सहेला रे..
डॉ. अंकिता डॉ. सलीलच्या गाडीतून त्याच्या गावी चालली होती. रोजच्या हॉस्पिटलमधील धावपळ, ऑपरेशन्स, पेशन्ट तपासणी यातून थोडी मोकळीक. सलीलची आजी हृदयविकाराने आजारी होती... सलीलची आवडती आजी. तिच्या आठवणीने तो रोज व्याकुळ व्हायचा. हॉस्पिटलमध्ये ओपीडी करताना तिची सलीलची भेट व्हायची..मध्येच दोघे कॉफी घ्यायची. अंकिता हृदयाची ऑपरेशन करणारी तर सलील चेस्ट स्पेशालिस्ट.. काही वेळा हृदयाचे ऑपरेशन करताना अंकिताची सहाय्य्क माधुरी नसायची..मग सलील तिचा सहाय्यक असायचा.. त्यावेळी तिच्या बोटांकडे तो पहात राहायचा.. एखाद्या डान्सरसारखी तिचे हात आणि बोट पेशन्टच्या हृदयात नृत्य करत असायचे. त्या हातांचा तो फँन झाला होता.
गाडी चालवता चालवता सलील त्याच्या कुटुंबाबद्दल सांगत होता. त्याचे बाबा म्हणजे जयवंतराव इंग्लिशचे प्राध्यापक.. आई जयश्री हायस्कूल शिक्षिका. काका वसंतराव त्या भागातील मान्यवर वकील.. काकू वसुधा एका वर्तमानपत्राच्या संपादक. आत्या सुरेखा नाटक सिनेमांत काम करणारी अभिनेत्री.. तिचा नवरा मोहन तिच्यासारखाच नट.. सलीलच्या घरातील तरुण मंडळी म्हणजे काका काकूंची लाडकी मुलगी नीला आणि आतेची मुलगी नभा. त्यासर्वांची बॉस म्हणजे आजी. एवढे मोठे एकत्र कुटुंब. अर्थात सुरेखा आत्या मुंबईत राहायची.. पण ती उद्या येणार होती सहकुटुंब. वसंत काकाकाकू त्याच बिल्डिंगमध्ये खालच्या मजल्यावर आणि सलीलचे आईबाबा वरच्या मजल्यावर आजीसह.
सर्व मंडळी उद्या एकत्र जमणार होती, निमित्त होतं डॉ.सलीलचा वाढदिवस. या पिढीतील तिन्ही मुलांच्या वाढदिवसाला सर्वजण एकत्र होत. चार दिवस मजा करत.. रोज गोडधोड होत असे.. मुले खेळत, एकत्र पोहायला जात, सिनेमाला जात, बॅडमिंटन खेळत. मोठी माणसे आईसोबत बसत, तिची सेवा करत. खाणेपिणे होई.
डॉ. सलील सर्व चुलत भावंडात मोठा. एमडी. डॉक्टर झालेला..तिशीजवळ आलेला.. त्याच्या लग्नाची आता सर्वजण वाट पहात होते.. मग नीला. नभा. डॉ. अंकिताला या अश्या कुटुंबाचे कौतुक वाटतं होत, तिला त्याच अप्रूप होतं. सलील तिला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि आजीची तब्येत दाखवण्याच्या निमित्ताने घरी घेऊन चालला होता. खरं म्हणजे डॉ. अंकिताच्या ऑपरेशन कौशल्यावर बरेचजण फिदा असत.. शिवाय तिचे मृदू बोलणे.. साधी रहाणी आणि तिच्या गाण्यावर सुद्धा.. डॉ. अंकिता ही चांगली गायिकापण होती, गावी असताना ती गाणे शिकली होती, तिने गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा पहिल्या वर्गात पास केल्या होत्या, तिने डॉक्टरी केली नसती तर ती चांगली गायिका झाली असती. एवढ्या सर्व जमेच्या बाजू असतानासुद्धा अंकिताला लग्नाबद्दल कोणी विचारत नव्हते, कारण... तिच्या उजव्या गालावर आणि मानेवर असलेला पांढरा पट्टा.. तो पट्टा काही केल्या बरा होत नव्हता.. अनेक डॉक्टर्स, वैद्य यांनी उपचार करूनसुद्धा. आणि मेकअप करून तो दडवणे तिला मान्य नव्हते.
