मृत्युपत्र गरज आणि मार्गदर्शन

 ‘मृत्युपत्र गरज आणि मार्गदर्शन' हे अरूण गोडबोले यांचे  पुस्तक वाचले. सामान्य माणसाला अत्यंत किचकट वाटणारा हा विषय सोपा करून दाखवल्यामुळे हे पुस्तक वाचकांना आवडले आहे.

 गोडबोले यांच्या मते मृत्युपत्र म्हणजे आपल्या निधनानंतर आपल्या मिळकतीचे वाटप कसे व्हावे, यासंबंधी मृताने व्यक्त केलेली इच्छा. कायदेशीर भाषेत ‘मृत्युपत्र म्हणजे ते करणाऱ्या व्यक्तीने आपल्या मिळकतीची व्यवस्था आपल्या मृत्युनंतर कशी व्हावी यासंबंधीच्या इच्छाची कायदेशीररित्या केलेली उद्‌घोषणा.'

कोणत्याही व्यक्तींचे सर्व वारस यांचे स्वभाव व आर्थिक परिस्थितीसारखी नसते. ज्या वारसांनी मृत व्यक्तीची सेवा केली असेल अथवा त्यांच्यासाठी पैसे खर्च केले असतील अशा वारसांना इतरांच्या तुलनेने जास्त रक्कम मिळण्यासाठी मृत्युपत्रात नोंद असावी लागते. मृत्युपत्र नसेल तर सर्वाना सारखा हिस्सा मिळतो. त्यामुळे ज्यांना जास्त हिस्सा मिळावा असे मृत व्यक्तीला वाटत असते त्यांचा हेतू साध्य होत नाही. मृत्युपत्र केले असेल तर वारसांमध्ये कलह होत नाहीत व कोर्टकचेऱ्या होत नाहीत. आपल्या पश्चात आपल्या पत्नीला कोणाच्याही मेहेरबानीवर अवलंबून राहावे लागु नये व सन्मानाने जगता यावे यासाठी मृत्युपत्रात तशी नोंद करावी लागते. त्यासाठी योग्यवेळी योग्य पध्दतीने मृत्युपत्र करणे आवश्यक आहे.

 मृत्युपत्र कायदेशीर करण्यासाठी अनेक बाबींची पूर्तता केलेली असणे आवश्यक आहे. ते स्टॅम्पपेपरवर करण्याची सक्ती नसली तरी सुरक्षित राहील आणि वारसांना वेळेवर मिळेल याची काळजी घेतली पहिजे. मृत्युपत्राची भाषा सुस्पष्ट असावी. ह्या पुस्तकात मृत्यूपत्र कसे लिहावे याबाबत योग्य मार्गदर्शन केले आहे. ज्यांना मृत्युपत्र करायचे असेल हे पुस्तक जरूर वाचावं.

अरूण गोडबोले उत्तम लेखक आहेत तसेच ते उत्तम वक्ते आहेत.ज्येष्ठ नागरिक संघ व इतर सामाजिक संस्थांना ह्या पुस्तकाचे लेखक अरूण गोडबोले यांना व्याख्यानासाठी निमंत्रण देऊन त्यांचे मार्गदर्शन मिळवता येईल.

मृत्युपत्र गरज आणि मार्गदर्शन
लेखक -  अरूण अ. गोडबोले
पहिली आवृती - मे २००१
पृष्ठ - १७२  मूल्य - १६० रुपये
 -दिलीप प्रभाकर गडकरी 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

व्हिडीओ सेंटरची कथा