माझी मराठी शाळाच हरपली

मराठी भाषेसाठी सामूहिक प्रयत्न होणे फार गरजेचे आहे. प्रत्येकाने मराठी बोलणे फार गरजेचे आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात आपण मराठी बोलले पाहिजे, लिहिले पाहिजे, मराठी वर्तमानपत्र वाचले पाहिजे, मराठी कविता, लेख, निबंध, लघु कथा, पुस्तके लिहिली पाहिजेत, वाचली पाहिजेत. तसेच गोष्टी सुद्धा मराठीत सांगितल्या पाहिजे. वाढदिवसाला मराठी पुस्तके भेट दिली पाहिजेत.

मी महाराष्ट्रात जन्मलो. माझी मातृभाषा मराठी. मी अमरावतीच्या नगर परिषदेच्या मराठी शाळेत शिकलो. मला ह्या सर्वांचा खूपच अभिमान आहे. माझे संपूर्ण शिक्षण मराठीतच झाले. मध्ये मी थोडे शिक्षण सेमी इंग्रजीत घेतले.

मला एक क्षण अजूनही आठवतो.  मी १९८० ला बारावीत न्यू हायस्कुल मेन, अमरावती येथे शिकत असतांना सामान्य परीक्षेत मराठीचे प्राध्यापक मराठी विषयाचे पेपर तपासून देत असतांना अचानक त्यांनी सूचना केली "अरविंद मोरे कोण आहे ?” मी एकदम घाबरून गेलो. मला वाटले मी नापासच झालो की काय? सरांनी मोठ्या अभिमानाने म्हटले, "मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत कुठल्याही विद्यार्थ्याला ७५ मार्क दिले नाहीत. परंतु आज मी ह्या विद्यार्थ्याला मराठीत ७५ गुण देत आहे. त्याने पेपर खूप छान लिहिलेले आहे. निबंध आणि पत्र तर खूपच छान लिहिलेले आहे. मी त्याचे अभिनंदन करतो व त्याला शुभेच्छा देतो.” वर्गातील सर्व मुलांनी टाळ्या वाजविल्या. त्या सरांचे नांव मा. खापर्डे सर होते. मी काही तेव्हा खूप हे मनावर घेतले नाही.

ग्रॅजुएशन करत असतांना स्पर्धात्मक परीक्षा पास झालो आणि बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सेवा केली. बँकेत सेवा करीत असतांना लेखनाचा छंद कधी लागला कळला सुद्धा नाही. मी जवळपास २०० च्या वर विविध विषयांवर लेख लिहिले असतील. नुतकेच मी २०२३ ला ”कुतूहलाचा करिश्मा  हे पुस्तक लिहिले.

पुस्तक प्रकाशित झाल्यावर माझी पहिली उत्सुकता ही होती की, हे पहिले पुस्तक आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेच्या ग्रंथालयात असावे म्हणून मी नगर परिषद शाळा क्रमांक १६, अंबिका नगर, अमरावती येथे गेलो. शाळेचे भव्य मैदान पार केले व शाळेच्या वास्तूत शिरलो. मी इकडे तिकडे बघत होतो तर विद्यार्थी मला दिसलेच नाही. मला वाटले शाळेला कदाचित सुट्टी असेल. मला कोणी तरी विचारले कोण पाहिजे? मी म्हटले शाळा पाहिजे. मला त्यांनी सांगितले शाळा तर केव्हाच बंद झाली. आता इथे महानगरपालिकेचे आरोग्य प्राथमिक केंद्र आहे. मला आश्चर्याचा धक्का बसला व फार दुःख सुद्धा झाले की आपण लिहिलेले पहिले पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात संग्रही असावे म्हणून. ते स्वप्न पार धुळीस मिळाले.

नंतर मी जिज्ञेसेपोटी चौकशी केली शाळा अशी कशी बंद झाली? त्यांनी सांगितलेली माहिती ऐकल्यावर खरोखर माझीच काय मराठी भाषेचीसुद्धा झोप उडविणारी होती. सगळीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडल्या आहेत, सगळीकडे सी.बी.एस.ई. चे शिक्षण आहे, श्रीमंतांची मुले इथे येत नाहीत, नौकरी करणाऱ्यांची मुले येत नाहीत. कारण की ह्या शाळेत रिक्षाचालकांची, घरकाम करणाऱ्यांची व झोपडपट्टीत राहणाऱ्यांची मुले शिक्षण घेतात. मग कोण येईल या शाळेत? मराठी शाळा ह्या जवळपास बंद झाल्या आहेत आणि शेवटच्या घटका मोजत आहेत. मी लगेच पलॅश बॅक मध्ये गेलो. त्या काळात काय वैभव होत. एका-एका इयत्तेचे अ, ब, क, ड, इ, ई  असे सहा-सहा वर्ग होते. आता तर अशी दैना आहे की एकाच वर्गात पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथीचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

मध्यंतरी १४७८३ शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने २० पेक्षा कमी पट संख्या आहे म्हणून घेतला होता. मग ह्या  दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे व शिक्षकांचे भविष्याचे काय होणार?  कसा प्रचार व प्रसार होणार? मराठी भाषा ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे. भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे १४ कोटी आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा ही समृद्ध भाषा आहे. मराठी भाषेचे वय सुमारे २४०० वर्ष आहे. मराठी ही भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक आहे. सध्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ३ ऑक्टोबर, २०२४ ला मिळाला. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला.

मातृभाषा ही केवळ मातृभाषा नसते तर ती आपला जिव्हाळा, आत्मा व स्वाभिमान सुद्धा असतो. आम्ही २००७ ला केरळला फिरायला गेलो होतो. बहुतेक जण इंग्रजी आणि हिंदी बोलत होते. अचानक कोणी तरी मराठी बोलले आम्हाला हायसे वाटले. कोणी तरी आपले भेटल्यासारखे वाटले. इथे जात, धर्म, पंथ, ऊच नीच, गरीब श्रीमंत ही कुठलीही दरी नव्हती केवळ आपले पणाचा भाव होता. मराठी भाषेवर इंग्रज आल्यावर एव्हढी आक्रमणे झाली नाहीत  तर १९९१ नंतर जे जागतिकरण झाले, त्यामुळे जास्त परिणाम आपल्याला जाणवायला लागलेत. प्रत्येक जण इंग्रजीत बोलण्याचा, लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे. मराठीत बोलल्यामुळे न्यूनगंड निर्माण होतो आहे. ह्याचा सुद्धा खूप मोठा परिणाम मराठी भाषेवर होतो आहे.

मराठी भाषेसाठी सामूहिक प्रयत्न होणे फार गरजेचे आहे. प्रत्येकाने मराठी बोलणे फार गरजेचे आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात आपण मराठी बोलले पाहिजे, लिहिले पाहिजे, मराठी वर्तमानपत्र वाचले पाहिजे, मराठी कविता, लेख, निबंध, लघु कथा, पुस्तके लिहिली पाहिजेत, वाचली पाहिजेत. तसेच गोष्टी सुद्धा मराठीत सांगितल्या पाहिजे.

 वाढदिवसाला मराठी पुस्तके भेट दिली पाहिजेत.मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी शाहिरांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, बहिणाबाई चौधरी व संत गाडगे बाबा यांनी सुद्धा किर्तनातून मराठी भाषेचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केला आहे ही खरोखर अभिमानास्पद व कौतुकास्पद बाब आहे.
मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. - अरविंद मोरे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

आपली मातृभाषाच आपल्याला घडवते