मध्यरात्रीचे सूर्य
ज्या स्वप्नाचा गेली दहा वर्षे जीव खाऊन पाठलाग केला, जे स्वप्न पाहताना कधी झोप आलीच नाही, ज्याने गेल्या दहा वर्षात खूप रडवले, थकवले, हरवले अशा नुकत्याच साकार होऊ पाहणाऱ्या त्या स्वप्नाची ही कथा... माऊली आपल्या सर्वांसमोर सादर...कारण हे स्वप्न पाहण्याची शक्ती तुमच्याच मुळे मिळाली आहे.... फक्त तुमच्यामुळे !!!
तर, आयुष्याच्या सुरुवातीला भीक मागणाऱ्या आजोबांनी मदत केली होती; त्यांच्या मदतीमधून उतराई व्हायचे, त्यांच्या उपकाराचे कर्ज डोक्यावर होते त्यातून उतराई व्हायचे, या भावनेतून, भिक्षेकऱ्यांंच्या पुनर्वसनासाठी आंतरराष्ट्रीय संस्थेतील महाराष्ट्र प्रमुख म्हणून असलेली नोकरी २०१५ साली सोडून काम सुरू केले. आमच्या या भीक मागणाऱ्या समाजाला वैद्यकीय सेवा, स्वयंरोजगार आणि पुनर्वसन तसेच भिक मागणाऱ्या मुलांचे शिक्षण असे एका मागोमाग एक अनेक प्रकल्प सुरू झाले. हे सर्व काम भीक मागणारे लोक जिथे असतात, तिथेच म्हणजे रस्त्यावर, उकिरडा किंवा गटाराजवळ, भर गर्दीतल्या फुटपाथवर चालते. दीडशे किलोचे साहित्य मोटर सायकल गाडीवर आणि बॉडीवर वागवताना या दहा वर्षात अनेक छोटे-मोठे ॲक्सीडेंट झाले. वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळी हाडे मोडून घेतली. हरकत नाही, चूल पेटवायची म्हटल्यानंतर लाकडं जाळावीच लागतात..! भिक्षेकऱ्यांच्या घरात चूल पेटावी, म्हणून मी हाडं घातली.. !
तर, याचना करणाऱ्या लोकांनी स्वयंरोजगार करावा, सन्मानाने नागरिक म्हणून जगावे यासाठी त्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या मार्गांनी काम करण्यासाठी प्रवृत्त करायला सुरुवात केली. हळूहळू तुम्ही सर्वजण मला भेटत गेलात... माझा हूरूप वाढला... तुम्हीच माझे आईबाप झालात... ! माझ्या आईबापाने जन्म दिला, तुम्ही कर्म दिले. भिक्षेकऱ्यांनी नोकरी धंदा व्यवसाय करावा म्हणून, यांना काहीतरी शिकवायचे म्हटले तर, कुठेतरी बसवून यांना काहीतरी प्रशिक्षण द्यावे लागेल याची जाणीव झाली. यानंतर भीक मागणाऱ्या लोकांसाठी एखादे प्रशिक्षण आणि रोजगार केंद्र उभे करून तिथे व्यवसायाभिमुख स्किल्स देऊन यांना यांच्या पायावर उभे करावे हा विचार डोक्यात आला, परंतु त्यासाठी एखादी जागा ताब्यात असणं गरजेचं होतं.
