तुकारामची इच्छा पूर्ण झाली...

काशिनाथ गुरुजी मनात विचार करत होते. शाळेतल्या सर्व मुलामुलींची घरची परिस्थिती थोडीफार चांगली आहे. ती सहलीसाठी पैसे देतील. पण हुशार विद्यार्थी तुकाराम यालासुद्धा आपण सागरेश्वरला सहलीला घेऊन जायचे. त्याच्या सहलीचे पैसे मी देणार. मलासुद्धा एकेकाळी सहलीला पैसे नव्हते. मीसुद्धा असाच तुकारामसारखा नाराज होऊन बसलो होतो. मला काही सुचत नव्हते. मीसुद्धा गरिबीतून मास्तर झालो आहे. शिक्षणासाठी किती त्रास होतो याची परिस्थिती मला आज आठवण करून देत आहे तुकारामला मी मदत करणारच, असा गुरुजींनी मनात विचार केला.

.... तुकारामची शाळा भरली होती. शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी खुशीत होती. सागरेश्वर अभयारण्य पाहण्यासाठी शाळेतील सहल जाणार होती पण तुकाराम जवळ सहलीला जाण्यासाठी त्याच्या घरी पैसे मिळत नव्हते. तुकाराम हा परगावहून राहिला गावात आला होता तुकारामच्या आई वडिलांची फार मोठी इच्छा होती की तुकारामाने भरपूर शाळा शिकावी. घरात तर अठरा विश्व दारिद्रय आहे. रोज दुसऱ्याच्या बांधावर कामाला गेल्याशिवाय घरात कोणाचे पोट भरत नव्हते. तुकारामला तीन बहिणी व तुकाराम व त्याचे आई-वडील असे पाच माणसांचे कुटुंब गावात रोजगार करून जगत होते. पोट हे फार वाईट आहे लातूर जिल्हा सोडून आलेले हे कुटुंब गावामध्ये दिवस रात्र काम करत होते. तुकारामची थोरली बहीण  लग्नाच्या वयामध्ये आली होती. हा एक फास तुकारामच्या आईला वडिलाला गळ्याला लागलेला होता. मुली नाही शिकल्या तरी चालतील. कारण मुलगी हे परघरचे देणे आहे. परंतु तुकारामला मात्र मराठी शाळेचा मास्टर करायचे हे स्वप्न तुकारामाच्या आई-वडिलांनी मनात रंगवले होते.

