यांच्यापेक्षा जनावरं परवडली....

प्राणी आणि मानव  यात मूलभूत फरक निसर्गाने केलेला आहे. प्राणी नाती पाळत नाहीत. कारण त्यांच्यात विचारक्षम आणि संस्कारक्षम असं मन नाही. म्हणून तिथे नात्यांना महत्त्व नाही. परंतु माणूस हा प्राणी हुशार आहे असं म्हटलं जातं आणि तो समूहाने राहतो.

     आठ मार्च जागतिक महिला दिन अगदी जवळ येऊन ठेपलाय. जागतिक महिला दिन कसा साजरा करायचा? कुठले विषय घ्यायचे? कोण वक्ते चांगले बोलतील?...इत्यादी विषयी नियोजन सुरू झाले असतानाच पुण्यातील बलात्कार प्रकरणाने मन सुन्न झाले. स्वारगेट बस स्थानकात थांबलेल्या शिवशाही बसमध्ये एका नराधमाने २६ वर्षाच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची बातमी आली. त्यानुसार ही तरुणी स्वारगेट बस स्थानकात फलटणला जाण्यासाठी पहाटे पाच वाजता बस शोधत होती. अशातच आरोपीने तिला गाठले. ताई, फलटणला जाणारी बस दुसऱ्या फलाटावर लागते. मी काही वर्षांपासून येथेच असतो, असे म्हणत त्याने तरुणीचा विश्वास संपादन केला. त्याने तरुणीला सोलापूरहून स्वारगेटला मुक्कामी आलेली शिवशाही बस दाखविली. परंतु त्या बसमध्ये एकही प्रवासी नव्हता. तेव्हा तरुणीने बसमध्ये तर एकही प्रवासी नाही असे विचारले असता त्यावर त्याने हीच बस फलटणला जाते. तुम्ही आत बसा असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तरुणी बसमध्ये बसली. तिच्या पाठोपाठ हा नराधम बस मध्ये गेला. त्यानंतर आरोपीने बसचा दरवाजा बंद करून तरुणीवर अत्याचार केला. अन्याय अत्याचार झाल्यानंतर साधारणपणे ज्या प्रतिक्रिया उमटतात त्या उमटल्यात. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कुठे गेला? हा प्रश्नही विचारण्यात आला. हा गुन्हा पोलिसांनी (पोलीस आयुक्तांनी बरं का!) गांभीर्याने घ्यावा अशी नेहमीप्रमाणे माफक अपेक्षा करण्यात आली. कारण जिथे हा गंभीर गुन्हा घडला तिथे यापूर्वी लूट आणि प्रवाशांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आणि न्यायाची मागणी केली. आता तपास समित्यांची निर्मिती ही ओघानेच आली आणि सहा पथके निर्माण करुन आरोपीला शेवटी अटक झाली.

 आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडून अशा गुन्ह्यांचे राजकारणही होईल. त्याची आता सुरुवात झालेलीच आहे. पण त्याने तरुणीवर झालेला प्रसंग आणि त्यात गेलेली तिची इज्जत ही कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. हे कोण भरून देणार ? हा खरा प्रश्न आहे. संबंधित गुन्ह्यातील आरोपीला अनेक गुन्ह्यांची पार्श्वभूमी आहे. त्याच्यावर त्याच परिसरात सहा गुन्ह्यांचे आरोप आहेत. आणि तरीही आरोपी एका कंपनीत कामाला आहे असे समजते. सहापैकी एकही गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली नसावी असाच बहुतेक अर्थ निघतो. यावरून न्याय किती मंद गतीने पावले टाकत चालतो आहे, त्याचा वेग किती मंद आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे. न्यायदानासारख्या क्षेत्रातील अनेक न्यायाधीशांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे तारीख पे तारीख तारीख पे तारीख असा अन्याय पिडितावर होतो आणि हा अन्याय पीडित मूकपणे भोगत राहतो. आत्ताच एका राजकीय पुढाऱ्याला दोन वर्षांची शिक्षा झाली अशी बातमी उडत आली आहे. पण तक्रारकर्त्याने ३० वर्षांपूर्वी याचिका दाखल केली होती. म्हणजे तक्रार केली होती आणि तीस वर्षा पूर्वी केलेली तक्रार त्याचा निकाल लागायला तीस वर्षांचा काळ लोटला. तोपर्यंत राजकारणात इकडे तिकडे करायला राजकीय पुढाऱ्याला बराच वेळ मिळाला. सत्ता भोगता आली. बलात्कार प्रकरणातही आरोपीला सहा आरोपात शिक्षा मिळाली असती तर त्याला हा अतिप्रसंग करायला संधी मिळाली नसती. आता चोर सोडून संन्याशाला फाशी होईल. परिवहन विभागाचे एक दोन अधिकारी, कर्मचारी कारण नसताना किंवा असताना बडतर्फ वगैरे होतील. एक दोन पोलीस विभागातील कर्मचारीही नोकरीपासून वंचित होतील. म्हणजे काय तर वांग्याचे तेल वड्यावर होईल. या साऱ्या भानगडीत आरोपीला शिक्षा होईलच याची खात्री नाही. अशा घटना घडल्याची की सर्वच क्षेत्रातून जलद गती न्यायालयाची मागणी होते. ती मागणी धूळ खात बसते. पुरावे गोळा करण्याकरता करताच कधी पिडित तर कधी आरोपी हे जग सोडून जातो.