मग सरकारी, निमसरकारी, बिगर सरकारी अशा सर्व यंत्रणांना आम्हाला जागा देता का ? जागा... ? म्हणत झोळी घेऊन फिरलो. अनेक माणसं भिंती वाचून, छपरापासून, इतरांच्या माये वाचून, माणूस होण्याचा प्रयत्न करत, रस्त्या रस्त्यात भीक मागत आहेत... यांना माणूस बनवण्याचा प्रयत्न करत आहे... जिथून कोणी उठवणार नाही; अशी भाड्याने का होईना पण जागा देता का ? जागा....? गावकरी होण्यासाठी झटणाऱ्या, या सम्राटांसाठी मी नट झालो.. मी जिथे जायचो त्या सर्व ठिकाणी माझ्या कामाचे कौतुक व्हायचे....परंतु जागा द्यायचा विषय आल्यानंतर, आमच्या जागेत हे गलिच्छ लोक येणार ? किती घाण करतील हे लोक ? असा विचार होऊन आम्हाला कायम नकार मिळत गेले. पुण्यातील अनेक बिल्डिंगमधल्या सोसायटीमधील चेअरमनसाहेबांचे पाय धरून त्यांचा हॉल रीतसर भाड्याने मागितला, पण अत्यंत प्रेमाने, प्रत्येकाने शेजारच्या बिल्डिंगमध्ये विचारा, असा सल्ला दिला. शेजारच्या बिल्डिंग वाल्यांनी, त्यांच्या शेजारच्या बिल्डिंगचा रस्ता दाखवला...आम्ही रस्त्यावरचे, शेवटी रस्त्यावरच राहीलो, यांच्यासाठी प्रशिक्षण आणि रोजगार केंद्र काढण्याचे स्वप्न दरवेळी भंगत गेले!
ज्यांना भीक मागणे सोडायचं आहे, ज्यांना आमच्या केंद्रात काम करायचे आहे, असा वर्ग, दरवेळी मला भेटला; की विचारायचा, सर मिळाली का जागा आपल्याला?' अनेक हितचिंतक विचारायचे, ‘डॉक्टर तुम्हाला जागा मिळत नाही म्हणजे काय ? समाजाचे काम करणाऱ्याला, दानशूर लोक दोन-चार एकर जागा सहज देतात... तुम्हाला चार-पाचशे स्क्वेअर फुटाची जागा मिळेना ? अहो काय हे..' इतके पुरस्कार आणि सत्कार होतात, पण तुम्हाला कोणी जागा का देत नाही ???' या सर्वांच्या प्रश्नामुळे माझ्या जखमेवर आपोआप मीठ पडायचे...डोकंच चालायचं नाही...! खूप वेळा काम झाल्यानंतर, अंगावरचा Apron काढून भिक्षेकऱ्यांमध्येच बसून मी काय करावं, कोणाशी बोलावं, कसा मार्ग काढावा ? याचा डोक्याला हात लावून विचार करत असे...
असा भिक्षेकऱ्यांमध्ये बसलेलो असताना, सहानुभूतीने, भिकारी समजून, माझ्या पुढ्यात भीक म्हणून खूप लोक पैसे टाकायचे...धडधाकट आहे, अंगावर कपडे पण चांगले आहेत; तरी भीक मागतोय बघ कसा नालायक... अशी माझ्या माघारी, माझ्याच विषयी झालेली कुजबुजसुद्धा मी कितीतरी वेळा ऐकली. हे ऐकून, डोळ्याच्या वाटेने अश्रू ओघळायचे... प्रचंड राग यायचा... खूप वेळा वाटायचं, शासनाला किंवा इतर कोणालाच या कामाची गरज वाटत नाही... तर मला तरी ती गरज का वाटावी ? मरू दे.... सोडून देतो उद्यापासून हे सर्व... ! मी पूर्णतः हरून फ्रस्ट्रेट होऊन जायचो... मी उठणार इतक्यात, मामा मामा, म्हणत चार-पाच वर्षाचं मूल मांडीवर येऊन बसतं...‘तु का ललतो मामा, तुला भूक लागली?' महिनाभर आंघोळ न केलेलं, काळकुट्ट एक बाळ माझ्या गालाचा मुका घेत विचारतं.... भीक मागण्यात व्यस्त असलेली त्याची आई मागून बोलते, ‘हा मामाला भूक लागली आसंल, म्हणून मामा रडतो...!'भूक हेच आमच्या लोकांसाठी अंतिम सत्य... ! भुकेच्या पलीकडे काही नाहीच... ! भुकेसाठी लढायचं .... भुकेसाठी मरायचं... ! जन्माला येऊन एवढं एकच करायचं...!!!
