आपली मातृभाषाच आपल्याला घडवते
आपण शाळा महाविद्यालयात आपण पाहतो की, मुलांना मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषेचे ज्ञान अपुरे असल्यामुळे कोणतीच भाषा नीट येत नाही. ती मुले धड कोणत्याच भाषेत पारंगत होऊ शकत नाही आणि विचित्र वाक्यरचना करतात. उदा. मी भागत आली, मी रनलो, आता याचा अर्थ काय समजायचा? त्याऐवजी मी पळत आलो, हे समजायला किती सोपे! पण जर आपल्या भाषेमध्ये हिंदी इंग्रजीचे शब्द वापरले तर वाक्यरचना देखील बदलते आणि त्याचा अर्थदेखील बदलतो. आपल्या मातृभाषेमधून जे काही ज्ञान घेतो ते ज्ञान कधीच संपत नाही किंवा पुरेदेखील पडत नाही. कारण लहानपणापासून जे आपण आपल्या मातृभाषेतून शिकतो ते समजायला खूप सोपे जाते.
माझ्या मराठीची बोलू कौतुके । परी अमृतांतही पैंजा जिंके । ऐसी अक्षरे रसिके मेळवीन ।। १।।
श्री ज्ञानेश्वरी ६ वा अध्याय यामधील ही ओवी आहे. या ओवीतून मराठी भाषेविषयीचा अभिमान व्यक्त झाला आहे. अमृता पेक्षा गोड असलेल्या मराठी भाषेविषयीची गौरवाची भावना आणि आपल्या शब्द सामर्थ्यावर असणारा सार्थ विश्वास व्यक्त करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझ्या मराठीतून अमृताशी पैज जिंकणारी अशी रसाळ अक्षरे मी निर्माण करीन. ही कविता ११ वी अकरावीच्या पुस्तकात ऐसी अक्षरे रसिके या नावाने विद्यार्थ्यांना शिकवण्यास आहे. आणि त्याची प्रस्तावना वाचल्यानंतर असे मनात आले की खरंच ! आपली मराठी भाषा किती रसाळ, मधुर आणि सुंदर आहे. जसे आपण तिला वळवू तशी आपली मराठी भाषा वळते आणि आपल्याला खूप काही सांगून जाते.
खरंच! मराठी म्हणण्यापेक्षा आपण आपल्या मातृभाषेमधून जे काही ज्ञान घेतो ते ज्ञान कधीच संपत नाही किंवा पुरे देखील पडत नाही. ते आपल्याला अजून घ्यावेसे वाटते, कारण लहानपणापासून जे आपण आपल्या मातृभाषेतून शिकतो ते समजायला उमजायला खूप सोपे जाते. अवघड कामे आपल्याला आपल्या मराठी, मातृभाषेतून जर समजावून सांगितली तर ती आपल्याला आत्मसात करायला कठीण जात नाही. पण, तेच काम जर आपल्याला इतर कोणत्या भाषेमध्ये सांगितले, तर ते आत्मसात करायला थोडा वेळ जातो. मग जर आपल्याकडे प्रत्येकाची आपली स्वतःची हक्काची आपली मातृभाषा असेल तर आपण इतर भाषा का स्वीकाराव्यात? व्यवहारज्ञानासाठी इतर भाषा स्वीकारणे गरजेचे आहे आणि ते आपण आत्मसात देखील करत आहोत. पण आपल्या रोजच्या जीवनामध्ये, व्यवहारामध्ये जर इतर भाषांची आवश्यकता नसेल, आपल्या मातृभाषेत जर आपले काम होणार असतील तर आपली भाषा शिकणे, आत्मसात करणे आणि जतन करणे गरजेचे आहे.
आई आपल्या लहान मुलाला जेवण भरवताना एक घास चिऊचा, एक घास काऊचा असे म्हणून त्याला एक एक घास भरवत असते. आणि छान छान गोष्टी सांगत असते. आई जेव्हा आपल्या मुलाला ह्या छान छान गोष्टी तिच्या भाषेत समजावून सांगत असते, तेव्हा ते बाळ एकाग्र होऊन ऐकत असतं आणि अनुकरण करत असतं, का ? तर, त्याला आपल्या आईची भाषा पटकन समजत असते. तो आईने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जरी त्याला बोलता येत नसेल तरी तो त्याची बोबडे बोल बोलून किंवा हातवारे करून सांगत असतो आणि आई देखील ते समजावून घेत असते. हे सर्व का शक्य होते? तर, आई त्याच्याशी त्याच्या मातृभाषेत बोलत असते. त्यामुळे दोघांना आपल्या भाषेची देवाण-घेवाण केल्यामुळे निर्माण होणारे प्रश्न, त्यांची उत्तरं सहज मिळत असतात आणि त्यांचा संवाद अगदी सहज होतो. म्हणूनच कदाचित असे म्हटले जाते की आपली मातृभाषा आपल्याला खूप काही सांगत असते आणि घडवत असते.