सलीलच्या गावी मोबाईल रेंज मिळत नव्हती, हे अंकिताला बरं वाटलं. अगदी अर्जंन्सी असेल त्यासाठी तिने डिपार्टमेंटमध्ये सलीलचा घरचा लँंडलाईन नंबर दिला होता, पण उर्जेन्सी येऊ नये अशी तिची इच्छा होती. तिने सलीलच्या घरातील मंडळीसाठी छोटयामोठया भेटी घेतल्या होत्या. सलील हा तिचा सहकारी तिला मनापासून आवडत होता पण तिला आवडला म्हणून, काय.. त्याला आणि त्याच्या फॅमिलीला.. आपले हे चेहऱ्यावरील पांढरे डाग..? डॉ. सलीलला पण डॉ. अंकिता आवडत होती.. तिचे ऑपरेशन कौशल्य आणि तिचे गाणे... त्यावर तो फिदा होता.. त्याच्यापुढे तिच्या चेहेऱ्यावरील डाग त्याला दिसत नव्हते; पण आपल्या कुटुंबाने तिला स्वीकारावे, अशी त्याची इच्छा होती.
सलीलची गाडी त्याच्या गावाकडे आली, आज आपण येत आहोत हे त्याने कळवले नव्हते. दरवर्षी सलील आपल्या वाढदिवसाच्या दिवशी रेल्वेने येत होता; पण यावर्षी त्याने अंकिताला सोबत आणले गाडीतून. रात्रीचे आठ वाजले आणि सलीलची गाडी गेटमधून आत शिरली. घरी फक्त काकांची मुलगी नीला होती आणि वरच्या मजल्यावरील खोलीत आजी. नीला अभ्यास करत होती, तिने सलीलदादाची गाडी ओळखली आणि ती आनंदाने बाहेर आली.
"दादा, एक दिवस आधीच आलास? फोन केला नव्हतास बहुतेक.”
"अगं, सरप्राईझ..ये गं..” म्हणत त्याने बाजूचा दरवाजा उघडला आणि अंकिता बाहेर आली.
"ही नीला.. माझी चुलत बहीण आणि ही डॉ. अंकिता, हार्ट सर्जन आहे.”
"हो का.. या हो.. या.”
अंकिता बाहेर आली आणि तिने निलाला जवळ घेतले.
"अहो म्हणायची गरज नाही नीला... तू फक्त अंकिता म्हण.”
निलाच्या मनात आलं किती बोलते ही आणि आवाज किती मंजुळ.
"नीला, हिला गेस्टरूममध्ये घेऊन जा. मी आजीला भेटतो आधी.”
"हो, दादा, घरी कोणच नाहीये. माझे आईबाबा एका लग्नाला गेले आहेत आणि तुझ्या काकूच्या माहेरी.. येतील थोडया वेळात.”
"बरं.. मी आहे आजीजवळ.”
असं म्हणत सलील आपली बॅग घेऊन पटपट जिना चढला आणि आजीच्या खोलीत पोहोचला. आजीला रात्रीचे व्यवस्थित दिसत नसे. ती आवाजाच्या अंदाजाने ओळखी.
नीला अंकिताला गेस्टरूमकडे घेउंन गेली. तिने तिची बॅग आत ठेवली आणि ट्यूब लावली. मग मागे वळत ती म्हणाली
"ये गं आत..” म्हणत ती अंकिताच्या समोर आली आणि तिच्या गालावरचे आणि मानेवरचे पट्टे पहाता पहाता तिचा आवाज हळूहळू झाला.