या भुकेची शिसारी आली आहे आता मला...!
‘भूक'... मग ती कसलीही असो.... माणसाला वाकायलाच लावते... ! यानंतर ते बाळ त्याच्याकडे एकमेव शिल्लक असलेला वडापाव माझ्या तोंडापुढे धरतो आणि म्हणतो, ‘तू खा मामा, माजं पोट भरलंय...' ज्याच्याकडे खूप काही आहे, त्याने देणं आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्याने देणं... यात खूप फरक आहे. प्रश्न एकच, खरा श्रीमंत कोण ? आत्तापर्यंत सावकाशपणे वाहणारे अश्रू नकळतपणे मग महापूर होतात... भावनेच्या भरात, त्या नागड्या पोराला मी घट्ट मिठी मारतो... तेवढ्यातूनही तो मामा मामा म्हणत मला घास भरवतो...माहित नाही कसा, पण तो बाळकृष्ण होतो आणि मी सुदामा होऊन जातो... !यानंतर मला माझीच लाज वाटायला लागते... ही नागडी पोरं अशीच नागडी जगणार, मोठी होणार, भूक भूक करत नागडी आणि बेवारस म्हणूनच मरणार...स्वतःकडे काही नसताना ज्याने तुला वडापाव खाऊ घातला, त्याला तू आयुष्यभर उपाशी ठेवणार ? ज्यांनी तुला मामा म्हटलं, काका म्हटलं, बाळा, सोन्या म्हणत नातू, मुलगा मानलं, ज्यांनी तुझ्याकडे आशेने डोळे लावले... त्यांना असंच रस्त्यावर बेवारस मरायला सोडून देणार ? ‘सोडून देतो सर्व म्हणताना, लाज वाटत नाही का रे तुला ?' मीच हा माझा मलाच प्रश्न विचारायचो... डोक्यात प्रचंड गदारोळ उठायचा...पण या आणि अशा प्रकारच्या अनेक प्रसंगांनी मला फ्रस्ट्रेशन मधून बाहेर काढलं, लढण्याचं सामर्थ्य दिलं. यानंतर हात वर करून शरणागती पत्करलेला मी, पुन्हा पुन्हा सज्ज व्हायचो...! हे असं.... एक नाही, दोन नाही, पाच नाही, तर तब्बल दहा वर्षे म्हणजे आजपर्यंत सुरूच आहे. दहा वर्षे मी या गोष्टीची दाहकता भोगतो आहे...
मधल्या काळात तुम्हा सर्वांसारखाच...एक मोठ्या मनाचा... मनाची गडगंज श्रीमंती असणारा भला माणूस निसर्गाने माझ्या झोळीत टाकला. त्यांचे नाव दानिशभाई शहा !! हातात पुरस्कार आणि कपाळावर नकार अशा माझ्यासारख्याच्या पाठीवर त्यांनी हात ठेवला. बिबवेवाडी परिसरात त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याच्या सोयीकरता त्यांची मालकी हक्काची बिल्डिंग आहे. त्यापुढील साधारण दोन हजार स्क्वेअर फुट जागा पार्किंग साठी त्यांनी शिल्लक ठेवली होती. ही मोकळी जागा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी त्यांनी मोफत वापरण्यास आपल्याला देऊ केली आहे. त्यांनी पाठीवर ठेवलेल्या हातामुळे माझी दहा वर्षाची घुसमट एका क्षणात थांबली. काही माणसं असे दैवी हात घेऊन जन्माला येतात आणि एखाद्याच्या आयुष्याचं भलं करून जातात... वर आपण काहीच केलं नाही या अविर्भावात नामानिराळे होतात... ! मला या माणसाचा हेवा वाटतो...!!! ते फक्त जागा देऊन थांबले नाहीत, स्वतःच्या घरचं कार्य आहे असं समजून चारही बाजूंनी पत्र्याचे शेड आणि डोक्यावर छप्पर करून दिले... दरवेळी मला ते या जागेवर बोलावून विचारायचे डॉक्टरसाहेब आणखी काय करूया ? दरवेळी मी घुम्यागत त्यांच्या पायांकडे पाहत राहायचो... काही मागायला माझी जीभ उचलायची नाही...
