गजालीतल्या माणसाचे पुस्तक

मनुष्य स्वभाव, स्त्रियांचे प्रश्न, अंधश्रद्धा, जात पात, सामाजिक समस्यांना हात घालून त्या उजागर केल्या आहेत. यातील अनेक कथा आपल्या आजुबाजूला घडलेल्या/घडत असल्याने त्या आपल्या वाटतात. लेखकाने ती ती पात्र त्या त्या कथा आपल्या पद्धतीने मांडून त्या कथा वाचनीय केलेल्या आहेत.

गेली अनेक वर्षे एखाद्या वृत्तपत्रात वा फेसबुकवर सतत नसले तरी अधूनमधून एखादी छोटी मालवणी विनोदी कथा वाचत होतो, मुळातच मी स्वतः मालवणी; त्यातही बालपण गावी गेल्याने त्यातील बऱ्याच कथा आपल्या आजुबाजूला घडलेल्या वाटत असल्याने आवडत होत्या. जवळपास ५० वर्षे मुंबई ठाण्यात राहात असल्याने मालवणी बोलत असूनही कालौघात काही विशिष्ट शब्द विस्मृतीत गेलेले होते, जे आता गावीही बोलले जात नाहीत. तसे दोन चार शब्द प्रत्येकवेळी पुन्हा त्या कथांमधून सापडत होते. त्यांच्या विनोदी अंगाने काही स्वभाव दर्शन घडवणाऱ्या सुंदर अशा ‘दाटू माटूच्या गजाली' प्रसिद्धी माध्यमांवर अलिकडेच वाचल्या होत्या असे साहित्यिक आणि ‘सिंधुदुर्ग प्रतिष्ठान, मुंबई'चे अध्यक्ष प्रकाश सरवणकर यांचे ‘गजालीतली माणसे' हे पुस्तक नुकतेच वाचले.

 पुस्तक हातात पडताच मुखपृष्ठ पाहून मलपृष्ठ पाहतो तर तेही मुखपृष्ठच असल्याचे दिसले. एका बाजूने गजालीतली माणसे' कथा मराठी भाषेत तर दुसऱ्या बाजूने वेगळ्या कथा मालवणी भाषेत अशी पुस्तकाची रचना आहे. अर्थातच मालवणी कथांपासून सुरूवात केली आणि पहिलीच आवळ्यांची गजाल वाचून कथेच्या शेवटी शेवटी डोळ्यात पाणी येईपर्यंत खूप हसलो, बाईंविषयी कणव वाटली. नमनालाच भन्नाट कथा झाल्यावर पुढे उत्कंठा वाढली आणि मग शिमग्याची गजाल शिकाऱ्याचीच कशी शिकार होते हे समजले तर एक र्सावत्रिक नमुना दिलपो वायरमनची भेट झाली. अशी माणसे म्हणजे सहन होत नाहीत नि टाळताही येत नाहीत. बापाचा बाहेरख्यालीपणा आईसमोर मोठ्या खुबीने उघड करणारा मुलगा - बाळगो ‘गंग्याचे रंग ढंग' कथेत भेटला तर पुढे एखाद्या धडधाकट मुलापेक्षा आपल्या व्यसनी मुलाची काळजी करणारी ‘आये'ची भेट झाली. ‘गजाल डुकराच्या पारधीची' कथा एका इंग्रजी कथेला दिलेली खमंग मालवणी फोडणी आहे. भूतांची भीती आणि उत्कंठा सगळ्यांनाच असते तरी कोकण आणि कोकणी माणूस मात्र भूताखेतांसाठी वाजवीपेक्षा जास्त बदनाम झालेला आहे. बऱ्याचवेळा भूतांच्या गोष्टींमागे काही दुसरीच कारणे कशी असतात हे लेखकाने ‘गजाल भुतांची' या कथेत खुमासदारपणे रंगवले आहे. पूर्वी कुणाच्या डोक्यावर जुवाळ (दोन कावळे एकत्र) पडले किंवा गणेश चतुर्थीच्या रात्री कुणी चंद्र पाहिला तर त्या माणसाचा मृत्यू होतो वा भयंकर संकटे ओढवतात असे मानले जाई व तसे घडू नये म्हणून काय उपाय योजना करीत ते ‘जुवाळ' कथेत रंगवले आहे. पूर्वी असे अनेकदा घडलेले गावातील लोकांना माहिती असेल. बालपणी झालेले संस्कार महत्वाचे असतात. पुढे तेच आपल्या वर्तनात दिसतात. चांगुलपणाची छोटीशी गजाल ‘सौंस्कार' या कथेत वाचायला मिळते. ठेकेदार - मग ते गावचे असो की शहरातील, त्यांच्या अंगी बनेलपणा सारखाच असतो. ते त्यांच्या संपर्कात आलेल्या माणसांना चूना लावल्याशिवाय रहात नाहीत; पण त्यांनाही कधीं कधीं एखादा त्यांचाही बाप मिळतोच. म्हणतात ना, ‘शेरास सव्वाशेर' तसा प्रकार ‘बाबलो आचरेकार' वाचताना सापडतो. एखादी गोष्ट लपविण्यासाठी कसे खटाटोप करावे लागतात, मने सांभाळावी लागतात, अटी मान्य कराव्या लागतात याचे दर्शन ‘गुपीत' या छोट्याशा कथेत होते आणि अलिकडे समाजात झपाट्याने रूढ होत चाललेली अगदी टुकार फॅशन म्हणजे प्रि वेडिंग शुटींग होय. या प्रि वेडिंग शूटच्या नादात अनेकदा कशा चुका होतात, धोके असतात हे आपण बऱ्याच ठिकाणी वाचलेले / ऐकलेले असते तशीच एक मस्त कथा आपल्याला ‘गजाल -प्रि वेडिंग शूटची' या मालवणी गजालीतील शेवटच्या गजालीत वाचायला मिळते. लेखकाने बालपणी व आता आपल्या समाजात पाहिलेल्या / घडत असलेल्या घटनांचे निरीक्षण करून त्या आपल्या ढंगात खुबीने लिहिल्यात, ज्या वाचताना वाचक त्यात गुंतत जातो. समाजातील अनेक व्यक्तींचे स्वभाव दर्शन घडते.

