भरती ओहोटी (जीवनचरित्र)
कोकणातील मच्छीमार ते यशस्वी उद्योजक अशी वाटचाल केलेले श्री कृष्णा गावकर यांचे जीवनचरित्र मराठी साहित्यविश्वात प्रकाशित झाले आहे. हे शामसुंदर कृष्णा गांवकर यांनी लिहिले असून ते पुस्तक आटोपशीर आणि चरित्रात्मक असल्याने वाचताना कधीही कंटाळा येत नाही. आपल्या वडिलांचे चरित्र असल्याने त्यात सर्व गोष्टींचा तपशीलवार आढावा लेखकाने घेतला गेला आहे.
या चरित्रात्मक पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या वडिलांच्या प्रति असलेल्या आदराला कुठेही धक्का लागू न देता लिखाण केले आहे. चरित्र ग्रंथातील सर्व कथानक हे कोकणात घडलेले असल्यामुळे वाचताना एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते.
पारतंत्र्यात जन्म झाला तरी वयात येईपर्यंत देश स्वतंत्र झाला होता. त्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न पुढे आ वासून उभा राहिला. त्याकाळी कोकण किनारपट्टीवर प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटी होत्या. दर्यावर्दी कोकणच्या तरूणांचे ते एक मुख्य आकर्षण होते. बहुतांश तरूण त्या बोटींवर नोकरी करायचे. आठ महिने नोकरी आणि चार महिने शेती किंवा मासेमारी असा एकंदर उपद्व्याप चाले. वादळवारे यांची पर्वा न करता बोटीवर नोकरी करणे हे एक आव्हान होते.
अशाच वादळात चरित्र नायकाची बोट क्षतिग्रस्त झाल्यावर ते आपल्या मुळ गावी गेले. मासेमारी हा पारंपरिक व्यवसाय होता. त्याला पुरक असे व्यवसाय प्रवाहाबाहेर जाऊन त्यांनी सुरू केले. त्याची रंजक आणि तेवढीच करूण कहाणी रेखाटण्यात लेखक यशस्वी झाला आहे. त्यानिमित्ताने त्या भागातील यशस्वी व्यक्ती आणि त्यांच्या धंद्यांची संपूर्ण माहिती वाचताना आपल्याला होते. आतापर्यंत माहिती नसलेल्या परिसराची आणि समुद्राची छान ओळख होते.
विषय वेगळा आहे. मांडणी वेगळी आहे. त्यातच कोकणातील एका दर्यावर्दी माणसाची परिस्थितीशी आणि निसर्गाच्या अकस्मात उद्भवणाऱ्या संकटांशी सामना असा एकंदर प्रवास आहे. एका झुंजार दर्यावर्दीची यशस्वी झुंज रेखाटण्यात यश आले आहे. तिथे कुठल्याही प्रकारची तडजोड केलेली नाही. अशा प्रकारचे चरित्र मराठी भाषेत प्रथमच आले आहे. वाचकांना निश्चित आनंद देईल यात शंका नाही.
या सर्व प्रवासात त्यांच्या पत्नीने दिलेली साथ फार मोलाची आहे. काहीही शिक्षण नसताना लक्ष्मीच्या पावलांनी घरात आलेल्या कष्टाच्या मोबदल्यामुळे संपूर्ण घर कुटुंब आपल्या हिंमतीवर आणि अखंड मेहनतीने व्यवस्थित हाताळले. धाडस माणसाला प्रत्येक क्षेत्र काबीज करण्याचे बळ देते. सर्वच बाबतीत त्याकाळी अनुकूल परिस्थिती नव्हती. तरीही प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी काही धाडसी पावले उचलली. प्रबळ इच्छाशक्ती याशिवाय याला काही शब्दच नाही. तरूण पिढीला मार्गदर्शन आणि दिशा दाखवेल असे एकंदर कर्तृत्व या पुस्तकात वाचकांना अनुभवायला मिळेल यात तिळमात्र शंका नाही.
भरती ओहोटी लेखक : शामसुंदर कृष्णा गांवकर
प्रकाशक : सृजनसंवाद प्रकाशन किंमत : ३००/रु.
-गजानन परब