आयुष्याच्या उत्तरार्धात असं जगून पाहु या

योग्य वयात म्हणजे ५०/५५ मध्ये जर प्रत्येक जोडप्याने ठरवलं की आपण इथून पुढे मित्र मैत्रीण बनून जगायचं, घरातील सगळी छोटी मोठी काम मिळून करायची, जुन्या कटू आठवणी काढण्यापेक्षा कॉलेजच्या खोडी गमतीजमती शेअर करून एकमेकांना चिडवायचं, एकमेकांसाठी नवीन अनुभव निर्माण करायचे, छोट्या छोट्या इच्छा लिहून काढून त्या पूर्ण करण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करायचा, न आवडणाऱ्या गोष्टींसहित एकमेकांना पूर्णपणे मान्य करून पुढे जायचं तर यातून कितीतरी आनंद मिळवता येईल.

काल असंच नवऱ्याशी गप्पा मारताना एक विषय निघाला. काही दिवसापासून मी  साठीच्या पुढे असणाऱ्या महिलांना नोटीस केलं त्यापैकी काही विधवा आणि काही आपल्या यजमानांसोबत राहणाऱ्या होत्या. यामध्ये प्रकर्षाने एक फरक जाणवला आणि मला मनातून खूप अस्वस्थ वाटलं.

म्हणजे, ज्यांचे नवरे नाहीत त्यातल्या काही महिला वर्षातून जसं जमेल तसं ट्रिपला जातात (मोठ्या खर्चाचीच असं नाही) जे आवडेल ते खातात, फिरतात, स्वतःकडे लक्ष देतात. उलट ज्या बायकांचे यजमान आहेत त्या ६० पार करूनही कोणत्याही परवानगीशिवाय जास्तीत जास्त भाजी आणणे आणि मंदिरात जाणे याशिवाय कुठे जाऊ शकत नाहीत. त्या अजूनही आपला पूर्ण वेळ नातवंडं सांभाळणे, नवऱ्याच्या औषधांच्या आणि खाण्याच्या वेळा सांभाळणे, येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार करणे हेच करतात.

त्यातही समजा, आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर वर्षातून दोन वेळा ट्रिपला गेल्याच तर मग बॅग भरण्याच्या वेळेपर्यंतची पूर्ण तयारी आणि परत ट्रिप वरून आल्यानंतर ती बॅग रिकामी करेपर्यंत सगळी कामेही त्या बायकाच करतात. मग त्या बाईने मोकळेपणाने फिरण्याचा आनंद कधी घ्यायचा?

हा असा प्रश्न मी माझ्या नवऱ्याला विचारला असता ते पटकन म्हणाले मग काय सगळ्या नवऱ्यांनी मरावं का? मला एकदम धडकीच भरली; पण स्वतःला सावरलं आणि मग आमची चर्चा चालू झाली. जे आता पन्नाशीला पोहोचलेत त्यापैकी बऱ्याच जणांचे लग्न हे आई-वडिलांनी लावून दिल म्हणून केलं, मग ते लग्न जबाबदारी म्हणून ते निभावत राहिले. तसंच मुलांना चांगलं शिक्षण देणं, काही वेळेस स्वतःचं मन मारून जबाबदारी म्हणून मुलांच्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करणं, असं करत करत लग्नाची २५/३०वर्षं कशी निघून गेली समजत नाही आणि असंच पुढे मुलं कामासाठी बाहेर जातील मग बायकोला नवऱ्याशिवाय आणि नवऱ्याला बायकोशिवाय कुणीच नसतं हा विचार करून तिथून पुढेही तसंच जबाबदारी आहे म्हणून आयुष्य ढकलत राहायचं का?

मी अशा काही बायकांना बघितलय ज्या वयाच्या ७०/८०पर्यंत पूर्णपणे आजारी नवऱ्याची सेवा करतात आणि हा!  कधी कधी वेळेनुसार नवरेसुद्धा बायकोची सेवा करतात; पण त्यात प्रेम कमी आणि जबाबदारी जास्त दिसते...मग हे सगळं करत असताना सतत चिडचिड आणि धुसफूस चालू असते मग जुन्या गोष्टींवरून छोटे-मोठे वाद पण होत असतात.

मग काय करावं, म्हातारपणी एकमेकांना सोडायचं का? कशासाठी ? त्यापेक्षा योग्य वयात म्हणजे ५०/५५मध्ये जर प्रत्येक जोडप्याने ठरवलं की आपण इथून पुढे मित्र मैत्रीण बनून जगायचं, घरातील सगळी छोटी मोठी काम मिळून करायची, जुन्या कटू आठवणी काढण्यापेक्षा कॉलेजच्या खोडी गमतीजमती शेअर करून एकमेकांना चिडवायचं, एकमेकांसाठी नवीन अनुभव निर्माण करायचे, छोट्या छोट्या इच्छा लिहून काढून त्या पूर्ण करण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करायचा, न आवडणाऱ्या गोष्टींसहित एकमेकांना पूर्णपणे मान्य करून पुढे जायचं, असं नाही का होऊ शकणार?

प्रत्येक व्यक्तीला एकदाच जन्म मिळतो मग तो मिळालेला जन्म जबाबदारीच जोखड म्हणून आयुष्य काढण्यापेक्षा आनंदात नाही का जगायचं..! असं सगळ ऐकल्यानंतर मात्र आमच्या ‘अहों'ना पटलं..तुम्हालाही पटतंय का ? बघा जरा विचार करून.... -समुपदेशीका वैशाली माने 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मृत्युपत्र गरज आणि मार्गदर्शन