सलील आजीच्या खोलीत आला. आजीला रात्रीचे व्यवस्थित दिसत नसे. तिने पायांचा आवाज ऐकला आणि ती म्हणाली
"कोण रे.. कोण आलंय आत..”
सलील आजीच्या जवळ आला आणि त्याने दोन्ही हाताने आजीला जवळ घेतले. आजीने त्याचा हात चाचपला. तिने ओळखले - सलील, तिचा नातू आला आहे.
"अरे, लबाड्डा.. तुला काय वाटले.. बोलला नाहीस म्हणून ओळखणार नाही.. उद्या तुझा वाढदिवस. एक दिवस लवकर आलास.आता या वेळी कुठली रेल्वे आली?”
"रेल्वेने नाही आजी.. यावेळी गाडी घेऊन आलो.. माझ्यसमवेत माझी सहकारी आली आहे.. डॉ. अंकिता.. हृदयाची ऑपरेशन करणारी आमच्या शहरातील नंबर वन डॉक्टर आहे.”
"हो काय.. तूझ्यासोबत काम करते काय रे ती? लग्न झालाय तीचं?”
"मी चेस्टचा डॉक्टर आहे आणि ती हृदयाची. हृदयाची ऑपरेशन करते आमच्या हॉस्पिटलमध्ये.. तुला तपासण्यासाठी मी मुद्दाम तिला बोलावलंय.”
"माझ्या प्रश्नाचे अर्धवट उत्तर दिलंस तू, तीच लग्न झालंय का?”
"नाही अजून.”
"बरं..” असं आजी म्हणत असताना नीला आणि अंकिता आत आल्या.
"आजी, ही बघ डॉ. अंकिता.. तुला भेटायला आली आहे.”
"ये गं.. ये.. माझ्याजवळ..”
डॉ. अंकिता आजीजवळ गेली आणि तिने आजीच्या हातात हात दिला. आजीने तिचा हात कुरवाळला.
"या हाताने ह्रदय फाडतेस तू.. कमाल आहे.. तुझे हात किती मऊ आहेत.. बोट लांबसडक. मला असे हात आवडतात अंकिता. माझ्या हृदयाचे ऑपरेशन तूच करायचं बरं का.. तू आवडलीस मला.”
"हो आजी.. मीच करीन तुमचं ऑपरेशन.. पण पहिल्यांदा तुमचे रिपोर्ट्स पहाते.. ऑपरेशनची गरज आहे का, हे पहायला हवं.” निलाने कपाटातून आजीचे आत्ताच घेतलेले रिपोर्ट्स अंकिताच्या हातात दिले. अंकिताने सर्व रिपोर्ट्स पाहिले. शिवाय स्टेथोने छाती तपासली.. ब्लड प्रेशर चेक केले. मग ती सलीलकडे वळून म्हणाली.
"सध्या रक्त व्हेन्समधून पास होत आहे. खडे अजून लहान आहेत.. पण कदाचित सहा महिन्यानंतर ऑपरेशन करावे लागेल, तोपर्यत आिंस्प्रन गोळीने रक्त पातळ होत राहील.”
"बघ, इकडच्या डॉक्टरनी ताबडतोब ऑपरेशन करायला सांगितलं; पण माझी ही होणारी नातसून.. शेवटी घरची ती घरची..” तिने काय ते व्यवस्थित सांगितलं.
तिचे "नातसून” म्हणण्याने अंकिता गोरिमोरी झाली. सलील पटकन म्हणाला
"तसं काही नाही आजी.. डॉ. अंकिताला तुझे रिपोर्ट्स दाखवायला आणि प्रत्यक्षात तुला तपासायला बोलावल होतं मी..”
"हो रे.. मला कळले आहे सारे. मला नातसून पसंत आहे. बरं मी झोपते.. मला पसंत असून उपयोग नाही.. तूझ्या आईला पसंत पडायला हवे.”