मी बोलत नाही असे पाहून... ते इकडे तिकडे, जागेकडे पाहत, मागे हात बांधून फिरत राहायचे... फिरता फिरता स्वतःशीच बोलत राहायचे, ‘उन्हाळ्यात उकडणार... मोठे पंखे लागतील... थंडीच्या दिवसात लवकर रात्र होते, लवकर अंधार होईल.... चांगल्या लाईट इथे लागतील...' प्रत्येक वाक्यानंतर लाईट आणि पंख्यांची ऑर्डर दिली जायची. पुढच्या वेळी असंच हात मागे बांधून फिरता फिरता मला विचारायचे, ‘डॉक्टर साहेब तुम्ही काहीतरी बोला ना, तुम्ही काहीच बोलत नाही... '
त्यांच्या इतक्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला मी....भिजलेल्या मांजरागत भेदरून जायचो...मी काय बोलणार ? पुन्हा स्वगत म्हणायचे, आपल्याकडे आपल्या जागेत आता रोज पाहुणे येणार, त्यांचे सामान ते कुठे ठेवणार? डाव्या तळहातावर उजव्या हाताच्या बोटांनी ताल धरत, गाणं म्हणाल्यागत ते बोलत राहायचे...काय करूया...? अजुन काय करूया..? काय काय करूया? म्हणत पुन्हा ते कोणालातरी फोन लावायचे, यापुढे लोखंडी कपाट आणि लॉकरची ऑर्डर, सीसीटीव्हीची ऑर्डर, रेडीमेड टॉयलेटची ऑर्डर जायची...त्यांनी तळहातावर धरलेला तो ताल होता; की माझ्या हृदयाची धडधड... हे मात्र मला कधी समजलं नाही...! माझ्या या लोकांना, इतर लोक भिकारी म्हणतात, मी त्यापुढे जाऊन त्यांना भिक्षेकरी किंवा याचक म्हणतो... हा देव माणूस याही पुढे जाऊन माझ्या लोकांना ‘पाहुण'े म्हणतो... !भीक मागणाऱ्या समाजात मी उठतो बसतो, त्यांच्याबरोबर माझं नातं तयार झालंय म्हणून मला त्यांच्याविषयी जिव्हाळा आणि प्रेम वाटणे स्वाभाविक आहे पण दानिशभाईंचं काय ? त्यांना या लोकांबद्दल का जिव्हाळा वाटत असावा ? मी यावर खूप विचार करत असे.
पाऊस पडून गेल्यानंतर मागे एक आल्हाददायक वातावरण तयार होते... मातीतून एक सुगंध यायला लागतो...पाऊस पडून गेला तरी मागे त्या पावसाच्या पाऊलखुणा उरतात...! दया, क्षमा, शांती, सहानुभूती, करुणा, माया, प्रेम या सर्वांचं मिश्रण असणारे अनेक महापुरुष आपल्याकडे होऊन गेले... या महापुरुषांनी आपले अवतार संपवताना आपल्या पाऊलखुणा मागे ठेवल्या.... यातलीच एक पाऊलखुण म्हणजे दानिश भाई शहा असावेत ! पाऊस पडून गेल्यानंतरचा सुखद गारवा आणि मातीचा मंद सुवास म्हणजे दानिश भाई...
