नाम, नामकरण, नामांतर
आपले नाव, आडनाव, आई-वडील, आपला धर्म, आपली जात, आपला देश, आपले नातेवाईक, आपला वर्ण यातले काहीही ठरवण्याचा अधिकार आपल्याला नसतो. ते सारे आपल्याला आपोआपच, जन्माने मिळते. मग ते तुम्हाला आवडो..न आवडो.. म्हणजेच आपल्याला नाव देणारे लोक चांगले, प्रगल्भ, विचारी असले पाहिजे तरच आपल्याला नावासह चांगले कौटुंबिक पर्यावरण लाभू शकते.
यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात दोन बालिकांच्या नामकरण सोहळ्यांना जायचा योग आला. दोन्ही कार्यक्रम घरगुती, कौटुंबिक जिव्हाळ्याचे असले तरी ते राहत्या घरात पाळणा टांगून (शक्यतो महिला वर्गाच्याच बहुसंख्य उपस्थितीने ) पार पडले नाहीत. त्यासाठी सभागृह घेण्यात आले होते. तेथे इतर अनेक कार्यक्रमांची जोड त्या ‘नामकरण सोहळ्यांना' देण्यात आली होती. एक होती माझ्याच भावाची नात. तिच्या डॉक्टर मातापित्यांनी तिचे नाव ‘राधा' ठेवले. तर दुसरा सोहळा होता ‘कविता डॉट कॉम'चे निर्मिती सुत्रधार श्री. रविंद्र पाटील यांच्या नातीच्या नामकरणाचा. तिचे नाव मोठ्या अभिनव पध्दतीने रंगमंचीय सोहळ्यात महाराष्ट्राचे नामांकित कवी श्री.अनंत राऊत यांच्या हस्ते (किंवा मुखे म्हणा फारतर!) ‘गाथा' असे ठेवण्यात आले. मला व्यक्तीशः हे दोन्ही कार्यक्रम व ही दोन्ही नावे मनापासून आवडली हे वेगळे सांगायला नकोच!
मी थोडे मागच्या काळात, एक दोन पिढ्या आधीच्या नावांकडे जातो. त्या काळच्या अनेक व्यक्तींची नावे दगडू, धोंडू, उंदऱ्या, बेमट्या या आणि अशा प्रकारची असत. याचा मागोवा घेतल्यास असे समजते की कुटुंब नियोजनाची साधने उपलब्ध नसण्याच्या व शेतीवर अवलंबून असण्याच्या त्या काळात अनेक अपत्ये जन्माला घातली जात. नवजात बालकांचे आरोग्य अबाधित ठेवणाऱ्या विविध लसींचा शोध लागण्याआधीच्या त्या दिवसांत मग बाळंतपणात योग्य ती काळजी न घेतल्याने एकतर माता तरी दगावत असे किंवा तिची अपत्ये तरी मृत्युमुखी पडत असत. मग ‘बाहेरची बाधा', ‘देवाची नड', ‘पूर्वजांचा कोप' असा समज करुन घेत लोक गावातल्या ग्रामजोशाकडे किंवा भगताकडे किंवा देवऋषीकडे जात. ते लोक सांगत की ‘झाडापानावरुन, दगडधोंड्यावरुन नावे ठेवून बघा, मुल जगेल.' बोलाफुलाला एक गाठ पडे व मुल जगे व त्याला गंमतीशीर नाव घेऊन आयुष्यभर वावरावे लागे.