एवढ्यात सलीलच्या आईवडिलांचा आवाज आला.
"अरे, आज आलास तू? आम्हाला वाटल उद्या येणार.. नाहीतर आम्ही बाहेर गेलो नसतो..”
सलीलची आई जयश्री आजीच्या खोलीत आली. पाठोपाठ त्याचे बाबापण आले.
"अगं, उद्याच येणार होतो, पण ही आमच्या हॉस्पिटलमधील हार्ट सर्जन अंकितालापण सोबत आणायचं होतं.. त्यामुळे गाडी काढली.”
जयश्रीने त्या खोलीतील अनोळखी मुलीकडे पाहिलं, तिला दिसले तिच्या गालावरील आणि मानेवरील पांढरे डाग... तिचा चेहेरा कसातरी झाला.
"अग जयश्री, माझा नातसुनेला दाखवायला आला.. माझी तब्येत फवत निमित्त.”
"तुम्ही गप्प बसाल का, तुम्हाला रात्रीच व्यवस्थित दिसत नाही....” सलीलची आई जयश्री कडाडली.
"हो बाई, मी गप्प रहाते.. तुझ्यापुढे या घरातले काही चालतं का?”
"जेवायला चला” असे म्हणून जयश्री चालू पडली.
सलीलचे बाबा जयवन्त पुढे आले, आणि अंकिताला विचारू लागले.
"तुझं गाव कोणतं गं?”
"अंमळनेर..”
"बरं.. बरं. सानेगुरुजी बराच काळ होते ना अंमळनेरला.”
"हो काका.”
"आणि शिक्षण?”
"बारावीपर्यत गावीच.. मग नाशिक.. पोस्टग्रॅज्युएशन पुणे.”
"घरी कोणकोण असतं?”
"वडील लहानपणी वारले.. आई नर्स होती... आम्ही दोन बहिणी.. मी मोठी. लहानबहीण बँकेत लागली आणि तिचे लग्न झाले.
"आणि तुझं?
"माझं हे असं.. अंकिताने आपल्या चेहेऱ्याकडे बोट दाखवलं.
एवढ्यात सलीलच्या आईने जेवणासाठी हाक मारली आणि सर्वजण जेवायला गेली.
रात्री उशिरा सलीलचे काका-काकू घरी आली, तेंव्हा त्त्यांची मुलगी नीला जागी होती. बाहेर सलीलची गाडी पाहून तिची आई वसुधा म्हणाली
"सलील आलेला दिसतोय. या वेळी गाडी घेऊन आला.”
"होय, सलीलदादा आलाय आणि त्याच्याबरोबर डॉ. अंकितापण आलीय.”
"कोण डॉ. अंकिता?”
"ती त्यांच्या हॉस्पिटलमधील हार्ट सर्जन.. दादाच्या वयाची आहे.”
"म्हणजे आपल्या वाढदिवसाला मैत्रिण दाखवायला आणली की काय सलीलने? कशी आहे गं ती?”
"बरी आहे गं.. पण.
"पण काय?”
"तू उद्याच बघ.. मी झोपते आता..”
निलाने डोवयावरून पांघरून घेतलं आणि झोपी गेली.
नीला असं का म्हणाली, हे जयश्रीला कळेना.
रात्री झोपताना तिने आपल्या नवऱ्याला निलाचे बोलणे सांगितले.
सकाळी चहाला सर्व मंडळी टेबलावर जमली. सलीलचे वडील जयवंत, काका वसंत, सलील. सलीलची आई जयश्री आणि काकू वसुधा चहा देत होती. एवढ्यात नीला अंकिताला घेऊन आली तसे सर्वांचे लक्ष तिच्याकडे आणि तिच्या पांढऱ्या डागांकडे गेले. वसंतकाकांनी आणि वसुधाकाकीनी अंकिताला प्रथमच पाहिले.
