पसारा
आपली मराठी संगीत नाटके हल्ली मागे पडल्यात जमा आहेत. आम्हाला मराठी पत्रकारिता शिकविणारे नाटककार, ज्येष्ठ पत्रकार-संपादक यांना आम्ही विद्यार्थ्यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता. त्याला त्यांनी उत्तर दिले होते, ... मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत संगीत नाटकं लिहीतच राहणार! त्यांनी आयुष्यभर ते तत्त्व खरेही करून दाखविले. मला संगीत नाटके आवडायची आणि आवडतात. विद्याधर गोखले यांचे जय जय गौरीशंकर, गोविंद बल्लाळ देवल यांचे संगीत संशयकल्लोळ.... अशी कितीतरी नाटके मी पाहिलेली आहेत.
वीर वामनराव जोशींच्या संगीत रणदुंदुभी नाटकातले जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा या मुखड्याचे एक सुंदर पद मधुवंती दांडेकरांच्या मधुर आवाजात ऐकले होते.
या जगात माणसाला जन्म मिळाला खरा. पण त्याचा हेतू काय, याचे उत्तर आजपर्यंत कुणालाच सापडले नाही. कोण म्हणते, आपल्याला मानव जन्म लाभला तो देवाची भक्ती करण्यासाठी. कोण म्हणते, दानधर्म करण्यासाठी.... यातले एकही उत्तर मला आजपर्यंत पटलेले नाही!
खरोखर मला तर मानव जन्म म्हणजे वेड्यांचा पसाराच वाटतो! कुणाला धन कमविण्याचे वेड, कुणाला घरे विकत घेण्याचे वेड; तर कुणाला शेअर बाजार खेळण्याचे वेड..... एकाचढी एक वेड! काय पुसू नका!! आदि शंकराचार्यांचे ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या (जगत्असत्य असून ब्रह्म सत्य आहे) हे आध्यात्मिक वचन मला योग्य वाटू लागते. कारण भगवद्गीतेत म्हटलेच आहे, वाक्यं सत्यं परमं ब्रह्म. सत्य वचन हेच परम ब्रह्म आहे.
माझा नातू, मुलीचा मुलगा, दीडदोन वर्षांचा असावा. घरात घोडा, वाघ, हरण जिराफ, बैलगाडी, मोटर कार अशी खेळणी घेऊन घरात खेळत होता. आई त्याला म्हणाली, अरे खेळण्यांच्या हा किती पसारा? जमा करून ठेव बरं तो. आपल्याला न्हाऊ कराचाय आता. मग मायलेक खेळण्यांचा पसारा आवरून ठेवीत. हे मधूनमधून घडतच असे. पसारा हा शब्द नातवाच्या डोक्यात चांगलाच घर करून बसला होता.
एकदा त्याला खेळणीच्या ट्रेमधली खेळणी हवी होती. तो म्हणाला, आई, मला पसारा दे ना. मला खेळायचंय. - नाना ढवळे