आता जागा मिळण्यासारखी अशक्यप्राय गोष्ट दानिशभाई मुळे शक्य झाली. दहा वर्षांची माझी फरपट थांबल्यानंतर, आता मला काय वाटत असेल, हे मी कोणत्या शब्दात, कसं सांगू ? आपण भविष्यात जेव्हा कधी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण आणि रोजगार केंद्र सुरू करू त्यावेळी तेथील प्रकल्प कसे असावेत याचा विचार खूप वर्षांपूर्वीच मी आणि मनीषाने करून ठेवला होता. आपण जे काही प्रशिक्षण आणि रोजगार देणार आहोत त्यामुळे आपल्याकडे कामासाठी येणाऱ्या लोकांच्या शरीराला कोणत्याही प्रकारे इजा होता कामा नये, आपण जे काही करू त्यामुळे प्रदूषण तर वाढणार नाहीच; परंतु अस्तित्वात असलेले प्रदूषण कमी होईल, कमीत कमी भांडवलात जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल अशा व्यवसायाची प्रशिक्षण द्यायचे, जेणेकरून गरीबातला गरीब व्यक्तीसुद्धा या व्यवसायाच्या आधारावर जगू शकतो.... असे आणि आणखीही बरेच काही निकष आम्ही ठरवले होते. त्या आधारावर खालील चार प्रकल्प या जागेत सुरू करायचे ठरवले आहे.
१. रस्त्यावर पडलेल्या फुलांची पावडर (चुर्ण)
वैद्यकीय त्यातूनही आयुर्वेदिक क्षेत्रात असल्यामुळे समजले, डोक्याला लावण्यासाठी आयुर्वेदिक तेल, विविध आजारांवर उपयुक्त असे मसाजसाठी तेल, अनेक मलम, त्वचेची निगा राखणारे क्रीम यासाठी अनेक कंपन्यांना खरोखरच्या फुलांची पावडर हवी असते. (हल्ली ऑरगॅनिक /नैसर्गिकचा बोलबाला असल्यामुळे कंपन्यांचा भर कृत्रिम रंग आणि वास (Essence) न वापरण्याकडे आहे )हे आमच्या पथ्यावर पडले...! अशी फुले आम्ही गोळा करून त्यांची पावडर करून या कंपन्यांना विकणार आहोत. अनेक फुलं देवाच्या दारात, मंदिराबाहेर पडलेली असतात, त्याला ‘निर्माल्य' म्हटले जाते.... अनेक फुलांच्या पाकळ्या, फुलविक्रीच्या दुकानाबाहेर किंवा रस्त्यावर अनेकदा उकिरड्यावर पडलेल्या असतात, त्याला ‘कचरा' म्हटले जाते...
आपण कोणाच्या संगतीत आहोत त्यावरून आपली प्रतिष्ठा ठरते हेच खरं ...!!!
आपण ‘निर्माल्य' की कचरा'? हे आपण कुणाच्या सहवासात आहोत त्यावर ठरते. असो.
आमचे भीक मागणारे लोक (तरुण मुलं) फिरून हे निर्माल्य आणि कचरा उचलतील, किलोच्या भावाने आपण तो विकत घेऊन त्यांना पैसे देऊ. ज्यांना आपण बैठे काम करण्यासाठी निवडले आहे, असे आपले वृद्ध लोक फुलांची रंग आणि जातीनुसार (जात म्हणजे गुलाब, झेंडू, निशिगंधा, जास्वंद वगैरे वगैरे ) वर्गवारी करतील. यानंतर या फुलांचे शुद्धीकरण करून त्यांना विशिष्ट तापमानात सुकवले जाईल. या प्रक्रियेत सर्व अशुद्धी (Impurities) इथे नष्ट होतील. यानंतर वर्गवारीनुसार फुलांची पावडर (चूर्ण) केले जाईल. स्वच्छतेचे सर्व निकष पाळून (Extremely hygienic conditions) याचे पॅकिंग केले जाईल, त्यावर स्टिकर लावले जाईल. यातील बऱ्याचशा बाबी मशीनवर होणार आहेत, या मशीन अत्यंत सुरक्षित आणि एका क्लिकवर चालणाऱ्या आहेत... जवळपास पाच लाखांच्या या मशिन्स आपल्याला सेंचुरी एन्का ही कंपनी देणार आहे. माझे ज्येष्ठ स्नेही डॉ निलेश लिमये सर यांचा या मशीन घेऊन देण्यात सिंहाचा वाटा आहे.
तर, आयुर्वेदिक प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपन्यांना प्रोफेशनली आपण हे प्रॉडक्ट विकणार आहोत, मिळालेला सर्व पैसा हा आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांना रोजगार म्हणून देणार आहोत.आपल्या या प्रकल्पात स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधले जात आहेत...रस्त्यावरचा कचरा आणि निर्माल्य उचलले जाईल...(जे नदीत जाते आणि नद्या प्रदूषित होतात) कचरा आणि निर्माल्यामधून तयार होणारी लक्ष्मी...कितीतरी भुकेल्यांची भूक भागवून अन्नपूर्णा होईल...भीक मागणाऱ्या लोकांना स्वयंपूर्ण बनवून सन्मानाने जगण्याचा आशीर्वाद देईल !
२. शोभेचा बुके
तुळशी बागेत खोटे, परंतु अत्यंत आकर्षक मोती मिळतात, सोन्यासारख्या दिसणाऱ्या तारा मिळतात. माझी आई या सर्व बाबींचा उपयोग करून अत्यंत सुंदर असा एक बुके तयार करते. फुलांचा बुके कितीही महाग असला आणि छान असला तरी तो चार दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही. माझी आई, जो बुके बनवते, त्याला फार खर्च येत नाही, दिसतो इतका सुंदर, की कुणीही प्रेमात पडावं...! आणि याचे सौंदर्य किमान पाच वर्षे टिकते. माझ्या आयुष्यातली प्रथम शिक्षिका, प्रथम प्रशिक्षिका माझी आई... लहानपणी डोळे उघडले तेव्हा तीच दिसली होती..तेव्हा मी तीच्या छायेखाली होतो..आज थोडा वयाने मोठा झाल्यानंतरसुद्धा पुन्हा एकदा तीच दिसली...आता तीच्या छायेखाली माझ्यासारखे अनेक अभिजीत घालत आहे. या प्रकल्पात तिला आम्ही प्रशिक्षिका म्हणून येण्याची विनंती केली आहे...
आईच ती...नाही म्हणेल कशी? आईच्या मार्गदर्शनानुसार, आमच्या लोकांनी तयार केलेले बुके आम्ही सर्व लोकांना विकत घेण्याची विनंती करू. रोटरी क्लब, लायन्स क्लब तथा अन्य संस्थांना कार्यक्रमावेळी फुलांचे बुके वापरण्याऐवजी आमचे बुके विकत घेण्याची विनंती करू. यातून जो निधी मिळेल, तो आपल्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस दिला जाईल.
२. लिक्विड वॉश
कपडे आणि भांडी सोडून सर्व डाग (फरशी, किचन कट्टा, गाड्या, टॉयलेट, खिडकीच्या काचा, टीव्ही अथवा इतर वस्तूंच्या ग्लासेस, आणखीही बरेच काही) साफ करणारे लिक्विड वॉश आपले लोक या ठिकाणी तयार करणार आहेत. यासाठी लागणारे सर्व तंत्रज्ञान आणि फॉर्म्युला मेहता सोप कंपनी यांनी आपल्याला विनामूल्य देऊ केले आहे. (ज्येष्ठ मेहता सर हे दानिश भाईंचे अत्यंत घनिष्ठ मित्र आहेत, या जन्मात तरी दोघांचे ऋण मला फेडणे शक्य नाही) हे लिक्विड वॉश आपण, समाजामध्ये लोकांनी विकत घ्यावे यासाठी विनंती करणार आहोत, त्याचप्रमाणे आयटी कंपन्या, मॉल्स अशा मोठ्या संस्थांच्या हाउस कीपिंग डिपार्टमेंटला भेटून आपले लिक्विड वॉश विकत घेण्यासाठी त्यांना विनंती करणार आहोत. यातून मिळणारा निधी, आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांना आपण देणार आहोत.
