नामाचा महिमा जाणे शंकर। जना उपदेसी विश्वेश्वर
नामाने सर्व दुःखे नाहीशी होतात . दुःखाचे मूळ विषयांच्या आसक्तीत आहे आणि नामाने ती आसक्ती सुटते.म्हणून दुःखनाहीसे होते.शिवाय भगवंत हा आनंदस्वरूप असल्याने त्याला नामाने घट्ट धरला की त्या ठिकाणी दुःख राहूच शकत नाही.म्हणून प्रत्येक मनुष्याने भगवंताचे नाम घ्यावे, त्याच्या स्मरणात रहावे आणि आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे.
समस्तामधे सार साचार आहे।
कळेना तरी सर्व शोधून पाहे।
जिवा संशयो वाउगा तो त्यजावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा । श्रीराम ७५।
भगवंतप्राप्तीच्या अनेक साधनांमध्ये अनेक अडचणी येतात, देहाला श्रम होतात, द्रव्यबळ लागते हे आधीच्या श्लोकांतूनसमर्थांनी सांगितले. नामस्मरणाचे महात्म्यही त्यांनी सांगितले. ह्या श्लोकांत समर्थ म्हणतात "नाम हेच सर्व साधनांचे सार आहे. जर माझे सांगणे पटत नसेल, कळत नसेल तर तुम्ही सर्व वेद,शास्त्रे, पुराणे, संतवचने शोधून पहा. अभ्यासून पहा. मनातील सर्व विकल्प, सर्व संशय सोडून संत वाक्यावर विश्वास ठेवा.” संतांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास करून, स्वतः तपश्चर्या करून, विचारमंथन करून, स्वानुभव घेऊन "नाम हेच नवनीत म्हणजे सार आहे” असा निःसंदिग्ध निष्कर्ष काढला आहे. नाम हे खरोखरच सर्व साधनांचा अर्क आहे. अनेक औषधी पदार्थ उकळून, गाळून घेतल्यावर जो अर्क उरतो त्यात त्या सर्व औषधी पदार्थांचे सर्व गुण उतरलेले असतात. तसेच नामसाधनात सर्व साधनांचे फल सामावलेले असते. म्हणूनच नाम हेच माणसाचे संपूर्ण कल्याण करणारे साधन आहे यावर सर्व संतांचे एकमत आहे.
जगद्गुरू संततुकाराम महाराज म्हणतात, "वेद अनंत बोलिला। अर्थ इतुकाचि साधिला। विठोबासी शरण जावे। निजनिष्ठे नाम गावे।सर्व साधनांचे सार।उतरी भववसिंधू पार” वेदांमध्ये ज्ञानाचे, ज्ञानप्राप्तीच्या साधनांचे सविस्तर वर्णन आहे. ते सर्व अभ्यासल्यानंतर अर्थ एवढाच निघतो की विठोबाला शरण जावे आणि निष्ठेने त्याचे नाम गावे. सर्व साधनांचे सार एकच आहे .ते म्हणजे वि्ीलाचे नाम! त्या नामसाधनेने मनुष्य भवसिंधू पार करू शकतो. प्रपंचातील सगळ्या समस्यांवर, सगळ्या दुःखावर मात करू शकतो.
अर्थात् अलिप्तपणे त्यांच्याकडे पाहू शकतो. प्रापंचिक सुखदुःखाने विचलित न होता तो नामाच्या नित्य आनंदात राहू शकतो. संतशिरोमणी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, "सर्व सुखगोडी साही शास्त्रे निवडी। रिकामा अर्धघडी राहू नको | ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान। समाधी संजीवन हरिपाठ ६ (हरिपाठ २७) सहा ही शास्त्रांचा निवाडा करून निर्णय केला की सर्व सुखाची गोडी हरिनामातच आहे. म्हणून अर्धा क्षणही नामाशिवाय राहू नकोस. श्रीनिवृत्तीदेवांनी मला दिलेले ज्ञानच मला प्रमाण आहे. त्यायोगेच मला संजीवन समाधीप्राप्त झाली. सद्गुरू निवृत्तीनाथांनी जी नामाची महती सांगितली त्याबद्दल मला कोणतीही शंका नाही.
