औरंगजेबाच्या नावाने असलेल्या शहरांची आणि गावांची नावे बदलावीत !

इतिहासकार आणि जाणकार यांच्या मते क्रूरकर्मा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे जे हाल केले त्यातील केवळ ५ टक्केच  छावा चित्रपटात दाखवण्यात आले आहेत यावरून त्याचे कौर्य लक्षात येते. शहरे, गावे, वसाहती आणि मार्गांना या क्रूरकर्माची नावे आजही शाबूत असणे म्हणजे त्याचे उदात्तीकरणच असून ती त्वरित बदलली पाहिजेत.

 मोगल बादशहा औरंगजेब हा अत्यंत धार्मिक, परोपकारी राजा होता. तो स्वतःच्या हाताने टोप्या बनवी आणि त्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशातूनच स्वतःचा चरितार्थ चालवी असे काहीसे चित्र आजपर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमातील इतिहासाच्या पुस्तकांतून आपल्या मनावर बिंबवले गेले. त्यामुळे आजही अनेकांना औरंगजेबाविषयी कमालीची आस्था आहे. औरंगजेबाला मानणारे आणि पुजणारे आजही समाजात मोठ्या संख्येने आहेत. अफझलखानानंतर औरंगजेबाच्या कबरीचे वाढत चाललेले प्रस्थ हेच दर्शवत आहे. आजही त्याठिकाणी हिंदू राजकीय नेत्यांची आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल पाहायला मिळते. औरंगजेबाच्या तुकडयांवर जगणाऱ्या काही भारतीय इतिहासकारांनी त्याकाळी त्याची महत्ती सांगणारी खोटी वर्णने इतिहास म्हणून मांडली आणि तेच सत्य समजून आपण आजतागायत ते गिरवत आलो आहोत. ज्याचा परिणाम म्हणून आज देशभरात त्याच्या नावावर किमान १७७ शहरे आणि गावे आहेत. देशभरात ६३ शहरे किंवा गावे यांना ‘औरंगाबाद' असे नाव आहे. यांतील ४८ शहरे किंवा गावे उत्तरप्रदेशात आहेत.

औरंगाबाद व्यतिरिक्त औरंगपुरा नावाची ३५, औरंगनगर नावाची ३ आणि औरंगजेबपूर नावाची १३ तर औरंगपोर नावाची ७ आणि औरंगबार नावाचे एक शहर किंवा गाव आहे. यात ‘औरंगाबाद खालसा', ‘औरंगाबाद दालचंद' आदी प्रकारची नावेही आहेत. छावा चित्रपटाच्या माध्यमातून क्रूरकर्मा औरंगजेबाचा खरा चेहरा जगासमोर आला आहे. त्याची धर्मांधता आणि क्रूरता या चित्रपटाच्या माध्यमातून कोट्यवधी जनतेने पाहिली त्यामुळे त्याच्याविरोधात देशभरात जनक्षोभ उसळला आहे. स्वराज्याचे धाकले धनी स्वराज्यरक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांची ज्या पद्धतीने हाल हाल करून हत्या करण्यात आली ते पाहता आजही या क्रूरकर्माचा अशाप्रकारे गौरव होत असेल तर ते भारतासाठी लज्जास्पद आहे. इतिहासकार आणि जाणकार यांच्या मते क्रूरकर्मा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे जे हाल केले त्यातील केवळ ५ टक्केच  छावा चित्रपटात दाखवण्यात आले आहेत यावरून त्याचे कौर्य लक्षात येते. शहरे, गावे, वसाहती आणि मार्गांना या क्रूरकर्माची नावे आजही शाबूत असणे म्हणजे त्याचे उदात्तीकरणच असून ती त्वरित बदलली पाहिजेत. महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराचे नाव बदलून महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आता केंद्र सरकारने ही उर्वारित नावे बदलण्यासाठी पुढाकार घेऊन औरंगजेबाचे उदात्तीकरण थांबवावे !  

  एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात रशियाने जेव्हा पोलंड जिंकला तेव्हा त्यांनी पोलंडवरील विजयाचे स्मारक म्हणून वॉर्सा शहराच्या मधोमध एक रशियन ऑर्थाडॉक्स चर्च उभे केले. पहिल्या महायुध्दानंतर जेव्हा पोलंड स्वतंत्र झाला तेव्हा पहिले काम कुठले केले असेल, तर रशियाने बांधलेले ते चर्च पाडले आणि रशियन वर्चस्वाचे चिन्ह नष्ट केले. कारण पोलंडवासीयांना ते चर्च आपल्या अपमानाची सतत आठवण करुन देत होते. याउलट भारताला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त होऊन ७७ वर्षांहून अधिक काळ लोटला तरी देशातील अनेक जिल्ह्यांना, शहरांना, तालुक्यांना आणि गावांना दिलेली जुलमी आक्रमकांची आणि त्यांच्या वारसांची नावे पालटली गेलेली नाहीत. असे म्हटले जाते की हजारो वर्षांपूर्वी भारतात सोन्याचा धूर निघत असे. भारताला ‘सुवर्णनगरी' असेही म्हटले जात असे. भारतावर चालून आलेल्या यवनी आक्रमकांनी आणि त्यानंतर आलेल्या ब्रिटिशांनी भारताचे सारे वैभव लुटले. येथील इतिहासाच्या खुणा पुसल्या. पुरातन मंदिरांची आणि कलाकृतींची नासधूस केली. तलवारीच्या बळावर भारतीयांवर अत्याचार केले, अनेकांचे धर्मांतर केले. येथील शहरांची आणि गावांची नावे पालटली. देश स्वतंत्र होऊन आज ७७ वर्षे उलटली तरी या आक्रमकांच्या स्मृतींना आपण अद्याप जपून ठेवले आहे. पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त झालेला कोणताही देश सर्वप्रथम त्याच्यावरील आक्रमकांच्या खुणा पुसून टाकतो; मात्र भारतीय राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे आपण आजही त्या स्मृती उगाळत बसलो आहोत. आजही हिंदुस्थानातील ७०० हुन अधिक गावांना बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब यांची नावे आहेत. प्राचीन भारतातील हिंदूंच्या सहिष्णुतेमुळे आक्रमणकर्त्यांनी येथे आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, तलवारीच्या बळावर धर्मांतरे घडवून आणली, देशाचे सारे वैभव लुटले; मात्र याच भारतातील पराक्रमी राजे महाराजांनी आपल्या शौर्याने या आक्रमकांच्या कबरी इथेच खणल्या. त्यानंतर आलेल्या इंग्रजांनाही क्रांतिकारकांनी जेरीस आणून देश सोडण्यास भाग पाडले. भारतभूमी ही जशी संतांची आणि समाजसुधारकांची भूमी आहे तशी ती अधर्माच्या नाशासाठी पृथ्वीतलावर जन्म घ्ोणाऱ्या अवतारांची, जनतेच्या कल्याणासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावून लढणाऱ्या वीरपुरुषांची आणि भारतमातेला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी बलीवेदीवर हसतमुखाने चढणाऱ्या क्रांतिकारकांचीही आहे. ज्या भूमीला अशा उत्तुंग पराक्रमाचा दैदिप्यमान इतिहास लाभला आहे, तिने जुलमी आक्रमकांचा आणि त्यांच्या पिढीच्या नावाचा वारसा का म्हणून चालवावा ? - जगन घाणेकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

घरचं ...बाहेरचं...