अंकिताला असल्या नजरांची सवय होती. किंबहुना असल्या नजरा स्वीकारून ती पुढे जात होती. चहा घेता घेता वसंत काका म्हणाले
"अंकिता, हे डाग जन्मापासूनचे आहेत काय?”
"नाही काका.. मी जन्मतः नॉर्मल होते, पण एकदा मी आणि माझी छोटी बहीण बॉलने खेळत होतो.. आई चकल्या तळत होती.. माझ्या बहिणीने बॉल टाकला तो उकलत्या तेलात.. दुर्दैवाने त्या वेळी मी गॅसजवळ होते.. त्या उकलत्या तेलाचे थेंब माझ्या गालावर आणि मानेवर पडले.. त्या ठिकाणी मोठे फोड आले.. काही दिवसांनी जखम बरी झाली, पण हे डाग गेले नाहीत. अनेक उपचार केले.. अनेक त्वचारोग तज्ञांना दाखवले.. होमिओपॅथी.. आयुर्वेदिक.. सर्व केले.. पण व्यर्थ. मग मी माझ्या अभ्यासावर लक्ष दिले आणि गाण्यावर. माझ्या लहान बहिणीचे लग्न झाले पण...” अंकिताला हुंदका आला
वसुधाकाकी पुढे गेली आणि तिने अंकिताला खुर्चीवर आपल्या शेजारी बसवले. चहा घेऊन नीला आणि अंकिता आजीच्या खोलीत गेल्या. आता दिवसा उजेडी आजीने अंकिताला पाहिले. तिलापण तिच्या गालावर आणि मानेवर पांढरे डाग दिसलें. आजीच्या सर्व लक्षात आले
"तरी जयश्री एवढ्यात बोलू नका म्हणत होती.. असुदे.. दुर्दैव असतं आपलं.. पण तरी अंकिता तू मला आवडलीस.. तू माझी नातसून होशील.. तूच माझं ऑपरेशन करशील.”
दहाच्या सुमारास मुंबईहुन सलीलची सुरेखाआते आणि तिची मुलगी नभा आली. आते आली म्हणजे एकदम गडबड.. त्यात ती नाटक मालिकेत काम करणारी.. तिच्याकडे बातम्या भरपूर.
सुरेखाला कळलं, सलीलसोबत एक डॉक्टर आली आहे.. हार्टचे ऑपरेशन करणारी.. तिला पण उत्सुकता.. कोण आणि कशी आहे ही डॉक्टर? ती घरात गेली आणि सलीलच्या आईला म्हणाली...
"सलीलने लग्न ठरवले की काय? एकदम सरप्राईज?”
"गप्प बस गं सुरेखा.. इकडे माझं डोकं पिकलंय?”
"काय झालं?” ”सलीलचे सोबत आणलेली मुलगी तू पहा आणि मग..”
सुरेखा आजीच्या खोलीत गेली तेंव्हा तिच्याशी बोलणारी सलीलची मैत्रीण तिला दिसली आणि तिला धक्का बसला.
सुरेखाआते त्या खोलीतून बाहेर पडली, तीचं लक्ष निलाच्या खोलीकडे गेले, त्या खोलीत नीला, अंकिता आणि आत्याची मुलगी नभा गप्पा मारत हसत खिदळत होत्या. नभा आणि अंकिता चिकटून बसल्या होत्या.
सुरेखाला आता टेन्शन आलं. तिच्या मुलीचे नभाचे सहा महिन्यात लग्न होणार होत. आणि नभा त्या अंकिताला चिकटून बसली होती. संसर्ग्र झाला तर? अंकिताचे पांढरे डाग आपल्या मुलीला आले तर?
सुरेखा घाबरली. तिने ताबडतोब लँड लाईनवरुन आपल्या स्कीन स्पेशालिस्ट डॉक्टरला फोन लावला आणि सर्व परिस्थिती सांगितली. ते डॉक्टर म्हणाले "मुळात पांढरे डाग हे संसर्गजन्य नाहीत. मुळात तो आजार नाही.. ते केवळ लक्षण आहे किंवा रिऍक्शन आहे. त्याची काळजी करू नकोस.”