नामात रंगून गेल्यावर देहाचे भान रहात नाही. जगाचे भान रहात नाही. अशा रीतीने जिवंतपणीच देहापासून, संसारापासून मुक्त होण्याचा अनुभव मी घेतला. संतश्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात, "अवघाची आकार गिळियेला काळे। एकचि निराळे हरिनाम। नामा म्हणे तत्व नाम गोविंदाचे । हेचि धरी साचे येर वृथा” सारे चराचर काळाच्या ओघात नाहीसे झाले तरी हरिनाम शाश्वत राहते. म्हणून तेच ह्रदयात धरावे. नामाशिवाय इतर कशाचाही विचारकरू नये. नामस्मरणाशिवाय इतर कोणताही मार्ग धरू नये.
नामाव्यतिरिक्त इतर सर्व व्यर्थ आहे. कारण त्याचा आपल्या कल्याणासाठी काहीच उपयोग नाही. नामच तेवढे हीतकारक आहे . माणसाला संपूर्णपणे दुःखमुक्त करून आनंदस्वरूप आत्मतत्त्वात नित्य स्थिर करणारे आहे. अद्वैत वेदांती, ज्ञानमार्गी पुज्यपाद श्रीशंकराचार्यांनीही सर्वसामान्य लोकांसाठी मंत्र दिला तो , "भज गोविंदम्भज गोविंद” हा नाममंत्रच! ह्या सर्व ज्ञानी महात्म्यांनी अभ्यास आणि अनुभवातून जाणले होते की सामान्य लोकांसाठी मुक्तीचा मार्ग भक्तीतूनच जाऊ शकतो. निर्गुण निराकार परमात्मस्वरूप जाणून त्यात स्थित होणे हे जरी नरजन्माचे अंतिम साध्य असले तरी ज्याला आकार नाही, रूप नाही, ज्याचे आकलन सामान्य बुध्दीला होऊ शकत नाही, ते साध्य कसे करावे? यासाठीच ज्ञानवंतांनी त्या निर्गुण निराकाराला "नाम” दिले. नाम हेच त्याचे रूप आहे. एखाद्या व्यक्तीला, देशाला, पदार्थाला आपण पाहिलेले नसते. पण त्याचे ”नाव” हीच त्याची ओळख होते.
तसेच न पाहिलेल्या भगवंताची ओळख त्याच्या नामातून होते. भक्तीचे सुख अनुभवण्यासाठी ज्ञानी भक्त अरूपाला सगुण रूप देतात. नाम देतात. काळाच्या ओघात सारे चराचर, सारी सृष्टीनष्ट होते .पण ”नाम” मात्र कायम राहते. युगानुयुगे ते पुढे पुढे चालत राहते. "जयाचा जनी जन्म नामात झाला। जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती” अशी ज्यांची स्तुती गायली जाते ते प.पु.श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात, "नाम घेतल्याने भगवंताकडे प्रेम लागते आणि इतर ठिकाणची आसक्ती सुटते. नामाने सर्व दुःखे नाहीशी होतात. कारण दुःखाचे मूळ विषयांच्या आसक्तीत आहे. नामाने ती आसक्ती सुटते म्हणून दुःख नाहीसे होते. शिवाय भगवंत आनंदस्वरूप असल्याने त्याला नामाने घट्ट धरला की त्या ठिकाणी दुःख राहूच शकत नाही.” आपल्या मूळ आनंदस्वरूपाला प्राप्त करून त्यात नित्य स्थित होऊन राहणे याचसाठी सारा खटाटोप आहे. समर्थ म्हणतात सर्व साधनांचे सार असलेले नाम आपल्याला हेच शाश्वत समाधान प्राप्त करून देते. म्हणून व्यर्थ संशय, शंका-कुशंकांचा त्याग करावा आणि निःशंकपणे नामाचा आश्रय घ्यावा. लवकरात लवकर नामस्मरणाची सवय करून घ्यावी आणि जन्माचे सार्थक करुन धन्य व्हावे.
जय जय रघुवीर समर्थ - सौ. आसावरी भोईर