कंजूष

कंजूषपणा हा पैशाचाच असतो असे नाही. ही एक मानवी प्रवृत्ती आहे. जी जवळपास प्रत्येकात कमीअधिक प्रमाणात दिसून येते. सर्वसामान्य माणूस कनवटीस आलेले पैसे जपून ठेवायचा. चप्पल, वहाणा, बूट अशा वस्तुंवर खर्च न करणे हा त्यांचा कंजूषपणा नव्हता तर ती काटकसर समजली जात असे. पण खिश्यात रक्कम असूनही फाटक्या चपला वारंवार ठिगळ मारून वापरणे हा चक्क कंजूषपणाच समजला जात असे. समाजात आजही अशा प्रवृत्तीचे लोक आहेत, हे विशेष!

You ट्यूबवर देश स्वतंत्र होण्यापूर्वीचे हिंदी सिनेमे पाहण्याची संधी मिळत आहे. आपण जन्माला येण्यापूर्वी देशातील एकूण परिस्थिती काय असावी? ते जाणून घेण्याची उत्सुकता कायम साऱ्यांनाच असते. असाच एक जुन्या काळातील सिनेमा पाहत असताना त्याचे एकूण कथानक ग्रामीण भागातील दाखविले आहे.त्यांतील पहिलाच सीन फार उत्सुकता वाढविणारा वाटला. जुने नामवर कलाकार भगवान दादा एका वृक्षाखाली बसून बूट-चपला पॉलिश करणे तसेच फाटलेल्या वहाणा शिवून देण्याचे काम करत आहेत. एक कोल्हापुरी फाटकी चप्पल शिवून देतांना दादा सांगतात
"शेठ, अब यह चप्पल थक चुकी है, दूसरी लेलो.
दुसरे ज्येष्ठ कलाकार जीवन जे यामध्ये कंजूस शेठजीच्या भूमिकेत आहेत, भगवान दादाचे शब्द ऐकून चिडतात. व बोलतात...
"ज्या झाडाखाली तू बसला आहेस ते झाड माझे आहे, जमीन माझी आहे. माझे उपकार समज मी तुझ्याकडून एक दमडी घेत नाही... अन त्या उपर तू माझ्याकडून पैसे मागतोस?

त्याकाळी जीवन, कन्हैय्यालाल असे नामांकित कलाकार अशा धनिक शेठजीची भूमिका वठवायचे. पुन्हा कथानकात तेच अमीर आणि गरीब! पैसे असुनही पायांत फाटक्या चपला वापरुन जीव मारण्याचे काम असे कंजूस लोक करतात!

माणसाच्या पायात चप्पल आली कारण वाटेवरून चालतांना झाडा झुडुपांमधला कांटा पायात रुतु नये, तीव्र उष्णतेमुळे तापलेल्या  पायवाटेने तळवे जळू नयेत, म्हणून चपलांचा शोध लागला असावा. अमक्याच्या पायांत चपला आहेत, हे दाखवण्यासाठी, मिरवण्यासाठी म्हणून कुणी चपला घालत नसतो. त्यांत दिखाऊपणा कसला?  त्यावेळी ती धनिकांची गरज असावी. इतर सामान्य नागरिकांना तापलेल्या जमिनीवर अनवाणी चालायची सवय झाली होती. शिवाय चपला विकत घेण्यासाठी खिश्यात मुबलक पैका ही नसायाचा. मी स्वतः गावी असेतोवर चपला ही गरज आहे, असे मला केव्हांच वाटले नाही. किंबहुना घरच्या मोठ्याने तसे वाटू दिले नसावे. असा तो काळ होता. सर्वसामान्य माणूस कनवटीस आलेले पैसे जपून ठेवायचा. चप्पल, वहाणा, बूट अशा वस्तुंवर खर्च न करणे हा त्यांचा कंजूषपणा नव्हता तर ती काटकसर समजली जात असे. पण खिश्यात रक्कम असूनही फाटक्या चपला वारंवार ठिगळ मारून वापरणे हा चक्क कंजूषपणाच समजला जात असे. समाजात आजही अशा प्रवृत्तीचे लोक आहेत, हे विशेष!