याबरोबरच देवीदेवतांची नावे ठेवण्याचाही तो काळ होता. यात गंमत अशी की ही नावे ठेवताना बऱ्याचदा देवीदेवतांच्या आपापसातील नात्यांचा विचार केला जात नसे. म्हणजे बघा...एखादे मुल झाले की त्याचे नाव शंकर ठेवले जाई. मग काही वर्षांनी आणखी एक मुल झाले की त्याचे नाव गजाजन ठेवले जात असे. पुराणात शंकराचा पुत्र गजानन आहे याच्याशी त्या वर्तमानातल्या लोकांना काही घेणेदेणे नसे. ते गजाननाला शंकराचा भाऊ बनवून मोकळे होत असत. तीच बाब रामाची. त्या वर्तमानातल्या रामाचा लहान भाऊ दशरथ असू शके; तर नंतरचा मुलगा श्रीकृष्ण आणि त्यानंतरचा मुलगा वासुदेव असेही काही घरांमध्ये झाले आहे. हे झाले एक. मग हीच मुले मोठी होऊन त्यांचे विवाह झाल्यावर त्यांच्या पत्नी म्हणून आलेल्या महिलांची नावे बदलताना तरी योग्य ते भान ठेवले जावे, तर अनेक परिवारांतून तसे झाले नसल्याचे पाहायला मिळे. म्हणजे बघा..शंकर नावाच्या व्यवतीला त्याच्या पत्नीचे मूळ नाव बदलण्याचा चॉईस असे; पण अनेकदा ते नाव पार्वतीऐवजी सीता असे. तर लक्ष्मण नावाच्या इसमाच्या बायकोचे नाव तो सिंधु वगैरे ठेवत असे. हा झाला पौराणिक नावांच्या प्रभावाचा परिणाम. यानंतर मग आपल्याकडे सिनेमा अवतरला. त्यापाठोपाठ क्रिकेटचा अंमल वाढला. त्यामुळे मग त्यातील गाजलेल्या व्यक्तीमत्वांची नावे मुलांना ठेवण्याचे युग आले. जसे की राजेश, मनोज, राज, दिलीप, शशि, सुनिल वगैरे वगैरे. एकेका गावात, एकेका चाळीत, एकेका इमारतीत पाच-दहा राजेश सहज सापडायचे असा काळ १९७० च्या सुमारास राजेश खन्ना या सुपरस्टारमुळे आला होता. तसे पाहिले तर राजेश खन्ना याचेच मुळ नाव जतीन होते. तीच बाब दिलीप कुमारची! पण तोही मुळचा युसुफ खान. तर सुनिल दत्त हा मुळचा बलराज दत्त. सुनिल गावस्कर याच्या क्रिकेटमधील गवगव्यामुळेही त्या सुमारास अनेक पालकांनी आपापल्या मुलाचे नाव सुनिल ठेवले होते. तर प्रत्यक्षात सुनिल गावस्कर हा वेस्ट इंडिज खेळाडू रोहन कन्हाय याच्या खेळाने प्रभावित होता. त्यामुळे त्याने त्याच्या मुलाचे नाव रोहन ठेवले होते. मात्र हे पोरगं भारतीय क्रिकेटमध्ये फारसं काही चाललं नाही. काही लोक आपल्या मुलांची नावे जन्मराशीनुसार जे आद्याक्षर आले त्यानुसार ठेवतात आणि वर आणखी एक घरातले म्हणून लाडाने घ्यायचे नावही असते. माझेच उदाहरण सांगतो. जन्मराशीनुसार माझे नाव ‘ह' अक्षरावरुन आले होते. म्हणून हेमंत असे ठरले. पण माझ्या आईला राजेंद्र हे नाव आवडे. याला कारण माझ्या जन्मापूर्वी माझे आईवडील पुण्यात राहायला असताना त्यांच्या शेजारी असणाऱ्या राजेंद्र नावाच्या बाळाचा लळा माझ्या आईला लागला होता. ती त्याचे खूप लाड करी. म्हणून माझे नाव राजेंद्र ठेवण्यात आले. माझे आजोबा गंमतीत आले की मला ‘अरे माझ्या राजा उंदरा' म्हणून गालगुच्चे घेत. मग मी लटक्या रागाने त्यांचे धोतर खेचत असे, त्यानंतर मग ‘अरे नाही रे माझ्या राजेंद्रा' म्हणत ते मला उचलून घेत त्यांचे खरखरीत हात माझ्या चेहऱ्यावरुन फिरवीत असत हे मला आजही स्पष्टपणे स्मरते. आज माझे आजोबा, आई-वडील या जगात नाहीत.. की ज्या बाळावरुन मला राजेंद्र हे नाव माझ्या आईने दिले ते बाळही मला कधी पाहायला मिळाले नाही.