 तीन महिन्यांपूर्वी घडलेला हत्याकांड बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील आरोपी फरार आहे. न्यायदान ही प्रक्रिया अतिशय मंद पाऊले टाकते या प्रवासात अनेकदा फाइल्स इकडच्या तिकडे होतात. कधी कधी तर त्या हरवतात असा आपल्या न्यायव्यवस्थेचा अनुभव आपण सर्वांनी अनुभवला आहे. त्या फाइल्स दडविण्यासाठी मध्यंतरी जी राजकीय उलथापालथ झाली ती सर्वज्ञात आहे. त्यामुळे पुणे शहरातील तरुणीवर झालेल्या अतिप्रसंगाला किंवा अत्याचाराला लवकर न्याय मिळेल अशी अपेक्षा करणे किती योग्य राहील याचा केवळ विचारच केलेलाच बरा. तिरंगा चित्रपटात नाना पाटेकर यांच्या तोंडी असलेले संवाद आठवतात ते म्हणतात, ‘यह जाचवाच की फाईले होती है ना यह थुलमुल सरकार बदलतेही गुम हो जाती है. यह दिल्ली बस मुह है इसलिये पटपटर करते रहती है. ये होना चाहिये वो होना चाहिये बस...,' सध्याच्या न्यायव्यवस्थेवर असाच संताप व्यक्त करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सरकारने अशा आरोपींसाठी जलद गती न्यायालय नेमणे गरजेचे आहे. त्याचबरोबर न्यायाधीशांची रिक्त पदे तातडीने भरून काढावीत. त्यामुळे इतर न्यायाधीशांवर असलेला ताण कमी होईल आणि न्यायाची पावले शीघ्रगतीने जलद गतीने पडतील. या घटनेने मनात जी संतापाची लाट आहे ती व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात. आरोपीने पीडित तरुणीला दोन वेळा ताई म्हटलं आहे. आई आणि ताई हे नातं सर्व नात्यांचा बाप आहे. ताई म्हणून त्याने जो पाशवी बलात्कार केला तशी त्याला त्याची ताई आठवायला हवी होती. पण संस्काराच्या पाठशाळा कधी कधी कमी पडतात. म्हणून तर आरोपीवर यापूर्वीही सहा गुन्ह्यांची नोंद आहे. प्राणी आणि मानव  यात मूलभूत फरक निसर्गाने केलेला आहे. प्राणी नाती पाळत नाहीत. कारण त्यांच्यात विचारक्षम आणि संस्कारक्षम असं मन नाही. म्हणून तिथे नात्यांना महत्त्व नाही. परंतु माणूस हा प्राणी हुशार आहे असं म्हटलं जातं आणि तो समूहाने राहतो. म्हणून कुटुंब एक व्यवस्था आहे, त्यातून विकसित झालेली व्यवस्था म्हणजे समाजव्यवस्था. म्हणूनच तो समाज व्यवस्थेचा एक भाग असतो.

आपण ज्या समाजात राहतो त्या समाजात राहताना समाजानं घालून दिलेली प्रमाण आणि मूल्य हे आपण शिरोधार्य मानली पाहिजेत. कारण हे मूल्य ही नीतिमत्ता आपल्याला वागण्याविषयीचा रीतभात शिकवते. असे रीतभात शिकवण्यासाठी प्राण्यांमध्ये कुटुंब किंवा समाज व्यवस्था नसते. बहुतेक प्राणी हे वेगवेगळे राहतात. जन्माला घातलेलं पिल्लू किंवा घरट्यातुन निघालेली पिल्लं नंतर आईकडे कधी येत नाहीत. माणसाचं मात्र तसं नाही. तो नाती जपत राहतो. मित्र मैत्रीण आई वडील बहीण भाऊ या नात्यात तो गुंतून राहतो. तिथे कुटुंब व्यवस्था निर्माण होते आणि या कुटुंब व्यवस्थेतून समाज व्यवस्था निर्माण होते. ही समाजव्यवस्था एक वेटाळ, मोहल्ला, गाव आणि मग राष्ट्र वगैरे संकल्पनांना जन्म देते. या साऱ्या व्यवस्थेत जगताना स्वतःचा एक आदर्श निर्माण करायचा असतो. आदर्श समाजात अशी चुकीची माणसं न्यायालयीन प्रक्रियेने काढून टाकली पाहिजेत. यानंतर कोणत्याही महिलेवर तरुणीवर किंवा चिमुरडीवर असा अन्याय अत्याचार होणार नाही याची समाजव्यवस्थेनं आणि न्यायव्यवस्थेनं कायदा आणि सुव्यवस्थेनं काळजी घेतली पाहिजे. या समाजाचा एक संवेदनशील व्यक्ती म्हणून मी घटनेचा जाहीर निषेध करतो. - राजू बोरकर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

फुलं आणि काटे