सुरेखाआते शांत झाली. तिने डॉक्टरचे म्हणणे सर्वाना सांगितले. जयश्रीच्या खोलीत जयश्री, तिचा नवरा जयवंत आणि वसंत वसुधा जमली होती.
"सलीलचे मत घेतले काय? खरंच तो लग्न करणार आहे तिच्याशी की आईला तपासण्यासाठी तो घेऊन आला?”
”सलीलच्या डोळ्यात तिच्याबद्दल प्रेम दिसते.. त्याला आदर आहे तिच्या हार्ट सर्जरी मधील कौशल्याबद्दल आणि तिच्या गाण्याबद्दल.”
"तीची गाण्याचीपण तयारी आहे काय?”
"तिने गाण्याच्या परीक्षा दिल्या आहेत म्हणे..”
एवढ्यात जयश्री म्हणाली.. "मला मान्य आहे.. मुलगी चांगली आहे; पण लग्नानंतर मुलामध्ये हा दोष राहिला तर?”
'जयश्री, मी डॉक्टरना मघा हेपण विचारले.. त्याचं म्हणणं मुळात हा आजारच नाही आणि कोडं असलेल्या आईबाबांचे कोडं मुलाला आजपर्यत आलेलं नाही.”
"मी अंकिताला तिच्या डागाबद्दल विचारलेले.. ती म्हणाली हे डाग जन्मजात नव्हते..उकळत्या तेलाचे थेंब तिच्या गालावर, मानेवर पडले आणि मग जखम बरी झाली पण डाग राहिले.”
रात्री मोठया हॉलमध्ये सर्वजण जमले होते. मोठा केक आणला होता. किचनमध्ये फ्रूट सॅलट, बिर्याणीची तयारी सुरु होती.
सलीलने केक कापला. सर्वांनी त्याला आशीर्वाद दिले.. शुभेच्छा दिल्या. मग थट्टामस्करी सुरु झाली. वसंतकाकांनी पेटी काढली आणि ते नाट्यसंगीत गाऊ लागले.. मग सलील आणि नभाने अंकिताला गाण्याचा आग्रह केला. अंकिता म्हणाली "काय गाऊ.. शास्त्रीय की पद?”
सलील म्हणाला मागे एकदा एका कार्यक्रमात तू "सहेला रे... हे गाणे छानच म्हंटलं होतंस.. ते आज म्हण.”
बरं, असं म्हणून अंकिता डोळे मिटून म्हणू लागली.. वसंतकाकांनी पेटीवर स्वर घेतले आणि गाणे सुरु झाले.
"सहेला रे... सहेला रे.... सहेला..”
तो हॉल त्या सुरांनी भरून गेला. पंधरा मिनिटे आलापी सुरु होती. जयवंतराव, वसुधा, नभा, नीला त्या स्वरांनी रडू लागल्या. काहीतरी विलक्षण त्या भिंतीनी आज ऐकलं होतं.
रात्रीचे दोन वाजले तेंव्हा मंडळी उठली आणि झोपायला गेली.
सकाळी जयवंतराव कॉलेजला गेले. सलीलच्या आईची सकाळची शाळा. सलीलला आज मामाकडे जायचं होत म्हणून तो स्कुटर घेऊन गेला आणि दुपारी जेवायला येईन असा त्याने निरोप ठेवला.
आज नीला आणि नभा अंकिताला त्यांची आमराई दाखविणार होत्या. म्हणून तिघींची तयारी चालली होती.
वसुधाकाकी त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्या आणि वसंतकाका जिल्हा न्यायालयात केस होती म्हणून आज लवकरच बाहेर पडले.
