महिलांच करतात नारी शक्तीचे खच्चीकरण!
जागतिक महिला दिनांच्या निमित्ताने अनेक सोहळे होतील. त्यात एक-दोन टक्केच महिलांचे गुणगान होईल, आदर-सत्कार होईल. पण बाकीच्या पिडित महिलांचे काय? त्यांच्या न्यायाचे काय? पुरुषांचे सोडाच, महिला पिडितांसाठी लढणार? का महिलाच महिलांना अबला बनवण्यासाठी कार्यरत राहणार?
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ८ मार्च रोजी देशासह जगभरात विविध तऱ्हेचे उपक्रम राबवून, विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या महिलांचा यथोचित सन्मान व गौरव केला जाईल. खरंतर हा दिवस पश्चिम अमेरिका व युरोपमधून २० व्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात सुरू झाला. त्या काळात महिला कर्मचाऱ्यावर विविध प्रकारचे अत्याचार होत असत, त्या विरोधात न्याय मिळवण्यासाठी तेथील महिलांनी उठाव करत एक महिलांचीच परिषद घेतली व त्या परिषदेत न्याय मिळवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला, व त्या ठरावाची प्रत तत्कालीन सरकारकडे सुपूर्द करण्यात आली. सरकारने तात्काळ तो ठराव स्विकारून महिलांवरील अत्याचारकर्त्यांना तात्काळ सजेस पात्र ठरवले. तेव्हापासून हा दिवस ‘महिला दिन' म्हणून साजरा होऊ लागला, पुढे तो जगभरात पसरला.
आपल्या भारत वर्षात हजारो वर्षापासून, महिलांना मानाचे स्थान होते. ज्या त्रिदेवाना आपण ‘सृष्टिचे निर्माते' म्हणतो त्यांनीही स्त्रियांना सन्मानाची वागणूक देत मानाचे स्थान प्रदान केल्याचे दाखले पुराणात आहेत. या त्रिदेवांनी आपापल्या पत्नीला कधी ‘अगं-तूगं' केलं नाही; उलट त्यांचा नामोल्लेख ‘देवी' या शब्दानेच केला. स्त्रीचे स्थान या संसारात मानाचे मानले जाते. स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंत काळाची माता असते असे पूर्वजांचे म्हणणे आहे आणि त्यात सत्यही आहे. या संसारात स्त्रिया विविध प्रकारच्या भूमिका वठवत असतात, कधी ती माता असते, कधी ती बहिण असते, कधी ती पत्नी असते, कधी ती मुलगी असते. या विविध प्रकारच्या भूमिका वठवत त्या संसाराचा गाडा ओढत असतात. त्यात त्यांना पुरुषापेक्षा जास्त काम व मेहनत करावी लागते. तरीही त्या थकत नाहीत. कंटाळत नाहीत, व आपल्या कुटूंबाच्या सुखात स्वतःचे सुख मानतात व सर्व प्रकारच्या ताण तणावात ही स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. सध्याच्या काळात तर स्त्रियांनी सर्वच क्षेत्रात कमालीचे प्राविण्य मिळवत पुरुषांच्याही पुढे चालल्या आहेत. शिक्षण क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात त्या हिरीरीने भाग घेऊन आपली सक्षमता दाखवत आहेत. काही क्षेत्रे तर अशी आहेत, ज्यात पुरुषांनाच स्थान दिले जात असे, अशा क्षेत्रातही महिला आघाडीवर आहेत, मग ते पोलिस दल असो, सैन्यदल असो, तिन्ही प्रकारचे भूदल, वैमानिक दल वा जल दल म्हणजे (नाविकसेना) खेळाबाबतही तेच आहे. पूर्वी क्रिकेट हा मुलांचा खेळ असायचा त्यातही मुलींनी आपला दबदबा निर्माण केला आहे. कुस्तीबाबतही तेच आहे. आताच्या महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांना मागे टाकत आहेत. वैज्ञानिक क्षेत्रात, संशोधन क्षेत्रात, वैद्यकिय क्षेत्रात, स्त्रियांनी कोणतेही क्षेत्र सोडलेले नाही. आताच्या स्त्रिया आता अबला राहिलेल्या नाहीत. त्या सबला व सक्षम झालेल्या आहेत. राजकारणात त्यांची कामगिरी वाखाणण्यासारखी आहे. समित्या अध्यक्ष पदापासून ते थेट मुख्यमंत्री व पंतप्रधान पदापर्यंत त्यांनी झेप घेतली आहे. शौर्याच्या शर्यतीतही त्या मागे नाहीत.