3 . लिक्विड वॉश
कपडे आणि भांडी सोडून सर्व डाग (फरशी, किचन कट्टा, गाड्या, टॉयलेट, खिडकीच्या काचा, टीव्ही अथवा इतर वस्तूंच्या ग्लासेस, आणखीही बरेच काही) साफ करणारे लिक्विड वॉश आपले लोक या ठिकाणी तयार करणार आहेत. यासाठी लागणारे सर्व तंत्रज्ञान आणि फॉर्म्युला मेहता सोप कंपनी यांनी आपल्याला विनामूल्य देऊ केले आहे. (ज्येष्ठ मेहता सर हे दानिश भाईंचे अत्यंत घनिष्ठ मित्र आहेत, या जन्मात तरी दोघांचे ऋण मला फेडणे शक्य नाही) हे लिक्विड वॉश आपण, समाजामध्ये लोकांनी विकत घ्यावे यासाठी विनंती करणार आहोत, त्याचप्रमाणे आयटी कंपन्या, मॉल्स अशा मोठ्या संस्थांच्या हाउस कीपिंग डिपार्टमेंटला भेटून आपले लिक्विड वॉश विकत घेण्यासाठी त्यांना विनंती करणार आहोत. यातून मिळणारा निधी, आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांना आपण देणार आहोत. Big Bucks या कंपनीचे मालक श्री विपुल भाई शहा यांनीसुद्धा मदतीचा हात पुढे केला आहे.
४. फेकलेल्या कपड्यांपासून कापडी पिशव्या तयार करणे...प्लास्टिक पिशव्या न वापरण्यासाठी समाजाला विनंती करणे. ज्यांना शिवणकला येते अशा वृद्धांना आपण या ठिकाणी बसवून त्यांच्याकडून कापडी पिशव्या शिवून घेणार आहोत. अंध आणि अपंग लोकांना या पिशव्या विकायला लावणार आहोत. समाजामध्ये प्लास्टिक पिशव्या न वापरण्याविषयी अपील करणार आहोत. पिशव्यांची विक्री करून, मिळणार आहे तो निधी, पिशव्या शिवणाऱ्या, पिशव्या विकणाऱ्या आणि समाजात प्रबोधन करणाऱ्या लोकांना आपण देणार आहोत.तर असे या प्रकल्पाचे प्राथमिक स्वरूप आहे... ! हा प्रकल्प म्हणजेच आपल्याकडे एक नवीन बाळ येणार आहे... ! बाळाचं नाव काय ठेवायचं ? बारसं कधी करायचं ? अशी आमच्याकडे लगबग सुरू आहे...
भिक्षेकंऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र /रोजगार केंद्र सुरू करण्यासाठी जागा हवी... हे दहा वर्षे उरात जपलेलं स्वप्न पाठलाग करून सुद्धा प्राप्त झाले नाही, मी आशा सोडली होती...जेव्हा कधी या प्रकल्पाचा विचार करायचो, तेव्हा कायम समोर काळाकुट्ट अंधार दिसायचा... अमावस्येच्या काळ्याकुट्ट रात्री सारखा ! परंतु अनेक अनाकलनीय घटना माझ्यासुद्धा नकळतपणे घडत गेल्या, आणि हे राखेत निपचित पडलेलं... विझत चाललेलं स्वप्न, नव्या जोमानं मशाल होत पुन्हा पेटून उठलं... या मशालीच्या प्रकाशाने माझे डोळे दिपून गेले... डोळ्यासमोरच्या काळ्याकुट्ट अंधारात दूरवर दिसणारा अत्यंत प्रखर आणि तेजस्वी असा हा प्रकाश म्हणजे माझ्या आयुष्याच्या मध्यरात्री उगवलेला जणू सूर्य वाटला !