संत ज्ञानेश्वरांनी आपल्या मातृभाषेचे इतके गोड कौतुक केले आहे की ती रसाळ वाणी ते रसाळ शब्द ऐकतच राहावेसे वाटते. प्रत्येक शब्दाचा अर्थ कसा निघतो हे देखील त्यांनी इतक्या मधुर शब्दांमध्ये मांडून ठेवले आहे. आपल्या मराठी भाषेमध्ये संस्कृत या भाषेचा देखील खूप वापर केला गेला आहे. मग संस्कृत सर्वांनाच समजते असे नाही. त्यासाठी त्यांनी त्या संस्कृत शब्दांना जोडशब्द म्हणून मराठीत शब्द शोधले आणि ते आपल्याला सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत की की रसाळ भाषेत निर्माण केलेल्या या ओव्या म्हणजे मोठी मेजवानीच आहे. हे अकरावीच्या पुस्तकात प्रस्तावनेमध्येच इतके सुंदर लिहून ठेवले आहे की, ह्या ज्ञानेश्वरांच्या ओव्या जितक्या वेळा वाचू, तितक्या वेळा त्याचे अर्थ आपल्याला वेगवेगळे निघतच आहेत.
त्यामधील अजून एक ओवी म्हणजे ऐका रसाळपणाची या लोभा की श्रावणीची होती जिभा बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका आता यामध्ये त्यांनी इतके सुंदर सांगितले आहे की कळंबा म्हणजे कलह, भांडण! ज्ञानेश्वरांनी सांगितले की मी मराठी भाषा इतकी रसाळ मधुर बनवेल की ते ऐकण्यासाठी सगळ्या इंद्रियांमध्ये भांडण होईल की ही माझी वाणी, मला ऐकायची आहे. जिभेचे काम आहे की रसग्रहण करणे, अन्नाचा स्वाद घेणे; पण तिलादेखील मोह आवरत नाही आहे, मराठी शुद्ध भाषा श्रवण करण्याचा! ती कानाला म्हणत आहे की फक्त तुझेच ऐकण्याचं काम नाही, मी सुद्धा या रसाळ मधुर वाणीचा श्रवण करून स्वाद घेईल. त्यासाठी कान आणि जिभेमध्ये भांडण झालेले दाखवलेले आहे. मग इतके मधुर रसाळ आपली मराठी भाषा असताना आपण इतर भाषा शिकण्याचा किंवा वापरण्याचा अट्टाहास का करतो? ठीक आहे! व्यवहारिक जीवनासाठी इतर भाषा शिकणे गरजेचे आहे आणि आपण ते शिकू. पण जर आपल्याला आपलीच भाषा शुद्ध बोलता नाही आली, लिहिता नाही आली, तर आपण इतर भाषेचे ज्ञान तरी कसे घेणार? इतर भाषा लिहिण्यासाठी, समजण्यासाठी आपल्याला आधी आपली मातृभाषा शिकणे गरजेचे आहे. याच पुस्तकात लिहून ठेवलेले आहे की शुद्ध वाचाल तर शुद्ध लिहाल! शुद्ध लिहाल तर शुद्ध वाचाल! म्हणजेच प्रत्येक काम शुद्धतेने केले तरच ते पूर्णत्वाकडे नेता येते. मग त्यासाठी आवश्यक आहे ती आपली मातृभाषा.
आज काल आपण शाळा महाविद्यालय यामध्ये पाहत आहोत किंवा अनुभवत देखील आहोत, की मुलांना मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषेचे ज्ञान अपुरे असल्यामुळे कोणतीच भाषा नीट अवगत करता येत नाही. त्यामुळे ती मुले धड कोणत्याच भाषेत पारंगत होऊ शकत नाही आणि विचित्र वाक्यरचना करतात. उदाहरणार्थ मी भागत आली, मी रनलो, आता याचा अर्थ आपण काय समजायचा? जर ते तेच बोलले असते की मी पळत आलो, हे समजायला किती सोपे! पण जर आपल्या भाषेमध्ये हिंदी इंग्रजीचे शब्द वापरले तर वाक्यरचना देखील बदलते आणि त्याचा अर्थ देखील बदलतो.
आजकाल आपल्याला वाक्यरचना करताना मुलांमध्ये फरक जाणवत आहे. ना त्यांना काळ वापरता येत आहे, ना त्यांना वाक्य संश्लेषण समजत आहे, ना शब्द भेद समजत आहे. मराठी व्याकरण कुठे कसे वापरायचे हे देखील समजत नाहीये.
