजण्याइतपतच. आपण केलेल्या कामाचं कौतुक व्हावं, असं सगळ्यांनाच वाटत असतं. आजची डब्यातली पालक-पनीर भाजी एकदम हटके होती, किंवा आज डब्यात पुऱ्या आणि श्रीखंडमुळे मजा आली, एवढं बायकोचं कौतुक पण खरंतर पुरेसं असत. घरातले कितीजण असं कौतूक करतात !.
मेघना : किती सासवा सून ऑफिसमधून आल्यानंतर तिच्या हातात खाण्याची डिश देतात/चहा देतात. उत्तर येईल अगदी एखादी.
मनवा : सुनेची विचारपूस करणे, हा बहुतेक घरात सासऱ्यांच्या प्रांतच नसतो. सुनेला मदत करण्याची जेंव्हा गरज असते तेव्हा ते त्यांच्या कट्ट्यावर गप्पा मारायला गेलेले असतात किंवा घरात मेडिटेशन करत असतात. या सगळ्याला अपवादात्मक मंडळी नक्कीच आहेत, किती आहेत, हे मोजायला मात्र आपली हाताची बोटे पुरेशी आहेत.
मी : तुम्ही दोघी म्हणता ते अगदी बरोबर आहे. पण काही बाबतीत, स्त्रियांचेपण चुकत असते. घरातली सगळी कामे स्वतःवर ओढून घेण्याची त्यांची सवय त्यांनी बदलायला पाहिजे. धकाधकीच्या जीवनात आनंदी आणि हेल्दी राहणे पुरुष आणि स्त्रिया या दोघांना पण गरजेचे आहे आणि याकरता रोज एक ते दीड तास प्रत्येकाने स्वतः करता राखून ठेवलाच पाहिजे असेच जाणकार सांगतात.
मनवा : काका, आपने सही फर्माया है. स्त्रियांना जर असा वेळ काढायचा असेल तर घरामधल्या कामाची विभागणी ही करायलाच पाहिजे आणि त्याकरता कोण काय म्हणेल, याला गौण महत्व द्यायला शिकले पाहिजे.
मेघना : सकाळचा चहा/खाणे, संध्याकाळचे खाणे पिणे, घरातली अवांतर कामे, थोडी आवराआवर, मुलांचे अभ्यास घेणे ह्या कामात सासू सासरे नक्कीच हातभार लावू शकतात. इतर कामे नवऱ्याबरोबर शेअर करता यतात. ध्येय एकच, की घर चालवण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे आणि मला पण माझ्या हॉबी जपायला, व्यायाम करायला, वगैरे वेळ मिळालाच पाहिजे आणि मी तो मिळवणारच.
मनवा : थोडक्यात काय ? तर स्त्रियांनी स्वतःवर प्रेम करणे, याला पहिली प्रायोरिटी दिलीच पाहिजे.
मेघना : आता मजा बघा, स्त्री आणि पुरुष ही नक्कीच दोन वेगळी रसायने आहेत. त्यामुळे एकमेकांना समजण्यात थोडे अंतर पडू शकते. पण घरामधली सासू आणि सून यांचे स्त्री रसायन तर एकच असते. तरीपण कुठल्याही स्त्रीच्या मागे सासू हे शीर्षक लागलं, की त्यांचं सून या स्त्रीच्या बाबतीत वागणे कां बदलते, सुनेला आपलीच मुलगी असे मनापासून समजून तिच्यावर त्या प्रेम का करत नाहीत ?आणि स्त्रीच स्त्रीची दुश्मन कां व्हावी, हे एक न उलगडणारे कोडेच आहे.
मी : मला वाटतं सासू या शब्दामधेच ती मेख आहे. लग्न झाल्यानंतर जर नवऱ्याच्या आईचे सासुऐवजी मावशी असे नामकरण केले, तर हे न उलगडणारे कोडे सहज सुटेल.
मनवा : काका मावशीचं का बरं?
मी : मावशी या नात्यात एक एक वेगळेच प्रेम आहे. आपल्याकडे म्हण आहे - माय मरो पण मावशी जगो. म्हणून मावशी असं नामकरण करायचं.
मनवा आणि मेघना : काका, एकदम जालीम उपाय आहे. आम्ही नक्कीच आमच्या ग्रुपवर टाकतो आणि घरी गेल्यावर सासूबाईंना आपल्या गप्पांचा संदर्भ देऊन मावशी म्हणायला सुरुवात करतो.
बाजूला चहा पित उभा असलेला ग्रुप : काका कल्पना आवडली. संध्याकाळी घरी गेल्यावर बायकोला सांगतो, की, आईला आता मावशी म्हणत जा. पुढच्या भेटीत तुम्हाला फीडबॅक देतो.
मी : पुरुष आणि स्त्रिया यांना सर्वच बाबतीत अगदी तंतोतंत समान हक्क आणि आनंदाच्या समान उपलब्धी हव्या असतील, तर मात्र आपल्याला ब्रह्मदेवाकडे पण थोडे साकडे घालावे लागणार आहे. सृष्टीच्या निर्मितीमध्ये पुरुष आणि स्त्री ही निर्मिती आखतांना, देवाचे पण थोडे चुकलेच आहे, असे मला वाटते. त्याने पुरुषाला थोडे झुकतेच माप दिले आहे. मासिक धर्म, बाळंतपण, मोनोपॉझ या गोष्टी त्यानी फक्त स्त्रियांच्या पदरी टाकल्यामुळे, या काळातली शारीरिक दुखणी आणि त्रास फक्त स्त्रियांना भोगावा लागतो. पुरुष नामोनिराळे असतात. संध्याचे कलियुग संपल्यानंतर पुढच्या अपग्रेडेड सृष्टीची निर्मिती करतांना, स्त्रियांचा हा शारीरिक त्रास दूर करावा किंवा समसमान करावा अशी आपण ब्रम्हदेवाकडे प्रार्थना करूया .
मनवा : काका, नक्कीच. देवांनी जर हे मान्य केलं तर सगळ्याच स्त्रिया खुश होतील आणि तुम्हाला दुवा देतील.
मेघना : काका, तुम्ही आल्यामुळे गप्पा मस्त रंगल्या, काही छान उपाय पुढे आले, मजा आली. चला आम्हाला ऑफिसला निघायला पाहिजे.
तेवढ्यात चहावाल्या दादांनी चहाचा दुसरा ग्लास आमच्या हातात दिला. चहा पिणारा बाजूचा ग्रुप दादांना उद्देशून : दादा इनका ये बिल हमारे बिल मे ॲड करना.
आम्ही सगळ्यांना बाय केले आणि आपापल्या मार्गाला लागलो.
-सुधीर करंदीकर