महिला सक्षमीकरण काळाची गरज

वर्षातून एकदा प्रतीकात्मक रावणाचे दहन करण्यापेक्षा जे समाजकंटक रावणालाही लाजवतील अशी कृत्य करतात त्यांच्यावर कडक कारवाई करून ते असे कृत्य करण्यास धजावणार नाहीत असा प्रयत्न करावा. ज्या महिलेवर अत्याचार झाला असेल तीला सर्व समाजाने आपलीच कन्या आहे असे समजून सामाजिक पालकत्वाची भूमिका बजावली तर स्त्रियांना दिलासा मिळेल.

  यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता :
 यत्रयीतात्स्तु ना पुज्यन्ते सर्वास्तत्राफला : क्रिया :

   "जेथे स्त्रियांची पूजा केली जाते, त्यांना मान दिला जातो तेथे देवता आनंदाने राहतात. जेथे मान राखला जात नाही तेथील सर्व कार्ये निष्फळ होतात.”  अशी आपल्या भारतीय संस्कृतीची पूर्वीपासून भूमिका होती. म्हणूनच भारतात समृद्धी होती. परकीय आक्रमणामुळे परधर्मिय राज्यकर्त्यांनी महिलांवर अत्याचार केले आणि समृध्दता कमी झाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय घटना बनविताना स्त्रियांच्या सन्मानाची विशेष दखल घेण्यात आली आहे. भारतालाही मोठी प्रगती साधायची असेल तर महिला सक्षमीकरण आवश्यक आहे या जाणिवेने भारतीय संविधानात राजकीय, सामाजिक, आर्थिक शैक्षणिक क्षेत्रात पुरुष आणि महिलांना समान संधी आणि अधिकार देऊ केले आहेत.
   आजच्या महिलेच्या प्रगतीची गरुडझेप पुरुषांच्या प्रगतीशी बरोबरी करू लागली आहे. कल्पना चावला हीने पहिली महिला वैमानिक, श्रीमती इंदिरा गांधी यांनी भारताच्या पंतप्रधान म्हणून तर श्रीमती प्रतिभा पाटील यांनी भारताच्या राष्ट्रपती म्हणून सर्वोत्तम कामगिरी केली आहे. महिलांची इतकी प्रगती झाली, कायद्याने इतके अधिकार दिले असले तरी अद्याप काही ठिकाणी पुरुषांची मानसिकता अशी आहे की ते म्हणतात,

"पायीची वहाण न घ्यावी शिरी
    अन सहन करूच नये स्त्रीची शिरजोरी”

अशी मानसिकता असणाऱ्या कुटुंबात महिलांवर अन्याय, अत्याचार होत आहेत. पंचवीस तीस वर्षापूर्वी अनेक जोडप्यांना आपल्याला एकच अपत्य हवे आणि तेपण मुलगाच हवा असे वाटत होते. त्यासाठी गर्भलिंग परिक्षा करून मुलगी असल्यास गर्भपात करण्यास सुरुवात केली होती. काही ठिकाणी महिलांवर हुंड्यासाठी अत्याचार करण्यात आले. अशा काही घटनांत सासू, नणंद अशी नाती असलेल्या महिलासुध्दा सहभागी होत आहेत. असे महिलांवर अत्याचार होत असून सुध्दा अनेक संस्कृती रक्षक दरवर्षी नवरात्रीत महिलांचा गौरव करतात व दसऱ्याला रावणाचे दहन करतात. ह्यावर्षी समाजमाध्यमांवर रावणाचे मनोगत व्यक्त करणारी कविता वाचली. ती कोणाची आहे माहीत नाही; पण कवितेतून सध्याच्या परिस्थितीवर केलेले भाष्य विचार करायला लावणारे आहे...

  रावणाचे आव्हान
 जळत असता रावणाने
 हसून गर्दीकडे बघितलं
 तपासा स्वतःच्या चारित्र्याला
 मोठ्याने त्याने विचारलं !

       हो केला होता मी गुन्हा
       सीतेचे अपहरण करण्याचा
       पण ! प्रयत्न नाही केला
       मर्यादेची सीमा ओलांडण्याचा !

दिवसाढवळ्या तुम्ही रस्त्यावर
अब्रुचे लचके तोडता
सभ्यपणाचा आव दाखवून
दरवर्षी मला जाळता !

      तुम्हां मानवांपेक्षा
      राक्षस असून ठरलो भारी
      केला नाही अपमान
       सीतेचा माझ्या दारी !

हुंड्याच्या लालसेपोटी
तुम्ही हजारो सीता जाळल्या
वंशांच्या दिवट्यासाठी
गर्भातच कळ्या मारल्या !

       हक्क नाही तुम्हांला
      मला बदनाम ठरवण्याचा
      प्रयत्न करा तुम्ही
      स्वतःचे चारित्र्य सुधारण्याचा !

तुमच्या समाधानासाठी
दरवर्षी तुम्ही मला जरूर पेटवा
पण पेटवण्याआधी
तुमच्यातील राम मला दाखवा !

   ह्या कवितेतील रावणाने ज्या भावना व्यक्त केल्या त्या योग्यच आहेत. वर्षातून एकदा प्रतीकात्मक रावणाचे दहन करण्यापेक्षा जे समाजकंटक रावणालाही लाजवतील अशी कृत्य करतात त्यांच्यावर कडक कारवाई करून ते असे कृत्य करण्यास धजावणार नाहीत असा प्रयत्न करावा. ज्या महिलेवर अत्याचार झाला असेल तीला सर्व समाजाने आपलीच कन्या आहे असे समजून सामाजिक पालकत्वाची भूमिका बजावली तर स्त्रियांना दिलासा मिळेल. भारतात खऱ्या अर्थाने ‘महिला सक्षमीकरण'  होणे गरजेचे आहे त्यासाठी पुरुषांनीसुध्दा सहकार्य करावे. ज्या देशात महिलांचा सन्मान केला जातो तो देश महान बनतो. भारतातील प्रत्येक नागरिकाने एक घोषवाक्य आचरणात आणले तर खऱ्या अर्थाने आपला भारत महान होईल. ते घोषवाक्य म्हणजे...

‘भारतीय महिलांना द्या सन्मान
 तरच बनेल आपला भारत महान'
 -दिलीप प्रभाकर गडकरी 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

कळी उमलता उमलता