पुनर्विवाह

"माझ्या मोठ्या मुलाच्या ‘आदित्य'च्या लग्नाला जरूर जरूर या गं साऱ्याजणी.”  वैष्णवीच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका आणि त्याचबरोबर तिने सर्व मैत्रिणींना आग्रहाचे निमंत्रण पाठवलं होतं. वैष्णवी माझी जीवश्च कंठश्च मैत्रीण. खूप गोड गळा.

आवाजाची देणगी होती तिला. वय ३२ वर्ष. तसं पाहिलं तर नाकीडोळी नीटंस. स्वभावाने अतिशय गोड, सालस सगळं चांगलं होतं. फक्त एकच गोष्ट तिच्या सर्व गुणांवर भारी पडत होती. तिच्याजवळ शुद्ध अंतःकरण होतं; पण रंग मात्र सावळा नाही, अगदी काळाच होता. आजारी आईची सुश्रुषा करत होती. भाऊ लहान होता त्याचं शिक्षण पूर्ण झालं होतं. अजून नोकरी लागली नव्हती. आईला मिळणाऱ्या फॅमिली पेन्शन मध्ये घर चालत नव्हतं म्हणून घरबसल्या नोकरी करणाऱ्या बायकांची लहान मुलं सांभाळायची म्हणून बेबी सिटिंग सुरू केलं होतं. शिवाय दोनतीन  मुली गाणे शिकायला ही तिच्याकडे येत होत्या. वैष्णवी हुशार होती. कामसु होती.

तिने तिच्या लग्नाचा विचारंच सोडून दिला होता. जे आहे त्यात ती अगदी सुखी होती. अधूनमधून नातेवाईकांपैकी कोणी तिच्यासाठी स्थळ घेऊन यायचे. मुलगा अगदी साधारण, कमी शिकलेला, अत्यंत कमी पगार असलेला, अशीच स्थळं सांगून येत होती. तर अशा स्थळांनीसुद्धा मुलगी खूप काळी म्हणून तिला नकार दिला होता.

सुरुवातीला तिला  खूप वाईट वाटायचं. पण आपल्या हातात काहीच नाहीना. एक दिवस तिचे मामा तिच्यासाठी एक स्थळ घेऊन आले. मुलगा महेश दिसायला सुंदर, चांगला पगार, घरदार पण बिजवर आहे .चाचरतंच त्यांनी सांगितलं. "नुकतेच त्याची म्हणजे महेशची बायको आजारपणात गेली. आणि त्याला दोन मुलं ही आहेत. त्यांची मुलीबद्दल काहींही अट नाही. पैशाचाही प्रश्न नाही आणि लग्न अगदी साधं करून द्यायचं. आईने तर ते ऐकताच नकार दिला आणि भाऊतर मामांवर चिडलाच. "मामा, म्हणजे त्यांना त्यांच्या मुलाना सांभाळण्यासाठी एक आया पाहिजे आहे. मला हे अजिबात पसंत नाही.”  पण मामा मोठे होते त्यांनी काहीतरी विचार करूनच स्थळ आणलं होतं. त्यांनी वैष्णवीला विचारलं. वैष्णवी काहीच बोलली नाही. मामा म्हणाले,  "वैष्णवी उद्या दुपारी चार वाजता मुलाकडचे येतील. तू तयार रहा.”

वैष्णवीनंं तर लग्नच करायचं नाही असं ठरवलं होतं. पण मामांचा मान राखायचा म्हणून तिने मानेनच हो म्हटलं.  रात्री झोप येत नव्हती. खरंच काळ्या रंगाचं विषच पिऊन ती जन्माला आली होती. त्याच्या वेदना तिला सहन करणं भाग होतं  उद्या ती प्रदर्शनातली एक वस्तू म्हणून पुन्हा त्यांच्या समोर बसणार होती आणि मुलगी काळी म्हणून त्यांनी नकार दिल्यावर उशीत तोंड खूपसून रडणार होती. खरंच काळा रंग ! कृष्णही काळाच नव्हता कां? पण काळ्या कृष्णाशी सोळा हजार एकशे आठ स्त्रियांची लग्नं लागली होती. पण आतापर्यंत पाहिलेल्या इतक्या स्थळांपैकी एकही तिच्याशी लग्नाला तयार होऊ नये? तिला वीट आला होता.

"हे देवा हा काळा रंग जगातून नष्ट करून टाक. आणि राहू दे जगाच्या नजरेला  आवडणारं फक्त पांढरं, स्वच्छ  शुभ्र रूप.” पण वैताग आणणारा हा विचार क्षणिक होता. त्या विचारात तिचं तिलाच हंसू आलं."वेडी कुठली."

जगातून काळोख नाहीसा झाला तर सूर्यानी दिमाख दाखवायचा कुणाला?  विचार करता करता वैष्णवीला झोप लागली. दुसऱ्या दिवशी मामां बरोबर तो मुलगा, महेश एकटाच मुलगी पाहायला आला. नवरा मुलगा खरंच सुंदर होता. बाकी सर्व चांगलं असताना त्याला सुंदर बायको मिळू शकते. तो मला कशाला हो म्हणेल ? असा विचार करत असताना महेश वैष्णवीला वेगळं बोलावून तिच्याशी स्पष्ट बोलला "हे बघ वैष्णवी, मला हे लग्न पसंत आहे; पण मी एक साधा, सच्चा बोलणारा माणूस आहे. मला कुणाला फसवायचं नाहीये. म्हणून तुला स्पष्टच सांगतो. मला दोन मुलं आहेत हे तुला माहीत असेलच. पण मी दोन मुलांनंतर पुन्हा मूल न होण्याचं ऑपरेशन करून घेतलं आहे. फक्त तुला माहिती असावी म्हणून सांगतो. तूही नीट विचार कर आणि मगच उत्तर दे.”

महेशने तर तिथेच मला मुलगी पसंत आहे सांगितलं होतं. पण वैष्णवीला ही विचार करून निर्णय घे. असं सांगून मामा आणि महेश निघून गेले. आता वैष्णवीला निर्णय घ्यायचा होता. वैष्णवी खूप साधी आणि प्रेमळ होती. नोकरी करणाऱ्या बायकांच्या मुलांनाही आईच्या मायेने सांभाळत होती. तिने विचार केला..आज मी दुसऱ्यांची मुलं इतक्या प्रेमाने आपलेपणाने सांभाळीत आहे. मग लग्न झाल्यावर महेशची मुलं  तर माझी हक्काची मुलं असतील. काय वाईट आहे ? आणि पुनर्विवाह त्याचा आहे. पण माझ्यासाठी तर प्रथम विवाहच आहे ना ? तो जर माझ्यासारख्या काळ्या पाषाणाचं त्याच्या परीस स्पर्शाने सोनं करतो आहे; तर मलाही त्याच्या अपूर्ण संसाराला पूर्णत्व देण्यास काय हरकत आहे ?वैष्णवीने महेशला होकार कळवला आणि वैष्णवी आणि महेश च लग्न झालं आणि मुलांनाही तिनं आईच्या मायेने इतका लळा लावला की मुलांसाठी त्यांची आई म्हणजे सर्वस्व झाली. दोन मुलें असलेल्या पुनर्विवाहाच्या पतीचा संसार आनंदाने सुखाचा केला. फुलवला. -मनीषा लिमये 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मध्यरात्रीचे सूर्य