पुण्यनगरी झाली पबनगरी !

१) एका मित्राच्या मित्राची मुलगी पुण्यात शिकायला होती. हा मित्र काही कामासाठी पुण्याला जाणार होता म्हणून त्याच्या मित्राने त्याला मुलीला भेटून येण्यास सांगितले. दिवसभराची कामे आटोपून हा मित्र, ती मुलगी रात्री सात आठ वाजता नक्की भेटेल अशा बेताने, ती रहात असलेल्या खाजगी गर्ल्स हॉस्टेलमध्ये तिला भेटायला गेला. रात्रीचे नऊ वाजले, तरी ती मुलगी काही आली नाही. मोबाईलही लागत नव्हता. शेवटी कंटाळून त्याने रेक्टरबाईकडे चौकशी केली, मुली परत येण्याची वेळ कितीची आहे ? रेक्टरबाई म्हणाल्या, तशी वेळ संध्याकाळी सातची असते. पण सर्व मुली त्या वेळेच्या आत येतीलच असे काही नाही. त्याने असे कसे चालते? विचारल्यावर त्या बाई म्हणाल्या, असेच चालते. नाही तर हॉस्टेल बंद करायची पाळी येईल.

२)नात्यातील एका उच्चशिक्षित मुलीचे लग्न पुण्यातील एका उच्चशिक्षित कुटुंबातील उच्चशिक्षित मुलाशी १० वर्षांपूर्वी फार थाटामाटात झाले. लग्नानंतर एकाच वर्षात त्यांना मुलगी झाली. आता ही मुलगी नऊ वर्षांची झाली आहे. वरकरणी सर्व काही छान दिसत होते. पण काही दिवसांपासून मुलीच्या लक्षात यायला लागले होते की,काही  कारणे सांगून नवरा शनिवारी रात्री बाहेर जातो ते थेट दुसऱ्या दिवशी दुपारीच घरी येतो. नवरा नेमका कुठे जातो, कशासाठी जातो,काय करतो, हे पाहण्यासाठी ती एका शनिवारी त्याचा पाठलाग करीत गेली. नवरा एका पबमध्ये गेलेला होता. अधिक चौकशी केली असता,तिला प्रचंड धक्का बसला. कारण तो पब त्या दिवसासाठी फक्त गे साठी ( सम लैंगिक पुरुषांसाठी) असतो, असे तिला सांगण्यात आले.  आपला नवरा असा आहे, हे सहन न होऊन आता तिने घटस्फोटासाठी दावा दाखल केला आहे. असे हे बदलत चाललेले पुणे. काही घटनांची पोलिस तक्रार झाली की बातम्यांत येते किंवा बातम्यांत आले की पोलिस तक्रार दाखल होऊन पुढे रितसर कायदेशीर कारवाई सुरू होते.
एकेकाळी पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जात असे. अजूनही तसे ते आहेच. उलट कोणे एकेकाळी फक्त पुणे विद्यापीठ, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, ॲग्रीकल्चर कॉलेज, लॉ कॉलेज, फर्ग्युसन, एस पी, वाडिया अशी काही मोजकी कॉलेजेस, एनडीए, काही संशोधन संस्था अशांबरोबर आता काही खाजगी विद्यापीठे, काही अन्य शैक्षणिक संस्था, स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे  असंख्य कोचिंग क्लासेस, संबंधित संस्थांबरोबरच प्रचंड मोठ्या संख्येने उभी राहिलेली मुलामुलींची खाजगी हॉस्टेल्‌स याने भरून चालले आहे. केवळ देशातूनच नाही तर विदेशातून शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही काही हजारात असेल. असे हे सर्व काही लाखात असलेले विद्यार्थी, नोकरदार यांची काही गणना होते की नाही?

कोचिंग क्लासेस, मुलामुलींची खाजगी हॉस्टेल्‌स यांच्यासाठी काही नियमावली आहे की नाही? असल्यास त्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन होते की नाही? ही सर्व जबाबदारी नेमक्या कोणत्या शासकीय, अर्ध शासकीय यंत्रणेची किंवा यंत्रणांची आहे, ते ती ती जबाबदारी नीट पार पाडत आहेत की नाही? हे सर्व तपासले पाहिजे.

अमृततुल्य चहासाठी प्रसिद्ध असलेले पुणे, आता वेगवेगळ्या प्रकारच्या पबमुळे कुप्रसिध्द होत चालले आहे. साध्या फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरून संध्याकाळी चक्कर न मारता थोडा वेळ जरी आपण उभे राहिलो तरी, बदलत्या पुण्याची झलक आपल्याला पहायला मिळते. तर पहायला मिळत नाही,असे काय काय चालले असेल, असते हे तिथे जाणारेच सांगू शकतील.

विद्येचे माहेरघर असलेल्या या शहरात, आधी आजूबाजूच्या औद्योगिक वसाहतींमुळे आणि गेल्या काही वर्षात फोफावलेल्या आय टी इंडन्स्ट्रीमुळे  आता विद्येबरोबर ‘लक्ष्मी'चा  वावर सुद्धा अफाट वाढला आहे. कुठल्याही चांगल्या औषधाचे जसे काही चांगले परिणाम होतात, तसे काही वाईट परिणामही होतातच. तसे ते पुण्याच्या तुफान होत चाललेल्या ‘प्रगती' बद्दल म्हणता येईल. शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधीमुळे आज पुण्यात युवा लोकसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि ती वाढतच जाणार आहे. पण गाडी जितक्या वेगात असेल, तितकेच त्या गाडीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. तसे ते न ठेवता आल्यास अपघात हा होणारच. तसे ते अपघात, अपघात म्हणजे केवळ वाहनांचे अपघात नाहीत तर अन्य अनेक प्रकारचे घात, अपघात ज्याच्या बातम्या होतात,असे घडतात.

आता हे झाले सद्य परिस्थितीचे विश्लेषण. पण मग ही परिस्थिती सुधारावी, न घडाव्या अशा घडून गेलेल्या घटना परत घडू नये, यासाठी काय करावे लागेल ? याचा शासन, शिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस, खाजगी हॉस्टेलचे मालक, चालक, समाज शास्त्रज्ञ, मनोविकार तज्ञ, अशा आणि इतर संबंधित घटकांनी एकत्र येऊन विचार विनिमय करून काही ठोस, उपाययोजना केली पाहिजे. अन्यथा बदनाम होत चाललेल्या पुण्यात कुणी पालक आपल्या मुलामुलींना ना शिक्षणासाठी पाठवणार, ना नोकरीसाठी पाठवणार, असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते? - देवेंद्र भुजबळ 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

गजालीतल्या माणसाचे पुस्तक