हे सर्व सत्य असले तरी, आपला पुरुष प्रधान अहंकार स्त्रियांना त्यांचे मानाचे स्थान त्यांना द्यायला तयार नाही. त्यांच्या मतानुसार ‘स्त्री' ही फक्त चूल आणि मूल पूरतीच मर्यादेत असायला हवी. ती फवत पुरुषांच्या भोगाची वस्तू आहे. तिला वापरा आणि सोडा (फेका) अशा मानसिकतेच्या लोकांमुळेच स्त्रियांवर अत्याचार होत असतात. समाजात जवळपास ६०% लोक स्त्रियांचा मान व आदर मान्य करतात. बाकीचे ४०% लोक आजही स्त्रियांना मान देताना दिसत नाहीत. त्यांच्याकडून स्त्रियांवर विविध प्रकारचा अन्याय होताना दिसतो. मग त्यांच्या मानखंडनेपासून, सुरू होऊन शारीरिक अवयवावर घाणेरडी टिप्पणीपर्यंत जाऊन पोहचतो. स्त्रियाकडे पाहून अश्लिल चाळे करण्याकडे त्यांची मजल जाते. एवढ्यावरच ते थांबत नाहीत तर त्यांची मजल शारीरिक नासाडीसह ठार मारण्यापर्यंत पोहचते. सध्या स्त्रियांना कायद्याचे मोठे संरक्षण असले तरी त्याची अंमलबजावणी करणारी पुरुष मंडळी बऱ्याचदा अत्याचार कर्त्यांचा बचाव करण्यातच स्वतःला धन्यता मानतांना दिसतात. म्हणूनच अत्याचार कर्त्याचे मनोबल वाढते. पोलिसांकडून योग्य वेळी संरक्षण मिळत नाही वा मिळाले तरी ते टिकत नाही. न्यायालयाकडूनही न्याय मिळण्यास कमालीची दिरंगाई होते, उशीरा न्याय मिळणे म्हणजेच न्याय न मिळण्यासारखेच आहे. कधी कधी तर रक्षकच भक्षक बनतात तेव्हा न्याय मागायचा कोणाकडे?
स्त्रियांना समाजाने विविध प्रकारच्या बंधनात अडकवून ठेवले आहे. त्यांच्यातील कर्माचा दाखला देत त्यांच्यावर विविध प्रकारची निर्बंधने घातली आहेत. मुलीला काचेचे भांडे संबोधले आहे. त्याचवेळी मुलाला सर्व प्रकारच्या बंधनातून मुवत ठेवले आहे. कारण समाज मुलाला वंशाचा दिवा म्हणून पाहतो तर मुलीला परवयाचे धन म्हणून पाहतो हा भेदभाव वैरभाव ठरत आहे.आत्ताचे सरकार घोषणा करते की, ‘बेटी बचाव, बेटी पढाव' पण प्रत्यक्षात बेटीवर अन्याय-अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालून त्यांना नवीन अत्यचार करण्यासाठी मोकळे सोडते. बेटीच्या शिक्षणासाठी असलेल्या सवलती (ज्या पूर्वीच्या सरकारने बहाल केलेल्या होत्या) काढून घेत आहे. पूर्वीच्या सरकारने मुलींचे शिक्षण मोफत केले होते. आताच्या सरकारने मुलांप्रमाणेच मुलींनाही ‘फी'ची आकारणी चालू केली आहे. श्रीमंत माणसे आपल्या मुलींना योग्य शिक्षण तर देतील पण, गरीब मुलींच्या शिक्षणाचे काय?