ज्या भीक मागणाऱ्या समाजासाठी आपण काम करतो, त्यांच्याही आयुष्यात असाच काळाकुट्ट अंधार आहे; या प्रकल्पाच्या निमित्ताने त्यांच्या सुद्धा घरात आता दिवा लागेल...सन्मानाने ! दुसऱ्याचा प्रकाश उधार घेऊन जे जगतात त्यांना ग्रह म्हणतात.... ज्यांना स्वतःचा प्रकाश असतो, ते तारे म्हणून मिरवतात...आजपर्यंत माझ्या आणि मनीषाच्या आधाराने जगलेले जे ग्रह आहेत, ते या प्रकल्पाच्या निमित्ताने तारे होतील.... आयुष्याच्या या टप्प्यावर, काळ्याकुट्ट मध्यरात्री, आता ते स्वतःच सूर्य म्हणून उगवतील... ते स्वयंप्रकाशित होतील... स्वयंपूर्ण होतील... तेजस्वी तारा होतील सूर्यासारखा!ठरलं... आता ठरलं....
आपल्या या नवीन बाळाचं नाव ‘मध्यरात्रीचे सूर्य'...!!! हेच ठेवायचं ठरलं..तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने शुभेच्छांमुळे इथवर तरी आलो....आता सगळ्यात मोठे आव्हान आणि माझी परीक्षा इथून पुढे सुरू होईल...सुरुवातीच्या टप्प्यात आपण साधारणपणे २५ लोकांना या प्रकल्पात सहभागी करून घेणार आहोत. आमच्या या लोकांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून ...
१. प्रत्येक व्यक्तीस रुपये १५० प्रतिदिन
२. सकाळचा चहा नाष्टा आणि दुपारचे जेवण.
३. याचसोबत कुटुंबाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा/किराणा
अंदाजे रुपये ३०० दर दिवशी एका व्यक्तीसाठी खर्च आहे...
२५ लोकांसाठी रुपये ७५०० प्रति दिवस...
सुट्ट्या वगळता २५ दिवस जरी काम झाले तरी महिन्याचा खर्च रुपये १,८७,००० (एक लाख सत्याऐंशी हजार)... यात कच्चा माल, फिरतीसाठी वाहन, पेट्रोल, मेंटेनन्स म्हणजे लाईट बिल वगैरे वगैरे खर्च समाविष्ट नाहीत. आमच्याकडे काम करणाऱ्या सर्वांना रोजच्या रोज पगार देणे मला भाग आहे...रोजच्या रोज चूल पेटवायची असेल तर रोज त्यात लाकडंसुद्धा घालावी लागतील...! असो...हा प्रकल्प नेमका काय आहे, कुठून कुठवर आलो, यामागे नेमकं उद्दिष्ट काय आहे, फलित काय मिळेल, आव्हानं काय आहेत याची सर्वांगीण कल्पना यावी, यासाठी आपल्यासमोर, वरीलप्रमाणे सर्व काही व्यक्त केलं आहे.
चैत्र शु. १ गुढीपाडवा, अर्थात ३० मार्च २०२५ या शुभ दिनापासून प्रकल्प सुरू करण्याची ‘मनीषा' आहे...! पुढे जे जसे घडेल तसे नक्की कळवत राहीन...प्रश्न खूप आहेत, पण तुम्हा सर्वांच्या साथीनं उत्तरं सुद्धा मिळतील, असा विश्वास आहे... इथवर ज्याने आणून सोडलंय, तो पुढे न्यायला नाही कसा म्हणेल...हि श्रद्धा आहे...आपण दिलेल्या आशीर्वाद आणि शुभेच्छांवर, मनापासून निष्ठा आहे...मला काही नको... फक्त सोबत रहावे, मी चालत राहीन, प्रयत्न करत राहीन, वाटेत मात्र कधी मोडला माझा कणा, तर फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा...!!!
१ मार्च २०२५
आपले स्नेहांकित,
-डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे डॉक्टर फॉर बेगर्स