सकाळी नऊ वाजता घरच्या लँड लाईनवर अंकिताला तिच्या हॉस्पिटलमधून फोन आला. आमराईत जायच्या तयारीत असलेल्या अंकिताने फोन घेतला. एका तातडीच्या ऑपरेशनसाठी तिला दुपारपर्यत हॉस्पिटलमध्ये पोचायचा निरोप होता. अकराची ट्रेन होती, दोन वाजेपर्यत पोचणार होती.
अंकिताने आमराईत जायचा बेत रद्द केला. तिने तसें नभा आणि नीलाला सांगितले. त्या नाराज झाल्या. घरात फक्त आजी आणि सुरेखाआते होत्या. अंकिताने आपली बॅग भरली आणि ती नभा आणि नीला समवेत सुरेखा आतेचा निरोप घयायला आली. बॅगसह तिला पाहून आतेला आश्यर्य वाटले.
"अग तू निघालीस की काय? परवा सलीलसोबत जाणार होतीस ना?”
"हो आते, पण हॉस्पिटलमधून फोन आला, एका वृद्ध आजीचे ऑपरेशन करायचे आहे.. खुप अवघड ऑपरेशन आहे, आणि माझ्याखेरीज हे ऑपरेशन आमच्या हॉस्पिटलमध्ये कोण करत नाही.. त्यामुळे निघालंच पाहिजे.. अकराची ट्रेन आहे.. दोनपर्यत पोचेल.”
"पण सलील बाहेर गेलाय, शिवाय दादा जयश्री तीपण घरात नाहीत, वसंत पण कोर्टात..”
"पण आत्या, मला जायलाच हवे.. सलील मला परवा हॉस्पिटलमध्ये भेटेल.. त्याच्या आईबाबांना, काका काकूंना सांगा... रागाउ नका माझ्यावर. मी आजींना भेटून जाते.”
"बरं.. ” असं म्हणत सुरेखा आते गप्प राहिली.
मग ती आजीच्या खोलीत गेली. बॅगसह अंकिताला पाहून आजींना आश्चर्य वाटलं.
"आजी, मी निघते.. हॉस्पिटलमधून फोन आलाय.. तातडीचे ऑपरेशन करायचंय एका आजीवर.. मला निघायला हवं.
"निघतेस.. जा बाई.. तुम्हा डॉक्टर लोकांचं आयुष्य हे असंच.. दोन दिवसात लळा लावलास हो सर्वाना.. काल रात्री गाणं म्हणत होतीस.. काय छान तयारी आहे तुझी. अजून माझ्या कानातून ते सूर जात नाहीस.. सलील बाहेर गेलाय ना,? घरातील सगळीच बाहेर असणार यावेळी.. फक्त नीला आणि नभा असतील. ये परत.. केंव्हा येशील? तुला माझी नातसून करायची इच्छा आहे माझी.. पण माझं आता या घरात काही चालत नाही..माझं ऑपरेशन मात्र तूच करायचं. दुसऱ्या कोणाला मी माझ्या हृदयाला हात लावू दयायची नाही.”
"येते..” म्हणत अंकिताने आजींना मिठी मारली.
मोठया कष्टाने आजींनी तिला दूर केली. निलाने स्कुटरवरुन अंकिताला स्टेशनवर सोडले. धावतपळत अंकिताने ट्रेन पकडली
डॉ अंकिता सीटवर बसली. दोन दिवस सलीलच्या घरी मजेत गेले.. असं भरलेले कुटुंबं तिला आवडत.. सख्खे, चुलत, आतेभाऊ, मामेबहीण भाऊ.. अशा घरात किती माणसं येत असतात.. जात असतात. आपण पण अशाच दोन दिवसाच्या पाहुण्या होतो का? हे घर आपलं वाटतं होतं, पण.. हा पण मोठा आहे आपल्या आयुष्यात.. एक मोठी चूक झाली लहानपणी.. बहिणीबरोबर खेळताना गॅसजवळ जाण्याची बुद्धी झाली..त्याचे भोग आयुष्यभर भोगायचे.