तुकारामच्या मनालासुद्धा वाटत होते. मलासुद्धा सहलीला मुलांच्या बरोबर जायचे आहे. मलासुद्धा सागरीश्वर पाण्याचे तीन कुंड शंकराचे मंदिर लिंगदरी डोंगर व दरी पाहयची आहे. असा हा सुंदर निसर्ग देखावा पाहायला मिळणार खरे;  पण सहलीला जायला पैसे नाहीत. वडिलांना कुठल्या तोंडाने सांगायचे मी सहलीला जाणार आहे मला पैसे द्या. आई वडील तर रोज दुसऱ्याच्या बांधावर काबाड कष्ट करतात. घरचा संसार चालेना त्यात ही अशी महागाई दोन बहिणींची कपडे माझा शाळेचा ड्रेस पाटी पेन्सिल वडील कष्ट करून पुरवतात. तुकारामच्या मनामध्ये अशा अनेक शंकांचा महापूर ओसंडून वाहत होता. आई वडिलांची तर इच्छा आहे, मी मराठी शाळेवर मास्तर व्हावे. फाटलेला संसार गावाच्या पुढे जागेत बांधलेली ही झोपडी. घरात लाईट नाही. कंदील आणि दिव्याचा प्रकाश. या प्रकाशात अंधुक दिसणारी संसारातील भांडी घरातील लोक कसंतरी पोट भरते हा सारा विचार तुकारामच्या लक्षात येत होता. तुकाराम शाळेत हुशार होता, हे वर्गाला  आणि वर्ग शिक्षकांनासुद्धा माहीत होते. तुकारामचे वर्गशिक्षक मनात विचार करीत होते याच जिल्हा परिषद मराठी शाळेतून शिकलेली मुले आज चांगल्या हुद्द्यावरती काम करतात. यांचीसुद्धा गरिबीच होती, या विचाराप्रमाणे तुकारामचा विचार त्याचे वर्गशिक्षक काशिनाथ तावदर मनात करत होते. वर्गशिक्षकांचे लक्ष तुकारामाकडे व त्याच्या अभ्यासाकडे होते. शिक्षण घेताना घरातील लोकांची तारांबळ होते याचा अनुभव शिक्षकांना खूप चांगला होता. शाळा भरली होती वर्ग मुला मुलींनी खससन भरला होता शाळेतील मुले सहलीसाठी वर्गणी घेऊन उभी राहिली होती. शाळेतील मुलं व मुली आनंदात होत्या. प्रत्येकाचे चेहरे  खुलून दिसत होते. सहलीला जाणे म्हणजे एक फार मोठा आनंद आणि याच आनंदातून निसर्ग पाहण्याची दर्शन व ज्ञान म्हणजे हा एक सोहळा वर्षभर डोक्यातून न जाणारा असा आहे. वर्गशिक्षक खुर्चीवर बसून व टेबलवर वही ठेवून पैसे देणाऱ्या मुला मुलींची यादी लिहीत होते. तुकाराम एका शेवटच्या ओळीत बसला होता तो हा सारा विषय ऐकत होता. त्याच्या मनाची फार मोठी घालमेल झाली होती. तो नाराज होता मुलांच्या बरोबर बोलत नव्हता. सोमवार कसा तरी गेला आणि वर्गशिक्षक तावदर गुरुजी म्हणाले राहिलेल्या मुलांनी उद्या पैसे जमा करा. गुरुवारी आपल्या शाळेची सहल सकाळच्या रेल्वे गाडीने सागरेश्वरला जाणार आहे. सकाळी बरोबर सहा वाजता रेल्वे स्टेशनवर सर्वांनी हजर राहिले पाहिजे. सर्वांनी एकत्र मिळून जायचे आहे. तुमचे पाच रुपये प्रवासाकरता घेतले आहेत. सहल संपून आल्यानंतर राहिलेले पैसे सर्वांना परत मिळतील हे लक्षात घ्या. गुरुजी तुकारामाकडे पाहत म्हणाले, काय तुकाराम तू सहलीला येणार ना..  नाही गुरुजी सहलीला येण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. माझी आई वडील रोज दुसऱ्याच्या बांधावर मोलमजुरी करतात हे तुम्हाला ठाऊक आहे. सहलीसाठी पैसे कोणाला मागू ? आप्पा तरी काही पैसे देणार नाही. कारण घरची परिस्थिती. आमच्याकडे पैसे असते तर आम्ही आमचं गाव सोडून जगायला या गावात आलो असतो का? लातूर जिल्हा दुष्काळी जिल्हा. तिथे पाऊस पडत नाही म्हणून गुरुजी आज कितीतरी कुटुंबे आमचे गाव सोडून सालगडी म्हणून काम करीत आहेत. गुरुजी,  फाटक्या संसाराला एक लागत नाही. जळणापासून पाण्यापर्यंत सारे पहावे लागते. आप्पाला आप्पाची व आईची फार मोठी प्रबळ इच्छा आहे की माझा तुकाराम भरपूर शाळा शिकावा. त्याला मराठी शाळेमध्ये मास्टर म्हणून नोकरी लागावी. म्हणून मी रोज शाळेला येत आहे.” तुकाराम म्हणाला...

"तुकाराम तुझे बरोबर आहे वर्षातून एकदा आपल्या शाळेची सहल बाहेर जात असते. शाळेप्रमाणेच बाहेरचे ज्ञान होणे तुम्हा  मुलांना अतिशय गरजेचे आहे. प्रत्येक वर्षी शाळेत एक प्रश्न सातत्याने येत असतो. शाळेची सहल हा निबंध तू कसा लिहिणार? परिस्थिती गंभीर आहे. अठरा विश्व दारिद्रय आहे. यातूनसुद्धा मार्ग काढायला शिकले पाहिजे. तुम्ही सुधारण्यासाठी अशी वेळ येते यावेळीची जाण पुढील तुमच्या आयुष्यामध्ये अतिशय उपयुक्त अशी ठरते. ज्याच्याकडे पैसा आहे तू मुळातच श्रीमंत नाही ज्याच्याकडे ज्ञान आहे, व्यवस्थित वागतो, नेहमी खरे बोलतो शाळेत कोणाची चोरी करत नाही अथवा भांडणे करत नाही, तोच विद्यार्थी खरा श्रीमंत समजला जातो. उभ्या आयुष्यामध्ये माणसाला संकटे ही येत राहतातच संकट म्हणजे भविष्यकाळासाठी एक समज आहे”. गुरुजी म्हणाले...

...गुरुजीचे ऐकून तुकाराम तोंडातून एक शब्दसुद्धा बाहेर काढत नव्हता. वर्गशिक्षक सांगतात हे अगदी खरे आहे; परंतु माझ्याजवळ सहलीसाठी पाच रुपये नाहीत. आप्पाला कोणत्या तोंडाने सांगू मला पाच रुपये द्या म्हणून. कारण घरची परिस्थिती मी माझ्या डोळ्यांनी पहात आहे. माझ्या मनाला भरपूर वाटतं आपल्याजवळ पैसा असावा. आपण या मुलामुलींसोबत सहलीला जावे. पण परिस्थिती आडवी येत आहे. शाळेत गुरुजी रोज फुकट शिकवतात. त्यांना जिल्हा परिषदेचा पगार आहे. हे एका अर्थाने खरे असले तरी ही नोकरी मिळवण्यासाठी गुरुजींनी अपार कष्ट केले आहे. रात्रंदिवस त्यांनी अभ्यास केला आहे. म्हणून ते आज खुर्चीवर बसून शिकवतात. कष्टाशिवाय फळ नाही; पण मी या वयात काय कष्ट करणार? पुढे उभे आयुष्य माझ्यासमोर पडले आहे. परवाच्या दिवशी गुरुजींनी शिकवताना एक म्हण आम्हा सर्व मुलांना सांगितली होती. कठीण समय येता, कोण कामास येतो ही म्हण खरी असली तरी मला कोण पैसे देणार सागरेश्वरला सहलीला जाण्यासाठी. असे तुकारामचे मन म्हणत होते. तेवढ्यात शाळेची घंटा झाली सर्व विद्यार्थी शाळेचे दप्तर घेऊन वानर सेना पाळावी अशी अवस्था झाली. तुकाराम मुलांच्या शेवटी दप्तर घेऊन घरी गेला; पण काशिनाथ गुरुजी मनात विचार करत होते. शाळेत सर्व मुलामुलींची घरची परिस्थिती थोडी फार चांगली आहे. ती सहलीसाठी पैसे देतील हे काही अवघड नाही; पण एक चुणचुणीत हुशार विद्यार्थी तुकाराम यालासुद्धा आपण सागरेश्वरला सहलीला घेऊन जायचे. त्याच्या सहलीचे पैसे मी देणार.  मलासुद्धा एकेकाळी सहलीला पैसे नव्हते. मीसुद्धा असाच तुकारामसारखा नाराज होऊन बसलो होतो. मला काही सुचत नव्हते. मीसुद्धा गरिबीतून मास्तर झालो आहे. शिक्षणासाठी किती त्रास होतो याची परिस्थिती मला आज आठवण करून देत आहे तुकारामला मी मदत करणारच, असा गुरुजींनी मनात विचार केला. शाळा सुटल्यानंतर सर्व शिक्षक स्टाफ रूममध्ये जमले आणि हेडमास्तर गुरव गुरुजी म्हणाले.. "काय गुरुजी, सहलीची तयारी काय म्हणते सर्व विद्यार्थ्यांनी पैसे दिले का? आणि हे बघा शाळेतील ही लहान मुले आपली मुले आहेत. मी तुमच्याबरोबर सहलीला आलो असतो; परंतु अचानक शिक्षण अधिकारी आपल्या शाळेला धावती भेट देणार आहेत. म्हणूनच मला थांबावं लागणार आहे. तुम्ही सहल चांगली करून या मुलांच्या पाठीमागून चार शिक्षक चांगले लक्ष ठेवा. कारण सागरेश्वर अभयारण्य हे फार मोठे आहे. सागरेश्वरला निसर्गाची एक फार मोठी देणगी मिळाली आहे. प्रत्येक तीर्थस्थळाला वेगवेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे याच परिसरामध्ये अनेक साधुनी तपश्चर्या करून सागरेश्वरचा भाग पुण्यशील असा केला आहे. लिंगदरीमध्ये अनेक साधुंनी होम हवन करून परमेश्वराची फार मोठी सेवा केली आहे असा हा पुण्यशील भाग आहे..”

"तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. अहो शाळेतील मुले आपली आहेत त्यांना व्यवस्थित सहलीला घेऊन जाणार आणि व्यवस्थित घेऊन येणार त्याची आपण तीळमात्र काळजी करू नये. शाळेत जवळजवळ सहल प्रवासासाठी वर्गणी जमा झाली आहे. दोन विद्यार्थी प्रवासाचे भाडे द्यायचे पाठीमागे राहिले आहेत. त्यातील एक विद्यार्थी देईल; पण तुकाराम भाडे देऊ शकणार नाही. कारण त्याची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. तेव्हा मी त्याचे पाच रुपये भाडे भरतो. तो शाळेत हुशार विद्यार्थी आहे. परिस्थिती नसली म्हणून काय झाले ? त्यालासुद्धा सहलीचा लाभ घ्यायला आला पाहिजे त्याला का म्हणून नाराज करायचे?  पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे.” तावदर गुरुजी म्हणाले..

"ठीक आहे गुरुजी तुम्ही जे करता ते योग्यच करणार याची खात्री मला आहे. तुकारामला सुद्धा सहलीला घेऊन जावा.” हेडमास्टर म्हणाले..

... स्टाफ रूम मधील सर्व मास्तर आपापल्या घरी गेले. हेडमास्टरनी एका मुलाच्या हाताला धरून शाळा बंद केली व चावी खिशात ठेवून हेडमास्तर घरी गेले. त्या दिवशी काशिनाथ मास्तना रात्रभर झोप लागली नाही. ते फक्त आणि फक्त तुकाराम या मुलाचा मनात विचार करत होते. या उघड्या जगामध्ये असे अनेक विद्यार्थी जन्म घ्ोतात. शाळेसाठी पैसा नाही म्हणून अर्ध्यावरती शाळा सोडून जातात. परिस्थितीमुळे कितीतरी विद्यार्थ्यांचे आज रोजी नुकसान झाले आहे हे चित्र गुरुजींच्या डोळ्यासमोर येत होते सकाळ झाली सूर्य उगवला होता व सूर्याच्या भोवती तांबूस रंगाची शाल पांगरली होती. गुरुजी सूर्याकडे पाहत होते. तेवढ्यात त्यांची बायको संगीता म्हणाली, "अहो कसला विचार करताय कालपासून मी काहीतरी तुमच्याविषयी वेगळंच पहात आहे. रात्री तुम्ही जेवणसुद्धा बरोबर केले नाही शाळेत तुम्हाला कुणी काय म्हटले का?”

"नाही गं. मी एका विद्यार्थ्यांचा विचार करत आहे. अगं आमच्या शाळेत लातूर भागचे एक कुटुंब पोट भरण्यासाठी आले आहे. त्याला दोन बहिणी आहेत. त्याचे आई-वडील दुसऱ्याच्या शेतामध्ये दिवसभर काबाडकष्ट करून कुटुंब सांभाळत आहेत. परंतु तुकारामच्या आई वडिलांची फार मोठी मनात अभिलाषा आहे. नाचार आला म्हणून विचार सोडायचा नाही. तुकारामला भरपूर शाळा शिकवायची आणि त्याला मास्तर करायची ही गोष्ट तुकारामाने मला सांगितली आहे. तुकाराम हुशार आहे आणि तो पुढे मास्तरसुद्धा होईल. म्हणून त्याला मदत करायची. त्याचे हस्ताक्षर फार सुंदर आहे. सुंदर अक्षर हाच माणसाचा खरा दागिना आहे आणि तुकाराम हा दागिना इथून पुढच्या काळात सोन्यासारखा चमकून दिसेल असे मला वाटते.” गुरुजी म्हणाले...

"अगदी बरोबर आहे तुमचे तुमचा निर्णय योग्यच असणार; परंतु मला एक आठवते घरच्या मुलाप्रमाणे शाळेतील मुलांची सुद्धा किती मोठी काळजी करता यात मी फार समाधानी आहे. मुलामुलींचे समाधान हेच शिक्षकाचे व शिक्षकांच्या घरची समाधान यापेक्षा आमच्या जीवनामध्ये आम्हाला आणि काय पाहिजे.” गुरुजींची बायको म्हणाली...
 सकाळ सकाळी सूर्य उगवून थोडा वर आला होता आकाश मार्गाने पक्षी भक्ष्य शोधण्यासाठी बाहेर पडले होते. गुरुजींनी आंघोळ केली व थोडा नाश्ता करून ते शाळेकडे गेले. शाळा भरली होती शाळेची प्रार्थना, प्रभू माझी, जीवन बाग फुलं,, ही प्रार्थना चालू होती प्रार्थना संपली. सुविचार झाला. सहलीची परत एकदा माहिती गुरुजींनी सर्वांना दिली व सारे विद्यार्थी विद्यार्थिनी आपापल्या वर्गात गेले तुकारामसुद्धा शाळेला आला होता. तोही नियमाप्रमाणे शाळेत जाऊन बसला गुरुजींनी हजेरी घेतली व गुरुजी म्हणाले, "काल दोन विद्यार्थी वर्गणी द्यायचे राहिले आहेत. प्रवास वर्गणी आणली आहे का?” यावर एका विद्यार्थ्याने सहलीसाठी पाच रुपये गुरुजींच्या हातात दिले. गुरुजींनी त्याचे नाव वहीत लिहून घेतले व गुरुजी तुकारामला हाक मारत म्हणाले, "तुकाराम तू माझ्याजवळ ये.” तुकाराम गुरुजींच्या जवळ आला व गुरुजी पुढे म्हणाले, ”उद्या सहलीला जायचे आहे की नाही? चांगली स्वच्छ कपडे धुऊन ये.” यावर तुकाराम म्हणाला, ”कशाची कपडे आणि कशाचं काय? माझ्याकडे सही भाड्यासाठी पैसे नाहीत हे मी तुम्हाला काल सांगितले आहे.” यावर गुरुजी म्हणाले "तू काही काळजी करू नको तुझी वर्गणी मी भरत आहे; परंतु तुला पाठीमागे ठेवून आम्ही कुणी सहलीला जाणार नाही. एक टायमाची सर्वांनी जेवून घ्यायचे आणि उद्या सर्वांनी रेल्वे स्टेशनवर जमा होऊन  सागरेश्वर सहलीला जायचे.” हे ऐकताच सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या. सर्वांनाच जणू आनंद झाला आणि तुकारामलासुद्धा आनंद झाला. तुकारामची इच्छा पूर्ण झाली व मनामध्ये पुन्हा पुन्हा गुरुजींचे आभार मानू लागला आणि त्याचे दुसरे मन म्हणाले या जगात कुठेतरी देव आहे आणि ते तो देव दुसरा तिसरा कोणी नसून माझ्या शाळेचे शिक्षक आहेत होय शिक्षक आहेत. - दत्तात्रय पांडुरंग मानुगडे 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

महिला सक्षमीकरण काळाची गरज