गावांत सातवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण प्राथमिक मराठी शाळा-कोळथरे येथे झाले. पंचक्रोशीतील मुले आम्ही शाळेत बिन चपलांनी जायचो. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले...आमचे गुरु श्री. कृष्णा मामा स्वतः कधीच चपला वापरत नसत. कायम अनवणी! भातलावणी करतांना, भातमळणी करतांना कायम अनवाणी असणे हा त्याकाळी अलिखित नियम होता. आज काळ बदलला असेल पण आजही शेतचोंड्यात शेतकरी अनवाणीच जातो. याला कारण वाटेतून येजा करत असतांना अस्वच्छ चपला दूर ठेवलेल्या जास्त बरे. अन्नाचा तो अवमान समजला जात असे. याला कंजूष असे नाही म्हणता येणार. त्यावेळेस ग्रामीण भागात जगण्याची ती पद्धत होती. मंचुरियन नामक प्रकार आला आणि सर्व समिकरणेच बदलून गेली आहेत. दो मिनट मे नूडल्स आणि मॅगी नामक फास्टफूड आले काय, अन जगण्याची एकूण पद्धतच बदलून गेली. याला काय म्हणावे कुणी सांगू शकत नाही.

कोकणातील जनजीवन बरेचसे काटकसरीचे असते. उदाहरणार्थ शेणगोठा करतेवेळी शेण ज्या टोपलीतून शेणकी पर्यंत वाहुन नेले जाते, त्याच्या तळाशी पोफळीच्या झावळाची इरी दाबली जाते. किनारी आलेल्या होडीमधून मासे वाहून नेणाऱ्या आया-बहिणी अशाच इरीचा उपयोग करतात. प्लास्टिकपेक्षा इरी ज्यास्त फायद्याची. शिवाय ती सहज उपलब्ध होते. बागेत पाटाचे पाणी फिरवायचे झाल्यास तीच इरी कामी येते. बंदरावर गेलो असताना जर मासे विकत घेतले तर प्लास्टिकला पर्याय म्हणून इरी असू शकते. यालाच काटकसरीचे जगणे असे म्हणू शकतो. शिवाय पर्यावरणपूरक विचार आबाधित राहू शकतो. केळीच्या पानांवर जेवण हा आयुर्वेदचा सल्ला एकदातरी मान्य करुन त्याचा अनुभव घ्यावा. आमचे कोळथरे येथील मित्र श्री. भाऊ बिवलकर यांनी तर चक्क आपल्या नारळ-पोफळीच्या बागेतच इरीपासून डिस्पोजिबल पत्रावळी तयार करण्याचा छोटेखानी कारखाना सुरु केला आहे. पर्यावरणाला जपायचे असल्यास अशा विद्वानांशी सहमत झाले पाहिजे. त्यांच्या वैचारिकतेचा आदर केला पाहिजे. कारण जीवन कृतीतून जगण्याची ती कला आहे! त्याचे जतन होणे आवश्यक आहे.

एक गावकरी उदास बसलेला पाहुन त्याचा मित्र कारण विचारु लागला...त्यांस गावकरी बोलता झाला...
 "आहे त्या पैश्यात डॉकटर साहेबांचे बिल भरु का वीज बिल भरू...काहीच कळेना.”
मित्र लगेच उत्तरला
"विजेचे बिल लगेच भर...अन्यथा सप्लाय कट होईल. डॉवटर काय तुझा रक्त प्रवाह थांबवू शकत नाही...?
हा जरी विनोदी किस्सा असला तरी त्यांत व्यवहारज्ञान दडलेले आहे, हे विशेष!

प्रत्येकाची जगण्याची पद्धत कशीही असू दे, समाजात एकरुप व्हायचे असेल तर साधेपणा हिच खरी ओळख आहे. ‘चाय से ज्यादा केटली गरम...' अशा वृत्तीचे लोक किती काळ तग धरून जगणार? शिजले थोडं,  तर करपले भारी...आजचा विचार हा असा विचित्र आहे, ‘खरा तो मीच, इतर सारे बिनडोक!' पैशाने बुद्धी विकत घेता आली असती तर आज AI ने जन्म तरी घेतला असता का?

काटकसरीने जगण्याचे तंत्र ज्याने त्याने स्वतः निर्माण करावे. EMI च्या चक्री व्याजातून मुक्ती हवी असेल तर किफायतशीर जगणे आणि इतरांकडे अमुक आहे तर आपल्याकडे का नसावे? ही देखादेखी माणसाला अनुकरणीय जाळ्यात अडकवू शकते, म्हणून सावधान!
-इक्बाल शर्फ मुकादम 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 सहेला रे..