यानंतरच्या काळात महानगरांतून मिश्र वस्ती वाढीला लागली. एकमेकांच्या प्रथा, परंपरा, चालीरीती यांची विचित्र सरमिसळ झालेली पाहायला मिळू लागली. मग यापासून नावे कशी दूर राहतील? खरे तर स्वीटी, जुली, डॉली, रीटा ही नावे मराठमोळ्या मुलींसाठी यापूर्वीच्या काळात ठेवली जात नसत. पण तीही नावे मराठी घरांतून घुसखोरी करु लागली. प्रियल, रुपल, सेजल अशी नावेही वाढत्या प्रमाणात आली. जिग्नेश (उच्चार जिग्नेस) निमिष, परेश (उच्चार परेस!) स्वीटू, सोनी, सनी, विकी, रॉकी या नावांनाही मराठी घरांतून स्थैर्य मिळू लागले. हे झाले नावांचे. पण अशा अनेक नावांना नीट न घेणे हाही जवळच्या मित्रांचा जणू जन्मसिध्द अधिकार असण्याचेही दिसते. जेवढे नावाचे वाटोळे तेवढा तो मित्र जवळचा. जसे गौतमचं गवत्या, गौरेशचं गौऱ्या, प्रसादचं पशा, प्रकाशचं पक्या, जनार्दनचं जन्या, सोमनाथचं सोम्या, रामनाथचं राम्या, जगन्नाथचं जग्या! इथपर्यंत ठीक होतं. पण आनंदचं एकदम आंड्या? मग रानडे आडनावाचं काय करणार बरे? मारणाऱ्याची काठी अडवू शकाल एकवेळ; पण बोलणाऱ्याचं तोंड नाही हेच खरं! जे नावांचं झालं तोच प्रकार आडनावांचा झाल्यालाही बराच काळ लोटला आहे. सचिन रमेश तेंडुलकर या भारतरत्न व्यवितमत्वाला ‘तेंडल्या' म्हणून संबोधणारेही अनेकजण आहेतच की! अनेक आडनावे परंपरेने चालत आलेली आहेत, उगाच त्यामागचा इतिहास शोधत बसण्यात काहीच अर्थ नाही. जसे की वाघमारे..याचा शब्दशः अर्थ कुणी घेत नसते; घेऊही नये. गाढवे, डुकरे, दहिभाते, हिंगमिरे, ढुंगणे, ढिसाळ, चिकटे, डोईफोडे, दातखिळे, चोरमारे, बडवे, बुचके, लचके, भुतडा, मुंदडा, भोंगळे ही व अशी अनेक आडनावे अनेक परिवारांना परंपरेने मिळाली आहेत.
सध्या हॉट टॉपिक ‘छावा' चित्रपटमुळे अधिक चर्चेत आलेले आडनाव ‘शिर्के' आहे. त्यावरुन मग छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना धमक्या देणं, त्यांच्यावर अब्रुनुकसानीचे दावे टाकण्याच्या बाता करणं, काही इतिहासकारांना यात ओढणं, त्यांना दरडावणं वगैरे प्रकारांना उत आला आहे. शिर्के आडनावाच्या व्यक्तींबद्दल सरसकट विधान करणं योग्य नव्हे. इतिहासात गणोजी शिर्के, सुर्याजी पिसाळ होऊन गेले, त्यांची काही कर्मे आहेत, त्याबद्दल मराठी व भारतीय जनमानस त्यांना माफ करणार नाहीच. त्यांच्याही वारसांनी याबाबत मध्यममार्गी समंजस भूमिका घ्यायला हवी. कलाकृतीकडे कलाकृती म्हणून मोठ्या मनाने पाहायला हवे. गांधीहत्या एका गोडसे आडनावाच्या ब्राह्मणाने केली, त्यावरुन सरसकट अनेक ब्राह्मणांची घरे जाळण्यात आली होती. गोडसे हे आडनाव ब्राह्मण नसलेल्या अन्य समाजविशेषांतही आहे. एखाद्या व्यक्तीविशेषाच्या वर्तनाची शिक्षा त्या संपूर्ण समाजालाच देणे योग्य वाटत नाही. खरे तर यवनी अंमलाखाली असताना भारतात अनेक समाज, व्यक्ती, महिला-मुली, देवळे, धर्मस्थळे, आस्थेची प्रतिके यांच्यावर अत्याचार, नासधूस, जाळपोळ, जुलुम झाले. भारतीय संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. देश स्वतंत्र झाल्यानंतर तरी यातून आपण बाहेर यायला हवे. जे या भारत देशाशी इमान राखून आहेत त्या मुसलमानांना भारताने नेहमीच प्रेमाने वागवले आहे. देशाचे राष्ट्रपती, गृहमंत्री, भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद अशी पदे देऊ केली आहेत. (पाकिस्तान, बांगलादेश येथे असे काही कधीतरी पाहायला मिळेल काय?) महमूद गजनवी, मुहम्मद बिन कासिम, चंगेज खान, तैमूर, औरंगजेब, अफझल, शायिस्तेखान या व असल्या परक्या, आक्रमक, विध्वंसकारी लोकांची नावे संपूर्ण भारतवर्षातील कोणत्याच वास्तूंना, रेल्वेस्थानकांना, सभागृहांना असता कामा नयेत. ती नामांतरे जलद घडवून आणण्यासाठी संपूर्ण देशवासियांनी आग्रह धरला पाहिजे. राजकीय अथवा इतर देशी विरोधकांबाबत आपापसात चर्चा करुन मार्ग काढता येईल. पण या भारत देशाच्या अस्मितेशी खेळणाऱ्या भूतकाळातील किड्यांचे नामोनिशान मिटवायला मात्र सगळ्यांनी एकत्र यायलाच पाहिजे.
-- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई