फुलं आणि काटे
आज अवतीभवती नीट पाहिल्यास असे अनेक दिवटे दिसतील की ज्यांनी त्यांच्या माता-पित्यांकडे म्हातारपणात दुर्लक्ष केले. त्यांना वृध्दाश्रमात टाकुन दिले. या दिवट्यांपैकी काहींनी स्वतः चांगली घरे, टुमदार बंगले बांधले; पण आपल्या आईवडिलांना जुन्याच घरात ठेवले. काहींनी नव्या घराच्या जिन्यात या म्हाताऱ्यांना अडगळीत टाकुन दिले. दुसऱ्यांकडे मागून खायची वेळ त्यांनी आपल्या वृध्द आई-वडिलांवर आणली. या मुलांवर त्याचवेळी जर कडक शिस्तीचे संस्कार केले असते, चांगल्या सवयी लावल्या असत्या, चांगले शिक्षण त्यांच्या आई-वडिलांना दिले असते, त्यांना लाडोबा, हट्टी, दुराग्रही होण्यापासून वेळीच रोखले असते तर वेगळे चित्र नवकीच दिसले असते.
‘मुलं ही देवाघरची फुलं' असं म्हणण्याचा प्रघात आहे. अर्थात ही फुलं तेवढी निरागस मात्र हवीत. या बालकांना विविध साहित्यिकांनी, गीतकारांनी, संगीतकारांनी आपापल्या कलाकृतींतून चांगले स्थान दिले आहे, नावाजले आहे. ‘दो कलियाँ ' चित्रपटात ‘बच्चे मन के सच्चे सारी जगकी आँखके तारे ये जो नन्हे फुल है जो भगवान को लगते प्यारे' हे नितांतसुंदर गीत त्यावेळची बाल कलाकार बेबी सोनिया अर्थात नितू सिंह हिच्यावर चित्रीत झाले होते. मातृत्व आणि बालपण यावर अनेकानेक सुंदर कलाकृती निर्माण केल्या गेल्या व त्यांना रसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. ‘तुझे सूरज कहूँ या चंदा तुझे दीप कहुॅ या तारा मेरा नाम करेगा रोशन जगमे मेरा राजदुलारा' हे आणखी एक अर्थपूर्ण गीत पित्याच्या आपल्या मुलाबद्दलच्या भावना मांडण्यास पुरेसे आहे.
असे जरी असले तरी ही मुले लहानपणी असतात कशी व मोठेपणी बनतात काय, हा एक गुंतागुंतीचा प्रश्न बनून राहिला आहे. मला वाटते कोणतेही पालक आपल्या मुलांना त्यांनी पुढे जाऊन गुन्हेगार बनावे, चोऱ्या कराव्यात, समाजकंटक होऊन इतरांना पिडावे, औरंगजेबासारखे इतरांना लुटावे, आपल्याच बापाला-भावाला छळावे, मारावे पिडीत करावे अशा प्रकारचे संस्कार करीत नसतात. मुल चांगले निपजावे, पुढे जाऊन त्याने घराण्याचे नाव गाजवावे, समाजाच्या, देशाच्या उपयोगी पडावे, सर्वांना अभिमान वाटेल असे कार्य करावे असेच प्रत्येक मातापित्याला वाटत असते. पण तरीही दाऊद इब्राहिम (मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण व इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड), वाल्मिक कराड, दत्तात्रय गाडे, अक्षय शिंदे, मेहबूब शेख (उरण मधील मुलीची हत्या) आफताब पूनावाला (श्रध्दा वालेकर हत्या प्रकरण) रेहान आणि फैजान (खारघरमध्ये इज्तेमा सुरु असण्याच्या काळात वाशीमधील शिवकुमार शर्मा यांच्या डोवयात हेल्मेट मारुन त्यांचा खून करणारे आरोपी) हे आणि असे अनेक दळभद्री लोक असतातच. तेही कधीतरी बाल्यावस्थेत असतील, त्यांच्यावर त्यांच्या पालकांनी असे गुन्हेगारी स्वरुपाचे संस्कार केले असतील काय? या फुलांचे काटे कसे होतात?