आत्ताच्या पिढीला जी भाषा समजते ती फक्त पैशांची भाषा समजत आहे. कोण श्रीमंत? कोण गरीब? त्यांच्या भाषेमध्ये स्टेटस बघितले जाते. स्टेटस जपण्याच्या नावाखाली भाषेचा तर गैरवापर करतातच पण आई-वडिलांनी दिलेला संस्कारदेखील ही आजकालची पिढी विसरत आहे. ज्या मातृभाषेने आपल्याला घडवले, ती मातृभाषा बोलताना त्यांना लाज वाटते. इतर भाषेमध्ये केलेला संवाद त्यांना मोठा वाटतो. आपला मूलगा किंवा आपली मुलगी आपल्याशी इतर भाषेमध्ये संवाद करते याचे त्यांना कौतुक वाटते. पण, आपल्या मातृभाषेत जेव्हा आजी आजोबा काही प्रश्न विचारतात तेव्हा उत्तर देता येत नाही किंवा टाळाटाळ केली जाते. मग ही टाळाटाळ कशाला ? त्यापेक्षा आपली मातृभाषा शिका. तिला पुढे न्या. जर तुम्ही मराठी मातृभाषा नीट शिकलात तर नक्कीच ते ज्ञान वाया जाणार नाही.
आपण इतर देशांचे अनुकरण करत आहोत. त्यांची भाषा आत्मसात करत आहोत आणि आता आपल्याला असे बघायला मिळते आहे की आपलीच मातृभाषा, तसेच संस्कृत भाषा, ते पाश्चात्य लोक आता शिकत आहेत. त्यांचे पठण करत आहेत. आयुर्वेद शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. का? तर ते जगण्यासाठी आवश्यक आहे प्रत्येक ठिकाणी पैसाच उपयोगी येतो असं नाही. शब्द ज्ञानदेखील उपयोगात येत असते.
आजकालची पिढी नको ते टेन्शन घेते. नको ते विचार मनात आणते आणि ते घालवण्यासाठी मोबाईलवर रिल्स बघणे, त्यासारखे अनुकरण करणे, चित्रपट बघणे, त्यातील काही कलाकारांसारखे अनुकरण करणे याकडे त्यांचा कल ओढवलेला आहे. पण आपल्या मातृभाषेमध्ये लिहून ठेवलेले ग्रंथ, कादंबरी, कविता वाचले जात नाहीत. इतक्या सुंदर कादंबऱ्या आहेत, इतके सुंदर ग्रंथ आहेत, की जे आपल्याला जीवनाचा अर्थ सांगतात, त्यातील सार्थ सांगतात आणि जगायचं कसं ते पण सांगतात. प्रत्येक कठीण प्रसंगांमध्ये, पुस्तकांमध्ये लिहिलेलं एक-एक वाक्य, एक-एक शब्द खूप सारं सांगून आणि शिकवून जातं. त्यासाठी आत्महत्या करणं, घर सोडून जाणं किंवा एखाद्याचा खून करणं हे कधीच लिहिलेलं नाही. त्यामध्ये लिहिलेलं आहे ते फक्त उत्तम ज्ञान आणि त्या ज्ञानातून मिळणारी ऊर्जा हे आपल्याला खरं आयुष्य कसं जगायचं, कसं घडवायचं हे सांगत असते.
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी! त्यासाठीच तर असं म्हणून ठेवला आहे की जसं शुद्ध बीज पेरलं ती नक्कीच येणारी फळं ही रसाळच असणार तसेच आपण आपल्या पुढच्या पिढीला जसे ज्ञान देऊ तसे ती पिढी ते ज्ञान आत्मसात करणार आणि त्याचं अनुकरण करणार. मग आपल्याला आपली पुढची पिढी कशी घडवायची आहे हे पूर्णतः आपल्यावर अवलंबून आहे. जर आपणच आपल्या मातृभाषेला नाकारलं तर पुढे आपली पिढी आपल्यालादेखील नाकारायला कमी करणार नाही. त्यासाठी मातृभाषा शिका, शिकवा आणि तिला वाचवा. कारण जे मातृभाषेत शिकता येतं, घडवता येतं ते इतर कोणत्याही भाषेने घडवता येत नाही. म्हणूनच माझ्या जिजाईने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवत असताना मातृभाषेचे ज्ञान आधी दिले आणि नंतर इतर भाषा शिकण्यास आग्रह केला, कारण तेव्हाच तर आपल्याला इतर जगहाटी समजेल. आपल्या मातृभूमीवरील कलागुणांना वाव दिला, भालाफेक, घोडसवारी, तलवारबाजी इत्यादी धाडसी खेळ जिजाऊ माता स्वतः शिकल्या आणि मग शिवबाला शिकवल्या. म्हणूनच आज आपण महाराष्ट्रामध्ये ताठ मानेने जगत आहोत आणि अभिमानाने राहत आहोत. मग तसेच जर आपल्या पुढच्या पिढीने राहावसे वाटत असेल किंवा येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्यांना या भवसागरात अभिमानाने जगायचे असेल तर मातृभाषा शिकणे खरंच गरजेचे आहे असे वाटते. - निवेदिता सचिन बनकर नेवसे