मराठी कथांमधून लेखकाने वेगवेगळ्या कथांमधून - तरूणपणी वैधव्य आल्याने मनातील दबलेल्या काम भावनांचा ‘आवेग' कधी कधी माणसाला विशेषतः स्त्रियांना अनावर झाल्याने कसा अनर्थ घडतो हे दाखवलेले आहे; मात्र असे प्रकार समाजात अगदी अभावानेच घडत असतील, वेळेत विवाह न झाल्याने अविवाहित प्रौढ मुलींची होणारी ‘घुसमट' कोणत्या थरापर्यंत जाऊ शकते, आता ‘ऑनलाईन'च्या जमान्यात मुली - स्त्रियांची कशी फसवणूक होते - अत्याचार होतात या विषयांवर धाडसाने लिहिलेले आहे. हिंदी चित्रपट ‘भुलभुलैया' च्या जवळची वाटणारी कथा ‘कामिनी'मध्ये मांडलेली आहे तर ‘एक झाड दोन पक्षी' ही कथा थोडीशी वासु सपना सारखी प्रेमी युगुलांची आहे. मुले नसलेल्या जोडप्यातील एकट्या वृद्धाची खूप चांगली कथा ‘वृद्धाश्रम' शिर्षक असलेल्या कथेत वाचायला मिळते. खरा वारस हा नेहमी आपल्या रक्त मांसाचाच असू शकतो का ? या प्रश्नाचे उत्तर ‘वारस' कथेत मिळेल तर माणसाने नेहमीच कृतज्ञ कसे असावे हे ‘खुदा का बंदा' या कथेतून समजते. वरवर दिसणाऱ्या रंगरूपावरून माणूस पारखू नये त्याने फसगत होते असा छान संदेश ‘काय भुललासी' या कथेतून मिळतो. ‘भूक' या छोट्याशा कथेत आपल्याला गावोगावी जशा भूतांच्या अनेक कथा पिढ्यानपिढ्या ऐकवल्या जातात तशीच एक कथा वाचायला मिळते. आंतरिक इच्छा असेल तर काही गोष्टी कशा आपसूकच जुळून येतात हे ‘देवाक काळजी' या कथेतून समजते. मराठी भाषेतील शेवटची बारावी कथा ‘अखेरचा श्वास' खूपच हृदयस्पर्शी आहे. लेखकाने या कथांमधून (गजालींमधून) मनुष्य स्वभाव, स्त्रियांचे प्रश्न, अंधश्रद्धा, जात पात, सामाजिक समस्यांना हात घालून त्या उजागर केल्या आहेत. यातील अनेक कथा आपल्या आजुबाजूला घडलेल्या/घडत असल्याने त्या आपल्या वाटतात. लेखकाने ती ती पात्र त्या त्या कथा आपल्या पद्धतीने मांडून त्या कथा वाचनीय केलेल्या आहेत. प्रकाशजींचे हे पहिले पुस्तक आहे हे कोठेही जाणवत नाही; कारण ते गेली अनेक वर्षे लिहीत आहेत आणि ते स्वतःही ‘गजालीत' असतात.

            गजालीतली माणसं  लेखक - प्रकाश सरवणकर
प्रकाशक - सिंधुदुर्ग प्रतिष्ठान प्रकाशन,मुंबई मुल्य ः रू.२००/-
 - मनमोहन रो. रोगे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मानवी प्रगतीसाठी वन्यजीवांना त्रास सहन करावा लागू नये