तुम्ही कितीही कर्तृत्व्वान असा, सलील म्हणतो तसे माझे हात आणि बोट ऑपरेशन करताना नर्तकासारखे हृदयात नाचू दे.. लग्नाच्या बाजारात तुमचा चेहेरा आणि शरीर महत्वाचे.
सलील आपल्याला त्याच्या घरी घेऊन गेला, मला वाटलेलं तो सर्वाना सांगेल "ही मुलगी मला आवडते.. मला हिच्याशी लग्न करायचे आहे.” पण.. पण तो सांगत होता.. "ही हार्ट सर्जन आहे आणि आजीचे रिपोर्ट्स आणि तब्येत दाखवायला हिला बोलावलं.”
म्हणजे सलील आपल्यावर प्रेम करतो असे वाटायचे हे खोटे तर.. हा पण इतर पुरुषासारखा. मग त्याच्या आईचे, काकूंचे, आतेचे काय चूक?
एवढा देखणा, हुशार आणि कुटुंबातील एकूलता एक मुलगा.. त्याला अशी चेहेऱ्यावर पांढरे पट्टे असलेली मुलगी? आपलेच चुकले. आपण जास्त अपेक्षा ठेवली. कोणी दया म्हणून लग्न करेलही आपल्याशी.. पण आपल्याला दया नको.. खरं खरं प्रेम हवं.. स्वीकार प्रेमाचा हवा. विचार करताकरता अंकिताला डुलकी आली. तिचे स्टेशन आलं तशी ती उतरली, तिच्यासाठी हॉस्पिटलची गाडी बाहेर उभी होती
तीन तासांनी डॉ. अंकिता ऑपरेशन विभागातून बाहेर आली. तिची सहकारी डॉ. माधुरीपण तिच्यासमवेत बाहेर आली.
"छान झालं ऑपरेशन अंकिता, तू तातडीने आलीस म्हणूंन बर झालं नाहीतर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्या पेशंटला शिपट करावं लागलं असतं.. पण तूझ्यासारखं सफाईदार ऑपरेशन झालं नसतंच.”
"म्हणून मी सलीलच्या घरचा लंँड लाईन देऊन ठेवला होता, तेथे मोबाईल रेंज नाही मिळत.”
"कसं आहे गं सलीलचे घर? त्याच्या घरचे?”
एवढ्यात अंकिताचा मोबाईल वाजला. सलीलचा फोन होता.
"झालं का ऑपरेशन? तू बाहेर आलीस काय?”
"हो हो.. मी आणि माधुरी आत्ताच बाहेर आलो.. छान झालं ऑपरेशन.” "मग बॅग घेऊन बाहेर ये.. मी पार्किंग लॉटमध्ये वाट पहातोय.”
पुढे काही विचारायाच्या आधी सलीलने फोन कट केला. अंकिता बॅग घेऊन बाहेर आली... तिला कळेना सलील यावेळी हॉस्पिटलमध्ये कसा? दुपारी घरी येणार होता. आणि चार तासात या शहरात..
ती जवळजवळ धावत पार्किंग लॉट मध्ये पोहोचली. सलील त्याच्या गाडीला टेकून उभा होता. तिला पहाताच तो पुढे झाला.. तिचा हात पकडून त्याने तिला जवळ घेतले
"मला फार आवडतेस तू अंकिता.. माझ्या घरच्यांनी तुला घरी बोलावलंय..”
"काय?”
"होय.. माझं तुझ्याशी लग्न लावणार आहेत घरचे..”
"काय.. काय.. ती गडबडली.”
"तुला न्यायला कोण आलंय बघ..”
सलीलने गाडीचे मागील दार उघडले..आत नीला आणि नभा होत्या.
त्या दोघीनी तिला आत खेचले आणि जोरात गाणे सुरु केले.
"सहेला रे... सहेला रे.. आ मिल गाये...”
"सहेला रे.. सहेला.. आ मिल गाये... सहेला रे....”
- प्रदीप केळुसकर