या सरकारमधील तथाकथित खेळ मंत्र्याकडून आंतरराष्ट्रीय ‘मल्ल' मुलीवर अत्याचार झाले, त्या विरोधात न्याय मागणाऱ्या मुलींना पोलीसी दणका दाखवत फरफटवले. त्यांना न्याय नाकारला एकूणच हे ‘मनुवादी' सरकार स्त्रियांच्या हवकाविषयी मूग गिळून गप्प आहे. त्याचे कारण आत्ताच्या शिकल्या सवरलेल्या मुली अन्यायाविरूध्द लगेच आवाज उठवतात. सरकारला जाब विचारतात. सरकारला नेमके तेच नको आहे. ‘आर.एस.एस.' मधील बऱ्याच मंडळीना आई हवी, बहिण हवी, बायको हवी; पण मुलगी नको. ही मानसिकता बऱ्याच अंशी पुरुषाबरोबरच महिलांचीही असल्याचे दिसून येते. बऱ्याच प्रमाणात स्त्रिया याच स्त्रियांच्या वैरी आहेत. सासू-सुनेचा जाच करते, त्यांचा बदला म्हणून सून सासूचा छळ करते.
बऱ्याच स्त्रिया पुरुषाच्या बरोबरीच्या असल्याचे दाखवण्यासाठी वा त्यांच्यापेक्षा वरचढ असल्याचे दाखवण्यासाठी नाठाळ व अपराधी पुरुषाच्या बरोबरीने अपराधाकडे वळताना दिसत आहेत. सरकारी कार्यालयापासून गुंड व तस्करी प्रकरणात स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढत आहे. अनेक कारागृहात ‘स्त्री' कैद्याची संख्या वाढत आहे. हा समाजाला धोवयाचा इशारा नव्हे काय? भाजप (मोदी) सरकार म्हणते देशात राम राज्य आणायचे आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' करत देशाला जगाच्या बरोबरीत आणायचे आहे. पण, प्रत्यक्षात तसे घडत आहे काय? ज्या राम राज्याची संकल्पना सांगत आहेत, त्याच रामाने आपल्या पत्नीवर किती अन्याय केलाय हे विसरतात. वनवास काळात रावणाने सीतेचे अपहरण केले व काही काळ आपल्याकडे ठेवले. त्याबाबत शंका घेऊन रामाने रावणाला हरवल्यानंतर सीतेची अग्नीपरीक्षा घेतली, ती सीतेनेे लिलया पास केली पण, तरीही एका धोब्याच्या वक्तव्यावरून रामाने सीतेला गरोदर स्थितीत खोटे बोलून परत वनवासात पाठवून दिले. तिथे त्रषिंनी तिचा मुलीप्रमाणे सांभाळ केला. पण रामाने परत तिला आपली पत्नी म्हणून स्विकारले नाही, त्यामुळे सीतेला धरणीत समाविष्ट व्हावे लागले. आजच्या या काळातही अनेक स्त्रियांना विविध प्रकारच्या अग्नी परीक्षा द्याव्या लागतात.
समाजात वावरताना स्त्रियांना अनेक प्रकारच्या टिकाटिप्पणींना, वखवखलेल्या नजरांना सामोरे जावे लागते. आजच्या कुटूंबव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात दरार आली आहे, पूर्वी क्वचित होणारे ‘डिव्होर्स'चे प्रमाण आता खूपच वाढले आहे. घटस्फोटित महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन पुरुषांसह महिलांचा बदलला आहे. प्रत्येक ठिकाणी महिलांनाच दोषी ठरवले जात आहे. याला अपवाद देशाचे पंतप्रधानही नाहीत. त्यांनी तर आपल्या पत्नीला ‘घर का ना घाट का' बनवले आहे आणि आपण त्यांनाच आंधळेपणाने न्यायी समजतो. जी व्यक्ती स्वतःच्या पत्नीला न्याय देऊ शकत नाही ती इतर स्त्रियांच्या न्यायाचा काय विचार करेल? - भिमराव गांधले