बाल्यावस्थेत असताना मुलांचे वर्तन भलत्याच दिशेकडे जात असल्याचे लक्षात येताच मातापित्यांनी वेळीच सावध व्हायला पाहिजे व योग्य ती पावले उचलून त्यांना रास्त मार्गावर आणले पाहिजे; नाहीतर त्याच मुलांसाठी मग पुढे जाऊन पोलीस स्टेशन-कोर्टाच्या पायऱ्या झिजवणे, जामीन, वकील, अशी मुले सजेसाठी जेलमध्ये गेल्यावर डबे पोहवचणे, लोकनिंदा, बदनामी यांना सामोरे जावे लागते. मुलांचे लाड, कौतुक, त्यांना डोक्यावर बसवणे, पाठीशी घालणे याला सीमा असली पाहिजे. अन्यथा आपण करतोय ते बरोबर आहे असे समजून पुढे हीच मुले बहकतात, वाया जातात आणि मग कपाळाला हात लावण्याची वेळ मातापित्यांवर येते. माझ्या पाहण्यात अशी अनेक मुले आहेत की जी लहान असताना पालकांनी त्यांच्या गैरवर्तनाकडे त्यावेळी दुर्लक्ष केले, मुलांना वेळीच दटावले नाही, शिस्त लावली नाही; त्यांनी आता पालकांना शरमेने मान खाली घालायची वेळ आणली आहे. तुम्ही कोणत्याही मंगल कार्यालयात विवाहप्रसंगी नवरा नवरी कपडे बदलण्यासाठी रंगपटात गेले की त्या मंचाचा ताबा घेणारे लहान मुलगे, मुली पाहा. कुणी बोहल्याच्या पाटावर चपलेसहित चढते, कुणी तेथे ठेवलेल्या कोचवर चपला घाऊन उड्या मारते, कुणी तेथे सजवलेल्या फुलांच्या आराशीमधील फुले ओरबाडते, कुणी रुखवतातील कलाकुसरीच्या वस्तूंची फेकाफेक करते. यातले काही कुणा ज्येष्ठाने त्या पालकांच्या लक्षात आणून दिल्यास ते दुर्लक्ष करतात, प्रामुख्याने त्या चिमुरड्यांची माता इतर महिलांबरोबर साड्या, दागिने, नणंद-जाऊ-सासूच्या तक्रारी अशा बाता करण्यात तल्लीन झालेली असते. ‘जाऊ द्या ना लहान मुल आहे ते, त्याला/तिला काय अक्कल' असं म्हणून काही महान माता इतरांचे म्हणणे मनावर घेत नाही. आपलं मुल विवाह वेदीचा, त्या सजावटीचा अपमान, नासधूस करीत आहे हे या साळकाया-माळकायांच्या गावीही नसते.
गेल्या महिन्यात एका बारश्याच्या कार्यक्रमात मी पाहिले की तेथे यजमान कुटुंबाने मोठ्या आवडीने व अतिशय कल्पकतेने बनवलेल्या सजावटीला एक पाच-सहा वर्षांच्या मुलगा ओरबाडत होता, त्याचे नुकसान करीत होता. त्याची आई मात्र ते सारे बघून तिकडे दुर्लक्ष करीत होती व अन्य नातेवाईक ‘हे कसले काय वात्रट, भंगार कार्टे आहे' या नजरेने ते सारे पाहात होते. मुलांच्या शाळेच्या दप्तरात तंबाखू, गुटक्याच्या पुड्या, बियरचे टीन्स सापडायला सुरुवात झाल्याला बराच काळ लोटला आहे व त्यांना वेळीच दंडीत न केल्याने ती पुरती वाया गेल्याचेही त्यांचे आई-वडील आता कसे मुकाट पाहात आहेत हेही मी पाहिले आहे. ‘त्याला/तिला त्याच्या/तिच्या मनासारखे दे, अजिबात अडवू नको' असे आपल्या मुलांच्या हट्टावर आपल्या पत्नीला सांगणाऱ्या अनेक पित्यांना त्यांच्या त्याच मुलांनी उतारवयात कसे तंगवले, हाल केले, प्रसंगी पित्यावर हात कसा उचलला, पित्याच्या शेवटच्या आजारपणातही कसे दुर्लक्ष केले, पिता गेल्यानंतर आईचा कसा अनादर केला, तिच्या दुखण्याखुपण्याकडे, औषधोपचारांकडे कसे तिऱ्हाईतपणे पाहिले याची अनेक उदाहरणे मी अवतीभवती पाहात आलो आहे. पण त्याला आता पुष्कळ उशीर झालेला आहे. यावर संत कबीरांचा एक दोहा आहे..‘अब पछताए होत वया जब चिडिया चुग गयी खेत'. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर हा सारा परिसर विकासप्रवण असून तेथील जमिनींना सोन्याचा भाव आहे. त्या जमिनी पूर्वजांनी मोठ्या मेहनतीने राखून ठेवल्याची फळे आताचे वंशज चाखीत आहेत. पण याच वंशजांच्या आधीच्या पिढ्यांनी या लेकरांना तळहाताच्या फोडासारखे जपले, त्यांचे लाड केले. परिस्थिती नसतानाही त्यांना हवे ते लाभू दिले. त्याची परतफेड आताची मोठी झालेली पिढी कसे करतेय? माझ्या पाहण्यात असे अनेक दिवटे आहेत की ज्यांनी त्यांच्या माता-पित्यांकडे म्हातारपणात दुर्लक्ष केले. अनेकांनी स्वतः चांगली घरे, टुमदार बंगले बांधले; पण आपल्या आईवडिलांना जुन्या घरातच ठेवले. काहींनी नव्या घराच्या जिन्यात या म्हाताऱ्यांना अडगळीत टाकुन दिले. दुसऱ्यांकडे मागून खायची वेळ त्यांनी आपल्या वृध्द आई-वडिलांवर आणली. या मुलांवर त्याचवेळी जर कडक शिस्तीचे संस्कार केले असते, चांगल्या सवयी लावल्या असत्या, चांगले शिक्षण त्यांच्या आई-वडिलांना दिले असते, त्यांना हट्टी, लाडोबा होण्यापासून वेळीच रोखले असते तर वेगळे चित्र नवकीच दिसले असते. माझ्या नात्यातील एका कुटुंबाकडे मी माझ्या मुलाच्या विवाहाची आमंत्रण पत्रिका घेऊन गेलो होतो, सन्मानपूर्वक मी ती पत्रिका दिली. तर माझ्या डोळ्यांदेखतच त्या व्यक्तीच्या नातवांनी ती पत्रिका कॅच कॅच खेळण्यासाठी एकमेकांकडे उडवायला घेतली. यावर एखाद्याने त्यांना दटावले असते. पण कुटुंबप्रमुख व्यक्ती गप्पा मारीत मजा बघत बसली. थोड्या वेळाने ती पत्रिका त्यांच्याकडून खेळताना चार वेळा जमिनीवर पडली. देवादिकांचे फोटो, स्वर्गवासी नातेवाईकांची नावे असलेल्या त्या विवाहपत्रिकेवर त्या कारट्यांनी पाय दिला. तरी त्या घरच्या मुख्य व्यक्तीला त्यांना आवरावेसे वाटेना. मी मग जास्त वेळ न दवडता तेथून काढता पाय घेतला; ही असली पनवती लग्नाला न आलेलीच बरी असे मला वाटून गेले.
विविध नामी व्यक्तीमत्वांच्या मुलाखती मी गेल्या तीस वर्षांपासून घेत आहे. अशाच एका गाजलेल्या व्यक्तिमत्वाची मुलाखत घेण्यासाठी जाण्याचा योग आला. आमच्या प्रथेप्रमाणे मी त्याला नॅपकीन बुके देऊन शुभेच्छा दिल्या. तोवर त्याची शाळेत सहाव्या इयत्तेत शिकणारी मुलगी तेथे येऊन बसली. तिने तो नॅपकीन बुके हातात घेऊन त्याला उलटसुलट पाहात न्याहाळले....आणि हळूहळू त्याचे विच्छेदन करायला घेतले. आधी वरचे प्लास्टिकचे आवरण तिने ओरबाडले. मला वाटले यावर तो कलावंत तिला आवरेल, दम देईल. पण तो निर्गुण, निराकार दिसला. मग तिने त्यातील नॅपकीन एकेक करुन खेचून काढले. आतील तिन्ही नॅपकीन तिने काढुन फेकले. मी हे सारे होत होत असताना त्या कलावंताचा चेहरा न्याहाळत होतो. तो सांगत होता ‘तिला असे करायची सवय आहे. प्रत्येक गोष्ट ती अशीच उलगडून बघते. आवडली नाही तर फाडून टाकते.' यावर मलाही म्हणावेसे वाटले की ‘मला अशीच बेशिस्त कारटी दिसली की त्यांचे कानफाट रंगवावेसे वाटते.' पण प्रत्यक्षात मी स्वतःला आवरले व तसे काही बोललो नाही. यावेळी माझा उजवा हात तिचे मुस्काट रंगवण्यासाठी चुळबुळ करीत होता आणि डावा हात त्याला अडवून धरत होता. क्षणभर मला वाटून गेले की या माणसाला मिळणारी सन्मानचिन्हे, सन्मानपत्रे, मिळणारे बँकेचे चेक, या मुलीच्या आईने आणलेल्या साड्या, नवनवे कपडे यातील काही या कारटीला आवडले नाही तर ती असेच फाडून, मोडून टाकत असते की काय? कुणी जास्तच उदारमतवादी, अतिप्रेमळ म्हणेल की ‘मुलांना काही कळत नाही हो, कशाला मनाला लावून घेता?' यावर माझे म्हणणे असे आहे की मुलांना काही कळत नाही हे शंभर टक्के कबूल! पण त्यांच्या आईबापांना तर कळत असते ना? ते का वेळीच शिस्त लावायला मागत नाहीत? तुमच्या घरचे लाड तुमच्या घरी! अन्यत्र असे कुठे मुले वागली व समोरच्यांनी त्यांना फटकावले तर मग काय कराल? - राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई